Saturday, 23 April 2022

स्वारी अफज़ल ख़ान...

दिग्पाल लांजेकरांच्या महत्वाकांक्षी अष्टकातलं चौथं पुष्प, अर्थातच, दिग्पाल लांजेकर दिग्दर्शित "शेर शिवराज है..."


छत्रपती शिवाजी महाराजांनी हुशारीने क्रूरकर्मा अफज़ल ख़ानाला प्रतापगडाच्या पायथ्याशी आणून त्याचा कोथळा बाहेर काढला, हे तर आपल्या सर्वांनाच ज्ञात आहे. इतिहासातली हीच घटना या चित्रपटात आपल्याला दिसते. छत्रपती शिवाजी महाराज, यसाजी कंक, तान्हाजी मालुसरे, जिवाजी महाले, नेताजी पालकर, कान्होजी जेधे, हे सर्व वीर larger than life होते. ते सर्व वीर मोठ्या पडद्यावर पाहताना एक वेगळाच जोश होता...

चित्रपटाचं चित्रीकरण उत्तम झालं आहे. साधाराण ३५-४० दिवसात संपूर्ण चित्रपट पूर्ण झाला असं ऐकीवात आहे. चित्रपटात घेतलेले लाँग शॉट्स, क्लोझ शॉट्स तर कमाल आहेतच, पण ड्रोन कॅमेऱ्याने टिपलेले खोऱ्यांचे, किल्ल्यांचे आणि अफाट फौजेचे शॉट्स निव्वळ अप्रतीम आहेत. शिवाजी महाराज शामियान्याकडे चालत जाताना आणि लढायांच्या वेळी वापरलेले स्लो मोशन शॉट्स आणि कॅमेरा एँगल्स अतिशय रोमहर्षक झाले आहेत...

तसा तर संपूर्ण चित्रपटच पाहण्यासारखा आहे. पण; व्ही.एफ.एक्सच्या सहाय्याने उभे केलेले भवानी मातेचे स्वप्नवत दृश्य, शंभू बाळ राजेंच्या काळजीने व्याकूळ झालेल्या सईबाईंना सोयराबाई शंभू बाळ राजेंच्या संगोपनाची हमी देतात आणि सईबाई डोळ मिटतात ते दृश्य, सईबाई निवर्तल्याची बातमी कळताच काही क्षण महाराज कोलमडतात ते दृश्य, आणि शिवाजी महाराज वाघनखांच्या मदतीने ख़ानाचा कोथळा बाहेर काढतात, अशी काही दृष्य विशेष लक्षात राहतात...

चित्रपटाला दमदार संगीत आणि पार्श्वसंगीत लाभलं आहे. ख़ानाच्या वधाच्या वेळी आणि नंतर होणाऱ्या लढायांच्या वेळी ऐकू येणाऱ्या पोवाड्याने तर या दृश्यांची ऊंची अजून वाढते. चित्रपटात वापरलेलं पार्श्वसंगीत काही अंशी "फत्तेशिकस्त" या चित्रपटाची आठवण करून देतं. चित्रपटात दिसणाऱ्या हत्तींचे चित्कार आणि सिंहाची गर्जना समयोचित असल्याने एक वेगळाच माहौल तयार होतो. शिवाजी महाराजांसाठी चित्रपटात दोन वेळा सिंहाची गर्जना वापरली गेली आहे. ती गर्जना आणि त्या व्यक्तिरेखेची एंट्री एकदम चपखल बसली आहे...

मृणाल कुलकर्णी, चिन्मय मांडलेकर, अजय पूरकर, आस्तीद काळे, समीर धर्माधिकारी, स्वत: दिग्पाल लांजेकर, विक्रम गायकवाड, ऋषभ शुक्ल या नेहमीच्या तगड्या कलावंतांखेरीज, मुकेश ऋषी, वर्षा उसगावकर, रविंद्र मंकणी, वैभव मांगले आणि मृणमयी देशपांडे या मातब्बर कलाकारांनीदेखील चित्रपटात हजेरी लावली आहे. सर्वांनीच आपापल्या भूमिका छान साकारल्या आहेत. पण दुसरा मराठी चित्रपट करणाऱ्या मुकेश ऋषी यांनी ख़ानाच्या भूमिकेला चार चाँद लावले आहेत...

बड़ी बेग़मच्या भूमिकेत वर्षा उसगावकर छान दिसल्या, पण त्यांची संवादफेक तितकीशी जमली नाही. आदिलशाही असो किंवा मुग़लशाही, त्यांच्या बोलण्यात उर्दूची झाक असणारी हिंदी असते. पण वर्षा उसगावकर यांच्या संवादफेकीत मराठीची झाक असलेली हिंदी जाणवते. मृण्मयी देशपांडे आणि आस्ताद काळे यांनी मात्र काही दृष्यांमधून विनोदांची छान फवारणी केली. समीर धर्माधिकारी या वेळी सकारात्मक भूमिकेत दिसले, ही गोष्ट चांगली घडली. तरीही, हरीश दुधाडे आणि अंकित मोहन यांची कमतरता मात्र जाणवली...

एकंदरीत, गनिमी काव्याचा वापर करून अफज़ल ख़ानासारख्या बलवान शत्रूचा खात्मा झाल्याची शिवकालीन इतिहासातली ही घटना दाखवणारा, आणि तांत्रिक दृष्ट्या सक्षम असलेला दिग्पाल लांजेकर लिखीत "शेर शिवराज है" हा चित्रपट मोठ्या पडद्यावरच पहावा असाच आहे...

@ अनिकेत परशुराम आपटे.

No comments:

Post a Comment