काही चित्रपट फक्त मनोरंजन करतात. पण काही चित्रपट निखळ मनोरंजनासह मोलाचा संदेशही देतात. अशाच काही चित्रपटांमधले दोन चित्रपट म्हणजे, "चिंटू" आणि "चिंटू २ - खजिन्याची चित्तरकथा"...
चिंटू...
लहान मुलांच्या खेळण्याचे मैदान बेकायदेशीररित्या आणि जबरदस्तीने काबीज करून बसलेल्या दिलखुश चायनीजच्या गाडीला, वानरवेडे वॉरियर्स आणि त्यांचे खेळातले शत्रू विंचू बायटर्स एकत्र येऊन कर्नल काकांच्या मदतीने तिथून कसे हुसकावून लावतात ही कथा...
एकता आणि हिम्मत माणसाच्या अंगी असेल तर किती मोठ्या संकटाचा आपण सामना करू शकतो, ते संकट दूर करू शकतो हा संदेश या चित्रपटातून मिळतो...
चिंटू २ - खजिन्याची चित्तरकथा...
में महिन्याच्या सुट्टीत कर्नल काकांसोबत कँपला गेलेल्या वानरवेडे वॉरियर्सला खजिन्याचा नकाशा कसा सापडतो आणि एकेक कोडं सोडवत, ते कसे खजिन्याचा शोध लावतात ही कथा...
शिस्तबद्ध वागणं, वक्तशीरपणा, हुशारी, हिम्मत आणि एकता हे गूण अंगी असले तर आपण आपले ध्येय अगदी सहज मिळवू शकतो हा मोलाचा संदेश या चित्रपटातून मिळतो...
दोन्ही चित्रपटात...
या दोन्ही चित्रपटांचे लेखन संयुक्तपणे श्रीरंग गोडबोले आणि विभावरी देशपांडे ह्यांनी केलं आहे. दोन्ही चित्रपटांच्या कथा जरी सामान्य असल्या तरी सतीश आळेकर, सुबोध भावे, विभावरी देशपांडे, दिलीप प्रभावळकर अशा मातब्बर कलावंतांची फौज आणि शुभंकर अत्रे व इतर बच्चे कंपनी ह्यांच्या अभिनयाने दोन्ही चित्रपट उचलून धरले आहेत...
पहिल्या चित्रपटापेक्षा दुसऱ्या चित्रपटात लहानग्यांच्या वाट्याला जास्त साहसदृष्य आली आहेत. दोन्ही चित्रपटातलं संगीत सुंदर आहे पण "चिंटू"मधलं, 'एकटी एकटी घाबरलीस ना...' हे गाणं विशेष लक्षात राहतं. सेट्सचं म्हणाल तर "चिंटू" या चित्रपटात रहवासी कॉलनी, सभोवतालचा परिसर, मुलांचं मैदान छान दाखवलं गेलं होतं, पण "चिंटू २ - खजिन्याची चित्तरकथा" या चित्रपटात मात्र उभारलेले सेट्स, कोड्यांसाठी लावलेले सापळे, जास्त छान आहेत...
थोडक्यात, लहानग्यांच्या भावविश्वात हळुवार डोकावणारे श्रीरंग गोडबोले दिग्दर्शित, "चिंटू" आणि "चिंटू २ - खजिन्याची चित्तरकथा" हे दोन्ही चित्रपट अत्यंत सुंदर आहेत...
@ अनिकेत परशुराम आपटे.


No comments:
Post a Comment