राजीव हरी ओम भाटिया हे नाव ऐकल्यावर कदाचित काहीच समजणार नाही. पण 'खिलाड़ी' हा शब्द ऐकताच एकाच कलावंताचं नाव समोर येतं. तो कलावंत म्हणजे बोलक्या ओठांचा, उंचपुरा, Martial Arts या कलेत पारंगत असलेला एक देखणा अभिनेता, अक्षय कुमार...
अक्षय कुमार प्रथम दिसले, ते १९८७ साली प्रदर्शित झालेल्या “आज” या चित्रपटात. यात ते त्यांच्या खऱ्या नावानिशी, म्हणजेच राजीव भाटिया या नावाने झळकले. चित्रपटाचे नायक होते कुमार गौरव आणि त्यांचं चित्रपटातलं नाव होतं अक्षय. त्याच नावावरून राजीव भाटिया यांनी अक्षय कुमार हे नाव धारण केलं. त्या चित्रपटात त्यांना फारसा वाव नसला तरी त्यांच्या Martial Arts या कलेचं कौतुक झालं. १९९१ साली नायक म्हणून “सौगंध” या चित्रपटातून अक्षय कुमार प्रथमच प्रेक्षकांसमोर आले. चित्रपटाला फारसे यश नाही मिळाले पण अक्षय कुमार यांच्या अभिनयाचे मात्र कौतुक झाले...
आपल्या सुरुवातीच्या काळात, अक्षय कुमार हाणामारी चित्रपटांसाठी जास्त जाणले जायचे. “Mr. Bond”, “अशांत”, "कायदा कानून”, “वक़्त हमारा है”, “सैनिक”, “ऐलान”, “जय किशन”, “मोहरा”, "लहू के दो रंग", अशा अनेक चित्रपटांमधून अक्षय कुमार त्यांच्या हाणामारीसाठी चर्चेत राहिले. थोडीशी हाणामारी आणि थोडं रहस्य असं मिश्रण असलेला त्यांचा “खिलाड़ी" हा चित्रपट तुफान गाजला आणि अक्षय कुमार यांच्या बहुचर्चित खिलाड़ी मालिका सुरू झाली. पुढे “मैं खिलाड़ी तू अनारी”, "सबसे बड़ा खिलाड़ी", “खिलाड़ी ४२०”, “खिलाड़ियो का खिलाड़ी”, “Mr. & Mrs खिलाड़ी”, “International खिलाड़ी”, “खिलाड़ी ७८६” अशी एका मागून एक यशस्वी चित्रपटांची रांग लागली...
अक्षय कुमार यांच्या नृत्यकलेबद्दल आणि हाणामारी दृश्यांबद्दल अनेक चित्रपट चर्चेत होतेच, पण काही चित्रपट विशेष लक्षात राहिले, अक्षय कुमार यांच्या साहस दृश्ये स्वत:च करण्याच्या आवडीमुळे. अनेक चित्रपटांमधून त्यांच्यावर चित्रित झालेली चित्तथरारक साहसदृश्य बहुतकरून त्यांनी स्वत:च केली. काही वेळा त्यांना दुखापतही झाली होती. पण तरीही डमी हा प्रकार न वापरता अक्षय कुमार स्वत:च या साहसदृश्यांची जबाबदारी घ्यायचे. हवेत असणाऱ्या विमानावर उभं राहणे, चालत्या हेलिकॉप्टरच्या पायाला लटकणे, काही फूट ऊंच अशा कड्यावरून किंवा भिंतीवरून उडी घेणे, अशी साहसदृश्य अक्षय कुमार यांच्या सहभागाने सजली आणि गाजलीदेखील...
एक नायक म्हणून अक्षय कुमार जितके प्रसिद्ध होते, तितकेच विनोदी अभिनेते व खलनायक म्हणूनही त्यांनी यश संपादन केले. "हेरा फेरी", "फिर हेरा फेरी", "भूलभुलैय्या", "दे दना दन", "भागम् भाग", "हाऊसफूल" मालिका, "हे बेबी", "दिवाने हुए पागल" अशा चित्रपटांमधून त्यांच्या विनोदी अभिनयाची झलक आपल्याला पहायला मिळाली, तर “अजनबी”, “अफलातून”, “Blue”, "२.०" अशा काही चित्रपटांमधून अक्षय कुमार यांनी रंगवलेल्या खलनायकी व्यक्तिरेखाही प्रेक्षकांच्या मनात घर करून बसल्या...
विनोद, हाणामारी, नृत्य, याखेरीज अक्षय कुमार यांच्या अभिनयाच्या वेगळ्या छटा दिसल्या, त्या "धड़कन", "वक्त - रेस अगेंस्ट टाईम", "स्पेशल २६", "यह दिल्लगी", "जानवर", "संघर्ष", "बेबी", "मिशन मंगल" अशा चित्रपटांमधून. शिवाय, "पॅडमॅन", "टॉयलेट - एक प्रेमकथा" अशा वेगळ्या धाटणीच्या चित्रपटांमधून अक्षय कुमार यांनी समाज प्रबोधनही घडवून आणलं. अक्षय कुमार जसे अनुभवाने प्रगल्भ होत गेले तसे त्यांनी त्यांच्या देहबोलीत, आवाजात आणि चित्रपट निवडीत कमालीचे बदल घडवून आणले. याचाच परिणाम म्हणून विविध चित्रपटांमधून अक्षय कुमार यांनी साकारलेल्या भूमिकांना प्रेक्षकांची दाद मिळाली...
चित्रपटसृष्टीत उल्लेखनीय कामगिरीसोबतच अक्षय कुमार यांनी जाहिरात क्षेत्रातही चांगलं योगदान दिलं आहे. कोणे एकाकाळी मद्यपानाची जाहिरात करणाऱ्या अक्षय कुमार यांनी गृहपयोगी वस्तूंसोबत सामाज कार्यांची जाणीव करून देणाऱ्या आणि सामाजिक बांधिलकी जपणाऱ्या जाहिरातींमध्येही कामं केली. याशिवाय आपल्या प्रसिद्धीचा वापर करून भारत व कॅनडा यांच्यातले संबंध अधिक सुदृढ करण्यात अक्षय कुमार यांनी मोलाचा वाटा उचलला होता. याच मोलाच्या योगदानाबद्दल कॅनडा सरकारने अक्षय कुमार यांना एका विशेष नियमांतर्गत कॅनडाचं नागरिकत्वही बहाल केलं...
आज ९ सप्टेंबर. या हरहुन्नरी अभिनेत्याचा जन्मदिवस. सर्वांच्या लाडक्या या खिलाड़ी कुमारला वाढदिवसाच्या मनापासून शुभेच्छा...
@ अनिकेत परशुराम आपटे.




No comments:
Post a Comment