Friday, 15 May 2020

फर्ज़ंद आणि फत्तेशिकस्त...




गनिमीकावा... छत्रपती शिवाजी महाराजांच्या युद्धनितीचा एक अविभाज्य घटक... गनीमांना सळो की पळो करून सोडणारा गनिमीकावा... आपण जिंकलो किंवा जिंकूच अशा गैरसमजात असणाऱ्या गनीमाला पुरतं नामोहरम करणारा गनिमीकावा... कमीत कमी रक्त आणि मनुष्यबळ वापरून गनीमाचं जास्तीत जास्त नुकसान करणारा गनिमीकावा. याच गनिमीकाव्याचा वापर करून फत्ते केलेल्या दोन मोहिमांचा दृकश्राव्य अनुभव देणारे दिग्पाल लांजेकर लिखित व दिग्दर्शित दोन भव्य चित्रपट म्हणजेच 'फर्ज़ंद' आणि 'फत्तेशिकस्त'...

फर्ज़ंद (२०१८)...

आदिल शाहच्या २५००च्या प्रचंड फौजेला आपल्या साठ मावळ्यानिशी नमवून पन्हाळ्याची मोहीम फत्ते करणाऱ्या शूर सरदार कोंडाजी फर्ज़ंद यांची कथा सांगणारा चित्रपट म्हणजेच 'फर्ज़ंद'...

सरदार तान्हाजी मालुसरे (गणेश यादव) या सिंहाच्या बलिदानावर जिंकलेल्या कोंढाण्याच्या लढाईपासून चित्रपट सुरू होतो. सिंहगड स्वराज्यात येतो आणि शिवाजी महाराजांच्या (चिन्मय मांडलेकर) राज्याभिषेकाचे वारे वाहू लागतात. एकदा चाल करून अपयश आलेल्या आणि अजूनही स्वराज्यापासून दूर असलेल्या बेशक़ ख़ान (समीर धर्माधिकारी) या सरदाराच्या आखत्यारीत असलेल्या पन्हाळ्याचे वेध जिजाऊंना (मृणाल कुलकर्णी) लागतात...

महाराजांच्या हाकेला प्रतिसाद देत सरदार कोंडाजी फर्ज़ंद (अंकित मोहन) साठ मावळ्यांची जमवाजमव करतात. स्वराज्याचे हेर बहिर्जी नाईक (प्रसाद ओक), त्यांचे दोन साथिदार किस्ना (निखील राऊत) आणि केसर (मृण्मई देशपांडे), फर्ज़ंद यांच्यासह व्यूह रचना आखतात आणि केवळ साडे तीन तासात २५०० गनीमांचा पराभव करून फर्ज़ंद पन्हाळा काबीज़ करतात...

घटना सर्वांना परिचयाची असली तरी चित्रीकरण, संवाद आणि संगीत यांच्या बळावर चित्रपट अधिक उठाव घेतो. अंकित मोहन यांचा हा पहिलाच चित्रपट असूनही त्यांनी तो बऱ्यापैकी हाताळला आहे. अर्थात, कसलेला बांधा आणि लढाईची दृष्य दाखवताना त्यांच्या वाट्याला अभिनयाची दृष्य थोडी कमीच आली आहेत. मुख्य कलावंताखेरीज नेहा जोशी, राहुल मेहेंदळे, प्रवीण तर्डे, अजय पूरकर, आस्ताद काळे, हरीश दुधाडे या कलाकारांनीही आपापल्या भूमिका छान वठवल्या आहेत...

चित्रपटातली चकमकींची दृष्य, हाणामारीची दृष्य आणि संगीत या चित्रपटाच्या जमेच्या बाजू आहेत. युद्धाच्या वेळी होणाऱ्या तलवारींच्या पातींची घर्षणं, प्रत्येक दृष्यागणिक ऐकू येणारं पार्श्वसंगीत आणि चित्रपटातली गाणी या तीनही आघाड्यांवर अमितराज यांनी छान बाजी मारली आहे. थोडक्यात, दिग्पाल लांजेकर लिखित व दिग्दर्शित 'फर्ज़ंद' या चित्रपटाने पन्हाळा विजयाच्या घटनेसह प्रेक्षकांची मनेही जिंकली आहेत...

फत्तेशिकस्त (२०१९)...

भारतातल्या पहिल्या-वहिल्या surgical strikeची आणि लाखाहून अधिक फौजफाटा असणाऱ्या शाहिस्ता ख़ानाला मुठभर मावळ्यांच्या साथीने शिवाजी महाराजांनी कसं जेरीस आणलं याची कथा सांगणारा चित्रपट म्हणजेच 'फत्तेशिकस्त'...

पुण्यातल्या लाल महालात तळ ठोकून बसलेल्या शाहिस्ता ख़ानाची (अनूप सोनी) छावणी आणि त्याचा सरदार नामदार ख़ान (समीर धर्माधिकारी) यांच्या जुलुमांचा पाढा वाचत चित्रपट सुरू होतो. राजगडावर झालेल्या हल्ल्याला परतवून लावण्यासाठी जिजाऊ (मृणाल कुलकर्णी) स्वत: तलवार हाती घेतात. अशावेळी शिवाजी महाराज (चिन्मय मांडलेकर) पन्हाळ्यावरून सुटण्याच्या तयारीत असतात. सरदार बाजी प्रभू देशपांडे यांच्या बलिदानाने पावन झालेली घोड खिंड पार करून शिवाजी महाराज आधी विशालगड मग राजगडावर पोहोचतात...

शाहिस्ता ख़ानाचा बंदोबस्त करण्यासाठी शिवाजी महाराजांच्या एका हाकेवर, त्यांचे शूर सरदार यसाजी कंक (अंकित मोहन), तान्हाजी मालुसरे (अजय पूरकर) कोयाजी बांदल (दिग्पाल लांजेकर), चिमणाजी देशपांडे (विक्रम गायकवाड) आणि स्वराज्याचे हेर बहिर्जी नाईक (हरीश दुधाडे) त्यांचे दोन साथिदार केसर (मृण्मई देशपांडे) व किस्ना (निखील राऊत) यांच्यासह लढायला तयार होतात. शिवाजी महाराजांना कोंडीत पकडण्याच्या मनसूब्याने कोकणात उतरलेल्या क़ार्तलब ख़ान (आस्ताद काळे) या सरदाराला उमर खिंडीत गनिमीकाव्यानिशी केलेल्या हल्ल्यात शिवाजी महाराजांकडून हार पत्करावी लागते आणि शाहिस्ता ख़ान अधिक चवताळतो...

लाल महालावर मोठा हल्ला करून शाहिस्ता ख़ानाला पुरतं नामोहरम करायच्या इराद्याने महाराज योजना आखतात. चिमणाजींच्या मदतीने बहिर्जी नाईक लाल महालावरच्या हल्ल्याच्या व निसटण्याच्या जागा निश्चित करतात. अखेर महाराज छुपा हल्ला करतात आणि तीन वर्ष पुण्यात ठाण मांडून बसलेल्या शाहिस्ता ख़ानाला तुटक्या बोटानिशी तीन दिवसातच पुण्याहून पलायन करावं लागतं...

एकामागून एक येणाऱ्या वेगवान घडामोडींमुळे चित्रपट कुठेही पकड सोडत नाही. नितीन चंद्रकांत देसाई यांनी उभारलेले नेत्रदिपक सेट्स चित्रपटाला अधिक ऊंची देतात. गाण्यांचा जास्त भपकारा न करता, कीर्तन, पोवाडा, जोगवा आणि कव्वाली या गायन प्रकारांचा आधार घेत चित्रपट पुढे सरकतो. प्रसंगानुरूप येणाऱ्या गाण्यांमध्येही काही घटना घडत असल्याने गाणी रटाळ किंवा दिशा बदलणारी वाटत नाहीत. हाणामारीची दृष्य आणि संगीताखेरीज चित्रपटात ड्रोन कॅमेऱ्याच्या सहाय्याने केलेलं गड-किल्ल्यांचं व जंगल-खोऱ्यांचं छायाचित्रण विशेष लक्षात राहतं...

थोडक्यात, शाहिस्ता ख़ानाची शिकस्त आणि लाल महालावर झालेली फत्ते दाखवताना दिग्पाल लांजेकर लिखित व दिग्दर्शित 'फत्तेशिकस्त' या चित्रपटाने प्रेक्षकांच्या मनावरही फत्ते मिळवली आहे...

दोन्ही चित्रपटात...

२०१८ साली प्रदर्शित झालेला 'फर्ज़ंद' आणि २०१९ सालच्या 'फत्तेशिकस्त' या दोन्ही चित्रपटांचे लेखक व दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर यांनी कलावंतांच्या निवडीत पैकीच्या पैकी गूण मिळवलेले दिसतात. 'फर्ज़ंद' चित्रपटातले काही कलावंत वेगळ्या भूमिकेत 'फत्तेशिकस्त' या चित्रपटात आपल्या समोर येतात तर काही कलावंतांच्या जागी नवीन कलाकार आपल्याला दिसतात. दोन्हीही चित्रपटात अभिनय जरा loud झाला आहे. फक्त मोठे डोळे केल्याने आणि दात-ओठ खाल्ल्यानेच स्फूरण चढतं असं बऱ्याच ठिकाणी दाखवलं गेलं आहे जे काही अंशी अयोग्य वाटतं...

अंकित मोहन या कलावंताला दोन्ही चित्रपटांत एखाद्या हिंदी किंवा इंग्रजी पहिलवान नायकाप्रमाणे दाखवलं गेलं आहे. अदाकारीपेक्षा त्याच्या कमावलेल्या शरीराचा चित्रपटात जास्त मारा केलेला दिसतो. चित्रपटातली काही दृष्य खास करून अंकित मोहनला प्रकाशझोतात आणण्यासाठीच लिहिली असावीत असं वाटतं. याउलट आपल्या कसदार अभिनयामुळे आणि अप्रतीम संवादफेकीमुळे अजय पूरकर आणि चिन्मय मांडलेकर दोन्ही चित्रपटात चांगलेच लक्षात राहतात...

विशेष नमूद करावेसे वाटते केसर या व्यक्तिरेखेबद्दल. 'फर्ज़ंद' चित्रपटात केसर जिवावर उदार होऊन इतरांचा प्राण वाचवते असा कथाभाग दाखवला आहे. इतिहास पाहता, 'फत्तेशिकस्त' चित्रपटात दाखवलेला घटनाक्रम, 'फर्ज़ंद' चित्रपटात दाखवलेल्या घटनेच्या आधी घडला होता. त्या अनुषंगानेच 'फत्तेशिकस्त' या चित्रपटात लेखकाने केसर या व्यक्तिरेखेचा वापर केलेला दिसतो. पण तरीही केसर ही व्यक्तिरेखा इतर व्यक्तिरेखांच्या तुलनेने जरा फिल्मी वाटते...

सेट्स, रंगभूषा, वेषभूषा आणि अदाकारी या व्यतिरिक्त दोन्ही चित्रपटांचं संगीत व पार्श्व संगीतही छान जमून आलं आहे. त्यातल्या त्यात 'फ़र्जंद' या चित्रपटातली 'आई अंबे जगदंबे...', 'शिवबा आमुचा मल्हारी...' व 'वज्रबाहू महाबाहू...' ही गाणी आणि 'फत्तेशिकस्त' या चित्रपटातली 'तू जोगवा वाढ माई...', 'रणी फडकती लाखो झेंडे...', 'वह मसीहा आ गया है...' आणि 'मय्यारी...' ही गाणी बऱ्यापैकी लक्षात राहतात. दोन्ही चित्रपटांचं पार्श्व संगीत अतिशय जोशपूर्ण आणि कथानकातली रंजकता वाढवण्याचं काम करतं...

दोन्ही चित्रपटातली रंगभूषा आणि वेषभूषा अप्रतीम वठली आहे. विशेषत: शिवाजी महाराज आणि बहिर्जी नाईक या पात्रांची रंगभूषा व वेषभूषा लक्षात राहण्यासारखी आहे. शिवाजी महाराजांचा जिरेटोप, त्यांनी, जिजाऊंनी व सोयराबाईंनी परिधान केलेले दागिने व वस्त्र यामुळे त्या काळाची आठवण झाल्यावाचून राहत नाही. शिवाय बहिर्जी नाईक यांना वेगवेगळ्या रूपात दाखवण्यासाठी केलेला कपडेपटांचा व रंगभूषेचा वापर वाखाणण्याजोगाच झाला आहे...

एकंदरीत, काही नकारात्मक मुद्दे सोडले, तर शिवकालीन इतिहासातल्या दोन सुवर्ण पानांचा दृकश्राव्य अनुभव घ्यायचा असेल तर आवर्जून पहा, दिग्पाल लांजेकर लिखित व दिग्दर्शित 'फर्ज़ंद' आणि 'फत्तेशिकस्त'...

हर हर हर... महादेव...
जय भवानी... जय शिवाजी...

@ अनिकेत परशुराम आपटे.

No comments:

Post a Comment