Thursday, 28 May 2020

Matrix Trilogy...



अशी कल्पना करा की पृथ्वीवर दोन वेगळ्या दुनिया आहेत... एक खरं जग जिथे माणसांची रेलचेल, ऋतू, काळ-वेळ, मनातल्या भावना असं सगळं आहे... आणि दुसरं म्हणजे आभासिक जग जिथे इंटरनेटचं मायाजाल आहे, किरणांचा गोतावळा आहे. जर आपल्याला समजलं, की आपलं हे राहतं जग, खरं नसून प्रचंड गुंतागुंतींचं जाळं आहे ज्यावर यंत्रांचे नियंत्रण आहे तर... हाच गाभा आहे Wachowski Sisters लिखित व दिग्दर्शित Matrix Trilogyचा...

१. The Matrix (१९९९)...


थॉमस अँडर्सन (Keanu Reaves) हा नीयो हे टोपणनाव धारण केलेला एक प्रोग्रॅमर असतो. त्याच्या लक्षात येतं की ज्या जगात तो जगत आहे तिथे काहीतरी गडबड आहे. ट्रिनीटी (Carrie-Anne Moss) नावाची एक हॅकर नीयोशी संपर्क साधून सांगते की जर खरं जाणून घ्यायचं असेल तर मॉर्फियस (Laurence Fishburne) मदत करू शकेल. नीयोची भेट झाल्यावर मॉर्फियस त्याला, "एकतर खरं जाणून घे, किंवा जिथे आहेस तिथेच रहा..." यापैकी एक पर्याय निवडायला सांगतो...

खरं जाण्यास उत्सूक असलेल्या नीयोला समजतं की ज्या जगात तो राहत होता ते मॅट्रिक्स नावाचं जग आहे. मॉर्फियस पुढे सांगतो की २१व्या शतकाच्या सुरुवातीला काही यंत्रांनी मानवांविरुद्ध युद्ध छेडलं व सौर ऊर्जेसाठी मानवी शरीरांचा वापर सुरू केला. मॉर्फियस, ट्रिनीटी व इतर काही जणांचा एक समुह याच यंत्रांनी पाठवलेल्या एजंट स्मिथ (Hugo Weaving) याच्याविरुद्ध लढा देत खऱ्या जगात झायॉन या एकमेव उरलेल्या शहराला वाचवण्याचा प्रयत्न करत आहेत आणि नीयोच तो एकमेव अद्वितीय आहे जो यंत्रांचं हे युद्ध थांबवू शकतो. हे जाणल्यावर नीयो त्या समुहात सहभागी होतो आणि त्याचं प्रशिक्षण सुरू होतं. त्याच वेळी एजंट स्मिथ मॉर्फियसला पकडतो. आत्मविश्वास दुणावलेला नीयो स्मिशी लढा देतो व मॉर्फियससह मॅट्रिक्समधून पलायन करतो...

२. Matrix Reloaded (२००३)...


नीयो व ट्रिनीटी एकमेकांमध्ये गुंतलेले असताना नायोबी (Jada Pinkett Smith) मॉर्फियसला संदेश पाठवते की झायॉनवर ७२ तासांमध्ये यंत्रांचा हल्ला होणार आहे आणि त्यासाठी सर्वांना झायॉनला जमायचं आहे. मॉर्फियस व इतर सर्व झायॉनकडे रवाना होतात पण नीयोमात्र ओरॅकल (Gloria Foster) या प्रोग्रॅमला भेटायला मॅट्रिक्समध्ये जातो. इकडे एजंट स्मिथ, ज्याला नीयोने मारलं असतं तो बंद होण्यास नकार देत व्हायरसमध्ये परिवर्तीत होतो व बेनचा (Ian Bliss) अवतार धारण करून मॅट्रिक्समध्ये प्रवेश करतो. झायॉनमध्ये मॉर्फियस यंत्रांविरुद्धच्या युद्धाची घोषणा करताना मॅट्रिक्समध्ये ओरॅकल नीयोला की-मेकरच्या (Randall Duk Kim) मदतीने मॅट्रिक्सच्या मुळापर्यंत जाण्याचा सल्ला देते...

आपली प्ररूपे बनवण्याची नवी शक्ती प्राप्त झालेला स्मिथ नीयोवर हल्ला करतो. स्मिथ व त्याच्या प्ररूपांशी लढा देत नीयो तिथून निसटतो व की-मेकरच्या मदतीने मॅट्रिक्सच्या मुळाचे दार उघडतो. तिथे त्याला मॅट्रिक्सचा निर्माता असलेला आर्किटेक्ट (Helmut Bakaitis) सांगतो की नीयोच आहे जो सर्व यंत्रणेला बंद पडण्यापासून थांबवू शकतो. नीयोला दोन प्रयाय दिले जातात एक म्हणजे मॅट्रिक्स रीबूट करणे व झायॉनला वाचवणे किंवा यंत्रणा बंद होताना बघत बसणे जेणेकरून मानवजातीचा विनाश होईल. नीयो तिसरा प्रयाय निवडत मॅट्रिक्समध्ये अडकलेल्या ट्रिनीटीला वाचवतो व कोमात जातो. यंत्रांकडून प्रवर्तीत झालेल्या इलेक्ट्रोमॅग्नेटिक किरणांमुळे नेव्ह्यूलरायझर व हॅमर सोडून सर्व जहाजं नष्ट होतात व त्यातून एकच व्यक्ती वाचते. तो असतो स्मिथने वश केलेला बेन...

३. Matrix Revolutions (२००३)...


ट्रिनीटीला वाचवताना कोमामध्ये गेलेला नीयो आणि स्मिथने वश केलेला बेन एका जहाजात निपचित पडलेले असतात तिथून कथेला सुरुवात होते. नीयोला, आपण एका काल्पनिक सब स्टेशनमध्ये अकडलो आहोत हे समजतं. ते स्टेशन, मॅट्रिक्स आणि यंत्रांच्या शहरातला एक दुवा असतं. ट्रेनमॅनच्या (Bruce Spence) मदतीने तिथून सुटका होऊ शकत असते पण स्मिथचा गुलाम असलेला ट्रेनमॅन नीयोला मदत करण्यास नकार देतो. तेव्हा मॉर्फियस आणि ट्रिनीटी नीयोला त्या स्टेशनमधून सोडवतात आणि ओरॅकलपर्यंत (Maru Alice) पोहोचवतात. ओरॅकलकडून नीयोला समजतं की स्मिथला मॅट्रिक्स आणि खरं जग, दोघांचाही नायनाट करायचा आहे व युद्ध अटळ आहे. खऱ्या जगात बेनकडून सर्वांना समजतं की यंत्र झायॉनवर हल्ला करायला निघाली आहेत. नायोबी व मॉर्फियस झायॉनला वाचवण्यासाठी शस्त्रास्त्रांची जमवाजमव करत असताना नीयो व ट्रिनीटी यंत्रांच्या शहराकडे प्रयाण करतात...

त्यांचं ध्येय असतं त्या शहराच्या प्रमुखासमोर म्हणजेच डियूस एक्स मशीनसमोर (Kevin Michael Richardson) स्मिथचं खरं रूप उघड करायचं. मॉर्फियसपासून वाचलेला बेन नीयोवर हल्ला करतो आणि त्याला आंधळा करतो. सूक्ष्म किरणांच्या सहाय्याने पाहू शकणारा नीयो बेनचा खात्मा करतो. तिथे झायॉन शहरावर यंत्रांचा प्रचंड मोठा हल्ला होतो. मॉर्फियस, नायोबी व इतर सर्व, धैर्याने त्यांचा सामना करत असताना यंत्रांच्या शहराजवळ नीयोच्या जहाजाला अनेक परमाणू बॉम्ब हल्ल्यांचा सामना करावा लागतो. त्या हल्ल्यात नीयोला वाचवताना ट्रिनीटी धारातिर्थी पडते. नीयोची यंत्रांच्या शहराच्या प्रमुखाशी भेट होते. नीयो स्मिथच्या मनसूब्यांबद्दल सर्व सांगतो व झायॉनला मुक्त करण्याच्या बदल्यात स्मिथला थांबवण्याची हमी देतो. यंत्रांच्या शहराचा प्रमुख या गोष्टीला तयार होतो आणि नीयोला मॅट्रिक्समध्ये पाठवतो. नीयो स्मिथला पूर्ण संपवतो व त्यात तो स्वत: यंत्रांच्या शहरात विरून जातो. अखेर युद्ध संपतं. मॅट्रिक्स रीबूट होतं आणि सर्व जीवित मनुष्यांना मॅट्रिक्स सोडण्याची संधी मिळते...

तीनही चित्रपटांत...

विलोभनीय व थरार हाणामारीची दृष्य, अप्रतीम छायांकन व अभूतपूर्व visual effects, या मॅट्रिक्सच्या तीनही भागांच्या जमेच्या बाजू आहेत. प्रत्येक भाग एकमेकात इतका गुंतला आहे की पहिला भाग सोडून इतर भाग पाहिले तर काय घडतंय याचा सूतरामही संपर्क लागत नाही....

पहिल्या भागातला, नीयोला त्याच्या स्वत्वाची जाणीव होते आणि पूर्ण आत्मविश्वासानिशी तो स्मिथसमोर उभा राहतो तो सीन; दुसऱ्या भागातला, शंभरहून अधिक जणांशी नीयो एकटा लढतो तो सीन आणि तिसऱ्या भागातलं, यंत्रांच्या शहराचं दृष्य; ही दृष्य विशेष लक्षात राहतात. १९९९ साली पहिला भाग प्रदर्शित झाला आणि चार वर्षानंतर म्हणजे २००३ साली, दुसरा आणि तिसरा भाग सहा महिन्यांच्या कालांतराने प्रदर्शित झाले....

तीनही चित्रपटात दोन प्रकारचे कपडेपट वापरण्यात आले. मॅट्रिक्समधल्या दृष्यांसाठी काळ्या रंगांचे सूट आणि बाहेरील जग दाखवायला करड्या व खाकी रंगछटा असलेले साधे फाटके कपडे. तीनही चित्रपटांचे सर्वात मोठे USP ठरले, चित्रपटांची चित्तथरारक आणि काहीशी वेगळी अशी साहस व हाणामारीची दृष्ये आणि या दृष्यांचे चित्रिकरण...

एकूण, काल्पनिक विज्ञान कथा असणारी व प्रत्येक भाग एकाहून एक सरस असणारी Matrix Trilogy खरोखर सुंदर कलाकृती आहे...

@ अनिकेत परशुराम आपटे.

ता.क.: या trilogyचा चौथा भाग, म्हणजेच The Matrix 4, हा नवा चित्रपट २०२१मध्ये प्रदर्शित होऊ घातलेला आहे...

Wednesday, 27 May 2020

शोले - लेखनाचे दोन पैलू माझ्या नजरेतून...


रमेश सिप्पी दिग्दर्शित, "शोले" हा चित्रपट सर्वांनाच परिचयाचा आहे. आपण सगळ्यांनीच आजवर अनेक वेळा "शोले" पाहिला असेल. इतकंच कशाला, त्यातले संवाद, गाणी आणि व्यक्तिरेखाही सर्वांच्या डोक्यात फिट्ट बसल्या आहेत. "मुग़ल-ए-आज़म" नंतर हिंदी चित्रपटसृष्टीचा milestone ठरलेला "शोले" तुमच्याप्रमाणेच मीही अनेक वेळा पाहिला आहे. गेल्याच आठवड्यात टि.व्ही.वर पुन्हा मी "शोले" पाहिला. त्यावेळी मला चित्रपटाच्या लेखनाबद्दल जाणवलेल्या काही गोष्टी...

ट्रेन हल्ल्याचा सीन...

सीन असा घडतो, इंस्पेक्टर बलदेव सिंह बेड्यांमध्ये जखडलेल्या जय व वीरूला घेऊन ट्रेनने जात असतात. अचानक ट्रेनवर दरोडेखोर हल्ला करतात. जय व वीरू मदतीचा हात पुढे करतात आणि त्यांच्या मदतीने इंस्पेक्टर बलदेव सिंह तो हल्ला परतवून लावतात. या तुफान action sequenceचं चित्रिकरणही तितकंच सुंदर झालं होतं. या सीनच्या लेखनाची एक दुसरी बाजू मला जाणवली...

सीन सुरू होतो तेव्हा ट्रेनवर दोन हवालदार आणि एक इंस्पेक्टर, म्हणजे तीन बंदुका असतात. दोन्ही हवालदार धारातीर्थी पडतात आणि एकच पिस्तूल उरते. जय व वीरू लढायला तयार होतात. जय आणि वीरूमध्ये नजरानजर होते आणि वीरू इंजीनकडे धाव घेतो. इथे एकही संवाद न देता लेखकाने दाखवलं की नेम धरून गोळी मारण्यात जय पारंगत आहे तर एखादं वाहन वेगाने चालवण्यात वीरू पटाईत आहे...

वीरू तितक्याच वेगाने ट्रेन चालवतो जितक्या वेगात घोड्यावरून दरोडेखोर आत प्रवेश करू शकतील. हव्या तेवढ्या बंदुका आत येताच वीरू ट्रेनचा वेग वाढवतो आणि संकटाला मागे टाकून ट्रेन पार होते. दुसरीकडे जय आणि बलदेव सिंहमध्येही एकही संवाद न वापरता प्लॅन ठरतो आणि बलदेव सिंह ट्रेनमागून येणाऱ्या हल्ल्याला थोपवतो तर जय ट्रेनच्या बाजूने येणाऱ्या हल्ल्याला परतवतो. जय व बलदेव सिंह, ट्रेनवर येणाऱ्या संकटाला लांब ठेवण्याचा plan execute करतात तर वीरू ट्रेनला संकटापासून दूर नेण्याचा plan execute करतो...

थोडक्यात, एकही संवाद न वापरता, planning, execution आणि quality identification या तीनही गोष्टी लेखकाने प्रभावीपणे दाखवल्या आहेत...

नाणेफेकीचे सीन...

नाणेफेकीचे सगळे सीन्स पाहिले, तर नाणं फकत जय उडवतो आणि नाण्याच्या दोन्ही बाजूंबद्दलही तोच बोलतो. प्रत्येक वेळी 'हेड' येतं आणि प्रत्येक वेळी जयच नाणेफेक जिंकतो. पण यातही, वीरू सारखा हरतो आहे हे मात्र दर्शवलं गेलं नाही. Decision makingच्या बाबतीत वीरू थोडा गोंधळलेला दाखवला गेला आहे तर जय सक्षम असतो. त्याला जे हवं तेच तो नाण्याच्या 'हेड' या बाजूवर ठेवतो आणि तेच येतं...

प्रत्येक वेळी जयला माहित असतं की वीरू एकटा योग्य निर्णय घेऊ शकणार नाही किंवा वेळ लावेल. अशा वेळी जय वीरूला बरोबरीची संधी देत नाणेफेकीच्या मार्गाने स्वत:चाच निर्णय उचलून धरतो. पण तरीही, वीरूला कुठेही कमी लेखण्याचा प्रयत्न दिसत नाही...

थोडक्यात, नाणेफेकीसारखी छोटी गोष्ट वापरून लेखकाने fair decision making आणि decision implementation या दोन गोष्टी खूप छान पद्धतीने मांडल्या...

इतक्या संदर लेखनाबद्दल सलीम-जावेद म्हणजेच सलीम खान व जावेद अख़्तर या लेखक द्वयींना सलाम...

@ अनिकेत परशुराम आपटे.

Wednesday, 20 May 2020

हरिश्चंद्राची फॅक्टरी आणि एलिझाबेथ एकादशी...


चित्रपटात येणारे संघर्ष जर हलक्या-फुलक्या पद्धतीने समोर आले आणि अशा चित्रपटांची नावंही काहीशी निराळी असली, तर त्या चित्रपटांचा नूर काही औरच असतो. असेच दोन चित्रपट आहेत परेश मोकाशी दिग्दर्शित, २००९ सालचा "हरिश्चंद्राची फॅक्टरी" आणि २०१४ साली प्रदर्शित झालेला "एलिझाबेथ एकादशी..."

हरिश्चंद्राची फॅक्टरी (२००९)...

भारतीय चित्रपटाचे जनक, धुंडीराज गोविंद फाळके म्हणजेच दादासाहेब फाळके यांच्या पहिल्या चित्रपटनिर्मितीच्या संघर्षाची कथा सांगणारा चित्रपट म्हणजेच २००९ साली प्रदर्शित झालेला पकेश मोकाशी दिग्दर्शित, "हरिश्चंद्राची फॅक्टरी..."

दादासाहेबांची (नंदू माधव) बिकट आर्थिक परिस्थिती, त्यातून बाहेर पडण्यासाठी वेगवेगळे व्यवसाय करण्यात त्यांना लाभलेली त्यांच्या पत्नी सरस्वती (विभावरी देशपांडे) यांची मोलाची साथ, दादासाहेबांनी सुरू केलेल्या नव्या व्यवसायात त्यांना आलेल्या असंख्य अडचणी आणि त्यावर केलेली मात, हे सगळं अत्यंत हलक्या-फुलक्या शैलीत पण तितक्याच प्रभावीपणे चित्रपटात मांडलं आहे...

वैभव मांगले, शतीश आळेकर, आस्ताद काळे, प्रवीण तर्डे, भाऊ कदम, विभावरी देशपांडे, विशाखा सुबेदार, संदीप पाठक, अमेय वाघ असे तोलामोलाचे कलावंत असतानाही नंदू माधव यांनी दादासाहेबांची भूमिका अफ्लातून वठवली आहे. चित्रपटाचे सेट्स खरोखर १९१२च्या आसपासचा काळ डोळ्यांसमोर जिवंत करतात. चार्ली चॅपलीनचे चित्रपट किंवा प्रसंग जसे fast forward केल्यासारखे आपल्याला दिसायचे, तसंच या चित्रपटातही काही प्रसंगांचं चित्रिकरण झाल्याने पाहतान छान मजा घेता येते.

चित्रपटात गाणं एकही नाही, पण एक विशिष्ट संगीत संपूर्ण चित्रपटभर वाजत राहतं. काही प्रसंगांतून आणि संवादांमधून छान विनोदलहरी बाहेर पडत अधिक मजा देतात. एकंदरीत, "राजा हरिश्चंद्र" या चित्रपटाची निर्मिती आणि त्यामागचा संघर्ष अत्यंत हलक्या-फुलक्या पद्धतीने मांडणारा "हरिश्चंद्राची फॅक्टरी" नक्की पहायला हवा...

एलिझाबेथ एकादशी (२०१४)...

आपल्या परिवाराला आर्थिक अडचणीतून बाहेर काढण्यासाठी आपल्या परीने हातभार लावण्याचा प्रयत्न करणाऱ्या लहानग्या ज्ञानेश (श्रीरंग महाजन) आणि त्याची बहिण मुक्ता (सायली भांदरकवठेकर) यांच्या संघर्षाची कथा म्हणजे, २०१४ साली प्रदर्शित झालेला मधुगंधा कुलकर्णी लिखीत "एलिझाबेथ एकादशी..."

पंढरपूरात ज्ञानेश व मुक्ता आपल्या आई (नंदिता धुरी) व आजीसोबत (वनमाला किणिकर) हालाखीच्या परिस्थितीत राहत असतात. घरची आर्थिक बाजू कमकुवत होत जाते तेव्हा ज्ञानेश व मुक्ताची आई एलिझाबेथ नावाची सायकल विकण्याच्या गोष्टी करू लागते. वडिलांकडून बक्षिस मिळालेली ही एलिझाबेथ सायकल विकण्यापासून वाचावी म्हणून ज्ञानेश व मुक्ता चंग बांधतात. त्यांच्या याच संघर्षाची कहाणी खूप सुंदर पद्धतीने चित्रपटात मांडली आहे...

आनंद मोडक यांनी संगीतबद्ध केलेलं, "दगड दगड..." हे चित्रपटातलं एकमेवं गाणं खूपच श्रवणीय आहे. लहान मुलांना ध्यानात ठेऊन केलेल्या शब्द रचनेमुळे गाणं छान लक्षात राहतं. याच गाण्याच्या संगीताचा काही भाग संपूर्ण चित्रपटभर ऐकू येत राहतो. चित्रपटाचं चित्रिकरणही सुरेख झालं आहे. पंढरपूर, एकादशीच्या दिवसातली गर्दी, जत्रेचा माहोल, सर्व कसं छान मिळून आलं आहे. पण चित्रपटात सर्वात जास्त लक्षात राहते ती एलिझाबेथ नावाची जराशी वेगळी पण सुंदर अशी सायकल...

एकंदरीत, परिवारातला एक सदस्य असलेल्या एलिझाबेथ नावाच्या सयकलीला वाचवण्याचा प्रयत्न दाखवणारा परेश मोकाशी दिग्दर्शित, "एलिझाबेथ एकादशी" हा चित्रपट नक्कीच पहावा असा आहे...

थोडक्यात, एक दिग्दर्शक म्हणून परेश मोकाशी यांचा पहिला  चित्रपट "हरिश्चंद्राची फॅक्टरी" आणि त्यांचा दुसरा चित्रपट "एलिझाबेथ एकादशी" ज्याचं लेखन त्यांच्याच पत्नीने म्हणजे मधुगंधा कुलकर्णी केलं होतं, हे दोन्ही चित्रपट नक्कीच बघण्यासारखे आहेत...

@ अनिकेत परशुराम आपटे.

Tuesday, 19 May 2020

चिंटू आणि चिंटू २ - खजिन्याची चित्तरकथा...



काही चित्रपट फक्त मनोरंजन करतात. पण काही चित्रपट निखळ मनोरंजनासह मोलाचा संदेशही देतात. अशाच काही चित्रपटांमधले दोन चित्रपट म्हणजे, "चिंटू" आणि "चिंटू २ - खजिन्याची चित्तरकथा"...

चिंटू...

लहान मुलांच्या खेळण्याचे मैदान बेकायदेशीररित्या आणि जबरदस्तीने काबीज करून बसलेल्या दिलखुश चायनीजच्या गाडीला, वानरवेडे वॉरियर्स आणि त्यांचे खेळातले शत्रू विंचू बायटर्स एकत्र येऊन कर्नल काकांच्या मदतीने तिथून कसे हुसकावून लावतात ही कथा...

एकता आणि हिम्मत माणसाच्या अंगी असेल तर किती मोठ्या संकटाचा आपण सामना करू शकतो, ते संकट दूर करू शकतो हा संदेश या चित्रपटातून मिळतो...

चिंटू २ - खजिन्याची चित्तरकथा...

में महिन्याच्या सुट्टीत कर्नल काकांसोबत कँपला गेलेल्या वानरवेडे वॉरियर्सला खजिन्याचा नकाशा कसा सापडतो आणि एकेक कोडं सोडवत, ते कसे खजिन्याचा शोध लावतात ही कथा...

शिस्तबद्ध वागणं, वक्तशीरपणा, हुशारी, हिम्मत आणि एकता हे गूण अंगी असले तर आपण आपले ध्येय अगदी सहज मिळवू शकतो हा मोलाचा संदेश या चित्रपटातून मिळतो...

दोन्ही चित्रपटात...

या दोन्ही चित्रपटांचे लेखन संयुक्तपणे श्रीरंग गोडबोले आणि विभावरी देशपांडे ह्यांनी केलं आहे. दोन्ही चित्रपटांच्या कथा जरी सामान्य असल्या तरी सतीश आळेकर, सुबोध भावे, विभावरी देशपांडे, दिलीप प्रभावळकर अशा मातब्बर कलावंतांची फौज आणि शुभंकर अत्रे व इतर बच्चे कंपनी ह्यांच्या अभिनयाने दोन्ही चित्रपट उचलून धरले आहेत...

पहिल्या चित्रपटापेक्षा दुसऱ्या चित्रपटात लहानग्यांच्या वाट्याला जास्त साहसदृष्य आली आहेत. दोन्ही चित्रपटातलं संगीत सुंदर आहे पण "चिंटू"मधलं, 'एकटी एकटी घाबरलीस ना...' हे गाणं विशेष लक्षात राहतं. सेट्सचं म्हणाल तर "चिंटू" या चित्रपटात रहवासी कॉलनी, सभोवतालचा परिसर, मुलांचं मैदान छान दाखवलं गेलं होतं, पण "चिंटू २ - खजिन्याची चित्तरकथा" या चित्रपटात मात्र उभारलेले सेट्स, कोड्यांसाठी लावलेले सापळे, जास्त छान आहेत...

थोडक्यात, लहानग्यांच्या भावविश्वात हळुवार डोकावणारे श्रीरंग गोडबोले दिग्दर्शित, "चिंटू" आणि "चिंटू २ - खजिन्याची चित्तरकथा" हे दोन्ही चित्रपट अत्यंत सुंदर आहेत...

@ अनिकेत परशुराम आपटे.

Friday, 15 May 2020

फर्ज़ंद आणि फत्तेशिकस्त...




गनिमीकावा... छत्रपती शिवाजी महाराजांच्या युद्धनितीचा एक अविभाज्य घटक... गनीमांना सळो की पळो करून सोडणारा गनिमीकावा... आपण जिंकलो किंवा जिंकूच अशा गैरसमजात असणाऱ्या गनीमाला पुरतं नामोहरम करणारा गनिमीकावा... कमीत कमी रक्त आणि मनुष्यबळ वापरून गनीमाचं जास्तीत जास्त नुकसान करणारा गनिमीकावा. याच गनिमीकाव्याचा वापर करून फत्ते केलेल्या दोन मोहिमांचा दृकश्राव्य अनुभव देणारे दिग्पाल लांजेकर लिखित व दिग्दर्शित दोन भव्य चित्रपट म्हणजेच 'फर्ज़ंद' आणि 'फत्तेशिकस्त'...

फर्ज़ंद (२०१८)...

आदिल शाहच्या २५००च्या प्रचंड फौजेला आपल्या साठ मावळ्यानिशी नमवून पन्हाळ्याची मोहीम फत्ते करणाऱ्या शूर सरदार कोंडाजी फर्ज़ंद यांची कथा सांगणारा चित्रपट म्हणजेच 'फर्ज़ंद'...

सरदार तान्हाजी मालुसरे (गणेश यादव) या सिंहाच्या बलिदानावर जिंकलेल्या कोंढाण्याच्या लढाईपासून चित्रपट सुरू होतो. सिंहगड स्वराज्यात येतो आणि शिवाजी महाराजांच्या (चिन्मय मांडलेकर) राज्याभिषेकाचे वारे वाहू लागतात. एकदा चाल करून अपयश आलेल्या आणि अजूनही स्वराज्यापासून दूर असलेल्या बेशक़ ख़ान (समीर धर्माधिकारी) या सरदाराच्या आखत्यारीत असलेल्या पन्हाळ्याचे वेध जिजाऊंना (मृणाल कुलकर्णी) लागतात...

महाराजांच्या हाकेला प्रतिसाद देत सरदार कोंडाजी फर्ज़ंद (अंकित मोहन) साठ मावळ्यांची जमवाजमव करतात. स्वराज्याचे हेर बहिर्जी नाईक (प्रसाद ओक), त्यांचे दोन साथिदार किस्ना (निखील राऊत) आणि केसर (मृण्मई देशपांडे), फर्ज़ंद यांच्यासह व्यूह रचना आखतात आणि केवळ साडे तीन तासात २५०० गनीमांचा पराभव करून फर्ज़ंद पन्हाळा काबीज़ करतात...

घटना सर्वांना परिचयाची असली तरी चित्रीकरण, संवाद आणि संगीत यांच्या बळावर चित्रपट अधिक उठाव घेतो. अंकित मोहन यांचा हा पहिलाच चित्रपट असूनही त्यांनी तो बऱ्यापैकी हाताळला आहे. अर्थात, कसलेला बांधा आणि लढाईची दृष्य दाखवताना त्यांच्या वाट्याला अभिनयाची दृष्य थोडी कमीच आली आहेत. मुख्य कलावंताखेरीज नेहा जोशी, राहुल मेहेंदळे, प्रवीण तर्डे, अजय पूरकर, आस्ताद काळे, हरीश दुधाडे या कलाकारांनीही आपापल्या भूमिका छान वठवल्या आहेत...

चित्रपटातली चकमकींची दृष्य, हाणामारीची दृष्य आणि संगीत या चित्रपटाच्या जमेच्या बाजू आहेत. युद्धाच्या वेळी होणाऱ्या तलवारींच्या पातींची घर्षणं, प्रत्येक दृष्यागणिक ऐकू येणारं पार्श्वसंगीत आणि चित्रपटातली गाणी या तीनही आघाड्यांवर अमितराज यांनी छान बाजी मारली आहे. थोडक्यात, दिग्पाल लांजेकर लिखित व दिग्दर्शित 'फर्ज़ंद' या चित्रपटाने पन्हाळा विजयाच्या घटनेसह प्रेक्षकांची मनेही जिंकली आहेत...

फत्तेशिकस्त (२०१९)...

भारतातल्या पहिल्या-वहिल्या surgical strikeची आणि लाखाहून अधिक फौजफाटा असणाऱ्या शाहिस्ता ख़ानाला मुठभर मावळ्यांच्या साथीने शिवाजी महाराजांनी कसं जेरीस आणलं याची कथा सांगणारा चित्रपट म्हणजेच 'फत्तेशिकस्त'...

पुण्यातल्या लाल महालात तळ ठोकून बसलेल्या शाहिस्ता ख़ानाची (अनूप सोनी) छावणी आणि त्याचा सरदार नामदार ख़ान (समीर धर्माधिकारी) यांच्या जुलुमांचा पाढा वाचत चित्रपट सुरू होतो. राजगडावर झालेल्या हल्ल्याला परतवून लावण्यासाठी जिजाऊ (मृणाल कुलकर्णी) स्वत: तलवार हाती घेतात. अशावेळी शिवाजी महाराज (चिन्मय मांडलेकर) पन्हाळ्यावरून सुटण्याच्या तयारीत असतात. सरदार बाजी प्रभू देशपांडे यांच्या बलिदानाने पावन झालेली घोड खिंड पार करून शिवाजी महाराज आधी विशालगड मग राजगडावर पोहोचतात...

शाहिस्ता ख़ानाचा बंदोबस्त करण्यासाठी शिवाजी महाराजांच्या एका हाकेवर, त्यांचे शूर सरदार यसाजी कंक (अंकित मोहन), तान्हाजी मालुसरे (अजय पूरकर) कोयाजी बांदल (दिग्पाल लांजेकर), चिमणाजी देशपांडे (विक्रम गायकवाड) आणि स्वराज्याचे हेर बहिर्जी नाईक (हरीश दुधाडे) त्यांचे दोन साथिदार केसर (मृण्मई देशपांडे) व किस्ना (निखील राऊत) यांच्यासह लढायला तयार होतात. शिवाजी महाराजांना कोंडीत पकडण्याच्या मनसूब्याने कोकणात उतरलेल्या क़ार्तलब ख़ान (आस्ताद काळे) या सरदाराला उमर खिंडीत गनिमीकाव्यानिशी केलेल्या हल्ल्यात शिवाजी महाराजांकडून हार पत्करावी लागते आणि शाहिस्ता ख़ान अधिक चवताळतो...

लाल महालावर मोठा हल्ला करून शाहिस्ता ख़ानाला पुरतं नामोहरम करायच्या इराद्याने महाराज योजना आखतात. चिमणाजींच्या मदतीने बहिर्जी नाईक लाल महालावरच्या हल्ल्याच्या व निसटण्याच्या जागा निश्चित करतात. अखेर महाराज छुपा हल्ला करतात आणि तीन वर्ष पुण्यात ठाण मांडून बसलेल्या शाहिस्ता ख़ानाला तुटक्या बोटानिशी तीन दिवसातच पुण्याहून पलायन करावं लागतं...

एकामागून एक येणाऱ्या वेगवान घडामोडींमुळे चित्रपट कुठेही पकड सोडत नाही. नितीन चंद्रकांत देसाई यांनी उभारलेले नेत्रदिपक सेट्स चित्रपटाला अधिक ऊंची देतात. गाण्यांचा जास्त भपकारा न करता, कीर्तन, पोवाडा, जोगवा आणि कव्वाली या गायन प्रकारांचा आधार घेत चित्रपट पुढे सरकतो. प्रसंगानुरूप येणाऱ्या गाण्यांमध्येही काही घटना घडत असल्याने गाणी रटाळ किंवा दिशा बदलणारी वाटत नाहीत. हाणामारीची दृष्य आणि संगीताखेरीज चित्रपटात ड्रोन कॅमेऱ्याच्या सहाय्याने केलेलं गड-किल्ल्यांचं व जंगल-खोऱ्यांचं छायाचित्रण विशेष लक्षात राहतं...

थोडक्यात, शाहिस्ता ख़ानाची शिकस्त आणि लाल महालावर झालेली फत्ते दाखवताना दिग्पाल लांजेकर लिखित व दिग्दर्शित 'फत्तेशिकस्त' या चित्रपटाने प्रेक्षकांच्या मनावरही फत्ते मिळवली आहे...

दोन्ही चित्रपटात...

२०१८ साली प्रदर्शित झालेला 'फर्ज़ंद' आणि २०१९ सालच्या 'फत्तेशिकस्त' या दोन्ही चित्रपटांचे लेखक व दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर यांनी कलावंतांच्या निवडीत पैकीच्या पैकी गूण मिळवलेले दिसतात. 'फर्ज़ंद' चित्रपटातले काही कलावंत वेगळ्या भूमिकेत 'फत्तेशिकस्त' या चित्रपटात आपल्या समोर येतात तर काही कलावंतांच्या जागी नवीन कलाकार आपल्याला दिसतात. दोन्हीही चित्रपटात अभिनय जरा loud झाला आहे. फक्त मोठे डोळे केल्याने आणि दात-ओठ खाल्ल्यानेच स्फूरण चढतं असं बऱ्याच ठिकाणी दाखवलं गेलं आहे जे काही अंशी अयोग्य वाटतं...

अंकित मोहन या कलावंताला दोन्ही चित्रपटांत एखाद्या हिंदी किंवा इंग्रजी पहिलवान नायकाप्रमाणे दाखवलं गेलं आहे. अदाकारीपेक्षा त्याच्या कमावलेल्या शरीराचा चित्रपटात जास्त मारा केलेला दिसतो. चित्रपटातली काही दृष्य खास करून अंकित मोहनला प्रकाशझोतात आणण्यासाठीच लिहिली असावीत असं वाटतं. याउलट आपल्या कसदार अभिनयामुळे आणि अप्रतीम संवादफेकीमुळे अजय पूरकर आणि चिन्मय मांडलेकर दोन्ही चित्रपटात चांगलेच लक्षात राहतात...

विशेष नमूद करावेसे वाटते केसर या व्यक्तिरेखेबद्दल. 'फर्ज़ंद' चित्रपटात केसर जिवावर उदार होऊन इतरांचा प्राण वाचवते असा कथाभाग दाखवला आहे. इतिहास पाहता, 'फत्तेशिकस्त' चित्रपटात दाखवलेला घटनाक्रम, 'फर्ज़ंद' चित्रपटात दाखवलेल्या घटनेच्या आधी घडला होता. त्या अनुषंगानेच 'फत्तेशिकस्त' या चित्रपटात लेखकाने केसर या व्यक्तिरेखेचा वापर केलेला दिसतो. पण तरीही केसर ही व्यक्तिरेखा इतर व्यक्तिरेखांच्या तुलनेने जरा फिल्मी वाटते...

सेट्स, रंगभूषा, वेषभूषा आणि अदाकारी या व्यतिरिक्त दोन्ही चित्रपटांचं संगीत व पार्श्व संगीतही छान जमून आलं आहे. त्यातल्या त्यात 'फ़र्जंद' या चित्रपटातली 'आई अंबे जगदंबे...', 'शिवबा आमुचा मल्हारी...' व 'वज्रबाहू महाबाहू...' ही गाणी आणि 'फत्तेशिकस्त' या चित्रपटातली 'तू जोगवा वाढ माई...', 'रणी फडकती लाखो झेंडे...', 'वह मसीहा आ गया है...' आणि 'मय्यारी...' ही गाणी बऱ्यापैकी लक्षात राहतात. दोन्ही चित्रपटांचं पार्श्व संगीत अतिशय जोशपूर्ण आणि कथानकातली रंजकता वाढवण्याचं काम करतं...

दोन्ही चित्रपटातली रंगभूषा आणि वेषभूषा अप्रतीम वठली आहे. विशेषत: शिवाजी महाराज आणि बहिर्जी नाईक या पात्रांची रंगभूषा व वेषभूषा लक्षात राहण्यासारखी आहे. शिवाजी महाराजांचा जिरेटोप, त्यांनी, जिजाऊंनी व सोयराबाईंनी परिधान केलेले दागिने व वस्त्र यामुळे त्या काळाची आठवण झाल्यावाचून राहत नाही. शिवाय बहिर्जी नाईक यांना वेगवेगळ्या रूपात दाखवण्यासाठी केलेला कपडेपटांचा व रंगभूषेचा वापर वाखाणण्याजोगाच झाला आहे...

एकंदरीत, काही नकारात्मक मुद्दे सोडले, तर शिवकालीन इतिहासातल्या दोन सुवर्ण पानांचा दृकश्राव्य अनुभव घ्यायचा असेल तर आवर्जून पहा, दिग्पाल लांजेकर लिखित व दिग्दर्शित 'फर्ज़ंद' आणि 'फत्तेशिकस्त'...

हर हर हर... महादेव...
जय भवानी... जय शिवाजी...

@ अनिकेत परशुराम आपटे.

Wednesday, 13 May 2020

The Adventures of Milo and Otis...


कुत्रा आणि मांजर यांची मैत्री होऊ शकेल का... उत्तर थोडं कठीण आहे. पण तरीही आपलं सर्वात पहिलं मत नाही असंच असतं. "The Adventures of Milo and Otis" या documentaryवजा चित्रपटात हीच मैत्री खूप सुंदर दाखवली गेली आहे...

निप्पॉन नावाच्या एका शेतात एक मांजर पिल्लांना जन्म देते. त्यापैकी एक पिल्लू (मायलो) सर्वात खोडकर असतं. आपल्या चाळ्यांमुळे ते नेहमी संकटात सापडतं. ओटीस नावाच्या एका कुत्र्याच्या पिल्लाशी मायलोची गट्टी जमते. एकदा मायलो व ओटीस नदी किनारी खेळत असताना मायलो एका लाकडी पेटीत शिरतो आणि ती पेटी अचानक प्रवाहासोबत वाहू लागते. तिथून सुरू होतो मायलो आणि ओटीसचा थक्क करणारा प्रवास...

मायलो त्याच्या प्रवासात हिंस्त्र अस्वल, विषारी साप, खोलगट खड्डा, चावरा खेकडा यांना सामोरा जाताना मायलोच्या सतत मागावर असलेला ओटीस वेळोवेळी त्याचं रक्षण करतो आणि दोघं पुन्हा वेगळे होत राहतात. या जिवावरच्या संकटांखेरीज मायलोला हरीण, डुक्कर, घुबड हे मित्रही आधार देतात. एका वळणावर मायलोला जॉईस या मांजराची आणि ओटीसला सँड्रा या कुत्रीची सोबत लाभते आणि मायलो व ओटीसचे मार्ग वेगळे होतात. अखेरीस मायलो, जॉईस, ओटीस, सँड्रा आणि त्यांची पिल्लं पुव्हा जवळ येऊन एकत्र राहू लागतात...

१९८६सालचा हा मूळचा जापानी चित्रपट १९८९साली, "The Adventures of Chatran" या नावाने इंग्रजीत पुन्हा प्रसारित केला गेला. चित्रपटाच्या पार्श्वसंगीताने कथेत वेगळे रंग भरण्यात मोलाचा वाटा उचलला आहे. हिंदीत जेव्हा चित्रपट डब झाला, तेव्हा त्याचं निवेदन गुल्ज़ार साहेबांनी केलं होतं. कथा साधीच असली तरी छायाचित्रण सुरेख झालं आहे. थोडक्यात, लहानग्यांच्या जिव्हाळ्याचे माऊ व भूभू आणि त्यांची सुंदर मैत्री दाखवणारा, "The Adventures of Milo and Otis" हा डॉकपिक आवर्जून पहावा असाच आहे...

@ अनिकेत परशुराम आपटे.

Monday, 11 May 2020

A Beautiful Mind...


काही सत्यघटनांवरचे चित्रपट येतात आणि काळात विरून जातात. पण काळ बदलला तरी काही चित्रपटांचं सौंदर्य आणि लोकप्रियता तशीच टिकून राहते. असे चित्रपट, इतिहासात अजरामर होतात. यातलाच एक आहे रॉन हार्वर्ड दिग्दर्शित, "A Beautiful Mind..."

जॉन नॅश (रसेल क्रो), एक अत्यंत हुशार आणि कर्तबगार गणितज्ञ व अर्थशास्त्रज्ञ. मात्र त्याच्या या बुद्धिमत्तेला कोंदण लाभलं ते Paranoid Schizophrenia या मेंदूच्या आजाराचं. त्याच्या या विकारावर मात करून वेगवेगळे शोध आणि गणितं सोडवण्याची वेगवेगळी तंत्र आणि पद्धती निर्माण करणाऱ्या व नोबेल पारितोषिक मिळवणाऱ्या याच जॉन नॅशची कहाणी म्हणजेच, "A Beautiful Mind..."

जॉनला एक अत्यंत महत्वाचा कोड क्रॅक करण्यासाठी बोलावलं जातं, तिथून कथेला खरी सुरुवात होते. त्याच्या कामादर्म्यान जॉन, Paranoid Schizophrenia ह्या आजाराच्या विळख्यात ओढला जातो. त्याला सतत भास होऊ लागतात. त्याच्याच मेंदूतून काही काल्पनिक पात्रही जॉन तयार करतो जी त्याच्याखेरीज कोणालाही दिसत नाहीत...

जॉन त्या पात्रांशी संवाद साधतो, गप्पाही मारतो. इतकंच नाही, तर आपण अमेरिकन गुप्तचर खात्यासाठी एक खूप महत्वाचं काम करतोय असंच त्याला वाटू लागतं. जॉनचा मेंदू त्याचं काम इतक्या प्रभावीपणे मांडतो की आजूबाजूच्या लोकांनाही त्याचं काम खरं वाटू लागतं. कालांतराने जॉनच्या लक्षात येतं की तो आजारी आहे. तेव्हा जॉन या आजाराविरुद्ध उभा राहतो आणि यश मिळवतो...

चित्रपटाचे दोन पैलू आहेत, एक म्हणजे जॉनचं समाजासोबत असलेलं वैचारिक भांडण, जिथे लोक सांगत राहतात की तो आजारी आहे पण त्याचं मन मानत नाही. चित्रपटाचा दुसरा पैलू आहे, जॉनचं स्वत:शी चाललेलं द्वंद्व, जेव्हा जॉनला आपण आजारी आहोत हे पटतं आणि त्यावर मात करण्यासाठी तो धडपडतो....

हा दुसरा पैलूच खरंतर चित्रपटाचा मुख्य गाभा आहे. काळ जसा पुढे सरकतो, तसा माणसाच्या दिसण्यात बदल होतो. मागे ज्या व्यक्तिला आपण पाहिले आहे तीच व्यक्ती जर काही वर्षांनंतर आपल्या समोर आली तर वयोमानाप्रमाणे झालेला बदल आपल्याला दिसतो. पण जॉनने निर्माण केलेली काल्पनिक पात्र जेव्हा पुन्हा त्याच्यासमोर येतात तेव्हा त्यांच्यात कोणताही फरक त्याला आढळत नाही. तिथे त्याला जाणवायला लागतं, की काहीतरी गडबड आहे आणि हाच या चित्रपटाचा high point आहे...

या अत्यंत सुंदर आणि संवेदनशील चित्रपटाची कथा लिहीली आहे अकीवा गोल्ड्मन यांनी आणि दिग्दर्शन आहे, रॉन हार्वर्ड यांचं. चित्रपटाचा उच्चांक आहे, सशक्त कथा व पटकथा आणि रसेल क्रो यांची अप्रतीम अदाकारी. एकंदरीत, मनात कायमचं घर करणारा एक अत्यंत सुंदर चित्रपट म्हणजेच, "A Beautiful Mind..."

@ अनिकेत परशुराम आपटे.

Saturday, 9 May 2020

रात्र आरंभ...

माणसाच्या मनाचा जसा थांग लागत नाही तसा माणसाचा मेंदूही गुंतागुंतीचा असतो. मेंदू जोवर माणसाच्या ताब्यात राहतो, तोवर मेंदूत येणारे विचार माणसाच्या हातात असतात. पण जर मेंदूने माणसाचा ताबा मिळवला तर माणूस स्वत:वरचं नियंत्रण हरवून बसतो आणि मेंदू दाखवेल त्या दिशेने माणूस जाऊ लागतो. याच आशयावर आधारलेला चित्रपट म्हणजेच अजय फणसेकर दिग्दर्शित, "रात्र आरंभ..."

प्रभाकर फडके (दिलीप प्रभावळकर), एक निवृत्त मध्यमवर्गीय माणूस. मुलगा, सून आणि त्यांना होणारं बाळ, एवढंच विश्व असणाऱ्या प्रभाकरना आवड असते पुस्तकं वाचण्याची आणि गूढ व रहस्यकथा लिहिण्याची. अशीच एक रहस्यकथा लिहित असताना प्रभाकर त्यात गुंतत जातात. प्रभाकरांचा मेंदू कागदावर कथा उतरवत जातो आणि त्याचवेळी ती कथा स्वत: ग्रहण करून प्रभाकरांच्या अवतीभोवती एक गूढ काल्पनिक जग तयार करत राहतो. आपल्याच मेंदूने निर्माण केलेल्या काल्पनिक जगाच्या चिखलात अडकलेल्या प्रभाकरांच्या हातून एक दुर्दैवी घटना घडते आणि ते वेडे होतात...

खऱ्या जगापासून दुरावलेल्या आणि काल्पनिक जगात अडकून पडलेले प्रभाकर पूर्ण वेडे नसून ते बरे होऊ शकतात हा विश्वास हॉस्पिटलमधल्या एका डॉक्टरला वाटतो आणि इतर डॉक्टर आणि प्रभाकरांच्या काल्पनिक जगातल्या काही पात्रांच्या मदतीने ती डॉक्टर प्रभाकरांना बरं करण्यात यश मिळवते. प्रभाकर बरे झाले आहेत याची खात्री करून त्यांच्या या आजारामुळे त्यांच्या खऱ्या आयुष्यात घडलेल्या त्या दुर्दैवी घटनेबद्दल डॉक्टर्स त्यांना सांगतात आणि प्रभाकरांना जबरदस्त मानसिक धक्का बसतो...

चित्रपटाची सुरुवात भन्नाट होते. पण कथानक सरसकट समोर येत असल्याने काही काळानंतर चित्रपटाचा शेवटमात्र अपेक्षित होत जातो. दिलीप प्रभावळकरांची अप्रतीम अदाकारी चित्रपटाचा मुख्य पाया आहे. खऱ्या आयुष्यातले शांत स्वभावी वाचक व लेखक प्रभाकर फडके आणि प्रभाकरांच्या मेंदूने तयार केलेल्या काल्पनिक जगातलं त्यांचं व्यक्तिमत्व या दोन्ही व्यक्तिरेखांमधला फरक दिलीप सरांनी उत्तम दर्शवला आहे. दिलीप सरांसोबतच राजन ताम्हणे, प्रदीप पटवर्धन, आनंद अभ्यंकर, दिलीप कुलकर्णी, प्रसाद पंडित, शीतल क्षिरसागर आणि दिपक शिर्के या मातब्बर कलाकारांनीही त्यांच्या वाट्याला आलेल्या छोट्या भूमिका छान वठवल्या आहेत...

चित्रपटाच्या दुसऱ्या भागात येणारं सुरेश वाडकर यांनी गायलेलं, "हुबेहूब दोन प्रतिमा... देव आणि सैतान..." हे गाणं म्हणजे संपूर्ण चित्रपटाचा सार आहे. मुख्य कथानकात प्रभाकर फडके लिहित असलेल्या कथेचं आणि त्यांच्या काल्पनिक जगाचं उपकथानक तुकड्या तुकड्यातून संपूर्ण चित्रपटभर समोर येत राहतं. दिलीप सरांच्या अदाकारीचा सर्वोच्च बिंदू आहे चित्रपटातलं शेवटचं दृष्य जेव्हा प्रभाकर फडके काल्पनिक जगातून बाहेर येतात आणि खऱ्या जगात त्यांच्या हातून घडलेली घटना त्यांच्यासमोर उलगडली जाते...

सरळसोट कथाभाग असूनही चित्रपट कंटाळवाणा होत नाही. मुख्य कथानकाशी जोडलेल्या इतर छोट्या छोट्या प्रसंगांमुळे चित्रपट रंजक होत जातो. थोडक्यात वेगळ्या विषयावरच्या कथानकासाठी आणि दिलीप प्रभावळकरांच्या सुंदर अभिनयासाठी निश्चितच पहावा, अजय फणसेकर लिखित व दिग्दर्शित, "रात्र आरंभ..."

@ अनिकेत परशुराम आपटे.

ता.क.: मेंदूच्या साधारण याच आजारावर आधारलेला दुसरा चित्रपट म्हणजे रसेल क्रो अभिनीत, "A Beautiful Mind". अर्थात, रात्र आरंभ आणि A Beautiful Mind या दोन्ही चित्रपटांची कथानकं वेगळी असली, तरी विषय जवळ जवळ सारखाच आहे...

Wednesday, 6 May 2020

काकस्पर्श - एक विलक्षण प्रेम कहाणी...


काही चित्रपट कापरासारखे उडून जातात. काही चित्रपट थोडेफार लक्षात राहतात. पण काही चित्रपट असेही असतात, जे मनात कायमचं स्थान मिळवतात. त्यातलाच एक आहे महेश वामन मांजरेकर कृत "काकस्पर्श - एक विलक्षण प्रेमकहाणी..."

हरीदादा (सचिन खेडेकर) त्यांच्या भावाचे, महादेवचे (अभिजीत केळकर) दुर्गेशी (केतकी माटेगावकर) लग्न लावून देतात. लग्नानंतर नाव बदललेल्या उमेचे घरात स्वागत होते. तिच्या शृंगाराच्या पहिल्याच रात्री उमेवर मानसिक आघात होतो आणि दीर्घ आजाराने ग्रासलेला तिचा नवरा महादेव शय्येवरच प्राण सोडतो. महादेवच्या पिंडाला कावळा शिवावा म्हणून हरीदादा एक प्रतिज्ञा करतात...

त्या प्रतिज्ञेमुळे उमेचं आयुष्य उध्वस्त होतं. परपुरूषाचा स्पर्श न लाभलेली, शृंगाररस न अनुभवलेली उमा (प्रिया बापट) तिचं आयुष्य खरडत राहते. या दर्म्यान हरीदादाबद्दल तिच्या मनात प्रेमाची पालवी फुटते. प्रतिज्ञाबद्ध हरीदादा उमेच्या प्रेमाचा अखेर स्वीकार करतात आणि उमा प्राण सोडते. महाभारतकालीन संदर्भ द्यायचा झाला, तर गंगापुत्र भीष्मासारखं प्रतिज्ञाबद्ध आयुष्य जगत असताना, हस्तिनापूररूपी उमाचं उध्वस्त होत असलेलं जीवन निमूटपणे पाहत राहणं हेच हरीदादाचं नशीब असतं...

एक शोकांतिका असूनही चित्रपट कुठेही कंटाळवाणा होत नाही. ह्याचं श्रेयं जातं कथानकाला धरून ठेवणाऱ्या गिरीश जोशी यांच्या पटकथेला. पटकथेसोबतच चित्रपटात असलेली मोजकीच पण चपखल बसवलेली गाणी आणि सर्व कलावंतांचा तोडीस तोड अभिनय यांमुळे चित्रपट पराकोटीची ऊंची गाठतो. सचिन खेडेकर व प्रिया बापट या मुख्य कलाकारांसोबत, मेधा मांजरेकर, वैभव मांगले, सविता मालपेकर, संजय खापरे, सक्षम कुलकर्णी, मनवा नाईक या कलावंतांनीही आपापल्या भूमिका चोख वठवल्या आहेत. संपूर्ण चित्रपटाचं चित्रिकरण अतिशय उत्तम झालं आहे. १९३० ते १९५०चा तो काळ, ते सारवलेलं जुनाट घर, सर्व कलाकारांचे कपडेपट व रंगभूषा, या सर्वांचं वास्तववादी चित्रण झालं आहे...

चित्रपटातली सर्वच दृश्य छान आहेत, पण मृख्यत्वे; १. आपला पुतण्या संकर्षण (सक्षम कुलकर्णी) आणि त्याची पत्नी खोलीत असताना, बंद दाराबाहेर येणारे आवाज ऐकून आनंद घेणारी उमा आणि त्याचक्षणी हरीला समोर पाहून बावरलेली उमा... २. विहिरीवर आपल्या पुतणीला, शांतीला (मनवा नाईक) नवरा गेल्याच्या दु:खापेक्षाही मोठं असं काहीतरी आपण गमावलं हे जिवाच्या आकांताने सांगणारी उमा... आणि ३. उमाच्या शेवटच्या काही क्षणात आपल्या प्रतिज्ञेबद्दल आणि उमावरच्या प्रेमाबद्दल तिच्याजवळ कबूली देणारा हरी... ही तीन दृश्य खूपच सुंदर झाली आहेत...

बहिणाबाईंच्या, "अरे संसार संसार..." या ओवीच्या पहिल्या दोन ओळींचा संपूर्ण चित्रपटभर प्रभावीपणे वापर केला गेलेला दिसतो. चित्रपटाच्या शेवटी सचिन खेडेकर यांच्या धीर-गंभीर आवाजात त्याच दोन ओळी ऐकताना अंगावर काटा येतो. एकंदरीत, सर्वच बाबतीत उच्चयोत्तम कळस घाठणारी शोकांतिका म्हणजेच महेश वामन मांजरेकर दिग्दर्शित, "काकस्पर्श - एक विलक्षण प्रेम कहाणी..."

"अरे संसार संसार...
जसा तवा चुल्ह्यावर...
आधी हाताला चटके...
तेव्हा मिळते भाकर..."

@ अनिकेत परशुराम आपटे.

Monday, 4 May 2020

102 not out...


यो... चैतन्याने ओतप्रोत भरलेली आणि जगायला शिकवणारी कथा म्हणजेच, "102 not out". ही कथा आहे वखारिया पिता-पुत्राची आणि जीवन जगण्याच्या त्यांच्या दृष्टीकोनाची...

१०२ वर्षांचे दत्तात्रय वखारिया (अमिताभ बच्चन) जगातल्या सर्वात वयस्कर माणसाच्या दीर्घायुष्याचा विक्रम मोडून काढण्याच्या प्रयत्नात असतात. वयाने शंभरी पार केलेले दत्तात्रय मनाने मात्र खूप तरूण असतात. यांच्या बरोब्बर उलट असलेला त्यांचा ७५ वर्षांचा मुलगा बाबुलाल वखारिया (ऋषी कपूर) वयाने कधीच म्हातारा झालेला असतो. बाबुलालच्या एकसूरी आणि रडक्या जगण्याला कंटाळून दत्तात्रय त्याला वृद्धाश्रमात पाठवण्याचा निर्णय घेतात...

वृद्धाश्रमाच्या भितीने बाबुलाल वडिलांकडे गयावया करतो तेव्हा दत्तात्रय त्याला काही अटी पूर्ण करायला सांगतात. एकेक अट पूर्ण करत असताना बाबुलाल त्याच्या भूतकाळात रमतो आणि मनाने तरूण होत जातो. अखेर बाबुलालमध्ये लढण्याची जिद्द यावी म्हणून दत्तात्रय त्याला असं काही सांगतात की बाबुलाल पुरता हादरतो आणि अंतरबाह्य बदलतो...

कथा साधी असली तरी आशय खूप गहन आहे. अमिताभ बच्चन व ऋषी कपूर १९९१ नंतर आज २६ वर्षांनी पुन्हा एकदा नायकांच्या भूमिकेमध्ये रुपेरी पडद्यावर एकत्र आले. त्यांच्या अभिनयांकित जुगलबंदीला पाहून एक शेर तर दुसरा बब्बर शेर असंच म्हणायला हवं. चित्रपटाच्या संगीताने चित्रपटात वेगळेच रंग भरले आहेत. चित्रपटातले काही सीन्स तर अप्रतीम वठले आहेत. चित्रपटाचा शेवट ज्या सकारात्मक दृष्टिकोनात झालाय त्याला तोड नाही...

एकंदरीत आयुष्य कसे सुंदर आहे, ते कसे जगावे, मनाने सदैव तरूण कसे रहावे यावर भाष्य करणारा, "102 not out" खरोखरच अप्रतीम आणि सर्वांनी आवर्जून पहावा असाच आहे... यो...

@ अनिकेत परशुराम आपटे.

Friday, 1 May 2020

कहानी...


असं म्हणतात, की दृढनिश्चयाच्या बळावर स्त्री आपल्या पतीचे प्राणदेखील परत आणू शकते याच मुद्द्यावर आधारली आहे सुजॉय घोष लिखीत व दिग्दर्शित थरारक शोधकथा, 'कहानी...'

कोलकात्यात एका मेट्रोमध्ये घडलेल्या एका दुर्दैवी घटनेपासून चित्रपट सुरू होतो. एकही प्रवासी न वाचलेल्या त्या घटनेचा तपास सुरू असतानाच अरनब बाग्ची नावाच्या माणसाला शोधत सॉफ्टवेयर इंजिनीयर असलेली त्याची गर्भवती पत्नी विद्या बाग्ची (विद्या बालन) कोलकात्यात येते. NDCच्या (National Data Center) एका कामगिरीसाठी अरनब इथे आला होता आणि गायब झाला असं पोलीसांना सांगत विद्या त्यांची मदत मागते. सत्योकी सिन्हा ऊर्फ राणा (परमब्रता चॅटर्जी) नावाचा पोलीस ऑफिसर विद्याची मदत करायला तयार होतो. NDCची HR प्रमुख ऍग्नेस डिमेलोकडून (कॉलीन बांचे) विद्याला NDCमध्येच काम करणाऱ्या मिलन दामजी (इंद्रनील सेनगुप्ता) या माणसाबद्दल महत्वपूर्ण माहिती मिळते आणि कथेला वेगळंच वळण मिळतं...

अरनब बाग्ची कोलकात्यात आल्याचे, राहत असल्याचे व काम करत असल्याचे काहीच पुरावे सापडत नसताना, फक्त एकच दुवा विद्यासमोर असतो, तो म्हणजे ऍग्नेसच्या बोलण्यातून आलेला मिलन दामजी. मिलन दामजी हा अरनबपर्यंत पोहोचण्याचा एकच मार्ग असावा व कदाचित याचमुळे अरनब संकटात सापडला असावा आणि मिलनला शोधलं तर अरनबही सापडेल, याच तर्कांचा आधार घेऊन मिलनच्या शोधार्थ विद्या निघते. दोन वर्षांपूर्वी कोलकात्यात घडलेल्या मेट्रो दुर्घटनेचा संशईत सूत्रधार असलेल्या मिलनचा शोध, विद्या नावाची मुलगी घेत आहे, हे समजताच दिल्लीला IBचे (Intelligence Bureau) प्रमुख भास्करन के. (दृतिमान चॅटर्जी) आणि त्यांचा सहायक, ए. खान (नवाजुद्दीन सिद्दिकी) हादरतात आणि खान तापडतोब कोलकात्यात येतो. कर्नल प्रताप बाजपई (दर्शन जरीवाला) या निवृत्त अधिकाऱ्याला पाचारण केलं जातं. तो सांगतो की IBमध्ये एक गद्दार आहे ज्याने मिलनला मदत केली होती आणि प्रकरण अधिकच गहिरं व मोठं होत जातं...

मिलनपर्यंत पोहोचण्याच्या पायऱ्या असणाऱ्या ऍग्नेस डिमेलोचा आणि डॉ. गांगुली या दोघांचा खून होतो पण मिलनच्या जुन्या घरातून विद्या व राणाला NDCमध्ये कार्यरत असलेल्या शशिधर (शांतिलाल मुखर्जी) या माणसाचा धागा मिळतो. शशिधरचा अपघाती खून होतो पण त्याच्या कॉम्प्यूटरमधून विद्या आणि राणाला महत्वपूर्ण माहिती मिळते. त्या माहितीच्या आधारे, विद्या आणि राणाच्या मदतीने खान सापळा लावतो. सापळ्यात अडकलेला मिलन दामजी अखेर सापडतो आणि अरनब बाग्चीच्या गायब होण्यामागचं रहस्यही उलगडतं...

अगदी पहिल्या फ्रेमपासून मनाची पकड घेतलेला 'कहानी', उत्कंठा शेवटपर्यंत कमी होऊ देत नाही. उत्सूकता शिगेला पोहोचवणाऱ्या या चित्रपटाचा अनपेक्षित आणि धक्कादायक शेवट होतो. कथा आणि पटकथा या दोन्ही गोष्टीत सुजॉय घोषने बाजी मारली आहे. कथानक अतिवेगवान होऊ नये याचाही पुरेपूर विचार झाला आहे. सर्व कलावंतांनी त्यांच्या त्यांच्या भूमिका छान वठवल्या आहेत पण विद्या बालन यांनी त्यांच्या उत्तम अदाकारीने चित्रपटावर कळस चढवला आहे...

मिलन दामजीसारखा बुद्धीमान व कावेबाज माणूस, जो मागे काहीच पुरावे सोडत नाही, तो इतक्या सहज सापळ्यात अडकावा आणि विद्या व राणाला जी माहिती मिळते, त्या माहितीत व मिलन दामजीमध्ये दुसरं काहीच नसावं, हे जरा खटकलं. अर्थात, अरनब बाग्ची व मिलन दामजी यांना शोधण्याचा घटनाक्रम खूप छान लिहिला गेला आहे, पण सापळ्याचा कथाभाग तितकासा नाही जमला....

एकंदरीत, क्षणोक्षणी उत्कंठा वाढवत जाणारी वेगवान शोधकथा अनुभवायची असेल तर नक्कीच पहावा, सुजॉय घोष लिखीत व दिग्दर्शित, "कहानी..."

@ अनिकेत परशुराम आपटे.