Monday, 11 May 2020

A Beautiful Mind...


काही सत्यघटनांवरचे चित्रपट येतात आणि काळात विरून जातात. पण काळ बदलला तरी काही चित्रपटांचं सौंदर्य आणि लोकप्रियता तशीच टिकून राहते. असे चित्रपट, इतिहासात अजरामर होतात. यातलाच एक आहे रॉन हार्वर्ड दिग्दर्शित, "A Beautiful Mind..."

जॉन नॅश (रसेल क्रो), एक अत्यंत हुशार आणि कर्तबगार गणितज्ञ व अर्थशास्त्रज्ञ. मात्र त्याच्या या बुद्धिमत्तेला कोंदण लाभलं ते Paranoid Schizophrenia या मेंदूच्या आजाराचं. त्याच्या या विकारावर मात करून वेगवेगळे शोध आणि गणितं सोडवण्याची वेगवेगळी तंत्र आणि पद्धती निर्माण करणाऱ्या व नोबेल पारितोषिक मिळवणाऱ्या याच जॉन नॅशची कहाणी म्हणजेच, "A Beautiful Mind..."

जॉनला एक अत्यंत महत्वाचा कोड क्रॅक करण्यासाठी बोलावलं जातं, तिथून कथेला खरी सुरुवात होते. त्याच्या कामादर्म्यान जॉन, Paranoid Schizophrenia ह्या आजाराच्या विळख्यात ओढला जातो. त्याला सतत भास होऊ लागतात. त्याच्याच मेंदूतून काही काल्पनिक पात्रही जॉन तयार करतो जी त्याच्याखेरीज कोणालाही दिसत नाहीत...

जॉन त्या पात्रांशी संवाद साधतो, गप्पाही मारतो. इतकंच नाही, तर आपण अमेरिकन गुप्तचर खात्यासाठी एक खूप महत्वाचं काम करतोय असंच त्याला वाटू लागतं. जॉनचा मेंदू त्याचं काम इतक्या प्रभावीपणे मांडतो की आजूबाजूच्या लोकांनाही त्याचं काम खरं वाटू लागतं. कालांतराने जॉनच्या लक्षात येतं की तो आजारी आहे. तेव्हा जॉन या आजाराविरुद्ध उभा राहतो आणि यश मिळवतो...

चित्रपटाचे दोन पैलू आहेत, एक म्हणजे जॉनचं समाजासोबत असलेलं वैचारिक भांडण, जिथे लोक सांगत राहतात की तो आजारी आहे पण त्याचं मन मानत नाही. चित्रपटाचा दुसरा पैलू आहे, जॉनचं स्वत:शी चाललेलं द्वंद्व, जेव्हा जॉनला आपण आजारी आहोत हे पटतं आणि त्यावर मात करण्यासाठी तो धडपडतो....

हा दुसरा पैलूच खरंतर चित्रपटाचा मुख्य गाभा आहे. काळ जसा पुढे सरकतो, तसा माणसाच्या दिसण्यात बदल होतो. मागे ज्या व्यक्तिला आपण पाहिले आहे तीच व्यक्ती जर काही वर्षांनंतर आपल्या समोर आली तर वयोमानाप्रमाणे झालेला बदल आपल्याला दिसतो. पण जॉनने निर्माण केलेली काल्पनिक पात्र जेव्हा पुन्हा त्याच्यासमोर येतात तेव्हा त्यांच्यात कोणताही फरक त्याला आढळत नाही. तिथे त्याला जाणवायला लागतं, की काहीतरी गडबड आहे आणि हाच या चित्रपटाचा high point आहे...

या अत्यंत सुंदर आणि संवेदनशील चित्रपटाची कथा लिहीली आहे अकीवा गोल्ड्मन यांनी आणि दिग्दर्शन आहे, रॉन हार्वर्ड यांचं. चित्रपटाचा उच्चांक आहे, सशक्त कथा व पटकथा आणि रसेल क्रो यांची अप्रतीम अदाकारी. एकंदरीत, मनात कायमचं घर करणारा एक अत्यंत सुंदर चित्रपट म्हणजेच, "A Beautiful Mind..."

@ अनिकेत परशुराम आपटे.

No comments:

Post a Comment