असं म्हणतात, की दृढनिश्चयाच्या बळावर स्त्री आपल्या पतीचे प्राणदेखील परत आणू शकते याच मुद्द्यावर आधारली आहे सुजॉय घोष लिखीत व दिग्दर्शित थरारक शोधकथा, 'कहानी...'
कोलकात्यात एका मेट्रोमध्ये घडलेल्या एका दुर्दैवी घटनेपासून चित्रपट सुरू होतो. एकही प्रवासी न वाचलेल्या त्या घटनेचा तपास सुरू असतानाच अरनब बाग्ची नावाच्या माणसाला शोधत सॉफ्टवेयर इंजिनीयर असलेली त्याची गर्भवती पत्नी विद्या बाग्ची (विद्या बालन) कोलकात्यात येते. NDCच्या (National Data Center) एका कामगिरीसाठी अरनब इथे आला होता आणि गायब झाला असं पोलीसांना सांगत विद्या त्यांची मदत मागते. सत्योकी सिन्हा ऊर्फ राणा (परमब्रता चॅटर्जी) नावाचा पोलीस ऑफिसर विद्याची मदत करायला तयार होतो. NDCची HR प्रमुख ऍग्नेस डिमेलोकडून (कॉलीन बांचे) विद्याला NDCमध्येच काम करणाऱ्या मिलन दामजी (इंद्रनील सेनगुप्ता) या माणसाबद्दल महत्वपूर्ण माहिती मिळते आणि कथेला वेगळंच वळण मिळतं...
अरनब बाग्ची कोलकात्यात आल्याचे, राहत असल्याचे व काम करत असल्याचे काहीच पुरावे सापडत नसताना, फक्त एकच दुवा विद्यासमोर असतो, तो म्हणजे ऍग्नेसच्या बोलण्यातून आलेला मिलन दामजी. मिलन दामजी हा अरनबपर्यंत पोहोचण्याचा एकच मार्ग असावा व कदाचित याचमुळे अरनब संकटात सापडला असावा आणि मिलनला शोधलं तर अरनबही सापडेल, याच तर्कांचा आधार घेऊन मिलनच्या शोधार्थ विद्या निघते. दोन वर्षांपूर्वी कोलकात्यात घडलेल्या मेट्रो दुर्घटनेचा संशईत सूत्रधार असलेल्या मिलनचा शोध, विद्या नावाची मुलगी घेत आहे, हे समजताच दिल्लीला IBचे (Intelligence Bureau) प्रमुख भास्करन के. (दृतिमान चॅटर्जी) आणि त्यांचा सहायक, ए. खान (नवाजुद्दीन सिद्दिकी) हादरतात आणि खान तापडतोब कोलकात्यात येतो. कर्नल प्रताप बाजपई (दर्शन जरीवाला) या निवृत्त अधिकाऱ्याला पाचारण केलं जातं. तो सांगतो की IBमध्ये एक गद्दार आहे ज्याने मिलनला मदत केली होती आणि प्रकरण अधिकच गहिरं व मोठं होत जातं...
मिलनपर्यंत पोहोचण्याच्या पायऱ्या असणाऱ्या ऍग्नेस डिमेलोचा आणि डॉ. गांगुली या दोघांचा खून होतो पण मिलनच्या जुन्या घरातून विद्या व राणाला NDCमध्ये कार्यरत असलेल्या शशिधर (शांतिलाल मुखर्जी) या माणसाचा धागा मिळतो. शशिधरचा अपघाती खून होतो पण त्याच्या कॉम्प्यूटरमधून विद्या आणि राणाला महत्वपूर्ण माहिती मिळते. त्या माहितीच्या आधारे, विद्या आणि राणाच्या मदतीने खान सापळा लावतो. सापळ्यात अडकलेला मिलन दामजी अखेर सापडतो आणि अरनब बाग्चीच्या गायब होण्यामागचं रहस्यही उलगडतं...
अगदी पहिल्या फ्रेमपासून मनाची पकड घेतलेला 'कहानी', उत्कंठा शेवटपर्यंत कमी होऊ देत नाही. उत्सूकता शिगेला पोहोचवणाऱ्या या चित्रपटाचा अनपेक्षित आणि धक्कादायक शेवट होतो. कथा आणि पटकथा या दोन्ही गोष्टीत सुजॉय घोषने बाजी मारली आहे. कथानक अतिवेगवान होऊ नये याचाही पुरेपूर विचार झाला आहे. सर्व कलावंतांनी त्यांच्या त्यांच्या भूमिका छान वठवल्या आहेत पण विद्या बालन यांनी त्यांच्या उत्तम अदाकारीने चित्रपटावर कळस चढवला आहे...
मिलन दामजीसारखा बुद्धीमान व कावेबाज माणूस, जो मागे काहीच पुरावे सोडत नाही, तो इतक्या सहज सापळ्यात अडकावा आणि विद्या व राणाला जी माहिती मिळते, त्या माहितीत व मिलन दामजीमध्ये दुसरं काहीच नसावं, हे जरा खटकलं. अर्थात, अरनब बाग्ची व मिलन दामजी यांना शोधण्याचा घटनाक्रम खूप छान लिहिला गेला आहे, पण सापळ्याचा कथाभाग तितकासा नाही जमला....
एकंदरीत, क्षणोक्षणी उत्कंठा वाढवत जाणारी वेगवान शोधकथा अनुभवायची असेल तर नक्कीच पहावा, सुजॉय घोष लिखीत व दिग्दर्शित, "कहानी..."
@ अनिकेत परशुराम आपटे.
No comments:
Post a Comment