मराठी-हिंदी चित्रपटांत आपण अनेक जोड्या पाहतो. नायक-नायिकेची जोडी, दोन नायकांची जोडी, संगीतकार किंवा गीतकार जोडी. एखाद्या जोडीचा चित्रपट यशस्वी झाला, तर त्याच जोडीला घेऊन अजूनही चित्रपट तयार होतात...
जशा जोड्या असतात तसंच त्रिकूटही असतं. पण चौकडीबद्दल कधी ऐकलं आहे का... हिंदी चित्रपटसृष्टी अशीच एक धमाल चौकडी आहे ज्यांनी दिलेले तीन चित्रपट, अपार नाही पण बऱ्यापैकी यशस्वी झाले...
हसीना मान जायेगी (१९९९)...
सोनू-मोनू हे अमीर बापचे बिगड़े हुए नाही, पण नटखट शहज़ादे. त्यांच्या उपद्रवाला कंटाळून त्यांचा बाप त्यांना वेगळं करतो. पुन्हा एकत्र येऊन वेगळ्या भूमिकेत दोघंही एका घरात शिरकाव करतात...
जोड़ी नं. १ (२००१)...
जय-वीरू हे दोन भुरटे चोर. वेषांतरं करून चोऱ्या करणे आणि मजा मारणे हे त्यांचं काम. अशीच मजा करत असताना ते अडकतात आणि त्यांना शहर सोडावं लागतं. वेगळी भूमिका घेऊन दोघंही एका घरात शिरकाव करतात...
एक और एक ग्यारह (२००३)...
तारा-सितारा हे दोन चोर. वेगवेगळ्या आयडिया वापरून चोऱ्या करताना एका लफड्यात ते अडकतात. सीमा पार करण्याच्या उद्देशाने एका वेगळ्या भूमिकेत दोघंही एका घरात शिरकाव करतात...
या तीनही चित्रपटांतली धमाल जोडी म्हणजे अभिनेते संजय दत्त आणि अभिनेते गोविंदा. चित्रपटांतली हाणामारीची दृष्य जर पाहिली, तर अभिनेते संजय दत्त यांच्यावर जास्त फोकस दिसतो. नृत्य आणि गाणी यांकडे पाहिलं, तर अभिनेते गोविंदा यांना जास्त वेटेज मिळालेलं दिसतं. पण तीनही चित्रपटांच्या शीर्षक गीतात मात्र दोन्ही नायकांना आणि त्यांच्या नायिकांना समान वाव दिलेला दिसतो...
या जोडीला लाभलेली तिसरी बाजू म्हणजेच अभिनेते आशिष विद्यार्थी. त्यांनी तीनही चित्रपटांत साकारलेल्या खलनायकी व्यक्तिरेखा, चित्रपटांच्या विनोदी कथानकाला छान वळणदार बनवतात. तीनही चित्रपटांमधल्या त्यांच्या भूमिका वैविध्यपूर्ण होत्या. विनोदी बाज असलेला भाई, सर जॉन नावाचा पूर्ण गंभीर असा डॉन आणि विनोदाकडे थोडा कल असलेला आतंकवादी कोब्रा, या तीनही व्यक्तिरेखा आशिष विद्यार्थी यांनी छान साकारल्या...
या त्रिकुटाला एकत्र बांधणारा, तीनही चित्रपटांतील चौथा कोन म्हणजेच या तीनही चित्रपटांना लाभलेला एकच दिग्दर्शक, अर्थात डेविड धवन. आधी संकलक (एडिटर), मग दिग्दर्शक बनलेल्या डेविड धवनने या तीनही चित्रपटांत विनोद, संवेदनशीलता, हाणामारी आणि संवाद यांची सुरेख सांगड घातली आहे...
एकंदरीत, संजाय दत्त, गोविंदा, आशिष विद्यार्थी व डेविड धवन या धमाल चौकडीचा, "हसीना मान जायेगी", "जोड़ी नं. १" आणि "एक और एक ग्यारह", हे एकसूरी कथानक लाभलेले तीन चित्रपट, निखळ मनोरंजनाचा छोटासा नजराणाच म्हणावे लागतील... नाही का...
@ अनिकेत परशुराम आपटे.






No comments:
Post a Comment