"नमस्कार मी रागिणी देसाई... तुम्ही बघताय फर्स्ट न्यूज... नेहमीच खरी बातमी..." तुम्ही ओळखलं असेलंच... प्रसिद्ध अभिनेत्री मुक्ता बर्वे...
२००४मध्ये प्रदर्शित झालेल्या "चकवा" या चित्रपटातून रुपेरी पडद्यावर पहिलं पाऊल ठेवणाऱ्या मुक्ताने "थांग", "शेवरी", "माती-माय" अशा बऱ्याच चित्रपटांमधून स्वत:ला सिद्ध केलं. "मुंबई पुणे मुंबई" सिरीज, "ऐका दाजीबा", "एक डाव धोबीपछाड", "बदाम राणी गुलाम चोर" अशा हलक्या-फुलक्या आणि विनोदी चित्रपटांमधून झळकत असताना, "डबल सीट", "हायवे", "आम्ही दोघी", "बंदीशाळा", "जोगवा", अशा वेगळ्या विषयांवरच्या गंभीर भूमिकाही मुक्ताने छान वठवल्या...
चित्रपटांसोबतच रंगमंच आणि छोटा पडदा, या दोन्हीही ठिकाणी मुक्ताने तिची छाप सोडली. १९९९ साली प्रसारित झालेल्या "घडलंय बिघडलंय" या मालिकेद्वारे मुक्ताने अभिनयक्षेत्रात पहिलं पाऊल ठेवलं. पुढे "बंधन", "पिंपळपान", "अग्निहोत्र", "एका लग्नाची दुसरी गोष्ट", "अजूनही बरसात आहे", "रुद्रम" अशा मालिकांमधून काम करत मुक्ताने छोटा पडदा गाजवला. छोट्या पडद्यासोबतच, रंगमंचावरही मुक्ताचा मुक्त वावर होता...
"घर तिघांचं हवं" हे मुक्ताचं पहिलं नाटक. पुढे, "आम्हाला वेगळं व्हायचंय", "फायनल ड्राफ्ट", "कबड्डी कबड्डी", "छापा काटा", "कोडमंत्र", "लव्हबर्ड्स" अशा नाटकांमधून काम करत मुक्ताने आपला चाहता वर्ग वाढवत नेला. विनोदी भूमिकांपेक्षा, गंभीर स्वरूपाच्या भूमिकांमध्ये मुक्ता जास्त रंगली. माझ्या दृष्टीने मुक्ताच्या अभिनयाला दाद मिळवून देणाऱ्या तीन भूमिका म्हणजे "फायनल ड्राफ्ट" या नाटकातली विद्यार्थिनी, "जोगवा" या चित्रपटातली सुली आणि "रुद्रम" या मालिकेतली रागिणी देसाई...
"फायनल ड्राफ्टमध्ये मुक्ताची भूमिका एका अशा विद्यार्थिनीची होती, जिला आपले प्रोफेसर काय शिकवत आहेत ते समजत नाही. आधीची संभ्रमित मुलगी आणि ड्राफ्ट म्हणजे कथा पूर्ण झाल्यावर आत्मविश्वास वाढलेली मुलगी, हा बदल मुक्ताने सुंदर दर्शवला आहे. "जोगवा" या चित्रपटात मुक्ताने एका जोगतीणीची व्यक्तिरेखा साकारली होती. रूढी आणि परंपरांच्या विळख्यात अडकलेली सुली, तय्यप्पाच्या मदतीने पूर्ण समाजाच्या विरोधात उभी राहते, अशी ती भूमिका होती. अल्लड निरागस सुली ते परिपक्व गंभीर सुली हा बदल मुक्ताने छान साकारला होता...
मुक्ताची सर्वात दमदार भूमिका होती "रुद्रम" मालिकेमधली रागिणी देसाई. काही असामाजिक तत्वांमुळे एक सामान्य मुलगी आपलं सर्वस्व गमावून बसते. त्या तत्वांचा थांग लागताच त्या सर्वांना संपण्याच्या इराद्याने पेटून उठलेली ती मुलगी काही असामान्य कामगिऱ्या पार पाडते, अशी ती भूमिका होती. रागिणी देसाईच्या व्यक्तिरेखेत, कुटुंबवत्सल रागिणी, नैराश्याच्या गर्तेत अडकलेली उदासवाणी रागिणी, सत्य कळल्यावर पूर्ण सत्य जाणून घेण्यासाठी अधीर झालेली अस्वस्थ रागिणी आणि सगळ्या कटाचा पडदाफाश करण्यासाठी थंड डोक्याने प्लॅन करणारी रागिणी, अशा अनेक छटा होत्या. माझ्या मते, रागिणी देसाई ही व्यक्तिरेखा, मुक्ताच्या सर्वच भूमिकांमध्ये वरचढ ठरली होती...
आज १७ में. या चित्ररागिणीचा म्हणजेच मुक्ता बर्वेचा आज वाढदिवस. रागिणीमय मुक्ता बर्वेला वाढदिवसाच्या मनापासून शुभेच्छा...
@ अनिकेत परशुराम आपटे.
No comments:
Post a Comment