रमेश सिप्पी दिग्दर्शित, "शोले" हा चित्रपट सर्वांनाच परिचयाचा आहे. आपण सगळ्यांनीच आजवर अनेक वेळा "शोले" पाहिला असेल. इतकंच कशाला, त्यातले संवाद, गाणी आणि व्यक्तिरेखाही सर्वांच्या डोक्यात फिट्ट बसल्या आहेत. "मुग़ल-ए-आज़म" नंतर हिंदी चित्रपटसृष्टीचा milestone ठरलेला "शोले" तुमच्याप्रमाणेच मीही अनेक वेळा पाहिला आहे. गेल्याच आठवड्यात टि.व्ही.वर पुन्हा मी "शोले" पाहिला. त्यावेळी मला चित्रपटाच्या लेखनाबद्दल जाणवलेल्या काही गोष्टी...
ट्रेन हल्ल्याचा सीन...
सीन असा घडतो, इंस्पेक्टर बलदेव सिंह बेड्यांमध्ये जखडलेल्या जय व वीरूला घेऊन ट्रेनने जात असतात. अचानक ट्रेनवर दरोडेखोर हल्ला करतात. जय व वीरू मदतीचा हात पुढे करतात आणि त्यांच्या मदतीने इंस्पेक्टर बलदेव सिंह तो हल्ला परतवून लावतात. या तुफान action sequenceचं चित्रिकरणही तितकंच सुंदर झालं होतं. या सीनच्या लेखनाची एक दुसरी बाजू मला जाणवली...
सीन सुरू होतो तेव्हा ट्रेनवर दोन हवालदार आणि एक इंस्पेक्टर, म्हणजे तीन बंदुका असतात. दोन्ही हवालदार धारातीर्थी पडतात आणि एकच पिस्तूल उरते. जय व वीरू लढायला तयार होतात. जय आणि वीरूमध्ये नजरानजर होते आणि वीरू इंजीनकडे धाव घेतो. इथे एकही संवाद न देता लेखकाने दाखवलं की नेम धरून गोळी मारण्यात जय पारंगत आहे तर एखादं वाहन वेगाने चालवण्यात वीरू पटाईत आहे...
वीरू तितक्याच वेगाने ट्रेन चालवतो जितक्या वेगात घोड्यावरून दरोडेखोर आत प्रवेश करू शकतील. हव्या तेवढ्या बंदुका आत येताच वीरू ट्रेनचा वेग वाढवतो आणि संकटाला मागे टाकून ट्रेन पार होते. दुसरीकडे जय आणि बलदेव सिंहमध्येही एकही संवाद न वापरता प्लॅन ठरतो आणि बलदेव सिंह ट्रेनमागून येणाऱ्या हल्ल्याला थोपवतो तर जय ट्रेनच्या बाजूने येणाऱ्या हल्ल्याला परतवतो. जय व बलदेव सिंह, ट्रेनवर येणाऱ्या संकटाला लांब ठेवण्याचा plan execute करतात तर वीरू ट्रेनला संकटापासून दूर नेण्याचा plan execute करतो...
थोडक्यात, एकही संवाद न वापरता, planning, execution आणि quality identification या तीनही गोष्टी लेखकाने प्रभावीपणे दाखवल्या आहेत...
नाणेफेकीचे सीन...
नाणेफेकीचे सगळे सीन्स पाहिले, तर नाणं फकत जय उडवतो आणि नाण्याच्या दोन्ही बाजूंबद्दलही तोच बोलतो. प्रत्येक वेळी 'हेड' येतं आणि प्रत्येक वेळी जयच नाणेफेक जिंकतो. पण यातही, वीरू सारखा हरतो आहे हे मात्र दर्शवलं गेलं नाही. Decision makingच्या बाबतीत वीरू थोडा गोंधळलेला दाखवला गेला आहे तर जय सक्षम असतो. त्याला जे हवं तेच तो नाण्याच्या 'हेड' या बाजूवर ठेवतो आणि तेच येतं...
प्रत्येक वेळी जयला माहित असतं की वीरू एकटा योग्य निर्णय घेऊ शकणार नाही किंवा वेळ लावेल. अशा वेळी जय वीरूला बरोबरीची संधी देत नाणेफेकीच्या मार्गाने स्वत:चाच निर्णय उचलून धरतो. पण तरीही, वीरूला कुठेही कमी लेखण्याचा प्रयत्न दिसत नाही...
थोडक्यात, नाणेफेकीसारखी छोटी गोष्ट वापरून लेखकाने fair decision making आणि decision implementation या दोन गोष्टी खूप छान पद्धतीने मांडल्या...
इतक्या संदर लेखनाबद्दल सलीम-जावेद म्हणजेच सलीम खान व जावेद अख़्तर या लेखक द्वयींना सलाम...
@ अनिकेत परशुराम आपटे.

No comments:
Post a Comment