"जिस्म चले जाएँगे... पर ज़िंदा रहेंगे, चेहेरे..." अमिताभ बच्चन यांच्या भारदस्त आवाजातलं हे वाक्य आहे, रुमी जाफरी दिग्दर्शित, "चेहेरे" या चित्रपटातलं...
हिम वर्षाव होत असताना पुढे जाऊ न शकल्याने समीर (इम्रान हाश्मी) एका घरात आसरा घेतो. ते घर असतं निवृत्त जज आचार्य (दृतिमान चॅटर्जी) यांचं. तिथे जस्टीस आचार्यसोबत, लतीफ ज़ाइदी (अमिताभ बच्चन), परमजीतसिंह भुल्लर (अन्नू कपूर), आणि हरिया खटाव (रघुवीर यादव) असे त्यांचे तीन मित्रही असतात. विरंगुळा म्हणून ते चौघंही एक खेळ खेळतात आणि मजा म्हणून समीरही त्यात सामील होतो. जसा खेळ पुढे सरकतो तसं समीरला त्या खेळातलं गांभीर्य जाणवायला लागतं. खेळ पूर्ण होतो का... त्या खेळात समीर जिंकतो की हारतो... या प्रश्नांची उत्तरं म्हणजे "चेहेरे" हा चित्रपट...
१९५६ साली प्रकाशित झालेल्या, "अ डेंजरस गेम" या कादंबरीवर आधारित, "चेहेरे" या चित्रपटाची सुरुवात आणि पहिला अर्धा तास खूप उत्कंठावर्धक आहे. विशेष म्हणजे अमिताभ बच्चन यांच्या आवाजातली त्यांच्यावर चित्रीत झालेली कविता तर कमाल आहे. अमितजींचा जो काही आवाज लागला आहे त्या कवितेदर्म्यान, त्याला तोडच नाही. चित्रपटातली अजून एक जमेची बाजू म्हणजे चित्रपटाची सिनेमॅटोग्राफी. बिनोद प्रधान यांनी घेतलेल्या अप्रतीम कॅमेरा एँगल्समुळे चित्रपट पाहताना वेगळीच मजा येते. शिवाय, चित्रपटाचं पार्श्वसंगीतही रहस्य टिकवून ठेवण्यात आणि उत्कंठा वाढवण्यात बऱ्यापैकी हातभार लावतं...
काही ठिकाणी चित्रपटाची कथा थोडी मार खाते असं वाटतं. चित्रपटातला खेळ सुरू होतो आणि काही वेळातच पुढे काय होऊ शकेल हे आपल्याला कळायला लागतं. रिया चक्रवर्तीने साकारलेली व्यक्तिरेखा चित्रपटात नसती, तरी चाललं असतं. शब्दातून आणि घराच्या मांडणीतून ही व्यक्तिरेखा साकारता आली असती. रघुवीर यादव यांनी साकारलेली व्यक्तिरेखा फक्त एका प्रसंगासाठी समोर येते. बाकी, एका बाजूला बासरी वाजवत बसणे, याशिवाय त्यांना चित्रपटात काहीच वाव मिळालेला नाही. इम्रान हाश्मी आणि अमिताभ बच्चनवर जास्त फोकस दिला गेला आहे. विशेषत: खेळाच्या अंताला आलेले अमितजींचे संवाद जरा जास्तच लांबले आहेत...
एक व्यक्ती बेधुंद अवस्थेत एक गुन्हा करते. पण बेधुंद असल्याने ज्या व्यक्तिबाबत तो गुन्हा घडला, त्या व्यक्तीचा चेहेरा या गुन्हेगाराला लक्षात राहत नाही. अशा प्रकारचा काही प्लॉट रेखाटला असता किंवा खेळामार्फत समीर आणि अॅना (रिया चक्रवर्ती) यांच्यातला भूतकाळ दाखवला असता, तर त्या खेळाला एक वेगळाच रंग चढला असता. अमिताभ बच्चन यांची संवादफेक, अदाकारी आणि वेशभूषा नेहमीप्रमाणेच लाजवाब. त्यांनी या आधी "वज़ीर" व "बदला" या थ्रिलर्समध्ये काम केल्याने या चित्रपटाकडून वेगळ्या अपेक्षा होत्या, पण कथेमुळे व पटकथेमुळे त्या पूर्ण होऊ शकल्या नाहीत...
चित्रपट पाहताना अधून-मधून, "मी शिवाजी पार्क" या चित्रपटाची आणि "समांतर २" या वेबसिरीजची आठवण होते. एकंदरीत, त्या घरात खेळला जाणारा तो खेळ चांगलाच रोमहर्षक आहे खरा, पण कथा व पटकथा त्या खेळाला तितकंसं परिणामकारक बनवू शकल्या नाहीत. अर्थात, हे चित्रपट पाहिल्यावर समजेलच की. पण त्यासाठी पहायला हवा रंजीत कपूर लिखीत, "चेहेरे..."
@ अनिकेत परशुराम आपटे.
No comments:
Post a Comment