एक माथेफिरू अतिरेकी त्याच्या साथिदारांच्या मदतीने काही नागरिकांना ओलीस ठेवतो आणि त्यांच्या सुटकेसाठी काही मागण्या करून सरकारवर दबाव आणतो. सरकार मागण्या मान्य करतं आणि अतिरेकी खुश होतात. संरक्षक दल मात्र counter attackचा छुपा प्लॅन बनवतात. नागरिक तर सुटतातंच, पण अतिरेकीही मारले जातात. हे कथानक वेगवेळ्या पद्धतीने आपण अनेक हिंदी, इंग्रजी चित्रपटांमध्ये पाहिलं. "White House Down", "True Lies", "Speed", "ज़मीन", "मैं हूँ ना", "बेल बॉटम असे अनेक चित्रपट या कथानकाने सजले. लक्ष्य राज आनंद दिग्दर्शित "अटॅक" हा चित्रपटही त्या पठडीतला, पण जरासा वेगळा...
"अटॅक"ची कथा आहे अर्जून शेरगिल (जॉन एब्राहम) या सैन्यातल्या एका जवानाची. एका अतिरेकी हल्ल्यात अर्जूनची मैत्रिण आयेशा (जॅक्वेलिन फरनँडीस) जिवानिशी जाते आणि स्वत: अर्जून पूर्ण अपंग होतो. अर्जून एका बाजूला स्वत:शीच लढत असतो, त्याच वेळी दुसरीकडे डॉ. सबाह क़ुरेशी (रकुल प्रीत सिंह) इरा नावाची एक अत्याधुनिक चिप प्रणाली तयार करते जिच्या वापराने सामान्य माणसाचं एका सूपर ह्यूमनमध्ये रूपांतर होईल. या प्रणालीच्या चाचणीसाठी अर्जूनची निवड होते. चिप अर्जूनच्या मेंदूमध्ये बसवली जाते. चिप आणि अर्जूनच्या मेंदूची एकरूपता होण्याची प्रक्रिया सुरू होते. अर्जून ठणठणीत तर होतोच, पण त्या अतुलनीय तांत्रिक शक्तीसुद्धा मिळते. एकरूपतेची प्रक्रिया पूर्णतेकडे जात असतानाच एक घातक अतिरेकी हल्ला होतो आणि इराच्या मदतीने अर्जून लढायला सज्ज होतो...
चित्रपटाचं कथानक सरधोपट आहे. गाणी उगाच नको तेव्हा येऊन कथानकात अडतळे निर्माण करतात. किरण कुमार, रत्ना पाठक शाह, रजत कपूर असे ताकदीचे कलावंत, असतानाही अदाकारी सुमार झाली आहे. जॉन एब्राहम पुन्हा त्याच एकसूरी भूमिकेत आल्याने, ते त्यांच्या मगच्याच चित्रपटातलं एखादं पात्र साकारत आहेत असं वाटत राहतं. प्रकाश राज आणि रकुल प्रीत सिंह यांनी चांगलं काम केलं आहे. चित्रपटातली गणी यथातथाच आहेत. वारंवार गुणगुणत रहावं असं कुठलंही गाणं नाही. पार्श्वसंगीत म्हणाल तर दमदार आहे. पण बऱ्याच अंशी "परमाणू" या चित्रपटाच्या वेळी ऐकू येणाऱ्या पार्श्वसंगीताची आठवण होते...
चित्रपटाची पटकथा वेगवान आहे. गाणी आणि जॉन-जॅक्वेलीनची सुरुवातीची दृष्य सोडली, तर कथा कुठेही आपली गती सोडत नाही. चित्रपटातलं एक दृष्य आणि पटकथेचा काही भाग न पटण्यासारखा आहे. अर्जून अपंग असताना दोन गुंड त्याच्या आईची अंगठी चोरतात. सूपर सोल्जर झालेल्या अर्जूनला त्यातला एक चोर अचानक त्याला दिसतो आणि ती अंगठीही त्याच्या जवळच असते. जणू त्याला माहित होतं अर्जून येणार आहे. "क्रिश" चित्रपटातल्या एका दृष्यासारखं वाटणारं हे दृष्य रंगतदार आहे खरं, पण बिनबुडाचं वाटतं. कथेतल्या एका भागात अतिरेकी अत्यंत शिताफीने एका इमारतीवर ताबा मिळवतात. मुख्य अतिरेकी जेव्हा आपल्या मागण्या पूर्ण करवून घेतो, तेव्हा हेच करायचं होतं तर अतिरेक्याने त्याच इमारतीची निवड का करावी, असा प्रश्न पडतो...
जॉन-जॅक्वेलीनमधली दृष्य छोडी जास्त वाटली. सुरुवातीच्या दृष्यांमध्ये काट-छाट केली असती तरी चाललं असतं. आयेशा गेल्यानंतर अर्जून-आयेशामधली दृष्य येणं हा कथेचा भाग होता. पण त्यांची ही लांबी जरा जास्त वाटली. चित्रपटातले दोन मुद्दे मला भावले. एक म्हणजे ओढून ताणून विनोद निर्मिती केलेली दिसत नाही. दुसरं म्हणजे हिरोईन मेल्यावर हिरो फुकट जाऊ नये म्हणून दुसऱ्या हिरोईनला आणून हिरो-हिरोईनमध्ये पुन्हा प्रेम निर्माण झालेलं दाखवलं जातं. या चित्रपटात मात्र रकुल प्रीत सिंह आणि जॉन एब्राहम यांच्या व्यक्तिरेखांमधलं नातं पूर्ण व्यावसायिक दाखवलं गेलं. त्यांच्यात कुठेही भावनिक गुंतागुंतं वगैरे दाखवली गेली नाही...
चित्रपटातले दोन महत्वाचे आधारस्तंभ म्हणजे टेक्नॉलॉजीचा वापर आणि चित्रपटातली हाणामारीची व साहसदृष्य. व्हि.एफ.एक्स.चा अत्यंत सुरेख वापर चित्रपटात दिसतो. अम्रितपाल सिंह आणि फ्रँझ स्पिहॉस यांनी दिग्दर्शित केलेली हाणामारीची व साहसदृष्य पडद्यावर पाहताना छानच वाटतात, पण ती दृष्य बऱ्याच अंशी "मेट्रीक्स", "टर्मिनेटर", ट्रू लाईज" या इंग्रजी चित्रपटांची आठवण करून देतात...
एकंदरीत, स्वत: जॉन एब्राहम यांनी लिहिलेल्या कथेला पडद्यावर आणण्याचा लक्ष्य राज आनंद यांचा प्रयत्न स्तुत्य आहे. पण पटकथा थोडीशी मार खाते. तरीही, एका वेगळ्या प्रयत्नाला दाद म्हणून "अटॅक" हा चित्रपट एकदातरी पहावाच. या मालिकेत येणारा पुढचा भाग कथेनुरूप आणि सादरीकरणानुसार सरस ठरावा...
@ अनिकेत परशुराम आपटे.
No comments:
Post a Comment