#HBD_Jaya...
"चक्कू छुरियाँ तेज करा लो..." आशाताई भोसले यांचे हे स्वर कानी पडताच डोळ्यांसमोर येते अल्लड, भाबडी, चाकूंना धार काढून देणारी एक मुलगी. "ज़ंजीर" या चित्रपटातली ही भूमिका, अभिनेत्री जया भादुरी म्हणजेच जया बच्चन यांनी उत्तम वठवली होती...
सशक्त अभिनय आणि सुरेख संवादफेक, या बलस्थानांमुळे जया भादुरी त्यांच्या काळातल्या आघाडीच्या अभिनेत्रींमध्ये गणल्या गेल्या. साज-श्रृंगार, नटणं-मुरडणं, तोकडे कपडे घालणं, यापेक्षाही परिपक्व अभिनय करणं, हीच गोष्ट जया भादुरी यांना अग्रस्थानी घेऊन गेली. सत्यजीत रे दिग्दर्शित "महासागर" या चित्रपटाद्वारे रुपेरी पडद्यावर पहिलं पाऊल ठेवणाऱ्या जया भादुरी यांचा पहिला हिंदी चित्रपट होता, हृषिकेश मुखर्जी दिग्दर्शित "गुड्डी..."
"गुड्डी"ला घवघवीत यश मिळालं आणि जया भादुरी यशाच्या दिशेने वाटचाल करू लागल्या. "अनामिका", "कोरा कागज़", "नया दिन नयी रात", "कोशिश", "पिया का घर", "परिचय", "बावर्ची", अशा एकाहून एक यशस्वी चित्रपटांत आपल्या सहज सुंदर अभिनयाने जया भादुरी यांनी वाह वाह मिळवली. Glamorous भूमिकांपेक्षा performance based भूमिकांमध्ये जया भादुरी जास्त रंगल्या आणि आघाडीच्या नायिकांमध्ये गणल्या गेल्या...
१९७३ साली प्रदर्शित झालेल्या "ज़ंजीर" हा चित्रपट अमिताभ बच्चन यांच्यासाठी मैलाचा खडक ठरला. असं म्हणतात, की अत्यंत यशस्वी झालेल्या "ज़ंजीर"ने अमिताभ बच्चन यांना रातोरात स्टार बनवलं ते जया भादुरी यांच्या पायगुणांनी. एकामागून एक अयशस्वी चित्रपट देणाऱ्या अमिताभ बच्चन यांची कारकिर्द जवळ जवळ संपत आली होती. कुठलीही आघाडीची नायिका त्यांच्यासोबत काम करायला तयार नव्हती. अशा वेळी जया भादुरी यांनी ती दुय्यम म्हणावी अशी भूमिका स्वीकारली होती...
"ज़ंजीर" तूफान गाजला आणि अमिताभ बच्चन यांच्या 'Angry young man' या उपाधीसोबत, जया-अमिताभ ही जोडीसुद्धा हिट झाली. "मिली", "अभिमान", "चुपके चुपके", "शोले", हे चित्रपट अफाट चालले आणि अमिताभ-जया या जोडीला प्रेक्षकांनी डोक्यावर घेतलं. अमिताभ बच्चन यांच्याशी विवाहबद्ध झाल्यावर संसार एके संसार करण्यासाठी जया बच्चन यांनी "शोले"नंतर बराच काळ चित्रपटांपासून स्वत:ला दूर ठेवलं. १९८१ साली प्रदर्शित झालेला "सिलसिला", नायिका म्हणून जया बच्चन यांचा शेवटचा चित्रपट ठरला...
"सिलसिला"नंतर जवळ जवळ सतरा वर्षांनी जया बच्चन पुन्हा अभिनयाकडे वळल्या. पण यावेळी चरित्र भूमिकांवर त्यांनी जास्त भर दिला. "हज़ार चौरासी की माँ", "कल हो ना हो", "लागा चुनरी में दाग़" असे काही चित्रपट जया बच्चन यांच्या चरित्र भूमिकांनी सजले. चित्रपट प्रेक्षकांच्या पसंतीस फारसे उतरले नाहीत, पण जया बच्चन यांच्या अदाकारीला चांगली दाद मिळाली. अभिनयासोबतच जया बच्चन यांनी समाजवादी पार्टीकडून उत्तर प्रदेशचं प्रतिनिधित्व करत राजकारणातही बऱ्यापैकी नाव मिळवलं...
आज ९ एप्रिल. 'पद्मश्री' जया बच्चन यांचा वाढदिवस. चित्रपटसृष्टीच्या या संवेदनशील, अभिनयप्रधान "गुड्डी"ला आजच्या दिवसाच्या मनापासून शुभेच्छा...
@ अनिकेत परशुराम आपटे.
.jpeg)
.jpeg)
.jpeg)
No comments:
Post a Comment