Friday, 10 December 2021

फोबिया...

Spine chilling psycho-thriller असं म्हणता ज्या कथेकडे पाहता येईल, तो चित्रपट म्हणजेच "फोबिया..."

महेक देव (राधिका आपटे) या अत्यंत कुशल चित्रकाराभोवती फोबियाचं कथानक फिरतं. एक आघाती क्षण महेकच्या मनाला अंतर्बाह्य बदलतो आणि एका मानसिक आजाराने ती ग्रस्त होते. सर्वांमध्ये मिळूनमिसळून राहणारी महेक अचानक लोकात मिसळेनाशी होते, एकलकोंडी होत जाते. तिचा हा आजार वाढत जातो आणि त्याचा त्रास तिच्या घरच्यांना होऊ लागतो. यातून बाहेर पडण्यासाठी महेकचा मित्र तिला एका रिकाम्या फ्लॅटमध्ये घेऊन येतो आणि तिथून कथानक वेगळेच वळण घेते...

महेक राहत असलेल्या नव्या घरात पूर्वी काहीतरी अघटित घडलं आहे असं तिला जाणवत राहतं. महेकला विचित्र आवाज येऊ लागतात, अनेक गोष्टी दिसू लागतात. हे सर्व भासच आहेत हे महेकचा मित्र सिद्ध करतो खरा पण महेकला हे पटत नाही आणि या घरात घडलेल्या दुर्घटनेला पुराव्यानिशी सर्वांसमोर आणण्याचा ती चंग बांधते. अखेर सत्य समोर येतं ते महेकच्याच प्रयत्नांमुळे. अशी कोणती घटना घडली त्या घरात... ते भास होते की खरंच अशी घटना घडली... या प्रश्नांची उत्तरं चित्रपटाच्या शेवटी मिळतातच...

साचेबद्ध कथेला तितक्याच सक्षम पटकथेची व पार्श्वसंगीताची जोड लाभल्याने चित्रपट कुठेही पकड सोडत नाही. चित्रपटाच्या काही दृष्यांमधून धक्कातंत्राचा सुरेख वापर दिसतो. कथेतलं ते घर भयावह वाटण्यासाठी वापरलेल्या प्रकाशयोजनेने चित्रपटात वेगळेच रंग भरले आहेत. या सर्वांपेक्षाही चित्रपटात जी गोष्ट जास्त लक्षात राहते, ती म्हणजे राधिका आपटे. भास व सत्य या द्वयींमध्ये सापडलेली, त्यांचा समन्वय साधण्याचा प्रयत्न करणारी महेक देव ही व्यक्तिरेखा राधिका आपटेने अत्यंत सुंदर साकारली आहे. भय, मनाचा उडालेला गोंधळ, व स्वत:चा बचाव, हे भाव एकाच वेळी दाखवताना राधिका आपटेने दमदार अभिनयाचं दर्शन घडवलं आहे...

एकंदरीत, चित्रपटाच्या शेवटापर्यंत रहस्य टिकवून ठेवत क्षणोक्षणी प्रेक्षकांची उत्कंठा वाढवत जाणारा psycho thriller "फोबिया", आवर्जून पहावा असाच आहे...

@ अनिकेत परशुराम आपटे.

Tuesday, 7 December 2021

गरम धरम ही-मॅन...

"कुत्ते... मैं तेरा खून पी जाऊँगा...!!!", "बसंती, इन कुत्तों के सामने मत नचना...!!!", "आ रहा हूँ मैं...", हे आणि असे अनेक संवाद अजरामर झाले ते धरमसिंह देओल अर्थात लोकप्रिय अभिनेते धर्मेंद्र यांच्यामुळे...

हिंदी चित्रपटांमधला 'ही-मॅन' असंही त्यांना संबोधलं जातं. पण त्यांची सर्वात जास्त प्रसिद्ध उपाधी 'गरम धरम'च होती.  १९६० साली प्रसारित झालेल्या, "दिल भी तेरा हम भी तेरे" या चित्रपटाद्वारे धर्मेंद्र यांनी रुपेरी पडद्यावर पहिलं पाऊल ठेवलं. "सूरत और सीरत", "बंदिनी", "दिल ने फिर याद किया", "काजल", अशा अनेक चित्रपटांमधून धर्मेंद्र हलक्या व रोमँटिक भूमिका करताना दिसले. रोमँटिक चित्रपटांसोबतच, "हकीकत", "बाज़ी", "फूल और पत्थर", "आँखें" अशा चित्रपटांमधून झळकत, धर्मेंद्र यांनी हाणामारी चित्रपटांकडे मोर्चा वळवला...

एक नायक असलेल्या चित्रपटांतून यशस्वी होत असल्यामुळे, "धरमवीर", "राम-बलराम", "यादों की बारात", "कातिलों के कातिल", "राज तिलक", "शोले" अशा, दोन किंवा अधिक नायक असलेल्या चित्रपटांमध्ये धर्मेंद्र यांच्या भूमिकांना अधिक वाव मिळालेला दिसला. "शोले"आधी, अशोक किंवा सुनील ही नावं धर्मेंद्र यांना प्रमुख्याने मिळायची. पण "शोले"नंतर, 'वीरू' हे नाव जणू त्यांना चिकटलंच. जसं, 'प्रेम' हे नाव ऐकल्यावर सलमान खान आठवतो, 'विजय' म्हटल्यावर अमिताभ बच्चन दिसतात, तसंच 'वीरू' हे नाव ऐकताच धर्मेंद्र डोळ्यांसमोर उभे राहतात...

'ऍक्शन हिरो' म्हणून जिथे धर्मेंद्र यांनी जम बसवला होता, तिथेच, "चुपके चुपके", "नौकर बीवी का" अशा चित्रपटांमधून काम करत त्यांनी विनोदी भूमिकांमधेही हात आजमावला. "शोले"मधला तो टाकीवरचा सीन असो किंवा "द बर्निंग ट्रेन"मधला छेडाछेडीचा सीन असो, "सीता और गीता"मधला शेवटचा सीन असो किंवा "ग़ज़ब"मधला भुताला घाबरणारा सीन असो, धर्मेंद्र यांनी ते सीन आणि भूमिका जबरदस्त यशस्वी केल्या. अदाकारीसोबतच धर्मेंद्र अजून एका गोष्टीसाठी प्रसिद्ध होते. ती गोष्ट म्हणजे त्यांची विशेष नृत्यशैली. "मैं जट यमला पगला दिवाना...", "होली के दिन दिल खिल जाते है..." अशा अनेक गाण्यांमधून धर्मेंद्र यांनी सादर केलेली अफाट नृत्य, त्या गाण्यांपेक्षाही जास्त लोकप्रिय झाली...

आज ८ डिसेंबर. धर्मेंद्र यांचा जन्मदिवस. आपल्या सर्वांच्या लाडक्या या गरम धरम ही-मॅन वीरूला वाढदिवसाच्या कोटी कोटी शुभेच्छा...

@ अनिकेत परशुराम आपटे.

तीन तिगाड़ा...

"सत्यमेव जयते २ पाहिलास का...???" असा प्रश्न विचारला असता मी उत्तर देईन, "हो पाहिला..." पण याचसोबत माझा मलाच एक प्रश्न असेल. तो म्हणजे, का पाहिला...!!!

तर, मोठ्या डोळ्यांची पांढरी फटक विद्या (दिव्या खोसला कुमार), डोल्ले-शोल्ले दाखवत तोडम् तोड हाणामारी करणारा इनिस्पेक्टर जय (जॉन एब्राहम), आणि चष्मा लाऊन पॉलिटिकल कापडं घालून फिरणारा होम मिनिश्टर सत्या (परत एब्राहमांचा जॉनच), असे तिघं असतात. अजून पण लोक्स आहेत, पण दंगा या तिघांचाच जास्त...

भ्रष्ट अधिकारी, आपलं काम न करता इतरांना त्रास देणारी माणसं, यांचे खून पाडण्याचं काम एक घूँघटधारी समाजसुधारक करत असतो. त्या खुन्याला पकडण्यासाठी सत्या जयची नेमणूक करतो. तरीही खून तर थांबत नाहीतच पण पोलीस तपास करतानाही दिसत नाहीत. मग येतो एक ट्विश्ट. खूनी आणि त्याच्या मदतनीसाच्या रूपात राम-बलराम (प्रतिकात्मक नावं बरं का...) समोर येतात...

एकीकडे खून होत राहतात पण पीडितांना भेटी देणे आणि टेबल तोडणे याखेरीज अजून काही करताना सत्या दिसत नाही तर, खुनाचा तपास चालू आहे असा भासही जय निर्माण करत नाही. मग येतो फ्लॅशबॅक. अजून एक जॉन एब्राहम (बाबो... तीन तीन जॉन... "हद कर दी आपने"... ही तर "महान" "आयडियाची कल्पना" झाली...) त्या फ्लॅशबॅकमधून प्रकटते एक माँ, जी सध्यातरी स्लीपिंग स्लीपिंगच आहे. आणि समोर येतो मेण व्हिलन, जो सध्यातरी साधूसंत येती घरा असा आहे...

चेतेश्वर पुजाराला अचानक सूर गवसावा तशी ती स्लीपिंग मम्मी खडबडून जागी होते. कोणीही न सांगता एका ठिकाणी येऊन मेण व्हिलनला बरोब्बर ओळखते. मग बदला-बदली, ढिशूम-ढिशूम आणि मेण व्हिलन खतम. पहिलं व्हर्जन पाहिल्यावर या भागाकडून वेगळी अपेक्षा होती. पण अपेक्षाभंग काय असतो ते परफेक्ट समजलं. एक शोधकथा म्हणून, "सत्यमेव जयते" जिथे ओळखला गेला, तिथेच हा चित्रपट विध्वंसक हाणामारीच दाखवतो फक्त...

एखादा जोशपूर्ण संवाद म्हणायचा असो किंवा गंभीर दृष्य असो, रोमँटिक सीन (एकच आहे म्हणा...) असो किंवा विनोदी दृष्य (हे सुद्धा एखादंच आहे बरं...) असो, दिव्या खोसला कुमार सतत डोळे फाडून फाडूनच पाहत असते. इतकंच कशाला, एकमेव डान्स साँग तिच्या वाटेला आलं आणि त्यातही डोळे मोठ्ठे करून ती ठुमके लगवते. पूर्ण चित्रपटात तिचे ते मोठ्ठे डोळे पाहताना असं वाटतं, मध्येच डोळे सांडतील आणि या चित्रपटातले तिचे डायलॉग विसरून दिव्या "मशाल" चित्रपटात घुसून म्हणेल, "ए भाय... कोई मेरी आँखें दिला दो भाय... पिक्चर पूरी करनी है..."

जॉन एब्राहमला तीन वेगळ्या भूमिकेत दाखवलं गेलं. चष्मा लाऊन राजनैतिक कपडे घातलेला जॉन अधिक भावतो. तुर्रेबाज फेटा आणि ऐटबाज मिशीवाला जॉनसुद्धा बरा वठलाय. पण खाकी वर्दीतला जॉन बघवत नाही. जॉन एब्राहमला आजवर पोलिसाच्या भूमिकेत पाहिलं नसल्याने कदाचित मला तसं वाटलं असेलही. मंत्री जॉन आणि शेतकरी जॉन आपापली कामं करताना दिसतात तरी. पण पोलिसवाला जॉन, हाणामारी आणि ओढून-ताणून केलेली कॉमेडी याखेरीज काहीच करताना दिसत नाही...

भाग्यश्री लिमये संपूर्ण चित्रपटात अधून-मधून दिसत राहते. पण चित्रपटाच्या शेवटच्या भागात तिला मिळालेला मोठा सीन तिने छान सांभाळला आहे. इतर सीन कधी संपतील असं होतं, पण भाग्यश्री लिमयेने सादर केलेला सीन संपूच नये असं वाटत राहतं इतपत चांगली अदाकारी झाली आहे...

पहिल्या "सत्यमेव जयते"मध्ये हिरोईन असून जॉन एब्राहमला चित्रपटाच्या शेवटी मारून टाकलं गेलं आणि हिरोईनला फुकट घालवलं होतं. पण यावेळी त्याची भरपाई करत दोन्हीही जॉनांना जित्तं सोडल्यानीत. ज्यूनियर जॉन डबल रोलमध्ये,आणि सीनियर जॉनऐवजी कोणीतरी दुसरा असता, शिवाय ज्यूनियर जॉनांमध्ये सस्पेन्सफूल गोंधळ दाखवला असता, तर हसू न येणारा एक विनोदी सीन कमी झाला असता आणि कथेत वेगळी वळणं दाखवता आली असती...

एकंदरीत, नो सक्षम कथानक, नो अप्रतीम अदाकारी, सुंदर कॅमेरा अँगल्स आणि तोडूफोडू हाणामारी असं मिक्चर असल्याने तीन तीन जॉनांच्या या तीन तिगाड़ा "सत्यमेव जयते २"चा काम बिगाड़ा झालाय हे नक्की...

@ अनिकेत परशुराम आपटे.

Saturday, 27 November 2021

हवाहवासा "झिम्मा..."

Some crazy tourists, one handsome tour manager, a tour filled with exotic locations and some beautiful moments; हीच थीम आहे हेमंत ढोमे दिग्दर्शित, "झिम्मा" या चित्रपटाची...

आपापल्या व्यक्तिमत्वात अडकलेल्या आणि स्वत:लाच हरवलेल्या अशा वेगवेगळ्या वयोगटातल्या बायका एकत्र येतात आणि ट्रिप सुरू होते. एकीकडे टूर चालत राहते, तर दुसरीकडे व्यक्तिमत्वांची जुळवाजुळव होऊन जोड्या जमत जातात. काही वेळा दृष्यांतून तर काही वेळा संवादांमधून, कथानक त्या त्या व्यक्तिरेखांच्या भूतकाळात डोकावत राहतं आणि त्या सर्व व्यक्तिरेखांची व्यक्तिमत्व समोर येतात...

व्यक्तिरेखांमध्ये असलेले शाब्दीक आणि वैचारीक मतभेद, त्यातून होणारे वादविवाद, समुहात पडलेली फूट, समेट आणि अखेर सुखांत, असा प्रवास करत चित्रपट एका refreshing endवर संपतो. कथानक नवीन नसावं. कारण "दिल चाहता है" आणि "ज़िंदगी ना मिलेगी दोबारा" या दोन चित्रपटांची पदोपदी आठवण होते. निदान मला तरी होते. पण मराठीत हा नवीन विषयींपैकी एक आहे हे नक्की...

चित्रपटात तीन गाणी आहेत. तीनही गाणी कथानकासोबत जात असल्याने, कथेला कुठेही ब्रेक लागला असं वाटत नाही. चित्रपटाचं शीर्षक गीत जिथे कथेतल्या पात्रांची ओळख करून चित्रपटाची सुरुवात करतं, तिथेच कथेच्या अगदी शेवटी येणारं, "अलविदा..." हे गाणं, त्या सर्व पात्रात झालेल्या सकारात्मक बदलांचं दर्शन घडवतं...

चित्रपटातले दोन सीन्स मला विशेष आवडले. पहिल्या सीनमध्ये मीता मागेच राहिल्याने एकटी पडते. अनोळखी वातावरणाने बावरलेली मीता, तिच्या मुलीने शिकवल्याप्रमाणे गूगल मॅप्सचा आधार घेऊन हव्या असलेल्या ठिकाणी पोहोचते. त्यावेळी, "येस... आपण करून दाखवलं..." असं सांगणारे जे विजयी भाव तिच्या चेहेऱ्यावर आलेत ना, ते अप्रतीम आहेत. दुसरा सीन आहे इंदू आणि वैशाली यांच्यात झालेल्या समेटचा. दोघीत पुन्हा मैत्री होते आणि त्याच वेळी बाजूला एक सफेद पक्षी उडत जातो. हा निव्वळ योगायोगही असू शकेल, पण त्या पक्षाचं उडणं आणि दोघींचं एकदम स्मितहास्य फुलवणं, हे टायमिंग छान जमून गेलं...

माझ्या मते काही गोष्टी मात्र गुलदस्त्यातच राहिल्या...

कृतिका, इतकी वर्ष जतन करून ठेवलेली आणि कोणालाही वाचायला न दिलेली डायरी समुद्रात फेकून देते. त्यामागचं नेमकं कारण नाही समजलं...

हा नायिकाप्रधान चित्रपट आहे. पण तरीही थोडाफार का होईना, पण कबीर या चित्रपटाचा नायक आहे. जेव्हा समुहात फूट पडते, तेव्हा टूर मॅनेजर म्हणून नाही, तर एक माणूस म्हणून कबीर भांडण मिटवण्याचा प्रयत्न करताना दिसत नाही. कदाचित अशी काही युक्ती दाखवली गेली असती, तर त्या सर्वांच्या नात्यात आणि चित्रपटात अजून मजा आली असती...

या कथानकात प्रत्येक व्यक्तिरेखेला एक स्वतंत्र भूतकाळ दिल्याचं दिसतं. पण रमाला स्वतंत्र असं वेगळं कथानक दिलं गेलं नाही. रमा फक्त फोटो काढण्यापुर्ती आणि ट्रिपमधली एक सदस्य आहे इतकंच दाखवण्यापेक्षा तिला मिळालेल्या हॅटच्या पार्श्वभूमीवर एखादा संवाद किंवा प्रसंग फुलवता आला असता...

एक मुलगी समुहातून नाहीशी होते. पण एक सीन सोडल्यास या प्रसंगाचं गांभीर्य कोणामध्येही दिसलं नाही. टूर मॅनेजर काही प्रयत्न करतोय किंवा इतर सदस्य काही फोनाफोनी करत आहेत असंही जाणवलं नाही...

तरीही, सुंदर लोकेशन्स, मराठीत घेतलेला एक नवा विषय, अप्रतीम कॅमेरा शॉट्स, तगड्या कलावंतांच्या फळीने केलेली सहज सुंदर अदाकारी आणि मैत्री या नात्याची नवी पालवी फुटलेल्या मित्र-मैत्रिणींच्या संवादावर होत असलेला सुंदर शेवट, यांसाठी इरावती कर्णिक लिखीत, "झिम्मा" हा चित्रपट नक्कीच पहावा असाच आहे...

@ अनिकेत परशुराम आपटे.

Tuesday, 23 November 2021

सवताच आटपलेला भयपट...

मंदी येक आसा शिणुमा पायला म्हनून सांगू... पायलास का आसं विचारल्यावर का पायला... आसं जालं ओ माजं... तर, डॉकॅलिटी बाजूला टिऊनश्यानी पिक्टुरे बगायचा आसंल तर "जानी दुश्मन - एक अनोखी कहानी" हा शिणुमा हायेच की...

तर, कपिल ("कहर" कोहली किंवा अरमान कोहली बी चालंल) आनी वसुंधरा ("बॉम्बे" कोयराला) ह्ये नाग-नागिनीचं जोडपं येकम्येकांवर पिरेम करत आसतं. कपिलने संभरी वलांडली आसती म्हनून तेला यक्श्ट्रो पावर गावली आसती. वसुंधरा आजून ल्हान आसती म्हनून ती काय यवडी पावरबाज नसती. कपिल आनी वसुंधरा नाच-गानं करत असत्यात तवाच येका गोसावड्याचा तपोभंग व्हतो आनी त्यो वसुंधराला मारून टाकतो. कपिल लईच गळ घालतो तवा त्ये गोसावडं कपिलला झाडमंदी कोंडून ठ्येऊन यकवीसाव्या सतकात भाईर याया सांगतं...

ह्यो जाला मागला जनम... आता कट टू यकवीसावं सतक...

वसुंधरा व्हर्जन टू म्हन्जी दिव्या, यका कालिजात शिकत आसती. थितं, शाना अतुल ("सूर्यवंशी" कुमार), बॉक्सर विजय ("बलवान" शेट्टी), शिरमंत अशोक ("सैलाब" पांचोली), रोमांचिक प्रेम ("मस्त" शिवदासानी), विनोद्या अब्दुल ('सर्किट' वारसी), फोटुग्राफर विक्टर ("जोश" कपूर) आनी कच्चा लिंबू विवेक ('सुरेल' निगम) अशी हांडसम फंटर लोकांची फौज दिव्यासोबत आसताना बी दिव्याला ढाई किलो के हाथवाला करणच ("गदर" देओल) आवडतू. यवडी ताकदीची मानसं आसताना बी, चालू राजेश ("२००१" बेदी) आनी येडा मदन (सिद्धार्थ किंवा "वंश" रे) हे दोगं दिव्यासोबत... आरारारारा...

दिव्या आतमहत्या करती आनी तवाच कपिल थितं येतू. हितून होते बदला-बदली श्टारट. त्या फंटर लोकांपैकी काहींना कपिल नाग्या मारतू तर काहींना दिव्या भुतीण मारती. कालिजचा परोफेसर जोसेफ ("ऐतबार" बब्बर) तेच्या परीनं या पोरांला वाचिवन्याचा परयतन करतू पन पावरबाज दिव्या आनी कपिलम्होरं कोनाचं काय बी चालत न्हाय. कोने येके काली तेंडुलकरांचा सचिन आऊट जाल्यावर कसे बाकीचे तेची ब्याट धरून पुन्ना प्याविलियनकडं परतायचे, तसंच हितं बी येका मागून येक समदे फंटर लोक्स टपकत्यात. मंग येतू आपला ओरड्या-आरड्या करण. परोफेर जोसेफने दिलेल्या अचाट पावरनं करण त्या नाग्या कपिलला धोपटतो आनी मारून टाकतो...

हानामारी म्हनाल तर "टर्मिनेटर", "मॅट्रिक्स", "ट्रू लाईज" हे फारिनचे शिणुमे आठिवतात. गानी तर... काय बरं गानी ती, "ग्यारह बजे या बारा बजे...", "जावेद भाय सो रे ले..." आता गं बया... काय बोलनार यावर. कलाकार तर लय दमदार घेतल्यानीत. सोनू निगम, आफताब शिवदासानी चालून गेले, पर आदित्य पांचोली, सुनील शेट्टी, अक्षय कुमार, अरशद वारसी, मनीषा कोयरालासारखी मंडली कालिजात... हाय रे माज्या कर्मा...

काई शीण तर काय च्या काय आंगावर आले बगा...

कपिल ज्या झाडामंदी कदीच्या काली जाऊन बसतो, यवडं वरीस निगुन गेलं तरी त्या झाडाच्या आसपासचं काय बी बदललं न्हाय, कमालच की...

भर कालिजात अतुल दंबूक घेऊन येतो आनी वर चालवतो बी. तरी तेला कोनी काय बी बोलत न्हाय. ह्ये कस्स्काय...

येक दंबूक सापडली तवा त्या संजूबाबाला जेलामंदी जावं लागलं. हितं तर अतुलकडं आक्का बाम्बर (म्होट्टा पाईप ओ जेच्यातून बाम्बचे गोले सुटतात...) आसतुय. तरी पन त्यो शेप कसा...

नाग नाचतू काय, आफताब आदित्यला हानतो काय, नरसिंह अवतारावानी करण त्या नाग्याला फाडून काढतो काय, समदंच डोस्क्यावरून आणि डोस्क्यात जानारं व्हतं. पर येक हाय... समद्या फंटर लोक्सना हिरवीनी दिल्या. तेंची कापडं जवडी कमी व्हते, तेंची याक्टिंग पन कमीच व्हती. जवा ते समदे लोक्स टपकले तवा या हिरवीनी फुकाट गेल्या ना राव...

त्या लंबू अरमान कोहलीचं पुन्यांदा बारसं करून, मोहनीश कोहली बनवून त्यासनी म्होट्या पडद्यावर आनाया राजकुमार कोहलीने "जानी दुश्मन - एक अनोखी कहानी" ह्यो शिणुमा बनिवला खरा. पर त्यो परयतनाचा टराय फसला आणि शिणुमाने सवताच सवताला हानून आपटवला...

@ अनिकेत परशुराम आपटे.

Sunday, 21 November 2021

बंडखोर कथा की सूडकथा...

हाणामारी व जाळपोळीच्या दृष्यांनी सजलेली कथा, असं ज्याचं सार्थ वर्णन करता येईल तो चित्रपट म्हणजे, "सत्यमेव जयते..."

पोलीस गोटातल्या काही भ्रष्ट अधिकाऱ्यांना संपवण्याचा विडा उचललेला एक तरूण (जॉन एब्राहम) आणि त्याच्या विरुद्ध उभा ठाकलेला कर्तव्यदक्ष व इमानदार पोलीस अधिकारी (मनोज बाजपायी) यांच्यामधल्या संघर्षाची ही कथा. असंख्य हाणामारीची दृष्य, जाळपोळ, गाड्यांचे स्फोट, आयटम साँग, नायकाचं एकाच वेळी चार-पाच जणांना मारणं, नायिकेसोबत प्रणय-द्वंद्वगीत गात फिरणं अशा एकेकाळच्या मसाला चित्रपटांच्या लोकप्रिय घटकांचा यात भरणा केला गेला आहे...

कमकुवत कथेला तितक्याच कमकुवत पटकथेची व संगीताची जोड मिळाल्याने चित्रपट पकड घेत नाही. नवतारका आयेशा शर्मा यांचा वावर आणि कपडेपट चांगले आहेत पण अदाकारी व संवादफेक यांमध्ये मात्र त्यांनी निराश केलं. अमृता खानविलकर यांनी त्यांच्या छोट्याशा भूमिकेत छान रंग भरलेत. हिंदी-मराठी मालिकांमधून अत्यंत लोकप्रिय झालेल्या काही कलाकारांनीही या चित्रपटात आपलं कसब दाखवलं आहे. पण चित्रपट ज्यामुळे लक्षात राहू शकेल अशा फक्त दोनच गोष्टी आहेत. एक म्हणजे जॉन एब्राहम व मनोज बाजपायी यांच्यातली शाब्दीक द्वंद्व दृष्य आणि दुसरं म्हणजे या दोघांची अदाकारी...

चित्रपटातले दोन प्रसंग जरासे खटकले. तीन खून होतात. त्या ठिकाणच्या नावांची पहिली अक्षरं एकमेकांशी जुळवून, तो अज्ञात खूनी कुठल्या मार्गाने चाललाय आणि पुढचा खून कुठे होणार हे इंस्पेक्टर सहज शोधून काढतो. मिळालेल्या पहिल्या तीन अक्षरांच्या आधारे पोलीस यंत्रणेशी जोडलेले अनेक शब्द बनू शकतात. पण इंस्पेक्टर मात्र ते दोन शब्द धरूनच तपास पुढे नेतो. दुसरा प्रसंग म्हणजे खुन्यापासून वाचावं म्हणून काही पोलीस अधिकारी एकाच जाग एकत्र येऊन राहतात. हे दृष्य पोलीस खात्याला बदनाम करणारं आहे असं मला वाटतं...

मुख्य नायक असल्याने जॉन एब्राहमला चित्रपटात भरपूर वाव मिळालाय. पण सहनायक मनोज बाजपाईला एखाद-दुसरी गोळी झाडणे आणि संवाद, याखेरीज अजून काहीच काम दिलेलं दिसत नाही. कार्यप्रणाली आणि भ्रष्ट पोलीस अधिकारी यांच्यावर चिडलेला सामान्य माणूस पेटून उठतो आणि त्यांचे खून करतो हा कथाभाग शेवटी शेवटी सूडनाट्यात बदलत जातो. सूडकथे ऐवजी जर बंडखोरकथाच ठेवली असती तर कदाचित परिणा वेगळा झाला असता...

बराच काळ मसाला चित्रपटांनी हजेरी न लावल्याने या चित्रपटाचा घाट घातला असावा, असं चित्रपट पाहताना वाटतं. एकंदरीत one time watch या पठडीत मोडणारा, "सत्यमेव जयते", मसाला चित्रपटांच्या शौकीनांसाठी परवणीच आहे असं म्हटलं तरी हरकत नाही. आता "सत्यमेव जयते २" येऊ घातला आहे. येणारा हा चित्रपट, "सत्यमेव जयतेचा सीक्वल आहे, की यात नवीन काही असेल, हे तर चित्रपट प्रदर्शित झाल्यावरच समजेल...

@ अनिकेत परशुराम आपटे.

Saturday, 20 November 2021

स्पर्धा, भावनांची संपत्तीशी...

भावना श्रेष्ठ की पैसा, या विषयावर हळुवार भाष्य करणारं कौटुंबिक नाटक म्हणजे, सुधीर जोशी दिग्दर्शित, "घर श्रीमंताचं..."


वसंत कुलकर्णी (सुधीर जोशी), नीला कुलकर्णी (आशा काळे), सीमा कुलकर्णी (नीलम शिर्के), प्रशांत कुलकर्णी (शेखर फडके), हे एक मध्यवर्गीय चौकोनी कुटुंब आणि मनोहर बापट (अतुल परचुरे), हा त्या चौकोनी कुटुंबात नव्याने प्रविष्ट होणारा त्या कुटुंबाचा जावई. ते चौकोनी कुटुंब आणि मनोहर यांचं एक रेष पकडून छानपैकी आयुष्य सुरू असताना, पूर्वज व दैवामुळे या कुटुंबाकडे एका मार्गाने पुष्कळ पैसा येतो...

नवं घर, नवी गाडी, हे सगळं झाल्यावर ज्या मार्गाने आधीचे पैसे मिळाले, त्याच मार्गाने अजून पैसे मिळवावेत, हा विचार वसंत आणि प्रशांतच्या मनात डोकावतो. त्याच मार्गावर, नीलाच्या भावना गुंतल्या असल्याने पैसा विरुद्ध भावना, असा कलह निर्माण होतो. पैसा श्रेष्ठ की भावना, अशी एक स्पर्धा त्या घरात जन्म घेते आणि पैशाला श्रेष्ठ मानणारे वसंत, सीमा आणि प्रशांत एका बाजूला होतात तर भावनांना वरचढ मानणारी नीला दुसऱ्या बाजूला जाते...

पैसा हा महत्वाचा असतोच. पण पैशापेक्षाही, मनात जतन केलेल्या लाखमोलाच्या भावनाच श्रेष्ठ असतात हे आपोआप सिद्ध होतं आणि कुलकर्णींच्या घरात घडणारं हे नाट्य, सुखांतावर संपतं...

नाटकातले काही प्रसंग फार सुंदर लिहिले गेले आहेत...

आईने उघड केलेलं गुपित...

आपल्याला एक मुलगा आवडतो हे मुलीने घरी सांगणं जितकं अवघड असतं, तितकंच अवघड असतं या गोष्टीला आई-वडिलांचा होकार मिळवणं. मनोहर निघून गेल्यावर सीमाशी बोलता बोलताच तो मनोहरच आहे, हे अलगदपणे नीला उघड करते तो प्रसंग सुंदर रेखाटलाय...

वडिल-मुलीचा संवाद...

प्रेम विवाहातलं सर्वात धोक्याचं वळण म्हणजे वडिलांची परवानगी. इतक्या नाजूक विषयाला मजेशीर आणि फिल्मी पद्धतीने मांडताना, लेखकाने त्या प्रसंगातल्या विषयाचं गांभीर्यही छान जपलं आहे. परवानगी दिल्यावर सीमाच्या लहानपणापासून ते आत्तापर्यंतचा धावता वृत्तांत जेव्हा वसंत सांगतात, तेव्हा डोळ्यात पाणी येतं...

प्रेमाची कबूली...

जुलूम जबरदस्ती न करता आपण प्रेमानेही आपल्या व्यक्तीला बदलू शकतो, हे दाखवणारा एक सुंदर प्रसंग नाटकात आला आहे. मनोहर कविता ऐकवून पूर्ण करतो. कविता ऐकताना सीमाच्या मनाची द्विधा मन:स्थिती होते. सरतेशेवटी मनोहरने कवितेतून मारलेल्या हाकेला सीमा कवितेनेच उत्तर देते आणि पैशाची बंधनं तोडून भावनेकडे जाते. समजवा-समजवीवर भर न देता, लेखकाने हा प्रसंग रेखीव शब्दात सुरेख रेखाटला आहे...

पैशाची नशा...

संपूर्ण नाटकात वेगळ्या विचारात वावरणारं, थोड्या ग्रे शेड दाखवणारं पात्र जर कोणी असेल तर तो आहे प्रशांत. त्याच्या बोलण्यातून, वावरातून पैशाची नशा, पैशाचा बडेजाव सतत दिसून येतो. प्रशांतसोबत रंगवलेले दोन प्रसंग मला जरा खटकले. आपले १०-१२ रुपये गेले तरी आपला जीव कासावीस होतो. नाटकात एक संदर्भ आला आहे की प्रशांतचा पार्टनर प्रशांतचे एक लाख रुपये बुडवतो. पण त्याबद्दलची अस्वस्थता कुठे जाणवली नाही. आपल्या हाती असलेला पैसा आपल्याला वाढवायचा असतो तेव्हा त्या पैशाला कामाला लावण्यासाठी आपण मार्ग शोधतो. पण प्रशांतच्या वागण्या-बोलण्यात ती अधीरता दिसत नाही. वास्तविक प्रशांतच्या पात्राला थोडं खुलवता आलं असतं असं मला वाटतं...

नवरा-बायकोचे अबोल संवाद...

वसंत दारूच्या अमलाखाली काहीतरी बरळत असताना, ते दारू प्यायलेले नाहीत असं नीलाने सांगणं, घरात लुटुपुटूचं विभाजन असूनसुद्धा खोबऱ्याच्या वड्या आणि गजऱ्याची देवाणघेवाण होणं, या दोन प्रसंगातून वसंत आणि नीला एकमेकांना किती छान समजतात, हे दिसतं. शाळिग्राम आणि कलश कसे मिळाले हे सांगत असताना एका क्षणासाठी नीला थांबते आणि सीमाला वसंतच्या हातात असलेला कलश धरायला मदत कर असं सांगते. या प्रसंगातून वसंत आणि नीला यांच्यातले अबोल संवाद प्रकर्षाने जाणवतात. हा प्रसंग संपूर्ण नाटकाचा हाय पॉईंट आहे असं मला वाटतं...

नाटकाच्या विनोदी प्रसंगांचं म्हणाल, तर सुधीर जोशी, अतुल परचुरे आणि शेखर फडके या तगड्या खेळाडूंनी ते प्रसंग सुरेख हाताळले आहेत. माझ्या मते आशा काळे आणि नीलम शिर्के या बाबतीत जरा कमी पडल्या...

थोडक्यात, पैसा आणि भावना दोन्हीही जरी समान असले, तरीही पैशापेक्षा भावना अधिक मौल्यवान, हे दाखवणारं हेमंत ऐदलाबादकर लिखित, "घर श्रीमंताचं" हे नाटक आवर्जून पहावं असंच आहे...

नाटकाची लिंक - https://youtube.com/watch?v=N-VOMqZcqyk&feature=share

@ अनिकेत परशुराम आपटे.

Friday, 19 November 2021

हम साथ साथ हैं - मला गावला तसा...

मंडळी, सूरज बरजातिया भाऊसाहेबांनी HAHKनंतर अजून एक फ्यामिली पिक्टुरे बनवला. तो होता, "हम साथ-साथ हैं..."

तर, रामकिशन (आलोक नाथ) नावाचा येक म्होट्टा मानूस असतोय. तेच्या पैल्या बायकोचा (आक्क्या शिणुमात पैली बायकोच दाखिवली न्हाय. तिचा सादा फोटू बी न्हाय... बहुत नाइंसाफी है...) पोरगा असतोय, येक हात्या विवेक (मोहनीश बहल). रामकिशनच्या दुज्जा बायकोला, ममताला (रीमा लागू... या शिणुमात लड़केवाली माय बनली. HAHKमंदी लड़कीवाली व्हती न्हवं...) तीन पोरं आसतीत, सरल मार्गी लाजरा प्रेम (आपला सल्लू भाय), लाडाकोडाची संगीता (नीलम कोठारी) आनी द्वाड, लेट उठ्या विनोद (क्रीना काकूचा न्हवरा ओ...). घरचा 'जावई माझा भला' आसतो हासतमुख आणंद ("तू तू मैं मैं"वाला म्हयेश टाकूर). येंच्या सोबत हायेत, ममताचा काला कोटवाला भाव आनी शिणुमातला मामा (अजित वाच्छानी, जो HAHKमंदी परोफेसर होता आन तेव्हा पन मामाच होता...) आनी नको तिथे विंग्रजी सांडनारी मामी (हिमानी शिवपुरी जिचे न्हवरा, धरम आनी काम तीनी पन बदलले...)

चला, ही हायेत घरची मंडली. आता भाईरच्या मंडलीमदे, एक आसतू हाटीलवाला पिरतम (साराभाईवाला इंदरवधन), रामकिशनचा धोतर फ्रँड, तेची पोरगी प्रीति (सोनाली बेंद्रे-बहल) जी थोडी डाक्टर पन हाय आनी प्रेमवर लाईन मारत हाय. प्रेम पन तिला लाईन देत आसतो. रामकिशनच्या रामपूर गावचे सक्के शेजारी, मौसीजी (शम्मी आँटी), तिचा पोरगा धरमराज (सदाशिव आमरापुरकर) आनी तेची पोर सपना (लोलो पकूर, आपलं ते क्रीस्मा पकूर). सपना आनी विनोद यांचा कायतरी जांगडगुत्ता आसतो बरं का. मग येक अनवर ("आऊ..." वाला शक्ति पकूर) आसतो जो विवेकचा फास्ट फ्रँड आसतो आनी शीक्रेटली सगल्यांसमोर रेहाना (हुमा खान) या ढोल्या शेक्रेटरीबायवर लाईक टाकत आसतो. आजून पन लोक्स हायेत, पर येक-दोन सीन करुशानी ते यग्झीट मारतात...

सगली कलावंत मंडली संपली येकदाची (किती ती गर्दी... त्यापेक्षा पंधरा डब्बा टरेन ल्हान आसल...) आता वलुया इश्टोरीकडं...

तर, विवेकचं लगीन, रामकिशनच्या बिझिनेस फ्रँड आदर्श बाबूच्या (राजीव वर्मा, आरं द्येवा, ह्यो रायलाच की...) पोरीशी, साधनाशी (तब्बू, म्येण हिरवीनच रायली की राव...) ठरतं. तिथून शिणुमा खरा सुरू होतो बगा. सगली कलाकार मंडली नाच-गानी करतात, उड्या मारतात, पिकनिला पन जातात. जालंच तर प्रेम-प्रीति आनी विनोद-सपना येंचा साकरपुडा म्हन्जी म्हराटीत वेंगेजम्येंट पन उरकतात. इथवर सगलं ठाक-ठिक बरं का. आता येतो कहानी में टविश्ट. त्यो आणंद बाबू असतोय का न्हाय, तेचा डुकधऱ्या थोरला भाव अनुराग (दिलीप धवन, "नुक्कड़"वाला गुरू ओ...) आयडियाची कल्पना करुनशान सगली इश्टेट बलकावतो. तेच्या बायकोला, ज्योतीला (शीला शर्मा) हे आवडत न्हाय. पर करनार काय ना बिचारी...

आणंद आनी संगीता घर सोडतात. हे बगुनशानी आगलाव्या धरमराज आनी ममताच्या घरफोड्या फ्रँड (कुनिकाताई, जयश्री टी ताई आनी कल्पनाताई अय्यर), हे चौगं ममताला घेराव घालून तिला भडकवतात. मग होतो 'ओम फट स्व:..' ममतेमदून चांगले विचार भाईर आन वाईट विचार आत. ममता हाट करून विवेक-साधनाला हाकलून देते. मग लय म्येलोडरामा. समदे रडत्यात, दुकी होत्यात. अनुरागच्या पोरासनी आलेला ताप सगल्यांच्या डोस्क्यातली हवा काडून टाकतो. साधना गाभन हून तीस पोर होतं, एक हात्या विवेकचा मोडका हात आचानक बरा होतो आनी सगलं आलबेल होतं. जे गानं श्टारटला लागलं त्येच गानं शेवटमदी वाजतं आनी स्माईल प्लीजवर शिणुमा सरतो...

मस्त मस्त गानी, छान छान नाचनी, ग्वाड ग्वाड डायलाग, पर तरी सवाल माझा ऐका...

पैला सवाल - संगीता सांगते, की आणंदने शिंप्यासमोर उबं ऱ्हाऊन सूट शिवून घ्येतला हाय. सादं प्यांट-शरट शिवायचं तर यक-दोन दिस लागत्यात, आनी हितं तर आखंड सूट हाय. त्यो शिवाया दोन दिस तरी ग्येलं आसल... मंग आणंद बाबूने दात कुटं घासलं आसंल, हागनदारीमुक्त कुटं जाला आसंल त्यो आनी शिवशंभो कुटं क्येलं आसंल...???

दुज्जा सवाल - साधनाबायला फ्यामिलीची वलक करून देताना पिरतम आनी आणंदबाबू दोगं पन श्टेजवर येतात. पर पिरतम यकलाच बोलत सुटतो. मंग आणंद बाबूला का पिरतमचा बाडीगारड म्हनून बोलावल्यानीत...???

तिज्जा सवाल - रामकिशन कंटुपरवर कायतरी टायपत आसतो. पन जेव्हा स्कीरीन दाखिवतात तेव्हा काय पन नसतं. मग काय आदृश होनाऱ्या फांटाने तेनी टाईपलं...??? बरं, तेचं बोलनं आनी टाईपनं यकाच लयीमदी आसतं. हे कस्स्काय...???

चवथा सवाल - तो मोर आपली पिसं फुलवून 'म्यौ म्यौ...' करतो तेव्हा सगले तेच्या यका हाकेत तेच्याकडं वर बगतात. मग विनोदला यकट्यालाच तो मोर कसा न्हाय दिसत...???

हे सवाल पडले खरे, पर पिक्टुरे आक्शी भारी राव. मोट्टे मोट्टे सेट्स आनी छान छान कापडं यकदम ब्येश...

@ अनिकेत परशुराम आपटे.

Wednesday, 17 November 2021

करन असलेला अजय आणि अर्जून असलेला विजय...

मंडळी पुनर्जनम म्हणजे मराठी re-incarnation, यावर अनेक शिणुमे बनले. त्यातलाच येक म्हन्जी "क"च्या बाराखडीतला, "करन-अर्जून..."

एक आटपाट नगर असतंय. तिथे दुर्जनसिंह (पुरींचा अमरीश) नावाचा राक्षस असतोय. इश्टेटीसाठी दुर्जनसिंह दुर्गाच्या (गुल्ज़ारांची राखी) दोन्ही कार्ट्यांना म्हणजे करनला (खानांचा सलमान) आणि अर्जूनला (खानांचा शाह रुख) मारून टाकतोय. पण करन आणि अर्जूनने रिटर्न तिकीट काढलेलं असतंय. त्यांचं बुकिंग अजय आणि विजय या नावाने झालेलं असतंय...

करन-अर्जून हाणामारीच्या बाबतीत कंडम पण अजय-विजय मात्र लय पावरबाज. वाट्टेल तेव्हा तंगड्या उडवत जाम भारी मारामारी करत असतात. तिथे गावात, ग्रामोफोनची पिन जशी अडकते, तशी दुर्गाबाईची सुई, "मेरे करन-अर्जून आएँगे..." या वाक्यावर अडकलेली असते. एक दिवस अजय-विजयचं कातडं पांघरलेले करन-अर्जून गावात येतात आणि दुर्जनसिंहची हवा टाईट होते. शेवटी लय भन्नाट हाणामारी होते आणि अजय झालेल्या करनकडून व विजय झालेल्या अर्जूनकडून दुर्जनकाका गोळ्या खाऊन टपकून जातात...

चला पिच्चर संपला. आता पिच्चरचे चारेक्टर...

दुर्जनसिंह...

हा प्राणी आक्क्या पिच्चरमध्ये म्हातारा होत नाही. करन-अर्जूनला मारतानाही त्याच्या मिशा आणि केस काळे असतात. आणि अजय-विजयकडून मार खाऊन मरतानाही ते काळेच असतात. बहुतेक दुर्जनकाका गोद्रेज हेयर डाय लावत असावेत...

दुर्गादेवी...

या काकूचं नक्की वय काय असावं... म्हणजे करन-अर्जून मरतात तेव्हा ही काकू शीनियरमंडळीत जमा होण्याच्या मार्गावर असते. जवळ-जवळ २०-२२ वर्षांनी रिटर्नच्या पासावर अजय-विजय परत येतात. तेव्हा या काकू खरंतर सुरकुतलेल्या थोबाडाच्या आजी दिसायला हव्यात. पण त्यांचं वय थोडंसंच वाढलेलं वाटतं. एकतर त्यांचा बालविवाह झाला असावा किंवा त्यांचा सीन नसेल तेव्हा त्या फेयर एँड लव्हली किंवा संतूर वापरत असाव्यात...

विजय किंवा अर्जूनची स्मरणशक्ती दाखवणारा चुड़ीवाला...

आपण एखाद्या दुकानदाराकडून एखादी गोष्ट विकत घेतल्यावर त्या दुकानदाराचा चेहेरा आपल्या लक्षात राहील न राहील. पण इथे अर्जून ज्या चुड़ीवाल्या चाचाकडून चुड़ियाँ विकत घेतो, २०-२२ वर्षांनंतरही त्या चाचाला बरोब्बर ओळखतो. हा विजय बहुदा बदाम खात मोठा झाला असावा...

या तीन चारेक्टरशिवाय मुनीमजी नावाचं येक चारेक्टर आहे जे दोन रुपयांचा हफ्ता मागत असतं आणि करन-अर्जून त्याला शेंडी लावतात. ते चारेक्टर त्या शेंडीमुळे बहुदा इतकं शरमलं, की तलावातल्या त्या चुल्लूभर पाण्यातच लपून राहिलं असावं. कारण नंतर ते परत आलंच नाही...

फिल्लममधल्या हिरवीनपैकी कुलकर्णींच्या ममताला जास्तच फुटेज मिळालं बरं का... म्हणजे, "इक मुंड़ा मेरी उम्र का..." या रोमांचिक गाण्यात हिरूसमोर, "भंगड़ा पा ले..." या फ्यामिली गाण्यात सासूसमोर, "गुपचूप गुपचूप गुपचूप गुपचूप..." या आयटम गाण्यात सावत्र चुलत सासरा व व्हिलनसोबत आणि "जय माँ काली..." या भक्ती गाण्यात दुज्जा हिरवीनसोबत नाचण्याचा चानस मिळाला. हे पाहून देवगणांच्या काजोलला किती वाईट वाटलं असेल ना...

माझ्या काही शंका पण आहेत बरं का...

वीस-बावीस वर्षात एखाद्या जागेत, तिथल्या गल्ल्यांमध्ये थोडेफार फरक होतात. करन-अर्जून जेव्हा बागडतात तेव्हाची घरं, घरांवरची कौलं, फुलबाग, भिंतींमधून दिसणाऱ्या विटा, हे सगळं जसंच्या तसं विजयला कस्स्काय दिसतं बौ...

सोनियाला दुर्जनसिंह काका आणि त्यांचा व्हॉट ए जोकवाला पोरगा, जबरदस्तीने किंड्याप करून हवेलीवर नेतात. तेव्हा सोनिया रस्ते पाहत नाही. हवेलीतून सटकल्यावर ती डायरेक्ट विजयकडे कशी काय येते... शीक्रेटली गूगल म्याप तर नाही ना चालवलं...

"जय माँ... काली..." या भक्तीगीताच्या यंडिंगला दुर्जनकाकांला करन-अर्जून दिसतात आणि त्याचवेळी सक्सेनाला अजय-विजय दिसतात... येकाच वेली दोन मानसं आनी कापडं पन चेंजली... डोस्क्यावरून ग्येलं बौ...

हे दोन्ही खान भाऊ येकत्र येण्याची पण येक मजा आहे बरं का...  आदी ह्यो शिणुमा राहुलवाला खानांचा शाह रुख आणि सिंघमवाला देवगणांचा अजय करणार होता. पण अजयला करायचा होता अर्जून (बायको सोबत रोमांचिक गाणं मिळालं असतं ना...) आणि शाह रुखला करायचा होता करन (का म्हणजे... आहो ममता ताई होती ना करनची हिरवीन... ) पण आपला हृतिकचा पप्पू लय हुशार बगा. त्याने शक्कल लढवली आणि खान भाऊसाहेबांची वर्णी लागली... (कोणाला सांगू नका बरं... नायतर तो सिंघम आणि मैं हूँ ना... दोघं पण धोपटतील मला...)

तर, बाकी काही असो, पण या शिणुमाच्या आशिटण असलेल्या पडद्याबाहेरच्या क्रिशच्या पडद्याबाहेरच्या वडूंनी भारीच पिच्चर बनवल्यानीत... नाही का...

@ अनिकेत परशुराम आपटे.

Monday, 15 November 2021

हम आपके हैं कौन...!! - पात्र ओळख नी काही शंका...

"लग्नाची व्हिडियो काशेट..." अशी ज्या शिणुमाची ओळक होती किंवा आहे, तो पिच्चर म्हन्जे "हम आपके है कौन..!!"

एक मोठ्ठा बंगला. एक कुँवारा काका कैलाशनाथ (अलोक नाथ); दोन पुतणे, ऑफिसिया राजेश (मोहनीश बहल) आणि आगामी ऑफिसिया प्रेम (सलमान खान). थोडे आगाऊ पण घरचे बेटा-बेटी असलेले घरचे नोकर लल्लू प्रसाद (लक्ष्मीकांत बेर्डे) व चमेली (प्रिया बेर्डे). यांसोबत चार पायांचा केसाळ भुबड्या टफी. ही आहेत घरातली मंडळी. नातेवाईकांमध्ये मामाजी (अजित वाच्छानी), मामीजी (बिंदू) आणि मामीजीच्या बहिणीची मुलगी रीटा (साहिला चड्ढा). फ्रँड लिस्टमध्ये दिल का डॉक्टर सिंघल (सतीश शाह) आणि बच्चों की डॉक्टर रज़िया (हिमानी शिवपुरी). ही झाली मुलाकडली मंडळी...

दुसरा मोठा बंगला. प्रोफेसर सिद्धांत चौधरी (अनुपम खेर), त्यांची पत्नी मधुकला (रीमा लागू), साधी सरळ पूजा (रेणुका शहाणे-राणा) आणि नटखट निशा (माधुरी दिक्षीत-नेने). ही आपोझिट पार्टी. त्यांचा नातेवाईक म्हणजे मधुकलाचा भाचा, शकुंतला शोधक भोला प्रसाद (दिलीप जोशी). इथे नो फ्रँड लिश्ट. हा शॉर्ट बट स्वीट परिवार म्हणजे लड़कीवाले. हुश्श... झाली यकदाची ओळख परेड...

ऑफिसिया राजेशचं लग्न साध्या सरळ पूजाशी ठरतं आणि लग्नाच्या काशेटला जी सुरुवात होते ती थेट दि यंडची पाटी येईपर्यंत. या काशेटमंदी कैलाशनाथचे दोन्हीही दिवटे आणि सिद्धांत चौधरीच्या दोन्ही कार्ट्या बोहल्यावर चढून घेतात. झालंच तर आपल्यासोबत लल्लू प्रसाद-चमेली आणि भोला प्रसाद-रीटा या जोडगोळ्यांनाही लगीन सपन दाखवतात...

गानी... जाम भारी...
मूझिक... लई भारी...
याक्टिंग... यकदम भारी...
आता माझ्या शंकांची बारी...

स्थळ - लग्नघर, दुसरा मोठा बंगला. करवली म्हणून नटलेली निशा इकडे-तिकडे बागडताना दिसते. मी आजवर जितकी लग्न अटेंड केली, त्यानुसार करवलीला, म्हणजे मुलाच्या किंवा मुलीच्या बहिणीला मोप कामं असत्यात. आनी हितं ही बया, म्हन्जी निशाबाई हो... कोड्रिक्सचे घोट घेत टेबल खाली आरामात पसरलेली असते... काय म्हनावं या करवली बायला...!!!

स्थळ - पहिला मोठा बंगला. "धिकताना धिकताना..." गाणं सुरू असतं. ऑफिसिया राजेश ब्याग पकडून खोलीत येतो. बच्चों की डॉक्टर रज़िया सांगते, "तुझी बायडी पोटूशी हाय..." मी काय म्हनतो, तो राजेश यवडा सुजान नागरिक, पर तेला आदी कसं कललं न्हाय याबद्दल...!!!

स्थळ - दुसरा बंगला. सिद्धांत चौधरी मधुकलाशी राजेश आणि निशाच्या लग्नाविषयी बोलत असतात. निशाचं लग्न... यवडंच काय ती निशा ऐकते आनी समजातल्या गैरामुळे ती आनंदते. डायरेक्ट लग्नाच्या आदल्या दिवशी हातात आलेल्या पत्रिकेमुळे निशाला समजतं, की प्रेम स्टेशनपर जानेवाली गाड़ी अब राजेश स्टेशपर रुकेगी... नाही म्हणजे जिचं लगीन हाय, तिला म्हाईतच न्हाय तिचा दादला कोन...!!!

स्थळ - हास्पिटल. राजेशची बायडी बाळतीन होऊन तीच पोरगा होतो. आनी हे सांगायला अखंड डाक्टर ओ.टी.भाईर येतो. हे तर काय बी न्हाय... खुश झालेला प्रेम काका त्या डाक्टरला टेबलवर उभी करतो, लिबर्टीवाल्या पुतळ्यासारखी... हे कस्काय...!!!

प्रसंग - "माये नि माये...", "दीदी तेरा देवर दिवाना..." ही गाणी, ज्यात प्रेमचं निशासोबत नाचणं; पासिंग द पार्सल हा खेळ, ज्यात निशाचं प्रेमजवळ बसणं, त्याच्या पायाला गुदगुल्या करणं, प्रेमचं निशाची वेणी ओढणं; हॉस्पिटलमध्ये प्रेमचं निशाला अभिंनदन करणं, या सगळ्यातून प्रेम आणि निशामध्ये कुछ तो गडबड़ है दया हे शेंबडं पोर देखील ओळखेल. पण टफीने चुकीच्या पत्त्यावर कुरियर केलेल्या निशाच्या पत्राला वाचून सर्वांला दे धक्का काहून बसतो...!!!

ते सर्व काय पन असो...

दिल की धड़कन माधुरीचा "हम आपके हैं कौन..!!" सुप्परच भारी होता राव...

@ अनिकेत परशुराम आपटे.

Monday, 8 November 2021

देर से आया फल पर...

सुमारे दीडेक वर्ष ज्या चित्रपटाची आतूरतेने वाट पाहिली, तो शेट्टी पोलीस फॅक्टरीतला "सूर्यवंशी" पाहण्याची अखेर संधी मिळाली...

कथा गुंतागुंतीची, पण तरीही सरळसोट. एका प्रचंड मोठ्या अतिरेकी हल्ल्याचा पडदाफाश करण्यासाठी डी.सी.पी. वीर सूर्यवंशी (अक्षय कुमार) कंबर कसतो. सगळे धागेदोरे खणून काढत सूर्यवंशी अखेर तो हल्ला नाकाम करतो...

शेट्टी पोलीस फॅक्टरीच्या आधीच्या चित्रपटांत, नायिका नायकांना पाठिंबा देताना, त्याची हिम्मत वाढवताना दिसतात. पण या चित्रपटात मात्र नायिका अनेक प्रसंगात नायकाच्या कामात अडथळे आणताना दिसते. चित्रपटातली गाणी फार काही श्रवणीय नाहीत, पण त्यातल्या त्यात 'हम हिंदुस्तानी...' हे गाणं थोडं प्रभावशाली वाटतं. अर्थात, गाणं न वापरताही प्रसंग अधिक खुलवता आला असता असं मला वाटतं...

शेट्टी पोलीस फॅक्टरीच्या दोन नेहमीच्या गोष्टी याही चित्रपटात दिसल्या. पहिली गोष्ट म्हणजे नायकाला दिलेली एखादी विशिष्ठ खूण. "सिंघम"मध्ये, "आता माझी सटकली..." हा संवाद होता, तर "सिम्बा"मध्ये, "जे मला माहित नाही ते सांगा..." हा संवाद होता. या वेळी नायकाला ठेवणीतला संवाद न देता, नावात बदल करून ती नावं उच्चारण्याची लकब दिली गेली होती. यामुळेच चित्रपटाच्या गंभीर स्वरूपाला विनोदी टच मिळत गेला...

या चित्रपटातली शेट्टी स्पेशल दुसरी गोष्ट म्हणजे, पुढे येणाऱ्या चित्रपटाची नांदी. "सिम्बा"मध्ये "सूर्यवंशी" या चित्रपटाची छोटीशी झलक पहायला मिळाली होती. तसंच याही वेळी ओमर हाफिज़ (जॅकी श्रॉफ) आणि सिंघम (अजय देवगण) यांच्यात चित्रपटाच्या अगदी शेवटी होणाऱ्या एका संवादामुळे, शेट्टी पोलीस फक्टरीचा पुढचा चित्रपट काय असू शकेल याचा अंदाज येतो...

चित्रपटातल्या पाहुण्या कलावंतांबद्दल काय बोलणार... कटाचा मुख्य सूत्रधार म्हणून जॅकी श्रॉफला दाखवलं गेलं. त्या ऐवजी चेहेरा न दाखवता फक्त संवाद ऐकवले असते किंवा हालचाली दाखवल्या असत्या, तर एक छान गूढ निर्माण झालं असतं ज्याचा वापर पुढच्या चित्रपटात करता आला असता. रणबीर सिंहची एंट्री कथेच्या दृष्टीने ठिक होती, पण अजय देवगणच्या एंट्रीचं कारण स्पष्ट केलेलं दिसत नाही...

चित्रपटाच्या तीन जमेच्या बाजू आहेत. पहिली म्हणजे तब्बल सोळा वर्षांनी अक्षय कुमार आणि अजय देवगण या दोन ऍक्शन हिरोंना पडद्यावर एकत्र पाहणे. २००५ साली प्रदर्शित झालेल्या "इंसान" या चित्रपटात दोघं शेवटचे दिसले होते. त्यानंतर आज "सूर्यवंशी"च्या निमित्ताने पुन्हा हे दोघं एकत्र पहायला मिळाले. चित्रपटाची दुसरी जमेची बाजू म्हणजे चित्रपटाचं पार्श्व संगीत. वेगवान साहसकथेला न्याय देणारं तितकंच दमदार पार्श्वसंगीत ऐकताना छान वाटतं...

चित्रपटाची तिसरी आणि सर्वात महत्वाची जमेची बाजू म्हणजे चित्रपटातली हाणामारी व साहसदृश्य. वेगवान हाणामारी आणि जबरदस्त साहसदृश्य पाहताना डोळ्यांचं पारणं फिटतं अगदी. चित्रपटाच्या शेवटी येणारी हाणामारी तर कमाल रंगली आहे. या चित्रपटामुळे बऱ्याच काळानंतर जुना अक्षय कुमार पहायला मिळाला. त्या किक्स, ते पंचेस, "सबसे बड़ा खिलाड़ी", "खिलाड़ियों का खिलाड़ी", अशा काही चित्रपटांमधून तुकड्या तुकड्याने घेतलेली ती भन्नाट साहसदृष्ये पडद्यावर पाहताना मजा आली...

एकंदरीत, सब्र का फल हमेशा मीठा होता है असं नाही. कधीकधी ते फळ बाहेरून मस्त आणि आतून नीरसही असू शकतं याचं उदाहरण म्हणजे हा चित्रपट. पण तर्कशास्त्र म्हणजे मराठीत लॉजिक, या गोष्टीला बगल देऊन चित्रपट पहायचा असेल तर शेट्टी पोलीस फॅक्टरीचा रोहित शेट्टी दिग्दर्शित, "सूर्यवंशी" नक्की पहावा...

@ अनिकेत परशुराम आपटे.

Monday, 18 October 2021

ढाई किलो के हाथवाला एँग्री मॅन...

"तारीख पे तारीख...", "हिंदुस्तान ज़िंदाबाद था, ज़िंदाबाद है और ज़िंदाबाद रहेगा...", "नो इफ नो बट, ओनली जट..."  "यह ढाई किलो का हाथ है..." हे सर्व दमदार संवाद कानी पडले की एकच व्यक्ती आठवते. ती व्यक्ती आहे अजयसिंह देवल, अर्थात आपल्या सर्वांच्याच परिचयाचे, 'द एँग्री ऍक्शन हिरो ऑफ बॉलीवूड...' म्हणजेच सन्नी देवल...

१९८३ साली प्रदर्शित झालेल्या, "बेताब" या चित्रपटापासून सन्नी देवल यांनी त्यांची अभिनय कारकिर्द सुरू केली. या कारकिर्दीला बहर आला तो १९८५ साली प्रदर्शित झालेल्या, "अर्जून" या चित्रपटामुळे. अर्जून यशस्वी झाला आणि सन्नी देवल यशाच्या शिखराकडे अग्रेसर झाले. पुढे, "जबरदस्त", "जोशीले", "डक़ैत", "पाप की दुनिया", "सल्तनत" अशा अनेक चित्रपटांमधून नायकाच्या भूमिका निभावत, सन्नी देवल यांनी 'ऍक्शन हिरो' हे बिरूद मिळवलं...

१९९० साली प्रदर्शित झालेला "घायल" हा चित्रपट, सन्नी देवल यांच्यासाठी मैलाचा खडक ठरला. याच चित्रपटाने सन्नी देवल यांना त्यांचा पहिला सर्वोकृष्ट नायकाचा फिल्मफेयर व राष्ट्रीय पुरस्कार मिळाला. वरच्या पट्टीतली संवादफेक, पहिलवानी शरीरयष्ठी, यांच्या जोरावर सन्नी देवल यांनी, एक नायक असलेल्या अनेक हाणामारीपटात काम केलं. त्यांच्या याच इमेजमुळे, "वर्दी", "त्रिदेव", "विश्वात्मा", "लुटेरे", "जानी दुश्मन", "बॉर्डर" अशा मल्टीस्टारर चित्रपटांत सन्नी देवल यांना महत्वाच्या भूमिका मिळाल्या...

ऍक्शन चित्रपटांसोबतच, "सोनी-महिवाल", "राम-अवतार", "मंज़िल-मंज़िल", "दामिनी", "अपने", अशा अनेक वेगळ्याप्रकारच्या चित्रपटांमध्ये सन्नी देवल यांनी केलेल्या भूमिका प्रेक्षकांना आवडल्या. अर्थात यातल्या काही चित्रपटांमध्येही सन्नी देवल यांची हाणामारीची दृश्य होतीच, पण ती कमी प्रमाणात होती. कालांतराने पुन्हा एकेरी नायक असलेल्या ऍक्शनपटांकडे वळत सन्नी देवल यांनी "ज़िद्दी", "सलाखें", "ज़ोर", "घातक", "चॅम्पियन" असे एका मागून एक हिट चित्रपट दिले...

सन्नी देवल यांच्या आजवरच्या कारकिर्दीमधले माझ्या दृष्टीने दोन सर्वोत्कृष्ट सीन्स होते, "घायल" आणि "घातक" या चित्रपटांमधले. अजय मेहरा आपल्या भावाचं प्रेत हातात घेऊन रडतो, मग फोन करून भावाला मारल्याचं सांगतो, हे "घायल" चित्रपटातलं दृष्य आणि काशिनाथ कातियाच्या गळ्यात पट्टा अडकवून त्याला भुंकायला सांगतो, हे "घातक" चित्रपटातलं दृष्य, ही दोन्हीही दृष्य कमाल रंगली होती. अजय मेहराचं लहान मुलासारखं दु:खी होणं आणि काशिनाथचा तो त्वेष आणि संताप, सन्नी देवल यांनी अप्रतीम सादर केले होते...

अभिनय आणि हाणामारीची दृष्य यांसोबत, सन्नी देवल अजून एका गोष्टीसाठी प्रसिद्ध होते. ती गोष्ट म्हणजे अनेक चित्रपटांत त्यांच्यावर चित्रीत झालेली नृत्यप्रधान गाणी. "जीत" या चित्रपटातलं 'यारा ओ यारा...', हे गाणं असो किंवा 'मेरा दिल ले गई ओए...' हे "ज़िद्दी" चित्रपटातलं गाणं असो, अशा अनेक गाण्यांमध्ये सन्नी देवल यांच्यावर चित्रीत झालेले नृत्याविष्कार बघण्यासारखे होते. सन्नी देवल यांच्या शरीरयष्टीचा पुरेपूर फायदा घेता येईल अशा प्रकारे ती नृत्य दिग्दर्शित केली गेली होती...

"यमला पगला दिवाना", "बोले सो निहाल", "पोस्टर बॉईज" अशा काही चित्रपटांमध्ये सन्नी देवल यांनी सादर केलेल्या विनोदी भूमिकाही प्रेक्षकांना बऱ्यापैकी आवडल्या होत्या. एका बाबतीत मात्र सन्नी देवल थोडेसे नशीबवान ठरले किंवा मागे राहिले. ती गोष्ट म्हणजे नकारात्मक व्यक्तिरेखा. "चाहनेवाले" आणि "फॉक्स" या दोन चित्रपटात सन्नी देवल यांनी नकारात्मक भूमिका साकारल्या होत्या. पण दोन्हीही चित्रपट सपशेल अयशस्वी ठरले, त्यामुळे नकारात्मक भूमिका त्यांना विशेष फळल्या नाहीत...

याखेरीज, चित्रपटांशी निगडीत अजून एका गोष्टीत सन्नी देवल यांनी हात आजमावला. ती गोष्ट म्हणजे दिग्दर्शन. "दिल्लगी" आणि "घायल वन्स अगेन" हे दोन्ही चित्रपट सन्नी देवल यांनी दिग्दर्शित केले होते. ते फारसे चालले नाहीत, पण सन्नी देवल यांच्या दिग्दर्शनाची चांगली स्तूती झाली होती. चित्रपटसृष्टीत छान जम बसलेला असतानाच, २०१९ साली सन्नी देवल यांनी भा.ज.प.मध्ये प्रेवश केला आणि निवडणूकीत घसघशीत विजयही मिळवला...

आज १९ ऑक्टोबर. आज, ढाई किलो के हाथवाल्या या बॉलीवूडच्या एँग्री मॅनचा वाढदिवस. सन्नी देवल यांना वाढदिवसाच्या मनापासून शुभेच्छा...

@ अनिकेत परशुराम आपटे.

Sunday, 10 October 2021

चिरतरूण महानायक...

"आज खुश तो बहुत होगे तुम...", "नाम, विजय | विजय दीनानाथ चौहान, पूरा नाम...", "रिश्ते में तो हम सबके बाप लगते हैं, नाम है शहनशाह...", "आय कॅन टाक इंग्लीस, आय कॅन वाक इंग्लीस, आय कॅन लाफ इंग्लीस, बिकॉज इंग्लीस इज अ फन्नी लँग्वेज..." हे संवाद रुपेरी पडद्यावर अजरामर झाले, ते इंक़िलाब हरिवंशराय श्रीवास्तव अर्थात आपल्या सर्वांचे लाडके व प्रसिद्ध अभिनेते अमिताभ बच्चन यांच्यामुळे...

स्वातंत्र्यपूर्व काळात, "इंक़िलाब ज़िदाबाद" या प्रचलित घोष वाक्याचा श्रीवास्तव कुटुंबावर इतका प्रभाव होता, की घरात जन्मलेल्या बाळाचं नावच इंक़िलाब ठेवलं गेलं. पुढे हरिवंशराय श्रीवास्तव यांचे मित्र व कवी सुमित्रानंदन पंत यांच्या सांगण्यावरून इंक़िलाब हे नाव बदलून अमिताभ ठेवलं गेलं आणि हरिवंशराय श्रीवास्तव यांनी स्वत: लेखनासाठी 'बच्चे जैसे' अर्थात बच्चन हे नाव धारण केल्यामुळे तो मुलगा अमिताभ हरिवंशराय बच्चन या नावाने ओळखला गेला...

१९६९ साली प्रदर्शित झालेल्या "सात हिंदुस्तानी" या चित्रपटाद्वारे अमिताभ बच्चन यांनी रुपेरी पडद्यावर पहिलं पाऊल ठेवलं. "आनंद", "मिली", "नमक हराम" या चित्रपटांमधून सहनायक म्हणून काम करत असताना, "ज़ंजीर" प्रदर्शित झाला आणि नायक म्हणून अमिताभ बच्चन रातोरात प्रसिद्ध झाले. इतकंच नाही, तर 'एँग्री यंग मॅन' हे टोपणनावही त्यांना मिळालं. पुढे, "कालिया", "दिवार", "कभी कभी", "नमक हलाल", "कूली", "त्रिशूल" अशा अनेक यशस्वी चित्रपटांची लांबच लांब रांग लागली...

एक नायक म्हणून चार दशकांहून अधिक काळ रुपेरी पडदा गाजवणाऱ्या अमिताभ बच्चन यांनी, "डॉन", "परवाना", "आग", "आँखें" या चित्रपटांमध्ये खलनायकी व्यक्तिरेखाही साकारल्या. त्याचसोबत, "हेरा-फेरी", "दो और दो पाँच", "चुपके चुपके", "अमर अक़बर एँथनी" अशा चित्रपटांमध्ये अमिताभ बच्चन यांच्या विनोदी भूमिकांनाही प्रेक्षकांनी उचलून धरलं. याशिवाय, "सोदागर", "शक्ति", "अभिमान", "आलाप", अशा चित्रपटांत त्यांच्या वाट्याला आलेल्या गंभीर स्वरूपाच्या भूमिकाही चांगल्याच लक्षात राहिल्या...

मधल्या काळात नायक म्हणून, "मृत्यूदाता", "इंद्रजीत", "लाल बादशाह" अशा प्रकारचे चित्रपट अमिताभ बच्चन यांनी केले. काही चित्रपट बरे चालले तर काहींकडे प्रेक्षकांनी पाठ फिरवली. अमिताभ बच्चन यांच्या कारकिर्दीला धक्का लागतो की काय असं वाटत असतानाच, "मोहब्बतें" प्रदर्शित झाला आणि नारायण शंकरच्या प्रभावशाली चरित्र व्यक्तिरेखेने अमिताभ बच्चन यांनी मेन स्ट्रीम चित्रपटांत जबरदस्त पुनरागमन केलं. त्यांच्या चरित्र भूमिकांनी नटलेले, "ब्लॅक", "वज़ीर", "अक़्स", "पा", "खाकी" प्रेक्षकांच्या पसंतीस उतरले आणि अमिताभ बच्चन यांच्या दुसऱ्या इनिंगचे अश्वही चौखूर उधळू लागले...

या दुसऱ्या इंनिंगमध्ये चरित्र नायक, चरित्र सहनायक किंवा चरित्र सहकलावंत या भूमिकांसोबत, "बावर्ची" या चित्रपटात अमिताभ बच्चन यांनी निभावलेली सूत्रधार किंवा निवेदकाची भूमिकाही, "लगान", "जोधा अक़बर", "परिणीता" या चित्रपटांद्वारे त्यांच्या वाट्याला आली. याखेरीज, "चेहरे", "बदला", "१०२ नॉट आऊट", "भूतनाथ" या चित्रपटांमधल्या अमिताभ बच्चन यांच्या वेगळ्या धाटणीच्या भूमिकांना प्रेक्षकांची चांगली पसंती मिळाली...

आज ११ ऑक्टोबर. श्री अमिताभ हरिवंशराय बच्चन यांचा जन्मदिवस. बोलके ओठ, धारदार आवाज, सुस्पष्ट उच्चार, कसदार अभिनय आणि मनमिळाऊ स्वभाव, यांमुळे आजही प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणाऱ्या या चिरतरूण महानायकाला वाढदिवसाच्या मनापासून शुभेच्छा...

"छूकर सबके मन को...
किया तूने यह इशारा...
बदलेंगे सब सितारे...
तूही सिकंदर रहेगा हमारा..."


@ अनिकेत परशुराम आपटे.

Wednesday, 6 October 2021

निरागस मुक्ती...

बऱ्याच भयपटांमध्ये आपण पाहतो, कुठेतरी एक अतृप्त आत्मा अडकलेला असतो. आपली इच्छा पूर्ण करण्यासाठी तो आत्मा अनेकांना त्रास देतो, काहींचा जीवही घेतो. मग नायक किंवा नायिकेकडून असं काहीतरी घडवलं जातं, ज्यामुळे तो आत्मा मुक्त होतो. आत्म्याच्या मुक्तीचा प्रसंग, कधी गंभीर तर कधी विनोदीपद्धतीने प्रेक्षकांसमोर येतो. हाच मुक्तीचा प्रसंग जर भावस्पर्शी असला तर... अशाच निरागस मुक्तीचा प्रसंग हळुवार पद्धतीने रेखाटलेला दिसतो, २००८ साली प्रदर्शित झालेल्या "भूतनाथ" या चित्रपटातील एका गाण्यात...

"भूतनाथ, घरमें एक पूजा होनेवाली है जिससे तुम एंजल से स्टार एंजल बन जाओगे..." गच्चीवर उभ्या असलेल्या कैलाशनाथला बंकू हे सांगतो आणि सुखविंदर सिंह यांच्या आवाजात, वरच्या पट्टीत हे बोल ऐकू येतात...

"क्रोध के बोझ को मनपर उठाए काहे चलता है प्राणी...
क्षमा जो शत्रू को भी कर दे, वही मुक्त है वही है ज्ञानी..."

कैलाशनाथला समजतं, की ते त्यांचं श्राद्ध आहे आणि मुलावरचा राग विसरून त्यांना अनंताची वाट धरायची आहे. त्याचवेळी हरिहरन यांच्या स्वरातले हळुवार बोल सुरू होतात...

"समय का पहिया चलता है, दिन ढ़लता है, रात आती है...
रात में एक छोटासा, एक नन्हासा दिपक जलता है...
उसकी जरासी ज्योत सही, पर दूर से उसको देखकर...
कोई बरसों का मुसाफिर, गिरते गिरते सँभलता है..."

बायकोच्या विरहाने आणि मुलाच्या दुराव्याने व्यथित झालेल्या कैलाशनाथच्या शरीराची रात्र होते म्हणजेच अंत होतो. पण मुलावरच्या व तिथे येणाऱ्या इतरांवरच्या क्रोधामुळे, देवलोक आणि मृत्यूलोक यांच्या मध्ये अडकलेल्या कैलाशनाथचा आत्मा एक बिभत्स रूप धारण करत असतो...

क्रोधाच्या त्याच अंधारात बंकू नावाचा एक छोटासा कवडसा येतो. बंकूच्या त्या गोड वागण्याने भूतनाथ विरघळतो आणि स्वत:ला बदलतो. घरात एक पूजा आहे आणि पूजेला सगळे असायला हवेत ही भाबडी कल्पना मनात ठेऊन बंकू कैलाशनाथला त्यांच्याच श्राद्धासाठी बोलावतो आणि गाण्याच्या पुढच्या ओळी सुरू होतात...

"मैंने जाते जाते जाना कौन है अपना कौन पराया...
बस तू ही मेरा अपना है, बस तूने प्यार निभाया..."

तिथे बसल्या बसल्या बंकूकडे पाहत कैलाशनाथ विचार करतात, "माझा स्वत:चा मुलगा मला मरणाच्या दारात सोडून निघून गेला, पण हा लहानगा पोर, कुठलंही नातं नसताना माझ्या मुक्तीसाठी प्रयत्न करतो आहे. किती प्रेमळ आहे हा बंकू..." आणि बंकूलाच कैलाशनाथ विचारतात...

"काम, क्रोध और लोभ में तजकर जा सकता हूँ...
तुझको चाहूँ भी तो, मैं कैसे भुला सकता हूँ...
तेरा प्यार भी तो एक बंधन है...
तू ही बता, क्या मैं मुक्ती पा सकता हूँ..??
तू नहीं जानता तू मेरा अब है क्या...
तुझको ही देखा, तो दिल कैसे पिघलता है..."

बंकू, तू माझ्या मुक्तीसाठी हे श्राद्ध करतो आहेस. लोभ, क्रोध, अशा दुर्गुणांपासून मी अलिप्त राहू शकतो, हा मृत्यूलोक मागे ठेऊन मी पुढेही जाऊ शकतो. पण बाळा, मला तुझा लळा लागला आहे रे... तुला सोडून मी कसा जाऊ..." बंकूला उद्देशून कैलाशनाथचा आत्मा मनातल्या मनात हे बोलत असतानाच त्याला विजयच्या येण्याची चाहूल लागते. कैलाशनाथ दाराकडे पाहतात आणि विजय घरात प्रेवश करतो...


"दिन में सोया रात आयी तो अब जागा सोया कब था...
अब क्या सूरज ढूँढ़े पगले, डूब गया सूरज कब का...
बरसों पहसे जो एक नदी प्यार की...
बह गई वह नदी, हाथ अब तू क्या मलता है..."

आपल्या आई-वडिलांच्या आठवणीत घरभर फिरत असलेल्या विजयला पाहताना कैलाशनाथ म्हणतात, "इतका काळ तू आमच्यापासून दूर राहिलास. आम्हाला एकदाही भेटायला आला नाहीस. प्रेमाची ऊब देणारा तुझा बाप गेला, मायेचा शीतल ओलावा देणारी तुझी आई गेली. आता इथे येऊन तू काय मिळवलंस...!!!"

उशीरा का होईना पण विजयला पश्चात्ताप झालेला असतो आणि आपल्या वडिलांच्या म्हणजेच कैलाशनाथच्या मुक्तीसाठी तो प्रार्थना करतो. कैलाशनाथ भरून पावतात आणि मुक्तीच्या मार्गाला लागतात. पूजेत बसलेल्या बंकूला काहीतरी वाटतं. तो मागे पाहतो आणि साश्रू नयनांनी कैलाशनाथ बंकूचा निरोप घेतात...


"मैं क्या जानू क्या है मुक्ती, नहीं करो यह बहाना...
देखो मुझे सिखाकर जीना, ऐसे मुझको छोड़ न जाना..."

आपल्या डोळ्यांदेखत आपल्या भूतनाथला निघून गेलेलं पाहून बंकूला दु:ख होतं. त्याचे आई-बाबा सांगतात की भूतनाथ मुक्त झाला. पण लहानगा बंकू म्हणतो, "मुक्त होणं म्हणजे काय ते मला कुठे माहित... ज्याने मला जगायला शिकवलं, नातं जोडायला शिकवलं, तो भूतनाथ मला का सोडून गेला..." हा विचार मनात आणत बंकू गच्चीवर जातो...


"आसमान में जगमग तारे, मेरी आँख में झिलमिल आँसू...
कहाँ छुपा है, कोई इशारा तो दे तू..."

बंकू सर्व ताऱ्यांमध्ये भूतनाथला शोधतो, त्या हाका मारतो. आसमानात कुठेतरी भूतनाथ बंकूसमोर येतो आणि लगेचच अंतर्धान पावतो. गाणं संपतं, पण आपल्या डोळ्यातलं पाणी संपत नाही...

जावेद अख़्तर यांनी अतिशय सुंदर शब्दरचना केली आहे. गाण्याचं संगीत अतिशय हृदयस्पर्शी आहे. विशेषत: बासरीचा अप्रतीम वापर संपूर्ण गाण्यात आपल्याला आढळतो. गाण्याच्या सुरुवातीपासून शेवटपर्यंत बासरीवर एक धुन आपल्याला ऐकू येत राहते. पण गाण्यातील एका प्रसंगात, जेव्हा आपल्या मुलाच्या प्रार्थनेमुळे कैलाशनाथच्या मनावरचं ओझं नाहीसं होतं आणि ते मुक्तीच्या मार्गाला लागतात, तेव्हा बासरीवर ऐकू येणारी सरगम आपल्या मनाला भिडते आणि डोळ्यांतून पाणी आल्यावाचून राहत नाही...

गाण्यात पाहण्यासारखी दुसरी गोष्ट म्हणजे अमिताभ बच्चन यांची अप्रतीम अदाकारी. कैलाशनाथचं आपल्या मुलावरचं प्रेम, भूतनाथची बंकूमधली भावनिक गुंतागुंत, मुलाकडून आपल्या मुक्तीचा मार्ग सुकर झाल्याचा आनंद आणि त्यासोबतच बंकूपासून दूर जाण्याचं दु:ख, या सगळ्या भावना, अमिताभ बच्चन यांनी सुरेख रेखाटल्या आहेत. एखाद्या अतृप्त आत्म्याला मुक्ती मिळते तेव्हा तो सुखांत समजला जातो. पण भूतनाथच्या मुक्तीला एक दु:खाची किनार आहे...

भूतनाथ आणि बंकू एकमेकांपासून दुरावलेले पाहताना आपल्याला सतत वाटत राहतं, की बंकूसाठी तरी, कैलाशनाथला मुक्तीच मिळू नये. चित्रपटाच्या शेवटी येणाऱ्या या गाण्याचा शेवट दु:खाने भरलेला असला, तरी चित्रपटाचा शेवट मात्र बंकूच्या बाजूने केलेला सुखांतच आहे...

@ अनिकेत परशुराम आपटे.

Friday, 24 September 2021

पाणावलेला संवाद...

दोन माणसात संवाद झाला, तर मन हलकं होतं असं म्हणतात. संवाद जसा दोन माणसात होतो तसा दोन मनातही होत असतो. एका माय-लेकाच्या मनातला हाच संवाद आपल्याला दिसतो, "रंग दे बसंती" या चित्रपटातल्या, "लुका छुप्पी बहुत हुई..." या गाण्यामधून...

फ्लाईट लेफ्टनंट अजय राठोडला (आर. माधवन) वीरमरण येतं. त्याचं शव चितेवर ठेवलं जातं आणि शव गुंडाळलेला तिरंगा त्याच्या आईला म्हणजेच श्रीमती राठोड (वहीदा रहमान) यांना दिला जातो. श्रीमती राठोड यांना माहित आहे की आपला मुलगा आता या जगात नाही. पण तरीही त्या माऊलीचं मन सांगत राहतं...

लुका छुपी बहुत हुई... सामने आ जा ना...
कहाँ कहाँ ढूँढ़ा... तुझे थक गई है अब तेरी माँ...
आज शाम हुई... मुझे तेरी फिकर...
धुँधला गई देख मेरी नजर... आ जा ना...


तिला वाटत असतं आपला मुलगा कुठेतरी लपलाय. त्याला बाहेर येण्यासाठी ती माऊली परोपरीने विनवण्या करत आहे. मनापासून त्याला बोलवत आहे. त्या आईची कळवळ अजयपर्यंत पोहोचते. अग्नी पेटतो, आणि या जगापासून दुरावलेला अजय आपल्या आईला सांगतो...

क्या बताऊँ माँ कहाँ हूँ मैं...
यहँ उड़ने को मेरे खुला आसमान है...
तेरे किस्सों जैसा भोला...
सलोना जहाँ है यह सपनोंवाला...
मेरी पतंग हो बेफिकर उड़ रही है माँ...
डोर कोई लूटे नहीं बींच से काटे ना...


अजय म्हणतो, "आई, अगं तुला काय सांगू मी कुठे आहे... एक सुंदर आणि नवीन जग आज माझ्या पुढे आहे. मी स्वच्छंद आकाशात मनमुराद उडत जातोय. मला कोणीही थांबवणारं नाही की माझा मार्ग अडवणारंही कोणी नाही. या स्वप्नांच्या अवकाशात आता मी मुक्त विहार करत आहे..."

चिता जळते आहे. उघड्या डोळ्यांनी आपल्या मुलाला दूर जाताना ती आई पाहते आहे. पण तरीही तिचं मन तिला सांगत आहे, "काळजी करू नकोस. तो इथेच कुठेतरी आहे. येईल परत..." मनातले हे विचार डोळ्यात साठवत आई म्हणते...

तेरी राह तके अखियाँ...
जाने कैसे कैसे होये जिया...
धीरे धीरे आँगन उतरे अँधेरा...
मेरा दीप कहाँ...
ढलके सूरज करे इशारा...
चँदा तू है कहाँ...
मेरे चँदा तू है कहाँ...


डोळ्यात प्राण आणून ती माऊली आपल्या मुलाला हाक मारताना म्हणते, "माझ्या राजा, अरे सांज होत चालली. अंधारही वाढत चाललाय. ये ना आता पटकन..." इथे अंधार म्हणजे प्रकाशाचा आभाव नसून काळजाचा तुकडा काळाच्या पडद्याआड गेल्याने आईच्या मनात निर्माण झालेली पोकळी, असा होतो. त्या पोकळीत आईला तिचं बाळ दिसत नसल्यामुळे तिचा जीव कासावीस होतोय...


आपल्या मुलाचं परत आलेलं सामान पाहून आई कोलमडते. त्यातल्या गोष्टी पाहताना तिला क्षणाक्षणाला आपल्या मुलाची आठवण होते. तिथे नव्या जगात मोकळं आयुष्य जगणारा तो मुलगा खूप आनंदात आहे. त्याच आनंदाच्या भरात तो आईला सांगतो...

कैसे तुझको दिखाऊँ यहाँ है क्या...
मैने झरने से पानी माँ तोड़ के पिया है...
गुच्छा गुच्छा कई ख्वाबों का...
उछल के छुआ है...
छाया लिये भली धूप यहाँ है...
नया नया सा रूप यहाँ...
यहाँ सबकुछ है माँ फिर भी...
लगे बिन तेरे मुझे अकेला...

सगळे पाश सोडून आलेल्या त्याला या नव्या जगात सगळंच खूप सुंदर वाटतंय. आपल्याला हवं ते मिळालं याचा त्याला मनापासून आनंद होतोय. पण या आनंदालाही एक दु:खाची किनार आहे. तो स्वर्गात आहे. सगळ्या सुखसोयी त्याच्या चरणांशी आहेत. तरीही हा आनंद तो पूर्ण उपभोगू शकत नाही. तो म्हणतो, "आई, इथे सगळं काही आहे. पण तू माझ्या जवळ नाहीस. त्यामुळे मला खूपच एकटेपणा आलाय...

आई व मुलाचा हा अप्रतीम संवाद दाखवताना प्रसून जोशी यांनी सुरेख शब्द गुंफले आहेत. ए.आर.रहमान यांच्या सुमधूर संगीताने प्रसून जोशींच्या शब्दांची ऊंची अधिक वाढते. विशेष म्हणजे गाण्यात तबला आणि बासरीचा अप्रतीम वापर झालेला दिसतो...

लतादीदी आणि खुद्द ए.आर.रहमानने आपल्या स्वरांनी या गाण्याला सजवलं आहे. दोघांमधील सरगम ऐकतच रहावी अशीच आहे. दीदींनी वापरलेली खालची पट्टी, एका आईची व्यथा व काळजी दर्शवते तर ए.आर.रहमान यांचे वरच्या पट्टीतले स्वर एका मोकळ्या झालेल्या श्वासाचा आनंद व्यक्त करतात...

गाणं सुरू असताना आपल्याला चित्रपटातले बरेच कलावंत पडद्यावर दिसतात. त्यातही, एकही शब्द न उच्चारता फक्त डोळे आणि चेहेऱ्यावरचे हावभाव यांच्या साथीने वहीदाजींनी जी अदाकारी सादर केली, ती पाहून अंगावर काटा येतो. वयात आलेला आपला मुलगा आपल्या डोळ्यांदेखत... हे पाहताना काळीज किती पिळवटून निघालं असेल त्या आईचं...

इतक्या वेळा "रंग दे बसंती" पाहिला. काही वेळा हे गाणं पुढेही केलं. पण डोळे बंद करून फक्त हे गाणंच नुसतं ऐकलं आणि बंद डोळ्यातूनही पाण्याचे थेंब बाहेर येताना दिसले. खरंच, शब्दांची ताकद, संगीताची जादू आणि स्वरांचा गोडवा, या त्रयींमुळे, "लुका छुपी बहुत हुई..." हे गाणं अजरामर झालं आहे...

@ अनिकेत परशुराम आपटे.

Tuesday, 21 September 2021

आगळा वेगळा खेळ...

गलिच्छ राजकारण, समाजकंटकांशी असलेले राजकारण्यांचे लागेबांधे, त्यातून होणारी कटकारस्थानं, या सर्वांवर भाष्य करणारा चित्रपट म्हणजेच, १९९९ साली प्रदर्शित झालेला गुलज़ार साहेबांचा "हुतुतु..."

भूतकाळ आणि वर्तमानकाळाची सांगड घालत चित्रपटाची कथा पुढे सरकत जाते. वर्तमानकाळात घडणारं कथानक एका अपहरणनाट्यापासून सुरू होतं. आपल्या एका माणसाला सोडवण्यासाठी बंडखोरांचा एक समुह, मुख्यमंत्री मालती बर्वे (सुहासिनी मूळ्ये) यांच्या मुलीचं म्हणजेच पन्ना बर्वेचं (तब्बू) अपहरण करतो. हे अपहरणनाट्य सफल होतं आणि बंडखोरांच्या माणसाला सोडलं जातं, पण ते ही अर्धमेल्या अवस्थेत. त्या माणसाच्या या अवस्थेला व एकूणच परिस्थितीला मालती बर्वेच जबाबदार आहे हे समजल्यामुळे बंडखोरांचा तो समुह, भर सभेत स्फोट घडवून आणत पन्नाच्या मदतीनेच मालती बर्वेचा वध करतो...

वर्तमानकाळात घडत असलेलं हे मुख्य कथानक, भूतकाळातल्या सहकथानकाच्या प्रवाहात अधून मधून डोकं वर काढत राहतं. भूतकाळात दाखवल्या जाणाऱ्या घटनांमधून वर्तमानकाळाच्या कथानकाचा पाया रचलेला आपल्याला दिसतो. कथानकासोबतच मातब्बर कलावंतांच्या फौजेने चित्रपटाला चार चाँद लावलेत. डॉ. मोहन आघाशे, कुलभूषण खरबंदा, शिवाजी साटम, राज झुत्शी, अजीत वाच्छानी, ग्रेसी सिंह या मंडळींनी आपापल्या अदाकारीने भूमिकांना न्याय दिलेला दिसतो. पण याखेरीज, सर्वात हटके भूमिका जर कोणाची असेल, तर ती आहे सुनील शेट्टी यांची...

आदित्य पटेल या मुलाची व्यक्तिरेखा सुनील शेट्टी यांनी छानच रंगवली आहे. व्यावसायिक पातळीवर गाजणाऱ्या त्यांच्या इतर एकसूरी भूमिकांना बगल देत सुनील शेट्टी यांनी आदित्यची व्यक्तिरेखा साकारली आहे. गलिच्छ राजकारणामुळे, कट कारस्थानांमुळे होणारी चिडचीड किंवा येणारा संताप म्हणा आणि सगळं जाणूनही काहीही करू न शकल्यामुळे होणारी घुसमट सुनील शेट्टी यांनी अप्रतीम दाखवली आहे. चित्रपट प्रदर्शित झाला तेव्हा नावावरून आणि एक नायिका-दोन नायक या समिकरणावरून असं वाटलं, की प्रेम त्रिकोण आणि कुरघोड्या असं काही असेल, पण भिन्न व्यक्तिरेखा आणि एकच विचारधारा असलेल्या  आदित्य व भाऊसोबत (नाना पाटेकर) बंडखोर विचारांची पन्ना, यांनी वेगळेच रंग भरले...

अभिनेत्री तब्बूने बेफिकीर, बिन्धास्त, अशी टॉम बॉय छटेतली पन्ना छान रंगवली आहे. चित्रपट गंभीर स्वरूपाचा आहे, तरी पन्नाला मिळालेल्या काही संवादांमुळे व सीन्समुळे थोडीफार विनोद निर्मिती होते. तब्बूवर चित्रित झालेली दोन दृष्य विशेष लक्षात राहतात. पन्नाचं बाळ दगावतं त्या वेळी बेडवरूनच पन्ना विचारते, "आई, मुलगा होता की मुलगी..." या प्रश्नाच्या वेळी शारिरिक वेदनेपेक्षा बाळ गेल्याचं दु:ख पन्नाच्या चेहेऱ्यावर अधिक दिसलं. दुसरा सीन जो लक्षात राहिला, तो होता सुहासिनी मूळ्ये आणि तब्बू यांच्यातला चित्रपटातील शेवटचा सीन. गर्दीतून वाट काढत पन्ना मालतीबाईंपर्यंत पोहोचते आणि, "कशी आहे आई..??" हा प्रश्न विचारते. त्यावेळी आईबद्दलची काळजी आणि मालती बर्वेबद्दलचा राग, या दोन्ही भावना एकाच वेळी तब्बूने सुरेख दाखवल्या आहेत...

इतर सर्व कलावंत मंडळींसोबत, चित्रपटात वेगळ्या भूमिकेत दिसले ते अभिनेते नाना पाटेकर. सगळं हसत हसत सांगणारा, टोमणे मारणारा, हजरजबाबी भाऊ, कथेच्या गंभीर स्वरूपाला अधून मधून हलकं बनवत राहतो.  गाव-खेड्यात राहणारा भाऊ, वेळेप्रसंगी इंग्रजी बोलून समोरच्या व्यक्तीला निरुत्तर करतो हे एका प्रसंगात छानच दाखवलं आहे. "थोड़ासा रुमानी हो जाएँ" आणि "राजू बन गया जंटलमॅन" या दोन्ही चित्रपटातली खुशमस्कऱ्या समाज प्रबोधक ही नानांची भूमिका याही चित्रपटात आपल्याला पहायला मिळते. "हुतुतु"मधली त्यांची व्यक्तिरेखा थोडी वेगळी आहे कारण या चित्रपटात त्यांच्या शाब्दिक वारांना तितक्याच धारदार गाण्यांचीही साथ मिळाली आहे...

पार्श्वसंगीतासोबतच विशाल भारद्वाज यांनी संगीतबद्ध केलेल्या गाण्यांचाही कथेवर चांगलाच परिणाम दिसतो. "जय हिन्द हिन्द...", "जागो जागो जागते रहो हे...", "बन्दोबस्त है जबरदस्त है..." ही गाणी एकदम जोशपूर्ण तर आहेतच, पण बऱ्यापैकी वेगवानही आहेत. सर्वात जास्त लक्षात राहतं, "घपला है घपला..." ताकदीच्या शब्दांसोबतच गाण्यांचं चित्रिकरणही तितकंच सुंदर झालंय. यातली जवळ जवळ सर्व गाणी नाना पाटेकर यांच्यावर चित्रीत झाली आहेत. चित्रपटातली, "छई छप्पा छई छप्पा के छई..." आणि "इतना लंबा कश लो यारों..." ही गाणी थोड्या धीम्या गतीची आहेत. चित्रपटाची रोमँटिक बाजू या दोन गाण्यांनी सांभाळलेली आहे. अर्थात, "छई छप्पा छई..." हे गाणी चित्रपटात नसतं तर विशेष फरक पडला नसता असं मला वाटतं...

गुलज़ार रचित, राजकारणावरचा हा आगळा वेगळा खेळ काही प्रेक्षकांना आवडला तर, काहींनी त्याला नापसंत केलं. पण तरीही, १९९९ सालचा "हुतुतु" हा चित्रपट पाहण्यासारखा आहे हे नक्की...

@ अनिकेत परशुराम आपटे.

Friday, 17 September 2021

कोड नेम - बेल बॉटम...

विमानाचं अपहरण, गुन्हेगारांच्या मागण्या आणि मागण्या पूर्ण झाल्यावर विमानाची सुटका... ८०च्या दशकात सर्रास होणाऱ्या या प्रकारावर आधारीत आहे, असीम अरोरा व परवेज़ शेख़ लिखीत, "बेल बॉटम..."

चित्रपटाचं कथानक सरळसोट आहे. दिल्लीवरून निघालेल्या IC 691 या विमानाचं अपहरण होतं. ते विमान अमृतसर व लाहौरमार्गे दुबईला उतरवण्यात येतं. या गोष्टीला पाकिस्तानचा छुपा पाठिंबा व सहाय्य असतं. सततच्या या त्रासाला त्या वेळच्या पंतप्रधान इंदिरा गांधी (लारा दत्ता) कंटाळलेल्या असतात...

भरमसाठ पैसे आणि आपल्या साथिदारांची सुटका, या मागण्यांवर अपहरणकर्त्यांशी चर्चा करायला इंदिराजी आपल्या दोन मंत्र्यांना पाठवण्याचं ठरवतात. पण दुसरीकडे कोड नेम 'बेल बॉटम' म्हणजेच रॉ एजंट अंशुल मल्होत्रा (अक्षय कुमार), हा कट हाणून पाडण्याचा मनसूबा रचतो. 'बेल बॉटम' आपल्या इराद्यात सफल होईल का... की अपहरणकर्त्यांचा कट तडीस जाईल... हे चित्रपट पाहिल्यावरच समजेल...

चित्रपटाचं कथानक ८० ते ९० या दशकात घडत असल्याने त्या काळातला कपडेपट, वाहनं छान जमून आली आहेत. त्या काळातला देखावा, सेट्स छान उभारलेले आहेत. चित्रपटातली दुसरी जमेची बाजू म्हणजे कलावंतांची रंगभूषा. भरघोस मिशा असलेला अक्षय कुमार छान दिसतो. "रावडी राठोड़"मध्येही अक्षय कुमार यांनी मिशीवाला नायक रंगवला होता, पण "बेल बॉटम" चित्रपटातला नायक अधिक जबाबदार व विचारवंत वाटतो...

अक्षय कुमार आणि इतर कलावंतांच्या रंगभूषेशिवाय लारा दत्ता, चित्रपटातला सर्वात मोठा धक्का आहे. लारा दत्ता यांची रंगभूषा कमाल झाली आहे. इंदिरा गांधी यांच्या व्यक्तिरेखेत लारा दत्ता आहेत, हे पटकन ओळखू नाही. आपल्या संवादफेकीत आणि देहबोलीत, लारा दत्ता यांनी कमालीचा बदल दाखवला आहे. त्या बदलामुळेच लारा दत्ता यांनी साकारलेली इंदिरा गांधी अधिक प्रभावशाली वाटते...

चित्रपटाच्या कथेला बऱ्यापैकी वेग आहे. चित्रपटात दोन कथानकं आहेत. पहिल्या कथानकात अक्षय कुमारचा अन्शुल ते बेल बॉटम बनण्याचा प्रवास दाखवला आहे, जो काही काही ठिकाणी थोडासा रटाळ वाटतो पण तरीही बऱ्यापैकी वेग राखतो. विमान अपहरणाचं दुसरं कथानक मात्र चांगलंच वेगवान आहे. त्यात कुठेही दिखाऊपणा जाणवत नाही. साहसदृष्यही वास्तविक वाटतात. अक्षय कुमार असूनही हाणामारी दाखवताना काळाचा आणि भूमिकेचा तोल सांभाळलेला दिसतो. विमानतळावर वादळाच्या सानिध्यात रंगणाऱ्या पाठलागाच्या दृश्याच्या वेळी येणाऱ्या पार्श्वसंगीतामुळे, "परमाणू" या चित्रपटाची आठवण होते...

चित्रपटातली गाणी यथातथाच आहेत. अर्थात गाणी कथेसोबतच चालत असली, तरी एखाद-दुसरं गाणं वगळता आलं असतं. चित्रपटात वाणी कपूरची भूमिका थोडी खटकते. अक्षय कुमारसारखा नायक एकटा राहू नये म्हणून वाणी कपूरची वर्णी लागली असं म्हटलं तरी चालू शकेल. चित्रपटाच्या एकदम शेवटी वाणी कपूरने साकारलेली व्यक्तिरेखा चित्रपटात का होती हे सांगण्याचा जो प्रयत्न झाला, तो पटत नाही...

एकंदरीत, वेगवान कथानक, उत्तम रंगभूषा आणि सुरेख अभिनय या त्रयींची सांगड घातलेला व सत्य घटनेच्या पार्श्वभूमीवर बेतलेला रणजीत तिवारी दिग्दर्शित, "बेल बॉटम" नक्कीच पहावा असाच आहे...

@ अनिकेत परशुराम आपटे.

Monday, 13 September 2021

अन(रियलिस्टिक) मसाला सॅगा...

तूफानी मारधाड़, आयटम साँग, भ्रष्ट मंत्री या पुलीस, इस तरह की कहानियाँ दिखानेवाली अनेक मसाला फिल्मों में से एक है, रॉबिन भट एवं संजय गुप्ताद्वारा लिखीत, "मुंबई सॅगा..."

गँगस्टर अमर नाईक के एन्काऊंटर की घटनापर आधारीत, "मुंबई सॅगा" यह फिल्म, मिल से लेकर मॉल तक होनेवाले मुंबई के बदलाव पर रौशनी डालती है | फिल्म की कहानी आम कहानियों की तरह ही है | अन्याय के खिलाफ खड़ा रहनेवाला हिरो अमरत्य राव (जॉन एब्राहम), भाऊ (महेश मांजरेकर) नाम के बड़े राजनितिज्ञ की मदद से कुछ दिन में ही बड़ा गँगस्टर बनता है | अमरत्य राव जब काबू से बाहर होने लगता है, तब उसे रोकने का जिम्मा इंस्पेक्टर विजय सावरकर (इम्रान हाश्मी) अपने सिर पर लेता है और अखिर एन्काऊंटर में विजय अमरत्य को मार गिराता है |

फिल्म के सभी पात्र अगर देखें, तो ८० एवं ९० के दशक के मशहूर व्यक्तियों की, अर्थात अमर नाईक, छोटा राजन, हाजी मस्तान, एन्काऊंटर स्पेशालिस्ट विजय साळसकर और बाळासाहेब ठाकरे की याद आती है | पूरी फिल्म अगर देखी जाए, तो कहानी दो भागों में बटी हुई है | पहला भाग, मेकिंग और राईज ऑफ अमरत्य राव दर्शाता है, तो दूसरे भाग में राईज ऑफ विजय सावरकर के साथ विजय आणि अमरत्य के बीच के चूहे-बिल्लीवाला खेल देखने को मिलता है |

गुलशन ग्रोव्हर, महेश मांजरेकर, समीर सोनी, रोनीत रॉय इन कलाकारों ने उनके हिस्से की भूमिकाएँ बखूबी निभाईं हैं | प्रतीक बब्बर अपने किरदार को निभाने में थोड़े से कमजोर दिखे | उनकी डायलॉग डिलिवरी, एक्सप्रेशन्स, बाकी कलाकारों की तुलना में उतने उभरकर नहीं आये | Standout performance की अगर बात करें, तो काजल अगरवाल ने अच्छा काम किया है | सीमा राव के किरदार में उन्होंने जैसे जान फूँक दी है | सीमा राव का किरदार, "सिंघम" फिल्म के 'काव्या' की याद दिलाता है | फिल्म की दूसरी अच्छी बात थी, इम्रान हाश्मी का performance...

"चॉकलेट" और "बादशाहो" जैसी फिल्मों के कई अरसे बाद इम्रान हाश्मी के पास ऐसा कोई डॅशिंग रोल आया है | हाला कि उनका रोल इंटरवल के बाद ही शुरू हुआ, लेकिन उन्हें जितने सीन मिले थे, इम्रान हाश्मी ने उन्हें अच्छे से निभाया है | फिल्म में एक सीन है जहाँ विजय और अमरत्य के बीच फाईट होती है | वह सीन थोड़ा अटपटासा लगा | जॉन एब्राहम जैसे शारिरीक तौरपर सुदृढ़ इंसान के साथ इम्रान हाश्मी फाईट करे, यह बात कुछ जमी नहीं | यह सीन अगर ना होता तो शायद उन दोनों के बीच की लड़ाई और realistic लगती | उनके बीच जो आखरी action sequence फिल्माया गया, वह कुछ हद तक ठिक था |

फिल्म के नायक की बात करें, तो जॉन एब्राहम ने अपने किरदार को ठिक से निभाया है | क्या यह उनका outstanding performance था... तो मैं कहूँगा नहीं | इससे पहले भी "ऐतबार", "शूट आऊट अॅट वडाला", "सत्यमेव जयते", ऐसी फिल्मों में जॉन एब्राहमने इस किस्म के किरदार निभाएँ थे, फर्क था तो सिर्फ कहानी, जगह और नाम का | "ऐतबार" में हाला कि उनका निगेटिव्ह किरदार था, लेकिन बाकी दोनों फिल्मों में जॉन एब्राहम की भूमिकाएँ अमरत्य राव के किरदार से करीब करीब मिलती-जुलती थी |

फिल्म का बॅकग्राऊंड स्कोर अमर मोहिलेजी ने दिया है, जो कहानी को रोमहर्षक बनाने में काफी हद तक मदद करता है | फिल्म में दो ही गाने हैं, 'डंका बजा...' और 'शोर मचेगा...' | दोनों गानों के बीट्स अच्छे हैं और दोनों ही कहानी के साथ चलते हैं | पर यह गाने ऐसे नहीं, जो हम हर वक्त गुनगुनाएँ | फिल्म के संवाद काफी जोश भरे हैं किरदारों को उभारने में उनकी बड़ी मदद होती है | संक्षेप में कहा जाए, तो मुंबई में घटी एक-दो घटनाओं का आधार लेकर एक फिल्म बनी, जो आम मसाला फिल्मों की तरह पेश की गई | इसमें सच कितना और मसाला कितना, यह तो वहीं बता सकते हैं जो उस वक्त मौजूद थे | लेकिन, जॉन एब्राहम के फॅन्स के लिये संजय गुप्ता निर्देशित "मुंबई सॅगा", दोन घंटों का सुहाना सफर है यह कहना गलत नहीं होगा |

@ अनिकेत परशुराम आपटे.

Tuesday, 7 September 2021

खिलाड़ी कुमार...

राजीव हरी ओम भाटिया हे नाव ऐकल्यावर कदाचित काहीच समजणार नाही. पण 'खिलाड़ी' हा शब्द ऐकताच एकाच कलावंताचं नाव समोर येतं. तो कलावंत म्हणजे बोलक्या ओठांचा, उंचपुरा, Martial Arts या कलेत पारंगत असलेला एक देखणा अभिनेता, अक्षय कुमार...

अक्षय कुमार प्रथम दिसले, ते १९८७ साली प्रदर्शित झालेल्या “आज” या चित्रपटात. यात ते त्यांच्या खऱ्या नावानिशी, म्हणजेच राजीव भाटिया या नावाने झळकले. चित्रपटाचे नायक होते कुमार गौरव आणि त्यांचं चित्रपटातलं नाव होतं अक्षय. त्याच नावावरून राजीव भाटिया यांनी अक्षय कुमार हे नाव धारण केलं. त्या चित्रपटात त्यांना फारसा वाव नसला तरी त्यांच्या Martial Arts या कलेचं कौतुक झालं. १९९१ साली नायक म्हणून “सौगंध” या चित्रपटातून अक्षय कुमार प्रथमच प्रेक्षकांसमोर आले. चित्रपटाला फारसे यश नाही मिळाले पण अक्षय कुमार यांच्या अभिनयाचे मात्र कौतुक झाले...

आपल्या सुरुवातीच्या काळात, अक्षय कुमार हाणामारी चित्रपटांसाठी जास्त जाणले जायचे. “Mr. Bond”, “अशांत”, "कायदा कानून”, “वक़्त हमारा है”, “सैनिक”, “ऐलान”, “जय किशन”, “मोहरा”, "लहू के दो रंग",  अशा अनेक चित्रपटांमधून अक्षय कुमार त्यांच्या हाणामारीसाठी चर्चेत राहिले. थोडीशी हाणामारी आणि थोडं रहस्य असं मिश्रण असलेला त्यांचा “खिलाड़ी" हा चित्रपट तुफान गाजला आणि अक्षय कुमार यांच्या बहुचर्चित खिलाड़ी मालिका सुरू झाली. पुढे “मैं खिलाड़ी तू अनारी”, "सबसे बड़ा खिलाड़ी", “खिलाड़ी ४२०”, “खिलाड़ियो का खिलाड़ी”, “Mr. & Mrs खिलाड़ी”, “International खिलाड़ी”, “खिलाड़ी ७८६” अशी एका मागून एक यशस्वी चित्रपटांची रांग लागली...

अक्षय कुमार यांच्या नृत्यकलेबद्दल आणि हाणामारी दृश्यांबद्दल अनेक चित्रपट चर्चेत होतेच, पण काही चित्रपट विशेष लक्षात राहिले, अक्षय कुमार यांच्या साहस दृश्ये स्वत:च करण्याच्या आवडीमुळे. अनेक चित्रपटांमधून त्यांच्यावर चित्रित झालेली चित्तथरारक साहसदृश्य बहुतकरून त्यांनी स्वत:च केली. काही वेळा त्यांना दुखापतही झाली होती. पण तरीही डमी हा प्रकार न वापरता अक्षय कुमार स्वत:च या साहसदृश्यांची जबाबदारी घ्यायचे. हवेत असणाऱ्या विमानावर उभं राहणे, चालत्या हेलिकॉप्टरच्या पायाला लटकणे, काही फूट ऊंच अशा कड्यावरून किंवा भिंतीवरून उडी घेणे, अशी साहसदृश्य अक्षय कुमार यांच्या सहभागाने सजली आणि गाजलीदेखील...

एक नायक म्हणून अक्षय कुमार जितके प्रसिद्ध होते, तितकेच विनोदी अभिनेते व खलनायक म्हणूनही त्यांनी यश संपादन केले. "हेरा फेरी", "फिर हेरा फेरी", "भूलभुलैय्या", "दे दना दन", "भागम् भाग", "हाऊसफूल" मालिका, "हे बेबी", "दिवाने हुए पागल" अशा चित्रपटांमधून त्यांच्या विनोदी अभिनयाची झलक आपल्याला पहायला मिळाली, तर “अजनबी”, “अफलातून”, “Blue”, "२.०" अशा काही चित्रपटांमधून अक्षय कुमार यांनी रंगवलेल्या खलनायकी व्यक्तिरेखाही प्रेक्षकांच्या मनात घर करून बसल्या...

विनोद, हाणामारी, नृत्य, याखेरीज अक्षय कुमार यांच्या अभिनयाच्या वेगळ्या छटा दिसल्या, त्या "धड़कन", "वक्त - रेस अगेंस्ट टाईम", "स्पेशल २६", "यह दिल्लगी", "जानवर", "संघर्ष", "बेबी", "मिशन मंगल" अशा चित्रपटांमधून. शिवाय, "पॅडमॅन", "टॉयलेट - एक प्रेमकथा" अशा वेगळ्या धाटणीच्या चित्रपटांमधून अक्षय कुमार यांनी समाज प्रबोधनही घडवून आणलं. अक्षय कुमार जसे अनुभवाने प्रगल्भ होत गेले तसे त्यांनी त्यांच्या देहबोलीत, आवाजात आणि चित्रपट निवडीत कमालीचे बदल घडवून आणले. याचाच परिणाम म्हणून विविध चित्रपटांमधून अक्षय कुमार यांनी साकारलेल्या भूमिकांना प्रेक्षकांची दाद मिळाली...

चित्रपटसृष्टीत उल्लेखनीय कामगिरीसोबतच अक्षय कुमार यांनी जाहिरात क्षेत्रातही चांगलं योगदान दिलं आहे. कोणे एकाकाळी मद्यपानाची जाहिरात करणाऱ्या अक्षय कुमार यांनी गृहपयोगी वस्तूंसोबत सामाज कार्यांची जाणीव करून देणाऱ्या आणि सामाजिक बांधिलकी जपणाऱ्या जाहिरातींमध्येही कामं केली. याशिवाय आपल्या प्रसिद्धीचा वापर करून भारत व कॅनडा यांच्यातले संबंध अधिक सुदृढ करण्यात अक्षय कुमार यांनी मोलाचा वाटा उचलला होता. याच मोलाच्या योगदानाबद्दल कॅनडा सरकारने अक्षय कुमार यांना एका विशेष नियमांतर्गत कॅनडाचं नागरिकत्वही बहाल केलं...

आज ९ सप्टेंबर. या हरहुन्नरी अभिनेत्याचा जन्मदिवस. सर्वांच्या लाडक्या या खिलाड़ी कुमारला वाढदिवसाच्या मनापासून शुभेच्छा...

"हर दिल मैं है रब बसता...
हर दिल में है रब बसता...
सबसे बड़ा खिलाड़ी तू है...
सबके दिलों पर राज है करता..."

@ अनिकेत परशुराम आपटे.