Sunday, 10 April 2022

एक कथानक दोन पैलू...

अमिताभचा "अग्निपथ" आणि हृतिकचा "अग्निपथ", धर्मेंद्रचा "ग़जब" आणि सचिनचा "भुताचा भाऊ", किशोर कुमारचा "चलती का नाम गाड़ी" आणि भरत जाधवचा "साडे माडे तीन", असे अनेक रिमेक आपण पाहिले. यात दाक्षिणात्य चित्रपटांचे रिमेक पण आले. चित्रपटाच्या प्रत्येक जोडीमध्ये कथानक एकच होतं, पण सादरीकरण आणि कलावंत वेगळे होते. दोन चित्रपट असे होते, ज्यात मुख्य कथानक एकच होतं, पण दृष्टीकोन वेगळे होते. ते चित्रपट म्हणजे १९९८चा "तू तिथं मी" आणि २००३चा "बाग़बान..."


एकमेकांवर आतोनात प्रेम करणारं एक वयस्कर जोडपं, त्यांच्या मुलांमुळे वेगळं होतं. नवरा एका मुलाकडे जातो तर बायको दुसऱ्या मुलाकडे जाते. एकमेकांच्या भेटीसाठी व्याकूळ झालेलं हे जोडपं कालांतराने एकत्र येतं आणि मुलांपासून लांब आपल्याच विश्वात रमतं... हे मुख्य कथानक आहे "तू तिथं मी" आणि "बाग़बान" या दोन्ही चित्रपटांचं. पण दोन्ही चित्रपटात हे कथानक पूर्ण वेगळ्या पद्धतीने वापरलं गेलं आहे...

प्रमुख व्यक्तिरेखा...


"तू तिथं मी"मध्ये मोहन जोशी आणि सुहास जोशी ही जोडी प्रमुख व्यक्तिरेखेत होती, तर "बाग़बान"मध्ये अमिताभ बच्चन आणि हेमा मालिनी यांनी प्रमुख भूमिका निभावल्या होत्या. "तू तिथं मी"मध्ये दोन्हीही कलावंतांना समान वेटेज दिलेलं दिसत होतं. ते अनुभवणाऱ्या सुखांची, त्यांच्या वाट्याला येणाऱ्या व्याकूळतेची समान वाटणी दिसली. "बाग़बान"मध्ये मात्र अमिताभ बच्चन यांच्या भूमिकेवर अधिक भर दिसला. अमिताभ बच्चन यांच्यासह हेमा मालिनीही मुख्य भूमिकेत असूनही त्यांची व्यक्तिरेखा सहनायिका म्हणून जास्त भासली...

अपत्य...


अपत्य म्हणजे मुलं. "बाग़बान"मध्ये चार मुलं दाखवली गेली. अर्थात राजा दशरथ आणि राणी कौसल्या यांना नव्याने समोर आणण्याचा तो प्रयत्न असावा, पण दोनच मुलांचा वापर जास्त दिसला. राहिलेल्या दोन मुलांचा उपयोगच दिसला नाही चित्रपटात. दोनच मुलं दाखवली असती, तरी चित्रपट पूर्ण झाला असता. मुलांचा पालकांकडे पाहण्याचा दृष्टीकोन वेगळा होता. एक ओझं म्हणून ती मुलं पालकांकडे पाहताना दाखवली गेली. "तू तिथं मी"मध्ये फक्त दोनच मुलं दाखवली गेली, ज्यांचा पुरेपूर वापर चित्रपटात दिसला. या चित्रपटात मात्र मुलांच्या मनात पालकांबद्दल प्रेम आणि आदर दाखवला गेला...

मदतनीस...


वेळोवेळी मदत करणारा, पाठीशी उभा राहून आधार देणारा म्हणजे मदतनीस. दोन्हीही चित्रपटांमध्ये मदतनीसाची व्यक्तिरेखा वडिलांसोबत दाखवली गेली. "तू तिथं मी"मध्ये ती भूमिका स्मिता तळवलकर यांनी केली, तर "बाग़बान"मध्ये परेश रावल यांनी ती व्यक्तिरेखा साकारली. स्मिता तळवलकर यांची व्यक्तिरेखा नाती जपणारी होती. हळुवारपणे प्रेमाचा अर्थ उलगडून समजावणारी होती. परेश रावल यांची व्यक्तिरेखा रोखठोक आणि एक घाव दोन तुकडे करणारी होती. अर्थात कथानकातल्या वळणामुळे ती गरजेची होती...

विशेष भूमिका...


दोन्हीही चित्रपटात मुख्य नायक-नायिकेच्या जोडी व्यतिरिक्त, दोन कलावंत विशेष भूमिकेत दिसले. "तू तिथं मी"मध्ये प्रशांत दामले आणि कविता मेढेकर या दोघांकडे त्या भूमिका होत्या. तर "बाग़बान"मध्ये सलमान ख़ान आणि महिमा चौधरी विशेष भूमिकेत दिसले. दोन्हीही चित्रपटात विशेष भूमिकेत असलेले प्रशांत दामले व सलमान ख़ान अनाथ आणि स्वकष्टाच्या कमाईवर जगणारे दाखवले गेले. प्रशांत दामले यांची भूमिका थोडी परावलंबी व मुख्य कथानकाच्या चाकोरी बाहेरची होती. सलमान ख़ान यांची भूमिका मात्र मुख्य कथानकात वेगळं वळण आणणारी ठरली...

गाणी...

दोन्हीही चित्रपटात बऱ्यापैकी गाणी होती. "तू तिथं मी" मधली गाणी थोडी संथ चालींची होती,  तर "बाग़बान" मधली अर्ध्याहून अधिक गाणी, ही उडत्या चालींची होती. वयस्करांमध्ये रंगलेला भेंड्यांचा खेळ, "तू तिथं मी" या चित्रपटाचं हायलाईट गाणं होतं असं मला वाटतं. "बाग़बान"मध्ये मात्र ती कमाल केली अमिताभ बच्चन यांनी गायलेल्या, "चली चली फिर चली चली..." या गाण्याने...

शीर्षक आणि अंत...

दोन्हीही चित्रपटांच्या शीर्षकावरूनच मुख्य कथानक कसं वळण घेईल याचा अंदाज बांधता येतो. "तू तिथं मी" ही एक सुंदर प्रम कहाणी होती आणि संपूर्ण चित्रपट, त्याच प्रेम कहाणीच्या आधाराने पुढे जात राहिला. बाग़बान म्हणजे माळी. 'मी बाग फुलवली. तिथे आता फुलं आली. त्यांचा गंध मला मिळावा...' हाच विचार माळी बाग फुलवताना करतो. तीच फुलं माळ्याच्याच उपयोगाला आली नाहीत तर  त्या माळ्याचं दु:ख काय असेल, हेच "बाग़बान"मध्ये प्रामुख्याने दाखवलं गेलं. दोन्हीही चित्रपटांमध्ये सुखांतच दाखवला आहे. "बाग़बान"मध्ये एकीकडे ढीग तर दुसऱ्या बाजूला खड्डा, असा अमिताभ बच्चन, हेमा मालिनी, सलमान ख़ान आणि महिमा चौधरी यांच्याच बाजूने सुखांत होता. "तू तिथं मी"मध्ये मात्र एक सकारात्मक आणि कथानकाच्या सर्व बाजूने समाधानकारक शेवट दाखवला गेला...


दोन्हीही चित्रपटांत एकच कथानक होतं, पण ते मांडण्याचे दृष्टीकोन मात्र वेगळे होते. तरीही, १९९८ सालचा "तू तिथं मी" आणि २००३चा "बाग़बान" हे दोन्हीही चित्रपट पाहण्यासारखे आहेत हे मात्र नक्की...

@ अनिकेत परशुराम आपटे.

No comments:

Post a Comment