Friday, 29 April 2022

भव्यदिव्य तरीही कमकुवत...

एक व्हिलन असतो, आणि एक असतो हिरो. व्हिलन शक्कल लढवून हिरोच्या जवळच्या व्यक्तीला मारतो तरी किंवा त्या व्यक्तीचं नुकसान तरी करतो. हिरो चवताळतो आणि एक टोळकं तयार करतो. त्या टोळक्यात मुख्यत्वे साईड हिरो-हिरोईन असतात. त्या टोळक्यानिशी हिरो व्हिलनवर हल्ला करतो. कधी हिरो जिंकतो तर कधी व्हिलन. शेवटी टोळक्याच्या मदतीने हिरो व्हिलनला जेरीस आणतो. हे सरधोपट कथानक अनेक मसालापटांत आपण पाहिलं. त्यातलाच एक म्हणजे २००५ साली प्रदर्शित झालेला, विक्रम भट दिग्दर्शित "एलान..."


कथा तीच, जी आत्ता सांगितली. पण ती मांडण्याची पद्धत पूर्ण वेगळी. वेगळी म्हणजे भव्यदिव्य. बर्फाच्छादित डोंगर, दऱ्या, बंगले, मोठाले रस्ते अशा exotic locations वापरल्या गेल्या. मुख्य हिरो ज्याने ते टोळकं तयार केलं, ज्याचं हे मिशन असतं, तो मागे राहून साईड हिरोनेच मेन लीड घेतली. चित्रपटातली गाणी यथातथाच आहेत. वास्तविक अन्नू मलिक यांनी आधीच्या चित्रपटांत दिलेलं संगीत आपण ऐकलंच आहे. त्या तुलनेत या चित्रपटातलं संगीत जरा मार खातं. पण चित्रपटाचं पार्श्वसंगीत मात्र दमदार आहे. लोकेशन्स, दृष्य आणि कलावंत यांना लक्षात ठेऊन पार्श्वसंगीताची जबरदस्त रचना केलेली दिसते...

चित्रपटातली हाणामारीची आणि साहसदृष्य कमाल रंगली आहेत. स्लो मोशन तंत्र, विविध कॅमेरा एँगल्स, ड्रोन आणि हेलिकॉप्टर शॉट्स यांमुळे ती ती साहसदृष्य अजूनच उत्कंठावर्धक बनतात. साहस किंवा हाणामारीच्या दृष्यांना उभारी देण्यासाठी पार्श्वसंगीतही मोलाची मदत करतं. जिथे धिम्या गतीची दृष्य आहेत तिथे मंद पार्श्वसंगीत वापरलं गेलं आणि प्रसंगी पार्श्वसंगीताचा टेम्पो वाढवत नेला आहे. शेवटच्या हाणामारीच्या दृष्यात ऐकू येणारं पार्श्वसंगीत, बहुतांशी "मॅट्रिक्स रीलोडेड" या चित्रपटातल्या पार्श्वसंगीताशी मेळ खातं. मिथूनदांच्या प्रत्येक एंट्रीच्या वेळी ऐकू येणारं पार्श्वसंगीत, त्यांनी साकारलेल्या व्यक्तिरेखेची ताकद दर्शवतं. चित्रपटात अनेक साहस व हाणामारीची दृष्य आहेत. पण त्यातही, मध्यंतरापूर्वी धावत्या रस्त्यावर रंगलेलं साहसदृष्य कमाल आहे...

चित्रपटातील कलावंतांचं म्हणाल, तर दोनच कलाकारांचा अभिनय बघण्यासारखा आहे. एक आहेत चंकी पांडे. आणि त्यांच्याहूनही सरस ठरलेत मिथूनदा, अर्थात मिथून चक्रवर्थी. एका दशकाहून अधिक काळ बी ग्रेड चित्रपटांच्या विश्वात राहिलेल्या मिथूनदांसाठी हा चित्रपट म्हणजे मेन स्ट्रीम सिनेमात पुनरागमन करण्याची एक नामी संधीच होती. चित्रपटाच्या मुख्य खलनायकाची प्रमुख भूमिका मिथूनदांच्या वाट्याला आली. देहबोली, दमदार संवादफेक, मिळालेले जबरदस्त संवाद आणि अदाकारी, यांच्या जोरावर मिथूनदांनी त्यांना मिळालेली व्यक्तिरेखा चोख वठवली आहे. मित्राच्या जाण्याचं दु:ख, एका क्षणासाठी का होईना पण चित्रपटाच्या शेवटी वाटणारी भिती, थंड वृत्तीने नायकाचं केलेलं सांत्वन, हे भाव मिथूनदांनी अप्रतीम साकारलेत. वेळप्रसंगी दहा दहा गुंडांशी एकहाती लढणारा, नाच-गाणी करणारा, कधी कधी वरच्या पट्टीत बोलणारा हिरो साकारणाऱ्या मिथूनदांनी या चित्रपटात शांत, धीर-गंभीर पात्र साकारलेलं जास्त भावलं...

मिथून चक्रवर्थी यांचा अभिनय इतका दमदार होता, की जॉन एब्राहम, अमीषा पटेल, लारा दत्ता, अर्जून रामपाल, राहुल खन्ना, मिलिंद गुणाजी यांची अदाकारी पार झाकोळली गेली. मिलिंद गुणाजी यांना इतक्या छोट्या भूमिकेसाठी घेतलेलं काही पटत नाही. एखाद-दुसरा संवाद आणि एक-दोन सीन इतकंच काय ते त्यांच्या वाट्याला आलं. त्यातही त्यांनी चांगला अभिनय केला. अर्जून रामपाल आणि राहुल खन्ना यांच्या चेहेऱ्यावर मात्र, कुठलंही दृष्य असलं तरी एकच भाव दिसतात. ग्लॅमरसाठी अमीषा पटेल आणि थोडासा मेलोड्रामा दाखवण्यासाठी लारा दत्ता असंच समीकरण चित्रपटात दिसतं. त्यातल्या त्यात जॉन एब्राहमने मुंबईचा टपोरी बरा साकारला आहे...

पात्र, लोकेशन्स, गाणी याहीपेक्षा चित्रपटाची कथा जास्त महत्वाची असते. त्या कथेला पडद्यावर सादर करताना पटकथा मोलाची साथ देते. या चित्रपटाची कथा साधी-सरळ आहे. मांडणी एकदम भव्यदिव्य आहे. पण चित्रपटात बऱ्याच ठिकाणी पटकथा मार खाते. उदाहरणार्थ, चित्रपटात मोबाईल ट्रॅक करण्यासाठी एक वेबसाईट वापरलेली दिसते, जिचा वापर करून हिरोईन आधी हिरोला आणि शेवटी व्हिलनला शोधून काढते. हिरोला शोधणं समजलं, पण व्हिलन ज्या स्तराचा दाखवला गेला आहे, तो इतक्या बाळबोध पद्धतीने स्वत:ला शोधून देईल का... जे प्रगत तंत्रज्ञान हिरोकडे आहे, ते व्हिलनकडे नाही असं दाखवण्यापेक्षा, इथे मिलिंद गुणाजीचा वापर करून तेच तंत्रज्ञान फिरवून हिरो व त्याच्या टोळक्याचा शोध दाखवला असता, तर कथेत अजून रंगत आली असती...

एकंदरीत, उत्तम भव्यता दाखवणारा, दमदार पार्श्वसंगीत आणि जबरदस्त साहसदृष्य लाभलेला, पण पटकथेत सपाटून मार खाणारा चित्रपट म्हणजे, रॉबिन भट आणि विक्रम भट लिखीत "एलान..." पहावा, तर फक्त मिथून चक्रवर्थीसाठीच...

@ अनिकेत परशुराम आपटे.

No comments:

Post a Comment