Thursday, 28 December 2023

एक सीन दोन पैलू...

फरहान अख़्तर यांचा "दिल चाहता है", कल्ट क्लासिक चित्रपटांमध्ये गणला जातो. चित्रपटाची कथा, गाणी, चित्रिकरण, सर्वच वेगळ्या स्तराचं होतं. एक सीन आहे, जो चित्रपटात दोन वेळा येतो. पण दोन्ही वेळेला अर्थ वेगळा असतो...

शालिनी (प्रीती झ़िंटा) एका ठिकाणी असते. आकाश (आमिर ख़ान) तिच्या जवळ जातो आणि घुडघ्यावर बसून एक लांबलचंक संवाद म्हणतो. त्यावेळी समीर (सैफ अली ख़ान) आकाशच्या मागे असतो तर रोहित (अयूब ख़ान) शालिनीच्या आस-पास असतो. हा सीन जेव्हा घडतो तेव्हा तिथे एका पार्टीचं वातावरण असतं. चित्रपटाच्या सुरुवातीच्या अर्ध्या-पाऊण तासात आणि शेवटच्या अर्ध्या-पाऊण तासात, असा दोन वेळा हा सीन चित्रपटात येतो. पण दोन्ही वेळी या सीनच्या अर्थात जमीन-आसमानाचं अंतर असतं...

चित्रपटाच्या सुरुवातीला आलेल्या या सीनमध्ये एक बेफिकीरपणा किंवा टाईमपासची वृत्ती दिसून येते. मोठमोठ्याने संवाद म्हणून मोकळा झालेला आकाश सर्वांची टाळी तर मिळवतो, पण त्यात आपण कसे सर्वांचं लक्ष वेधणारे हा विचार दिसतो. शालिनीसुद्धा एक बाईलवेडा बतफैल मुलगा म्हणूनच आकाशला पाहत असते. हाच सीन दुसऱ्यांदा येतो, तेव्हा जबाबदारपणा किंवा गांभिर्य जाणवतं. आकाशचं संवाद म्हणून झाल्यावर टाळ्यांच्या जागी शांतता पसरते. त्या शांततेत, हा मुलगा कदाचित खरंही बोलत असेल, हा विचार दिसतो...

दोन्ही सीन्स मधले मुख्य फरक आहेत संवादफेक आणि संवादाची पातळी. पहिल्या सीनमध्ये एक मुलगा एका मुलीला पटवण्याचा प्रयत्न करतो आहे, पार्टी संपली नातं संपलं, अशा प्रकारची ती संवादफेक होती. एका श्वासात ते संवाद पूर्ण झाल्याने शब्दांचे अपेक्षित अर्थ पोहोचले नाहीत. दुसऱ्या वेळी आलेल्या सीनमध्ये संवाद उच्चरण्याची गती हळू होते. संवादही खालच्या पट्टीत मिहटले जातात आणि योग्य ठिकाणी आलेल्या ठेहरावांमुळे शब्दांचे अपेक्षित अर्थही व्यवस्थित पोहोचतात. या वेळी पटवापटवीपेक्षा भरवसा जास्त दिसतो...

आमिर ख़ानने दोन्हीही सीन्समध्ये कमाल केली आहे. आकाशचं शालिनीकडे येणं, त्याची देहबोली, त्याच्या हालचालींममधला वेग, त्याचे संवादांमधले ठेहराव, यांमुळे दोन्हीही सीन्स कमालीचा परिणाम साधतात. आमिर ख़ानसोबतच प्रीती झ़िंटाने सुद्धा छान साकारले आहेत ते सीन्स. दोन्हीही सीन्समध्ये शालिनीला एखाद-दुसरा संवाद आहे. पण फक्त डोळ्यांवाटे संवादांच्या अर्थांमधला फरक तिने छान दर्शवला आहे...

संवादात (communication) सर्वात महत्वाचा असतो तो अर्थ. आपण जेव्हा समोरच्याशी संवाद साधतो. तेव्हा त्या संवादाचा अर्थ लावण्याची कामगिरी संवादकर्त्यापेक्षा समोरच्या व्यक्तीवर असते. पण त्या अर्थाची जबाबदारी मात्र संवादकर्त्याची असते. उच्चारलेल्या प्रत्येक शब्दाचा आणि संपूर्ण संवादाचा योग्य अर्थ समोरच्या व्यक्तीने लावावा यासाठी संवादकर्त्यानेच योग्य शब्द, शब्दांवरचं वजन, बोलण्याची पातळी आणि देहबोली या सर्वांचा योग्य वापर केला, तर संवादाचा अर्थ समोरच्यापर्यंत अचूक पोहोचतो...

"दिल चाहता है" मधल्या या दोन्हीही सीन्समधून हाच बोध आपल्याला मिळतो...

@ अनिकेत परशुराम आपटे.

Monday, 25 September 2023

पास्ता पांडे...

"I'm a joking..."  हा संवाद आज सर्वपरिचित आहे, तो "हाऊसफूल" या चित्रपटमालिकेत दिसणाऱ्या 'आखरी पास्ता' या व्यक्तिरेखेमुळे. "शोले"मधल्या 'अंग्रेजों के ज़माने का जेलर' आणि "बाज़ीगर"मधल्या 'बाबूलाल'सारखी 'आखरी पास्ता' ही व्यक्तिरेखा लोकप्रिय केली, ती देहबोली आणि संवादफेक यांच्या जोरावर ही व्यक्तिरेखा साकारणाऱ्या सुयश पांडे अर्थात प्रसिद्ध अभिनेते चंकी पांडे यांनी...


१९८७ साली प्रदर्शित झालेल्या "आग ही आग" या चित्रपटाद्वारे चंकीने रुपेरी पडद्यावर पहिलं पाऊल ठेवलं. धर्मेंद्र, शत्रुघ्न, डॅनी, शक्ति अशी तगड्या कलावंतांची फौज असूनही चंकीच्या अदाकारीला दाद मिळाली. "पाप की दुनिया" मध्ये सन्नी देओलसोबत सहनायक म्हणून काम केल्यावर चंकीने अनेक multi-starersमध्ये कामं केली. त्यांच्या कामाला खरी प्रशंसा मिळाली, ती "तेज़ाब" या चित्रपटामुळे...

"आँखें", "खतरों के खिलाड़ी", "ज़हरीले", "विश्वात्मा", "लुटेरे" अशा अनेक multi-starer चित्रपटात चंकी झळकले. त्यांची भूमिका बहुदा सहनायकाची असायची. एक नायक असलेले चित्रपट क्वचितच त्यांच्या वाट्याला आले. त्यातल्या त्यात "खिलाफ" आणि "परदा है परदा" या दोन चित्रपटात ते एकमेव नायक म्हणून समोर आले. "खिलाफ" फारसा यशस्वी झाला नाही पण ती कसर "परदा है परदा"ने भरबन काढली...


"जीवन दाता", "तीसरा कौन", "गोला बारूद" हे चित्रपटही चंकी पांडेसाठी महत्वाचे होते. एकाहून अधिक नायक असलेले चित्रपट यथातथाच होते. पण यात चंकीला प्रमुख नायकाच्या भूमिका मिळाल्या. पुढे खान मंडळींनी रोमँटिक चित्रपट काबीज केले तर अक्षय कुमार, अजय देवगण आणि सुनील शेट्टी यांनी हाणामारीपटांवर राज्य केलं. त्यामुळे चंकी पांडे भारतीय चित्रपटसृष्टीतून तात्पुरती रजा घेऊन चंकी बांगलादेशी चित्रपटांकडे वळले...

चंकीने जे काही मोजके बांगलादेशी चित्रपट केले, ते अत्यंत यशस्वी ठरले आणि थोड्याच अवधीत चंकी पांडे तिकडच्या लोकांसाठी स्टार आयडॉल बनले. २००३ चंकीसाठी बॉलीवूडमध्ये परतीचं साल ठरलं. या वेळी वेगळ्या भूमिकेत ते प्रेक्षकांसमोर आले. "ऐलान", "क़यामत - सिटी अंडर थ्रेट", "डॉन - द चेस बिगिन्स अगेन" या चित्रपटात चंकीला नकारात्मक छटा साकारायला मिळाल्या. पण त्या दुय्यम दर्जाच्या असल्याने चंकीला फारसा वाव नव्हता. अर्थात, "साहो" या दाक्षिणात्य चित्रपटात चंकीने वठवलेल्या प्रमुख खलनायकी भूमिकेला चांगला प्रतिसाद मिळाला...

नकारात्मक भूमिकामध्ये चंकीची अदाकारी तितकीशी बहरली नाही. "डी" आणि "सुख" या चित्रपटातल्या चंकीने साकारलेल्या सहायक व्यक्तिरेखा प्रेक्षकांच्या पसंतीस पडली खरी, पण त्यांच्या सेकंड इनिंगमध्ये चंकी जास्त लोकप्रिय झाले, ते त्यांना मिळालेल्या विनोदी भूमिकांमुळे. "अपना सपना मनी मनी", "फूल एँड फायनल", "दे दना दे" अशा चित्रपटात विनोदी भूमिका साकारताना चंकीला "हाऊसफूल" चित्रपटाच्या सर्व भागांत 'आखरी पास्ता' ही व्यक्तिरेखा साकारण्याची संधी मिळाली. या संधीचं सोनं करत चंकीने ही भूमिका अप्रतीम वठवली...


आज २६ सप्टेम्बर. आज सुयश पांडेचा वाढदिवस. बॉलीवूडच्या या विनोदी 'पास्ता'ला वाढदिवसाच्या हाऊसफूल शुभेच्छा...

@ अनिकेत परशुराम आपटे.

Thursday, 7 September 2023

मनाच्या दृष्टीचा संमोहित खेळ...

शारीरिक सौंदऱ्यापेक्षा मानाचं सौंदर्य अधिक मौल्यवान आणि सुंदर असतं, हे पटवून देणारा नितांत सुंदर चित्रपट म्हणजे, २००१ साली प्रदर्शित झालेला, "शॅलो हॅल" हा इंग्रजी चित्रपट...

ऑफिस, मग नाईट किलब्स, मुलींकडे पाहण्याची नजर, त्यांना मिळवण्याची लालसा, मुलींकडून झिडकारलं जणां, अशी उथळ जीवनशैली व्यतीत करणाऱ्या हॅल लार्सनला टोनी रॉबिन्स नावाचा माणूस लिफ्टमध्ये भेटतो. त्या भेटीनंतर हॅलला आता ज्या मुली भेटतात त्या त्याला न झिडकारता त्याच्याशी छान वागू लागतात. हॅलला आनंद होतो आणि तो त्यातच रमू लागतो. अशातच हॅलच्या बॉसची, स्टीव्हची मुलगी रोजमेरी हॅलच्या आयुष्यात येते. पहिल्या भेटीतच हॅल रोजमेरीच्या प्रेमात पडतो. रोजमेरीलाही हळूहळू हॅलचं प्रेम समजतं आणि ती त्याचा स्वीकार करते...

हॅलच्या वागण्यातला बदल, हॅलचा मित्र मारिसियोच्या लक्षात येतो आणि तो संभ्रमात पडतो. मारिसियोला समजतं की टोनी रॉबिन्सने हॅलला एका वाक्याने संमोहित (hypnotize) केलेलं. त्याच संमोहनाच्या अमलामुळे हॅलच्या मुलींकडे पाहण्याच्या दृष्टीत बदल झालेला असतो. टोनीकडून हॅलचं संमोहन तोडण्यासाठीचं ते वाक्य घेऊन मारिसियो ते वाक्य हॅलला ऐकवतो. संमोहन तुटताच सर्वात आधी हॅलला सुडौल बांध्याच्या रोजमेरीच्या जागी एक अगडबंब अशी महिला दिसते. हॅल रोजमेरीला झिडकारतो. आता हॅलला पुन्हा मुली भेटतात आणि हॅल त्यांना पाहून चक्रावतो...

संमोहनाच्या अमलाखाली वावरणाऱ्या हॅलला भेटलेल्या लहान-मोठ्या मुली सुंदर, मोहक आणि गोडुल्या असतात. पण संमोहन तुटल्यावर त्याच मुली, स्थूल, चष्मा लावणाऱ्या, कुरूप अशा त्यांच्या मूळ रूपात हॅलसमोर येतात. त्यावेळी हॅलला सत्याची जाणीव होते, की वरवर कुरूप आणि बिभत्स दिसणाऱ्या या मुली मनाने खूप सुंदर होत्या. इतकंच नाही तर हॅलला रोजमेरीवरच्या त्याच्या खऱ्या प्रेमाचीही प्रचिती येते आणि मानसिकदृष्या खचलेल्या रोजमेरीला हॅल त्याच्या प्रेमाची पुन्हा कबूली देतो...

सर्वच कलावंतांची अदाकारी छान जमली आहे. पण सर्वात अप्रतीम व्यक्तीरेखा आहे हॅलची. जॅक ब्लॅकने हॅलची भूमिका नितांत सुंदर वठवली आहे. आधीच्या हॅलची मुलींकडे बघणारी नजर आणि नंतरच्या हॅलची मुलींकडे पाहण्याची दृष्टी यातला फरक जॅकने छानच दर्शवला आहे. संमोहनाच्या अमलात वावरणाऱ्या हॅलला भेटलेल्या मुली, संमोहन तुटल्यावर पुन्हा भेटतात, या दोन्हीही वेळी जॅकने वेगवेगळे भाव दर्शवलेत ज्यातला फरक उठून दिसतो...

कथेनुरूप चित्रपटात येणारी विनोदी दृष्य अप्रतीम आहेत. या विनोदी दृष्यांवर कळस चढतो खुसखुशीत संवादांमुळे. विशेषता: संमोहनाच्या अमलाखाली असणाऱ्या हॅलला एखादी मुलगी दिसते आणि तीच मुलगी जेव्हा हॅल मारिसियोला दाखवतो, तेव्हा मारिसियोचे हावभाव आणि संवाद यांमुळे विनोदी दृष्य अधिक खुलतात. चित्रपटातली काही दृष्य दोन वेळा येतात. पहिल्यांदा येतात तेव्हा हॅल आभासिक जगात असतो. आणि दुसऱ्यांदा तीच दृष्य येतात तेव्हा संमोहनातून बाहेर आलेला हॅल त्याच्यासोबतचे प्रसंग आठवतो...

चित्रपट विनोदाच्या वाटेवर पुढे जात राहतो, पण चित्रपटात येणारी गंभीर व हलकी दृष्यही चांगला परिणाम साधतात. हॅल आणि रोजमेरीचं लग्न होतं आणि परंपरेनुसार हॅल रोजमेरीला उचलण्याचा प्रयत्न करतो. पण रोजमेरीच्या अवाढव्य शरीरयष्टीमुळे हॅलला ते शक्य होत नाही. मग रोजमेरीच हॅलला उचलून गाडीपर्यंत घेऊन जाते. चित्रपटालं हे शेवटचं दृष्य चित्रपटाचं हायलाईट आहे असं मला वाटतं. या दृष्यात विनोदापेक्षा प्रेम आणि जबाबदारी अधिक जाणवते...

एकंदरीत, विनोद, प्रणय आणि गंभीर दृष्य एकाच वेळी अनुभवायची असल्यास, पीटल फॅरले आणि बॉबी फॅरले दिग्दर्शित, "शॅलो हॅल" हा चित्रपट एक सुंदर पर्याय आहे...

@ अनिकेत परशुराम आपटे.

Thursday, 24 August 2023

धमाल चौकडी...

नाट्य-चित्रसृष्टीतले चार महारथी एकत्र दिसण्याचा योग फारच कमी. असाच एक विनोदी योग आला जेव्हा अशोकमामा, लक्ष्या, सचिन आणि प्रशांत दामले, हे चार महारथी एकत्र पडद्यावर दिसले. तो चित्रपट होता, "आयत्या घरात घरोबा..."

मुंबईत राहणाऱ्या किर्तीकर कुटुंबाचा एक नियम असतो, की वर्षातून एकदा, चार महिन्यांसाठी पूर्ण कुटुंब हवापालटासाठी जातं. घरातल्या नोकरांनाही तेव्हा सुट्टी दिली जाते. त्याच काळात त्या रिकाम्या घरात एक राजामाणूस चार महिने गुपचूप राहतो. यंदाही तसंच होतं, पण यावेळी एक गडबड होते. काही प्रसंग घडत जातात आणि अनोळखी माणसांसोबत किर्तीकर कुटुंबातली काही माणसं घरात शिरकाव करतात. हे सर्व सांभाळून घराची व्यवस्था पाहताना त्या राजामाणसाची भंबेरी उडते...

Multi-starer चित्रपटात एखादी तरी मध्यवर्ती भूमिका असते. त्या भूमिकेच्या अवती-भोवती कथानक घडत जातं. अशोकमामांना मिळालेली व्यक्तिरेखा तशीच आहे. वेळप्रसंगी कुटुंबप्रमुखासारखा कडक किंवा एखाद्यावेळी लहान मुलासारखा भोळा असा, पैशानं गरीब पण मनाने श्रीमंत असलेला गोपूकाका छान रंगवला आहे अशोकमामांनी. सोबतीला लक्ष्या, सचिन आणि प्रशांत असल्याने एकेक विनोदी दृष्य धमाल रंगलं आहे...

सचिन पिळगावकर यांना गुरूस्थानी मानणाऱ्या राजेश्वरी सचदेव यांचा हा पहिला चित्रपट. मातब्बर कलावंतांची फौज असतानाही राजेश्वरीने साकारलेली अल्लड, हुशार अशी कानन उठून दिसते. चित्रपटात सचिन-सुप्रिया ही नेहमीची जोडी तर आहेच, शिवाय प्रशांत-किशोरी ही जोडीसुद्धा छोट्या भूमिकेत आहे. "आत्मविश्वास"नंतर सचिन आणि प्रशांतने एकत्र काम केलेला हा दुसरा चित्रपट. "आत्मविश्वास"प्रमाणेच या वेळीही सचिन आणि प्रशांत काही प्रसंगात पडद्यावर एकत्र दिसलेत. पण त्यांच्या संवादांची देवाण-घेवाण नव्हती.

चित्रपटातील सहकलाकारांनी आपापल्या परीने त्यांच्या त्यांच्या भूमिका चांगल्या निभावल्या आहेत. पण जयराम कुलकर्णी यांनी साकारलेला सखाराम खासच होता. चित्रपटातल्या काही प्रसंगांच्या सुरूवातीला तर काही प्रसंगांच्या शेवटी सखाराम काही क्षणांसाठी पडद्यावर येतो. चित्रपटाच्या उत्तरार्धात सखारामच्या व्यक्तिमत्वात झालेला बदल आणि त्यामुळे निर्माण होणारे विनोद, ही जोडी छान जमली आहे. चित्रपटाच्या शेवटच्या तासाभरात एकही संवाद नसताना, नुसती देहबोली, शारीरिक हावभाव, विविध आवाज आणि अदाकारी यांच्या जोरावर जयराम कुलकर्णी यांनी सखाराम हे पात्र छान सादर केलं...

अरुण पौडवाल यांनी चित्रपटाला संगीतबद्ध केलं आहे. चित्रपटात असलेल्या चार गाण्यात वेस्टर्न आणि उत्तर भारतीय संगीताची झाक दिसते. प्रत्येक गाण्यात येणारी बहारदार नृत्य दिग्दर्शित केली आहेत माधव किशन आणि विजय बोराडे यांनी. चित्रपटाचं हायलाईट साँग आहे, "यश चालूनी आले दारी..." या कँवालीत चित्रपटातले सर्व नायक आणि नायिका एकत्र नृत्य करताना दिसतात. शिवाय सचिन आणि प्रशात या दोघांनी या गाण्यात पार्श्वगायन केलं आहे...

एकंदरीत, चार नायक, तीन नायिका, अप्रतीम संगीत आणि मजेशीर विनोदी कथानक, या धमाल चौकडीचा आस्वाद घ्यायचा, तर सचिन पिळगावकर दिग्दर्शित, "आयत्या घरात घरोबा" हा चित्रपट पाहण्यासारखा आहे...

@ अनिकेत परशुराम आपटे.

Sunday, 13 August 2023

अवलिया विनोदवीर...

'स्टँड-अप कॉमेडी' म्हटली, की जॉन प्रकाशराव जनुमाला ही एकमेव व्यक्ती आठवते. जॉन प्रकाशराव जनुमाला, अर्थात, सर्वांच्या गळ्यात विनोदी ताईत, जॉनी लिव्हर...

जॉनीचे वडिल 'हिंदुस्तान युनिलिव्हर'मध्ये असताना एका समारंभात जॉनीने अनेक जणांच्या नकला करून दाखवल्या आणि तेव्हापासून हा माणूस जॉनी लिव्हर म्हणून नुसता भारतातच नाही, तर भारताबाहेरही प्रसिद्ध झाला...

सुनील दत्त यांच्या "दर्द का रिश्ता" या गंभीर विषयावरच्या चित्रपटातल्या छोट्याशा विनोदी भूमिकेने जॉनीचा प्रवास सुरू झाला. अनेक विविध चित्रपटांमधून जॉनीने अनेक विनोदी भूमिका साकारल्या. कधी भुलक्कड डॉक्टर, कधी स्वप्नाळू हवालदार, कधी म्हातारा वकील, तर कधी कामचोर मेकॅनिक, अशाने भूमिका जॉनीने साकारल्या. १९९३ साली प्रदर्शित झालेल्या "बाज़ीगर" या चित्रपटातली जॉनीची भूमिका विशेष लक्षात राहण्यासारखी होती...

विसरभोळा, वेगवेगळे हाव-भाव करणारा, नको तिथे नको ते बोलून प्रसंगाला वेगळंच वळण देणारा 'बाबूलाल' अप्रतीम वठला, तो जॉनीमुळेच. अशाच प्रकारची विसरभोळ्या डॉन, 'पप्पी भाई' ही व्यक्तीरेखाही जॉनीने "गोलमाल ३" आणि "गोलमाल अगेन" या चित्रपटांत सुंदर साकारली. पप्पी भाईचे हाव-भाव, विसरल्यानंतर प्रसंगाला विसंगत संवादफेक आणि बोलण्याचा लेहेजा, यांमुळे पप्पी भाई ही व्यक्तीरेखा, चित्रपटातल्या नायकांसारखीच तुल्यबळ ठरली...

विनोदी भूमिका साकारत जॉनीने काही गंभीर स्वरूपाच्याही भूमिका निभावल्या. अर्थात या सर्व भूमिकांना जॉनीचा विनोदी टच होताच. "जीत"मधली 'पैय्याजी' ही व्यक्तीरेखा आणि "सपूत"मधली 'देवा' ही व्यक्तीरेखा, या दोन भूमिका विशेष लक्षात राहिल्या. 'पैय्याजी' या नाचासम असलेल्या भूमिकेला थोडे विनोदी पंचेस होते, पण 'देवा' ही भूमिका पूर्ण वेगळी होती. मतिमंद असलेल्या 'देवा'ची व्यक्तीरेखा संपूर्ण गंभीर स्वरूपाची होती. "सपूत" ने मार खाल्ला, पण जॉनीने साकारलेली देवा ही भूमिका उठून दिसली...

"काला बज़ार"मधला 'कुट्टी चायवाला', "खिलाड़ी"मधला 'आन्ना पिल्लई', "अनारी"मधला 'बबलू', "नरसिंहा"मधला 'टेम्पो दादा', "करन-अर्जून"मधला 'लिंघैय्या', "दरार"मधला 'हरि', "जुदाई"मधला 'हिरालाल', "दिवाना-मस्ताना"मधला 'गफूर', "दुल्हेराजा"मधला 'बाँके', अशा अनेक विविध व्यक्तीरेखा जॉनीने साकारल्या आणि चित्रपटातल्या आघाडीच्या विनोदवीरांमध्ये स्थान मिळवलं. मूळचा तेलगू ख्रिस्चन असूनही बंगाली, हिंदी, इंग्रजी, मराठी, तुळू, या भाषांमधूनही जॉनीने कामं केली. शिवाय, फक्त चित्रपटच नाही, तर अनेक कार्यक्रमांमधून वेगवेगळे विनोद सादर करत जॉनी लोकप्रियतेच्या शिखरावर विराजमान झाला...

आज १४ ऑगस्ट. जॉनी लिव्हरचा आज वाढदिवस. चित्रपटसृष्टीच्या या अवलिया विनोदवीराला वाढदिवसाच्या हास्यमय शुभेच्छा...

@ अनिकेत परशुराम आपटे.

Thursday, 10 August 2023

"बलवान" आन्ना...

'आन्ना' हा शब्द कानी पडला, की एकच व्यक्ती आठवते. ती व्यक्ती म्हणजे, प्रसिद्ध अभिनेते सुनील शेट्टी...

मंगलोर स्थित तुळू परिवारात आन्नाचा जन्म झाला. किक बॉक्सिंगमध्ये प्राविण्य मिळवल्यावर आन्ना मुंबईत आला. त्याची शरीरयष्टी, लुक आणि किक बॉक्सिंग यांच्या जोरावर आन्नाला १९९२ साली प्रदर्शित झालेल्या "बलवान" या चित्रपटात काम करण्याची संधी मिळाली. चित्रपटाला संमिश्र प्रतिसाद मिळाला, पण आन्ना 'ऍक्शन हीरो' म्हणून प्रेक्षकात लोकप्रिय झाला...

"कृष्णा", "शस्त्र", "टक्कर", "भाई", "आग़ाज़", अशा अनेक हाणामारीपटात नायक म्हणून आन्ना दिसला. मुख्य नायक म्हणून काम करताना अन्नाने, "बॉर्डर", "वक्त हमारा है", "मोहरा", "कहर", अशा अनेक चित्रपटात सहनायक किंवा सहायकाच्या भूमिकाही वठवल्या. आन्नाची खास संवादफेक आणि त्याचं शारीरिक बलाबल, यांमुळे आन्ना फक्त हाणामारीप्रधान चित्रपटच करू शकतो अशी धारणा झाली होती. पण, "हु तु तु", "ये तेरा घर ये मेरा घर", "बड़े दिलवाला", "एहसास", "धड़कन", "रक्त", अशा अभिनयप्रधान आणि वेगळ्या विषयावरच्या चित्रपटात नायक म्हणून आन्ना झळकला आणि त्याच्यावरची "Only Action Hero" ही छाप पुसली गेली...

"धड़कन" मध्ये दिसलेल्या आन्नाच्या नकारात्मक छटेचं प्रेक्षकांनी खूप कौतूक केलं. पुढे, "मैं हूँ ना", "गेम", "बाज़", "खेल", "रुद्राक्ष" अशा आन्नाच्या नकारात्मक भूमिका असलेल्या चित्रपटांची रांग लागली. हाणामारी, संवादफेक, गंभीर विषय याखेरीज, आन्नाने विनोदी चित्रपटांतून कामं करतही प्रेक्षकांची दाद मिळवली. "गोपी-किशन"मधला गोपी, "हेरा फेरी" आणि "फिर हेरा फेरी"मधला श्याम, "कुछ खट्टी कुछ मीठी"मधला समीर, "आवारा पागल दिवाना"मधला येड़ा आन्ना, "एक से बढ़कर एक"मधला राहुल, "दिवाने हुए पागल"मधला संजू, सर्वच भूमिका प्रेक्षकांच्या पसंतीस उतरल्या...

रुपेरी पडद्यावर झळकत असताना आन्नाने छोट्या पडद्यावरच्या काही कार्यक्रमात सूत्रसंचालनही केलं. "हंटर" या थ्रिलर वेब सीरिजमध्ये सध्या आन्ना झळकतो आहे. याशिवाय, मुबईस्थित एका हॉटेलही त्याच्या नावे आहे. आन्नाला क्रिकेटीची आवड आहे. 'सेलिब्रिटी क्रिकेट लीग' या स्पर्धेत 'मुंबई हीरोज' या संघाचं कर्णधारपद भूषवताना आन्नाने संघाला बऱ्यापैकी यश मिळवून दिलं होतं...

आज ११ ऑगस्ट. आज सुनील शेट्टी यांचा वाढदिवस. चित्रपटसृष्टीच्या या हँडसम आन्नाला वाढदिवसाच्या कोटी कोटी शुभेच्छा...

@ अनिकेत परशुराम आपटे.

Thursday, 3 August 2023

खलनायक नहीं नायक है तू...

"जी हां... मैं हूँ खलनायक...", विनोद राठोड यांच्या बुलंद आवाजातला हा संवाद ऐकला, की एकच चित्रपट आठवतो. तो चित्रपट म्हणजे, १९९३ साली प्रदर्शित झालेला "खलनायक..."

बल्लू ऊर्फ बलराम (संजय दत्त) या कुख्यात गुन्हेगाराभोवती चित्रपटाचं कथानक फिरतं. आपल्या मुलाच्या, बल्लूच्या परतीवर आशा ठेऊन असलेली आरती (राखी गुल्ज़ार), बल्लूच्या मदतीने घातपाती कृत्याचा कट रचणारा रोशी महंता (प्रमोद मुधू), बल्लूकडून माहिती काढून रोशी आणि त्याच्या समूहाचा नायनाट करण्याचा निर्धार केलेला इंस्पेक्टर राम सिन्हा (जॅकी श्रॉफ) आणि रामवरचा कलंक पुसण्यासाठी बल्लूला पकडून देण्याच्या इराद्याने त्याच्या गोटात सामिल झालेली गंगा (माधुरी दिक्षीत-नेने). या सर्व उपकथानकांतून प्रवास करत चित्रपट पुढे जातो...

चित्रपटात नकारात्मक व्यक्तिरेखा तितकीशी महत्वाची नाही. सुभाष घई यांच्या इतर चित्रपटांच्या तुलनेत या चित्रपटातली रोशी महंता ही खल व्यक्तिरेखा तितकी भारदस्त वाटत नाही. प्रमोद मुधु यांनी थोड्याफार दुय्यम असलेल्या व्यक्तिरेखेला चांगला न्याय दिला आहे. हाणामारीप्रधान चित्रपट जरी असला, तरी अवास्तव हिंसा दाखवली गेली नाही. या चित्रपटाचं पार्श्वसंगीतही तितकंच तोलामोलाचं आहे. चित्रपटातल्या वेगवेगळ्या दृष्यांना एकत्र जोडण्याच्या कामात चित्रपटाचं पार्श्वसंगीतही मदत करतं...

चित्रपटाला लक्ष्मीकांत-प्यारेलाल यांचं उत्कृष्ट संगीत लाभलं आहे. चित्रपटातली बहुतांश गाणी ही नृत्यप्रधान आहेत आणि इथे सरोज ख़ान यांनी नृत्यदिग्दर्शनात कमाल केली आहे. "चोली के पीछे क्या है...", "पालखी में हो के सवाँर चली रे...", "आ जा सजन आ जा...", "नायक नहीं खलनायक हूँ मैं..." या गाण्यांना सरोज ख़ान यांनी त्यांच्या नृत्यदिग्दर्शनाने वेगळीच उभारी दिली. यावर, आपल्या दिलखेचक नृत्याने आणि अदाकारीने माधुरी दिक्षीत-नेने यांनी या गाण्यांवर कळस चढवला. माधुरीने गाण्यादर्म्यान दिलेल्या हास्यमुद्रा आणि नृत्यमुद्रा यांनी त्या गाण्यांना चार चाँद लावले...

राखी गुल्ज़ार यांच्या वाट्याला त्यांच्याच 'इंतजार करनेवाली माँ' या पठडीतली भूमिका आल्याने तसं काही वेगळं वाटलं नाही. कथा, पटकथा, संगीत आणि पात्रनिवड याखेरीज, चित्रपटाची अजून एक भक्कम बाजू होती. ती बाजू म्हणजे, चित्रपटात बल्लू ऊर्फ बलराम प्रसादची मध्यवर्ती भूमिका सादर करणारे अभिनेते संजय दत्त. बल्लूची वेशभूषा, केशभूषा, देहबोली, बल्लू जेव्हा त्याच्या चेहेऱ्याचा लुक बदलतो, बल्लूची चलाखी, एकदम सुरूवातीला असलेलं त्याचं विकृत हसणं आणि तेच हसणं जेव्हा एकदम शेवटी येतं, कोरडा-पाषण हृदयी बल्लू स्वत:मध्ये बदल घडवतो, बल्लूची भावनिक छटा, या सर्व गोष्टी अभिनेते संजय दत्त यांनी अप्रतीम सादर केल्या आहेत. संजूबाबाने पूर्ण चित्रपट खाऊन टाकला आहे असं म्हटलं तरी हरकत नसावी...

रोशी महंता त्याच्या कटात यशस्वी होतो का... राम सिन्हा त्याच्या इराद्यात सफल होतो का... रामवरचा कलंक पुसण्यात गंगाला यश मिळतं का... आरती तिच्या मुलाला परत मिळवते का... बल्लू खरंच खलनायक आहे, की त्याच्यात एक नायकही लपलेला आहे... या सर्व प्रश्नांची उत्तरं मिळवण्यासाठी आणि संजय दत्तच्या अप्रतीम अदाकारीसाठी सुभीष घई दिग्दर्शित, "खलनायक" हा चित्रपट पाहण्यासारखा आहे...

@ अनिकेत परशुराम आपटे.

Thursday, 20 July 2023

सूपर कॉप अभिजीत...

अभिजीत हे नाव ऐकताच डोळ्यांसमोर येतात दमदार आवाजाचे प्रसिद्ध अभिनेते आदित्य श्रीवास्तव...

आलहाबाद येथे आपले शिक्षण पूर्ण करून आदित्य यांनी दिल्लीची वाट धरली. तिथे नाटकांमध्ये काम करत असताना प्रसिद्ध अभिनेते दिग्दर्शक शेखर कपूर यांनी आदित्य यांना पाहिलं. शेखर कपूर यांनी त्यांच्या आगामी चित्रपटात आदित्य श्रीवास्तव यांना संधी दिली आणि "बँडिट क्वीन" या चित्रपटातला पुट्टीलाल प्रेक्षकांसमोर आला. "बँडिट क्वीन"चे यश घेऊन आदित्य मुंबईत आले. इथे अनेक जाहिरातींसाठी त्यांनी आपला आवाज दिला. शिवाय, "व्योमकेश बक्षी", "रिश्ते", "आहट" अशा मालिकांच्या काही भागातही भूमिका करताना आदित्य प्रेक्षकांसमोर आले...

आदित्य यांना आत्तापर्यंत मिळालेल्या भूमिका गंभीर आणि रागीट स्वरूपाच्या होत्या. त्यामुळे ते विनोदी भूमिका निभावू शकतील की नाही यात शंका होती. पण "यह शादी नहीं हो सकती" या मालिकेतल्या दारुड्याच्या भूमिकेने ही शंका फोल ठरवली. त्या दारुड्याची व्यक्तीरेखा बहुतेक आदित्य यांना मिळालेली सर्वात मोठी पहिली भूमिका होती. अनेक मालिकांमधून काम केल्यावर रुपेरी पडद्याकडे वळण्यासाठी आदित्य यांनी छोट्या पडद्यापासून काही काळ विश्रांती घेतली. मग "संशोधन", "हज़ार चौरासी की माँ", "दिल से", "दिल पे मत ले यार", "कालो", "एक हसीना थी" अशा हटके विषयांवरच्या चित्रपटांतून आदित्य श्रीवास्तव प्रेक्षकांसमोर आले...

चित्रपटांना फारसं व्यावसायिक यश मिळवता आलं नाही. पण आदित्य श्रीवास्तव यांच्या अदाकारीची स्तूती मात्र झाली. "सत्या" या चित्रपटातली इंस्पेक्टर खाडिलकर ही व्यक्तीरेखा आदित्य श्रीवास्तव यांच्यासाठी मैलाचा खडक ठरली. बी.पी.सिंह यांनी इं. खाडिलकर या व्यक्तीरेखेवर मोहित होऊन "सी.आय.डी." या बहुचर्चित मालिकेत आदित्य श्रीवास्तव यांना इंस्पेक्टर अभिजीत या भूमिकेचा प्रस्ताव दिला. मूळत: काही भागांसाठी मिळालेली ही भूमिका पुढे इतकी मोठी होईल याची कल्पनाही कोणाला नव्हती...

"सी.आय.डी."च्या एका भागात गुन्हेगार म्हणून भूमिका करणाऱ्या आदित्य श्रीवास्तव यांनी इं. अभिजीत ही भूमिकाही छान वठवली. "सी.आय.डी" या मालिकेत अनेक कलावंतांनी इंस्पेक्टर म्हणून हजेरी लावली. पण शिवाजी साटम, दयानंद शेट्टी आणि आदित्य श्रीवास्तव हे कलावंत अढळ राहिले. क्राईम थ्रिलर असूनही इं. अभिजीतचं व्यक्तिगत आयुष्य, त्याच्या भावना, काही हलके तर काही भावनाप्रधान प्रसंग आदित्य श्रीवास्तव यांनी छान दर्शवले. "सी.आय.डी."मधल्या सर्वात मोठ्या एकसंध एपिसोडच्या चित्रिकरणाच्या "Guinness Book of World Records"च्या मानकऱ्यांच्या यादीत आदित्य श्रीवास्तव यांचाही समावेष होता...

आज २१ जुलाय. आदित्य श्रीवास्तव यांचा आज वाढदिवस. "सी.आय.डी."च्या सूपर कॉप अभिजीतला वाढदिवसाच्या तारिकामय शुभेच्छा...

@ अनिकेत परशुराम आपटे.

Sunday, 18 June 2023

पुराणात डोकावणारा तंत्रज्ञानी भडीमार...

"द अवेन्जर्स", "अवेन्जर्स - एंड गेम", "गेम ऑफ थॉर्न्स", "ब्लॅक पँथर", 'थॅनॉस', 'आयर्न मॅन', "लॉर्ड ऑफ द रिंग्स", "प्लॅनेट ऑफ एप्स", "बाहुबली", "मेन इन ब्लॅक २" या चित्रपटांची आणि व्यक्तिरेखांची नावं घेण्यामागचं महत्वाचं कारण म्हणजे, त्यांची थोडीफार झलक एकाच चित्रपटात पहायला मिळते. तो चित्रपट म्हणजे भव्यदिव्य असा, "आदिपुरुष..."


चित्रपटातल्या नकारात्मक गोष्टींचा विचार केला, तर सर्वात अग्रस्थानी असेल चित्रपटात वापरलेली भाषा. मेघनाद, ज्याने साक्षात देवराज इंद्राला हरवण्याचा पराक्रम केला, त्या इंद्रजीतच्या मुखी, "सुबह होने से पहले निकल लो यहाँ से..." हा संवाद, मुंबईतली एखादी बस्ती खाली करायला आलेल्या गुंडासारखा वाटला. शिवाय पवनपुत्र महापराक्रमी हनुमानाने, "लंका तेरे बाप की..." असं काही म्हणावं, हे तर आकलनाच्या पलिकडचं आहे. "महिने", "काम-धंधा" हे शब्द प्रेक्षकांना त्या युगातून थेट आत्ताच्या घडीत घेऊन येतात. पतीला नावाने हाक मारण्याची पद्धत, त्या वेळी कधीच नव्हती. चित्रपटात जानकी मात्र सतत "राघव" हे नाव सर्वांसमोर घेत राहते...

सेट्स आणि हाणामारीने चित्रपटाला धक्का देण्यात सिंहाचा वाटा उचलला असं मला वाटतं. लंकेश जानकीचं हरण करून मायदेशी परत येतो, तो सीन्स "ब्लॅक पँथर" चित्रपटातील वकाण्डाच्या ओपनिंग शॉटची आठवण करून देतो. 'सोन्याची लंका' असा ज्या स्थानाचा उल्लेख आहे, ते स्थान "लॉर्ड ऑफ द रिंग्स" आणि "गेम ऑफ थॉर्न्स" या चित्रपटातल्या राज्यांसारखं काळं कुळकुळीत दिसतं. दोन सैन्य जेव्हा समोरासमोर उभी राहतात, तेव्हा "अवेंजर्स - एंड गेम" मधल्या महायुद्धाची आठवण होते. एका सीनमध्ये राघव, बजरंग, शेष, जांबुवंत हे योद्धे एका बाजूला एक असे उभे राहतात. तो सीन तंतोतंत "द अवेंजर्स" चित्रपटातल्या एका सीनची फोटोकॉपी वाटतो. राघव आणि लंकेश यांच्यातलं द्वंद्व म्हणजे, आयर्न मॅन किंवा थॉर विरुद्ध थॅनॉस यांच्यातील द्वंद्वासारखं होतं. रावण हा ब्राह्मण होता असं मी ऐकलं होतं. त्यामुळे इथे लंकेश एका अजस्र वटनाघुळाला मांसाचे तुकडे खायला घालतो हे दृष्य चांगलंच खटकलं...

जी गत सेट्सची, तीच गत मेकपची. चित्रपटातली वानरसेना तर चक्क "प्लॅनेट ऑफ एप्स" या चित्रपटातून उडी मारून इथे आल्याचा भास होतो. लंकेचे रहिवासी राक्षस कुळाचे हेते. चित्रपटात दाखवलेलं लंकेशचं सैन्य, परग्रहावरून मागवल्यासारखं वाटतं. श्रीराम, सात्विक आणि मानवी रूपातला देव वाटावा, पण इथे धिप्पाड असलेला राघव, पुरातन काळातला एखादा शिकारी वाटतो. रावण हा महाबली आणि क्रूर, त्याच्या व्यक्तिमत्वातून समजावा, इथे लंकेश म्हणजे चक्क अल्लाउद्दिन खिलजी आणि थॅनॉस यांचं मिश्रण वाटत होता. बरं, इंद्रजीतच्या अंगभर खवल्या-खवल्यांचे टॅटू दाखवून काय मिळालं कोण जाणे. ब्रह्मदेवांचा जेव्हा आपण विचार करतो तेव्हा कमळावर बसलेलं, तीन शिरांचं तेजोमय दैवी व्यक्तिमत्व समोर येतं. पण इथे तसं झालंच नाही. उलट संवादामधून, "मी ब्रह्मदेव आहे..." हे त्या पात्राला सांगावं लागलं. ब्रह्मदेवांसोबत लंकेतल्या कोणाच्या शिरावर मुकूट नाही ही बाब न पटण्यासारखीच होती...

जानकी म्हणजे सीतामाता. पण ती व्यक्तिरेखा ज्या पद्धतीने मांडली आहे, ती कुठेच देवी किंवा माता वाटत नाही. उलट किर्ती सनोनच जास्त दिसते. नुसती किर्ती सनोनच नाही, तर जवळ जवळ सर्वच कलावंत आपापल्या व्यक्तिरेखांना न्याय देऊ शकले नाहीत. चित्रपटात दोन महत्वाच्या व्यक्तिरेखा आहेत. राघव म्हणजेच श्रीराम (प्रभास) आणि लंकेश अर्थात रावण (सैफ अली खान). प्रभास हा अमरेंद्र बाहुबली या भूमिकेतून बाहेर आलेला दिसत नाही आणि सैफने काही अंशी ईश्वर त्यागीचं बेरिंग घेतलेलं जाणवतं. देवदत्त नागे यांनी साकारलेला बजरंग बरा होता. पण त्याने हातात घेतलेली गदा मात्र, ताक घुसळणाऱ्या मोठ्या रवीसारखी वाटत होती. तेजस्विनी पंडित यांना चांगली भूमिका मिळाली आहे. तरीही मला वाटतं त्यांच्यापेक्षा अनिता दाते यांनी ती भूमिका अधिक चांगली वठवली असती...

चित्रपटात व्ही.एफ.एक्स आणि स्पेशल इफेक्ट्सचा भडिमार केलेला दिसतो. बजरंग आणि लंकेश जेव्हा आपला आकार बदलतात, तेव्हा 'हल्क' या व्यक्तिमत्वाची आठवण होते. चित्रपटातले राघव आणि जानकी यांचे रोमँटिक सीन्स आणि गाणी वगळली असते तर बरं झालं असतं. त्या ऐवजी कथानकात काहीतरी अधिक दाखवता आलं असतं. कथेच्या प्रवाहाला तोडणारी ही गाणी सोडली तर बाकी गाणी छान आहेत. खरंतर गाणी हा एकच दुआ आहे जो चित्रपटाला वाचवू शकतो. लंकेशची दहा शिरं एकमेकांशी बोलत असताना तर "मेन इन ब्लॅक २" या चित्रपटातल्या एलियनची आठवण होते. त्या शिरांचे एकमेकांमधले संवाद ऐकून सोसायटी मिटिंगमध्ये चाललेली हुज्जत नजरेसमोर येते...

चित्रपटात, अचानक आलेले मोर, पाण्यातली मासळी, लंकेशचं साधूचं रूप, वाली आणि सुग्रीव यांच्यातलं द्वंद्वं, राघव आणि बजरंग यांची भेट, बजरंगचं लंका जाळणं, शेष धारातिर्थी पडल्यावर हळहळणारा राघव, बजरंगचं द्रोणागिरी पर्वत उचलून आणणं, तिन्हीसांजेच्या वेळी बजरंगवर स्वार होऊन राघवचं लंकेशवर ब्रह्मास्त्र चालवणं, या काही गोष्टी खूप छान आहेत. कथानक म्हणाल, तर आपल्या महान पुराणातले सीता-हरण आणि रावण-वध हे दोन अध्याय कथेच्या रूपात या चित्रपटात दिसतात. छायांकन म्हणजेच cinematography, panorama styleने म्हणजे जुन्या जमान्यातली wide screen पद्धत वापरून केलेलं आहे. त्यामुळे ते भव्यदिव्य आणि रेखीव दिसतं...

"रामायण", "सीता हरण", "रावणवध" हे विषय पूर्ण बाजूला ठेऊन हा चित्रपट पाहिला तर परिणाम वेगळा होऊ शकतो. लहानग्यांना आपल्या पुराणाची थोडीशी ओळख म्हणून संवाद, मेकप आणि सेट्स सोडून, ओम राऊत यांचा "आदिपुरुष" वन टाईम वॉच आहे...

@ अनिकेत परशुराम आपटे.

Thursday, 15 June 2023

फिल्मी झाड...

एक झाड. खोड, फांद्या, पानं, कधी फुलं तर कधी फळं असलेलं एक साधं झाड. हेच झाड जर वेगवेगळ्या चित्रपटकारांना दिसलं तर त्यासोबतची दृष्य कशी असतील...


सुभाष घई...

चित्रपटात सुरुवातीला आणि शेवटी असं दोन वेळा हे झाड दिसतं. एका भव्य हवेलीच्या आवारात हे झाड असतं. सुरुवातीला व्हिलन भवानीसिंह, निर्दोष प्रतापसिंहला झाडाला लटकवून मारून टाकतो. हे दृष्य पाहणारी दुर्गा, हवेलीच्या आवारातच असलेल्या कालीमातेच्या मंदिरात पसरलेल्या मळवटाने जाऊन डोकं आपटून रडू लागते. मग म्हणते, "अब मैं तेरी चौखटपर उसी दिन आऊँगी, जिस दिन मेरे बेटे इसी पेड़ के सामने अपने पिता की मौत का बदला भवानीसिंह से लेंगे..." मध्ये पूर्ण चित्रपट निघून जातो. शेवटी पुन्हा तेच झाड दिसतं. या वेळी चित्रपटाच्या दोन्ही नायकांना, राम प्रताप सिंह आणि बलराम प्रताप सिंहला येशू ख्रिस्टासारखं झाडाला बांधलेलं असतं. समोर हातात दोन पिस्तुलं घेऊन भवानीसिंह उभा असते. लटकलेल्या आपल्या मुलांकडे पाहत दुर्गा बाजूला उभी असते. भवानीसिंह म्हणतो, "देख दुर्गा | कई साल पहले मैंने प्रताप को इस पेड़ पर मारा था | आज प्रताप के बेटों को भी यहीं मारूँगा..." आपल्या बेट्यांकडे पाहत, "राम, बलराम, अगर तुम मेरे बेटे हो, तो खत्म कर दो इस पापी को | अब मैं तुम्हें अपना मुँह तब दिखाऊँगी, जब तुम मेरा बदला पूरा करोगे..." असं म्हणत दुर्गा झाडाकडे पाठ फिरवते. राम आणि बलराम मग एकत्र, "जय माँ काली..." अशी ललकारी देऊन नुसत्या हातांनी दोर तोडून टाकतात. सगळी हाणामारी झाल्यावर राम आणि बलराम भवानीसिंहच्या गळ्यात फास अडकवतात आणि दुसरं टोक झाडावरून सोडून एका गाडीला बांधतात. भवानीच्या हाती एक पिस्तूल लागतं. ते उचलून तो गोळ्या झाडतो. राम व बलराम उडी मारतात. गोळ्या थेट गाडीवर आदळतात. गाडीचा स्फोट होऊन ती हवेत गटांगळ्या खाते. तिथे भवानी आपोआप खेचला जाऊन त्याला फाशी लागते. राम, बलराम आणि दुर्गा, काली मातेला नमसिकार करतात आणि मागे झाडाला भवानी लटकत असतो...

इंद्र कुमार...

इथे साधारणत: गाण्याच्या वेळी हे झाड दाखवलं जातं. निळ्या रंगाची जिन्स आणि कडक इस्त्री केवेला ब्रँडेड शर्ट घातलेला गरीब नायक राजा, राजकुमारीसारखे कपडे परिधान केलेल्या श्रीमंत पूजाला उचलून झाडाजवळ आणतो. "छोड़ दो मुझे..." असं सतत म्हणणाऱ्या पूजाला झाडाजवळ उभी करून राजा तिच्या जवळ जातो. अजून जवळ... अजून जवळ... पूजा तोंड फिरवते. पूजाच्या गालाला पकडून राजा तिचा चेहेरा आपल्याकडे फिरवतो आणि अजून जवळ जातो. पूजाचे थरथरणारे ओठ, राजाचे स्थिर ओठ आणि मागे धुसर असलेला झाडाचा बुंधा असं स्क्रीनभर दिसतं. पूजा डोळे बंद करून घेते. राजा म्हणतो, "कुछ भी हो जाए, मैं मेरी रानी पर आँच नहीं आने दूँगा..." हे वाक्य ऐकताच पूजा खाडकन डोळे उघडते. राजा परत म्हणतो, "आयी बात समझ में..." आणि पूजापासून लांब जायला लागतो. पूजाला काहीतरी आठवल्यासारखं होतं. "ठहरो राजा..." असं पूजाने म्हणताच राजा थांबतो. पूजा म्हणते, "क्या तुम वही मेरे बचपन के राजा हो..." राजा वळतो आणि मानेनेच होकार देतो. पूजाच्या डोळ्यात पाणी आणि ओठांवर हसू असतं. धावत जाऊन पूजा राजाला मिठी मारते. मग त्याच झाडाच्या अवती-भोवती रोमँटिक गाणं रंगतं...

रामसे बंधू...

चित्रपटाच्या सुरुवातीलाच हे झाड येतं. एका डरावन्या हवेलीच्या आवारात हे झाड असतं. मध्यरात्रीची वेळ असते. एक जोडपं गाडीतून फिरत असतं. गाडी बरोब्बर हवेलीच्या गेटसमोर बंद पडते. ते दोघं उतरतात आणि सताड उघड्या गेटमधून हवेलीकडे जाऊ लागतात. मुलीची नजर झाडाकडे वळते. बुंध्यावर ओरखडे असतात. मुलगी घाबरते. मुलगा तिला धीर देतो आणि हवेलीजवळ आणतो. मुलगा दार वाजवणार इतक्यात कर्कश आवाज करत दरवाजा स्वत:च उघडतो. दोघंही घाबरतात. तरीही आत जातात. आत जाताच दार आपोआप बंद होतं. "यहाँ कोई है... हमारी गाडी खराब हो गई है..." असं म्हणत दोघं अजून आत जातात. दिवाणाच्या मधोमध एका टेबलवर एक रक्तबंबाळ कवटी ठेवलेली असते. कवटीच्या मागे भिंतीवर एका बिभत्स माणसाचा मोठा फोटो लावलेला असतो. दोघंही फोटोजवळ जातात. अचानक तो बिभत्स माणूस म्हणतो, "तुमने मेरी हवेली में आकर अपनी मौत बुलाई है... हा...हा...हा..." असं म्हणत तो फोटोतून बाहेर येत त्या मुलाला धरतो. ती मुलगी ओरडून पळू लागते. एका खिडकीतून बाहेर पडत ती गाडीकडे जाते पण गेट आपोआप बंद होतं. मग परत येऊन ती मुलगी झाडामागे लपते. झाडामागून ती हवेलीकडे डोकावते तेव्हा सगळं शांत असतं. जरा दम खाल्ल्यावर ती मुलगी पुन्हा हवेलीकडे पाहते तर झाडाच्या दुसऱ्या बाजूने तो बिभत्स माणूस, लांब नखं असलेल्या त्याच्या पंजांनी त्या मुलीवर हल्ला करतो. मग एक दर्दनाक चीख. कॅमेरा झाडापासून दूर दूर जातो...

अब्बास-मस्तान...

चित्रपटात दोन वेळा हे झाड येतं. एकदम सुरुवातीला आलेलं झाड फोटोच्या निगेटिव्हसारखं दिसतं. झाडाच्या समोर एक माणूस गोळी चालवतो आणि ती दुसऱ्या माणसाला लागून तो माणूस झाडावर पाठमोरा आदळतो. मग ब्लॅक आऊट होतं. तेच झाड चित्रपटाच्या शेवटी पुन्हा दिसतं. पांढरे कपडे घातलेला राज आणि निळी साडी नेसलेली प्रिया धावत झाडाजवळ येतात आणि झाडामागे लपून बसतात. काळे कपडे घातलेला आणि हातात पिस्तूल घेतलेला विक्रम त्यांच्या मागावर असतो. तोही तिथे येतो आणि झाडाजवळ घुटमळू लागतो. संधी साधून राज विक्रमच्या हातावर फटका मारतो आणि खाली पडलेलं पिस्तुल उचलतो. राज काही-बाही बोलत असताना प्रियाला अचानक काहीतरी होतं आणि ती डोळे बंद करते. फ्लॅबॅकमध्ये पुन्हा तेच झाड फोटोच्या निगेटिव्हसारखं दिसतं. हळूहळू निगेटिव्हचा काळा रंग जाऊन वातावरण प्रकाशमय होतं आणि त्यात पिस्तूल धरलेला राज तिला दिसतो. प्रिया खाडकन डोळे उघडते आणि झाडामागून पुढे येत म्हणते, "तो वह तुम थे... असली मुजरिम विक्रम नहीं, तुम हो राज | तुमने मुझसे शादी की मेरी दौलत के लिए..." राज हसतो आणि पिस्तूल प्रियाकडे वळवत गोळी चालवतो. विक्रम मध्ये पडून गोळी खांद्यावर झेलतो आणि झाडाला जाऊन आदळतो. प्रिया राजवर दगड मारते आणि हवेत उडालेलं पिस्तूल झेलून गोळी चालवते. गोळी राजच्या दोन भुवयांच्या मध्ये लागते आणि राज झाडाजवळच धारातिर्थी पडतो...

रोहित शेट्टी...

चित्रपटात हे झाड एकदम शेवटी येतं. पांडुरंग, माधव, लकी, लक्ष्मण आणि वसूली भाई एकेक महागडी गाडी चालवत झाडाच्या दिशेने येतात. गाड्यांच्या पुढे दोन ट्रक धावत असतात ज्यांवर पाय ठेऊन गोपाल उभा असतो. बाईकवर असलेला सिम्बा, सायकलवर डबलसीट बसलेले इं. धांडे व काँ. गांधारी, हेलिकॉप्टरला लटकलेला सूर्यवंशी आणि जीपमध्ये असलेला सिंघम या सगळ्या टोळीच्या मागून येत असतात. सिम्बा बाईकवर उभा राहतो आणि पायांनी बाईकला फिरवून ढकलून देतो. बाईक एका गाडीला आदळते. ती गाडी कोलांटी उडी मारून दुसऱ्या गाड्यांवर आदळते. सगळ्या गाड्या हवेत उडतात. पांडुरंग, माधव, लकी, लक्ष्मण आणि वसूली भाई गाड्यांमधून उड्या घेतात. सगळ्या गाड्या झाडावर आपटून गाड्यांचे दोन तुकडे होतात. लकी व लक्ष्मणला सिम्बा पकडतो, पांडुरंग व वसूली भाईला गांधारी व धांडे पकडतात. सूर्यवंशी माधवला हवेतच कॅच करतो. गोपाल उभा असलेले ट्रक मात्र सटकत असतात. सूर्यवंशी एका हाताने माधवच्या शर्टाची कॉलर धरतो व दुसऱ्या हातातल्या पिस्तुलाने ट्रक्सच्या टायर्सवर गोळ्या झाडतो. ट्रक पंचर होऊन वाकडे-तिकडे होतात. गोपाल झाडावर उडी मारतो आणि एक फांदी पकडतो. सिंघम गाडी फिरवतो आणि फिरत्या गाडीतून खाली उतरत झाडाच्या फांदीवर गोळी चालवतो. फांदी तुटून गोपाल खाली पडतो. खाली पडताच गोपाल डोळे फिरवतो आणि गाणं म्हणायला लागतो. सिंघम त्याच्यावर पिस्तूल रोखतो आणि त्याच्या चेहेऱ्यावरचा मास्क काढतो. तेव्हा समजतं की हा पप्पी भाई आहे, जो ट्रकभर मातीच्या विटा चोरून गावाकडे घर बनवायला चालला होता...

केदार शिंदे...

श्रीरंग देशमुख ऑफिसमधून घरी परतत असतो. वाटेत त्याला दामू भेटतो. गप्पा मारत मारत दोघं एका झाडाजवळ येतात. तिथेच बसून दोघं पुन्हा गप्पा मारू लागतात. दामू श्रीरंगला झाडामागे लपलेल्या मुंगीचा आणि हत्तीचा जोक ऐकवतो. श्रीरंग हसू लागतो. दामूला श्रीरंगासोबत अजून एकाच्या हसण्याचा आवाज येतो. श्रीरंग हसणं थांबवतो. दामू अजून एक जोक सांगतो. पुन्हा श्रीरंग हसतो. पुन्हा दामूला अजून एकाच्या हसण्याचा आवाज येतो. तो आवाज म्हणतो, "दिवसभर उन्हात उभं राहून वीट आला होता. या दामूने छान हसवलं मला. थँक यू रे दाम्या. माझ्या पाना-पानाने आणि फांद्या-फांद्यांनी तुझे जोक ऐकले. बघ फांद्या कशा डोलत आहेत आणि पानं कशी सळसळ करत आहेत..." दामू वळून बघतो तर खरंच फांद्या हलत असतात आणि पानांची सळसळ होत असते. दामू श्रीरंगला म्हणतो, "आधी फक्त पंत यायचे अंगात. आता हे झाड पण येऊ लागलं की काय... मी नुसतं झाड होतो, पण ते महेश साहेबांसोबत. इथे मी दामू आहे..." तर ते झाड म्हणतं, "अरे म्हणूनच तुला माझं बोलणं ऐकू येत आहे. आता तुला सर्व झाडांचं, फुलांचं, पानांचं, फऴांचं बोलणं ऐकू येईल. ही शक्ती मी श्रीरंगला दिली असती, पण तो सध्या जनावरं आणि पक्ष्यांच्या समस्यांमध्ये बिझी आहे. आणि तू मला हसवलंस ना, म्हणून तुला हे बक्षिस..." नाही नाही म्हणत कानावर हात ठेऊन दामू पळू लागतो...

राज कपूर...

चित्रपटात पहिल्या अर्ध्या तासात हे झाड दिसतं. लाल-पांढरे चट्टे असलेला फूल बाहीचा टी-शर्ट, पांढरी पँट आणि पांढरे बूट, अशा वेषातला नायक रवि, हातात व्हिडियो कॅमेरा घेऊन फिरत फिरत झाडाजवळ येतो. झाडाच्या एका बाजूला सुंदर दरी असते तर दुसऱ्या बाजूला धुक्यात हरवलेला खूबसुरत पहाड़ असतो. पहाड़ातून फेसाळ असा धबधबा कोसळत असतो. गार वारा वाहत असतो. रवि शूटिंगला सुरुवात करतो. कॅमेरा फिरवत तो धबधब्यावर नेतो. धबधब्यावरून हळूहळू कॅमेरा खाली आणताना रविला एक पाय दिसतो. रवि कॅमेरा बाजूला घेऊन पाहतो. लालचुटूक कपड्यातली एक कामूक ललना धबधब्याखाली जाऊन विसावते. वरून पडणाऱ्या आणि तिथे असलेल्या पाण्याचा आंनद घेत ती ललना अंघोळ करून बाहेर येते. झाडाकडे पाठ करून उभी राहत ती ललना अंगावरच्या कापडाला एका खांद्यावरून बाहीपर्यंत सरकवते. झाडामागे उभा असलेला रवि, हे पाहून डोळे खाली करतो. काही क्षणातच एक पांढराशुभ्र आँचल झाडाच्या दिशेने येत रविच्याच तोंडावर येतो. रवि तो आँचल खाली घेतो तर समोर छातीवर हात दुमडून उभी असलेली ललना त्याला दिसते आणि तो पाहत राहतो. ती ललना हळूहळब पुढे येऊन आँचल खेचून पळू लागते. रवि म्हणको, "सुनो... तुम्हारा नाम क्या है..." मागे न वळता थोडीशी मान वळवत ती ललना म्हणते, "गंगा..." आणि तिचा आवाज सगळीकडे घुमतो..

महेश कोठारे...

चित्रपटात कुठल्याही वेळी हे झाड येतं. आचरटपणा करणारा घाबरट नायक, अर्थात लक्ष्या धावत असतो. त्याच्यामागे चकण्या वेताळ नावाचा कुख्यात गुंडं आणि त्याची माणसं लागलेली असतात. लक्ष्या धावत झाडाजवळ येतो आणि झाडावर चढून सर्वांना दिसेल असा लपून बसतो. चकण्या वेताळ आणि त्याची माणसं लक्ष्याला बघतात आणि झाडाजवळ येतात. तेवढ्यात तिथे इंस्पेक्टर महेश येतो आणि गुंडांशी हाणामारी करू लागतो. गुंडं इंस्पेक्टर महेशला बेशुद्ध करून त्याच झाडाला बांधतात व चकण्या लक्ष्याला खाली यायला सांगतो. लक्ष्या खाली उतरणार इतक्यात फांदीत अडकलेली बाटली त्याला दिसते. तहान लागली म्हणून तो बाटली उघडू पाहतो तर त्यात शाळीग्राम नावाचा राक्षस असतो. त्याच्या मदतीने लक्ष्या अचाट पॉव्हर मिळवतो. त्या पॉव्हरने लक्ष्या महेशला सोडवतो. महेश-लक्ष्या एका बाजूला दे दणादण करत असतात तर दुसरीकडे शाळीग्राम त्याची जादू वापरून गुंडांची हत्यारं निकामी करतो. गुंडं गाडीत बसून पळ काढतात तेव्हा फुल स्पीडने धावत लक्ष्या गाडी अडवतो. गाडी मागे ढकलत लक्ष्या पुन्हा झाडाजवळ आणतो आणि महेश चकण्याला बेड्या ठोकतो...

प्रियदर्शन...

चित्रपटाच्या सरते शेवटी हे झाड आपल्याला दिसतं. एक नायक, श्याम, एक बॅग घेऊन धावत असतो. त्याच्यामागे सदरा-धोतर परिधान केलेली काही माणसं धावत असतात. दुसरीकडे मोहन नावाचा दुसरा नायक दुसरी बॅग घेऊन धावत असतो आणि त्याच्यामागे काळी पँट-शर्ट घातलेले काही गुंडं धावत असतात. तिसरीकडे विदुषकी कपडे घातलेला तिसरा नायक रामू अजून एक बॅग घेऊन धावत असतो आणि वेडेवाकडे कपडे घातलेली काही माणसं त्याचा पाठलाग करत असतात. तिघंही झाडाजवळ येतात. सगळी माणसं त्यांच्या मागे असतात. श्याम, मोहन आणि रामू झाडाला फेऱ्या मारू लागतात. ती सगळी माणसंही त्यांच्यामागून झाडाला फेऱ्या मारू लागतात. या गदारोळात श्याम, मोहन आणि रामू एकेक दिशेने बाहेर येतात. तीनही बॅगा मिळाल्या म्हणून तिघं खुश होतात. मोहन आणि श्याम रामूकडे बधतात. रामूची फुल पँट नसते आणि चट्टेरी-पट्टेरी हाफ पँट दिसत असते. तिथे झाडाजवळचा गदारोळ थांबतो. माणसं मागे सरकतात तेव्हा बुंध्याजवळ रामूची पँट सर्वांना दिसते...

सचिन पिळगावकर...

चित्रपटात मध्येच कधीतरी हे झाड येतं. विश्वासराव सरपोतदार आणि त्यांची पत्नी सरिता चालता चालता दमून या झाडाखाली येऊन बसतात. सरिताला झाडाच्या मागे दोन माणसांचे आवाज येतात. ती वळून पाहते तर भैरव लक्ष्याची दाढी करत असतो. बाजूला बाईला पाहून लक्ष्या आणि भैरव दोघंही हसून नमस्कार करतात तेव्हा लक्ष्याची अर्धी मिशी तिला असते. सरिता विश्वासरावांना सांगते. विश्वासराव मागे वळतात तेव्हा त्यांना दोन मुली दिसतात. विश्वासरावांकडे पाहत त्या दोन्ही मुली हसत म्हणतात, "नमस्कार, मी लक्ष्मी...", "आणि मी भैरवी..." लांबून येणारे धनंजय म्हणजे धन्या आणि मनोज म्हणजे मन्या हे पाहतात. धन्या म्हणतो, "ए मन्या, ते बघ विश्वासराव... चल लवकर. नाहीतर आपलं सगळं नाटक उघडकीला येईल..." तेव्हा मन्या म्हणतो, "अरे आलं तर येऊ दे की... बायका बदलू आपण. अरे हाय काय नाय काय..." विश्वासराव काही बोलणार इतक्यात धन्या-मन्या तिॆथे येतात. मन्या म्हणतो, "नमस्कार विश्वासराव, ही भैरवी. मी हिचा नवरा..." धन्या म्हणतो, "आणि ही लक्ष्मी, माझा बायको..." तेवढ्यात तिथे गोट्या आणि सोट्या हे दोघं दोन रिक्षा घेऊन येतात आणि धन्या, लक्ष्मी, मन्या आणि भैरवी तिथून निघून जातात. विश्वासराव झाडाला प्रदक्षिणा घालतात आणि पुरुषांचे कपडे घेऊन बाहेर येत म्हणतात, "अरे देवा... बापे होते का काय ते..."

सूरज बडजातया...

यांच्या चित्रपटात हे झाड एका मोठ्या बंगल्याच्या आवारात असतं. विवेक आणि पूजाचं लग्न ठरल्यावर सगाईच्या रसमेसाठी पूजा आणि तिचे घरवाले म्हणजे लड़कीवाले विवेकच्या घरी येतात. त्यांच्यात पूजाची बहीण सुमन पण असते. सुमनला पाहून विवेकचा भाऊ प्रेम मोहित होतो. घराच्या मागच्या अंगणात असलेल्या या झाडाला एक झोपाळा बांधलेला असतो. सुमन त्यावर जाऊन बसते. प्रेम तिथे येऊन विचारतो, "जी, इस झूले पर क्या कर रहीं हैं आप..." सुमन हसते आणि म्हणते, "जी हम तो अपने बचपन को याद कर रहे थे... आप साथ देंगे..." प्रेम हसतो आणि हळू-हळू सुमनला झोका घ्यायला मदत करतो. त्यांचं हे कृत्य घराच्या एका खिडकीतून सगळे परिवारवाले पाहत असतात. मग सगळे त्या झाडाजवळ येतात. शेवटी प्रेम आणि सुमनला त्याच झाडाच्या झोपाळ्यावर बसवलं जातं आणि रिश्ता पक्का केला जातो...

हृषिकेश मुखर्जी...

चित्रपटाच्या सुरुवातीलाच हे झाड दिसतं. जाड भिंगाचा चष्मा लावलेला, पांढरा सदरा घातलेला, आणि पांढरं धोतर नेसलेला एक नायक झाडाखाली येऊन बसतो. आपण त्याला दिबाकर म्हणू. दिबाकर आधी आकाशाकडे पाहतो, मग आपल्या झोळ्यातून एक वही काढून शाईच्या पेनाने त्यावर प्रथम एक कविता लिहितो. नंतर त्याच काव्याच्या अनुषंगाने दुसऱ्या एका नायकाचं चरित्र लिहायला सुरुवात करतो. तिथून फ्लॅशबॅकमध्ये सुरू होते चित्रपटाची पुढची कथा. अखेरच्या दृष्यात पुन्हा तेच झाड दिसतं. यावेळी दिबाकर वही बंद करून हातात धरून उठतो आणि झाडाला हात लावून त्याकडे पाहत राहतो...

यश चोपड़ा...

चित्रपटाच्या सुरुवातीच्या अर्ध्या-पाऊण तासात हे झाड दिसतं. पांढराशुभ्र ड्रेस घातलेली नायिका म्हणजे सीमा, झाडाजवळ बसलेली असते. अधू-मधून घड्याळाकडे लक्ष देताना सीमाच्या चेहेऱ्यावरचे भाव बदलताना दिसतात. काही वेळातच नायक म्हणजे शेखर, त्या झाडाजवळ येतो. रुसलेल्या सीमाला मनवण्यासाठी काही-बाही बोलू लागतो पण सीमा मानत नाही आणि नाक मुरडून दुसरीकडे बघते. शेवटी सीमाकडे पाठ फिरवून शेखर कविता म्हणायला सुरुवात करतो. शेखरचं काव्य ऐकताच सीमाचा राग गळून पडतो आणि शेखरकडे वळून ती मुग्धपणे कविता ऐकू लागते. कविता संपता संपता दोघं एकमेकांना अलिंगन देतात. सीमा डोळे बंद करते. आणि मग, स्वीत्झरलँड की वादियों में ड्रीम सीक्वेन्स के साथ गाना...

मनमोहन देसाई...

चित्रपटाच्या शेवटच्या अर्ध्या-पाऊण तासात हे झाड दिसतं. चोर बनलेला नायक. आपण त्याला शंकर म्हणू. तर हा शंकर पळत असतो. पोलिस बनलेला दुसरा नायक, आपल्यासाठी अमर, त्या शंकर मागून येत असतो. झाड ओलांडून शंकर पुढे जातो. अमर तिथे येतो आणि नेमका त्याच झाडाजवळ अडखळून पडतो. पडलेल्या अवस्थेत समोरचं झाड बघून अमरला काहीतरी आठवतं. अमर झाडाच्या बुंध्याजवळची माती उकरायला लागतो. पुढे गेलेला शंकर वळून पाहतो आणि थबकतो. अमर मातीतून एक कुलूप काढतो. शंकर जवळ येऊन विचारतो, "तुम्हे कैसे पता यह ताला यहाँ दबा हुआ था..." अमर सांगतो, "बचपन में मैंने यह ताला यहाँ छुपाया था | लेकिन इसकी चाबी मेरे भाई के पास थी जो मुझसे बिछड़ गया..." शंकर खिशातून एक गंजलेली चावी काढतो आणि कुलूप उघडतो. "मेरा भाई..." असं म्हणत डोळ्यात पाणी आणत अमर आणि शंकर एकमेकांना मिठी मारतात...

डेविड धवन...

चित्रपटात मध्येच कुठेतरी हे झाड दाखवलं जातं. लाल-पिवळे बनियन आणि हिरवी-निळी पँट घातलेले दोन-तीन गुंडं एका विनोदी नायकाचा पाठलाग करत असतात. तो विनोदी नायक म्हणजे नंदू. नंदू धावत धावत झाडाजवळ येतो आणि थकल्यामुळे झाडाच्या दुसऱ्या बाजूला जाऊन बसतो. ते गुंडंही धापा टाकत त्याच झाडाजवळ येतात आणि नंदूच्या शेजारीच बसतात. जरा दम खाल्ल्यावर गुंडं नंदूला पाहतात आणि नंदू गुंडांना पाहतो. सगळे उठतात. गुंडं नंदूला धरण्यासाठी पुढे सरसावतात तेव्हा नंदू त्यांना थांबवतो. नंदू एक शिट्टी मारतो. झाडावरून नारळ एका गुंडाच्या डोक्यात पडतो. गुंडं तात्काळ बेशुद्ध होतो. अशाच शिट्ट्या मारून नंदू सर्व गुंडांना बेशुद्ध करतो. मग आनंदाच्या भरात नंदू पुन्हा शिट्टी मारतो. झाडावरून नारळ थेट नंदूच्या डोक्यात पडतो आणि नंदूही डोळे उघडे ठेऊन बेशुद्ध पडतो...

रामगोपाल वर्मा...

यावेळी झाडाला एकही पान नसतं. रात्रीच्या वेळीच हे झाड दाखवलं जातं. कॅमेरा झाडाच्या समोर असतो. लख्ख पांढऱ्या प्रकाशाचा फोकस झाडामागून आल्याने झाड अधिक भयावह दिसतं. चित्रपटाच्या सुरुवातीलाच जर हे झाड आलं, तर जमिनीवरून पालापाचोळा झाडाजवळ सरकत जातो. कॅमेरा त्या पाचोळ्यामागून जमिनीवर फोकस ठेऊन झाडाकडे सरकतो. अचानक कॅमेरा वर उचलला जातो. झाडाच्या एका फांदीला एका मुलीचं प्रेत लटकलेलं असतं. कॅमेरा चेहेऱ्यावर झूम होतो. डोळे बंद करून मान एक बाजूला कललेल्या अवस्थेतली ती मुलगी डोळे उघडते आणि बिभत्स हसते. हेच दृष्य जर चित्रपटात मध्येच कुठेतरी आलं, तर ते लटकलेलं प्रेत मागून दाखवलं जातं. त्या मुलीला शोधत फिरणारा नायक, आपण त्याला वासू म्हणू. तर हा वासू, ते प्रेत पाहून हक्का-बक्का होऊन स्तब्ध उभा राहतो...

तर असं हे झाड. वेगवेगळ्या चित्रपटकर्त्यांच्या हाती लागल्यावर वेगवेगळी दृष्य तयार झाली. अजूनही आहेत. पण मी इथेच थांबतो. जरा विचार करा, हॉलिवूड किंवा टॉलिवूडच्या चित्रपटकर्त्यांच्या हाती हे झाड लागलं तर काय होईल...

@ अनिकेत परशुराम आपटे.

Sunday, 11 June 2023

The Moving Thefts...

अनेक हिंदी चित्रपटात आपण वेगवेगळे चोरीचे प्रकार पाहतो. कधी एखाद्या बंगल्यात, किंवा महालात, किंवा घरात चोरी होते, तर कधी चक्क पोलीस चौकीतून चोरी होताना दाखवली जाते. या सर्व चोऱ्या एका ठिकाणाहून केलेल्या दाखवल्या जातात. पण काही चोऱ्या अशा असतात, ज्या एखाद्या धावत्या वाहनातून केलेल्या दाखवल्या जातात. हिंदी चित्रपटातल्या अशाच काही हलत्या चोऱ्या आपण पाहू...


डॉन (प्राण)...

आपल्या आजारी पत्नीच्या उपचारासाठी लागणाऱ्या पैशांची गरज म्हणून रतनलाल मिल्सच्या रस्त्यावर धावणाऱ्या कॅश व्हॅनमध्ये असलेल्या बंद तिजोरीतून पैसे चोरण्याचं काम करण्यासाठी जसजीत ऊर्फ जेजे तयार होतो. रेल्वे क्रॉसिंगवर व्हॅन थांबलेली असताना जेजे आत प्रवेश करतो. मोठ्या शिताफीनं अर्ध्या तासात तिजोरी फोडून जेजे सर्व पैसे चोरतो. मग एक बनावट अपघात घडवून आणत जेजेला व्हॅनच्या बाहेर काढलं जातं...


त्या काळातल्या चित्रपटांचा विचार करता, माझ्या मते अशा प्रकारचं वेगवान दृष्य हिंदी चित्रपटात पहिल्यांदात आलं होतं. गाडी बरोब्बर मॅनहोलवरच कशी थांबली, ज्याने आत शिरण्याचा रस्ता बनवला, त्यानेच तिजोरी निकामी का नाही केली, गाडीत काहीतरी खुडबूड सुरू आहे किंवा गाडीचा पाठलाग होत आहे याबद्दल ड्रायव्हर किंवा त्याच्या साथिदाराला जाणीव कशी नाही झाली, या तर्कांना बाजूला ठेवलं तर प्राणसाहेब असलेलं "डॉन" मधलं हे दृष्य छानच होतं...

रूप की रानी चोरों का राजा (अनिल कपूर)...

जुगरानकडून सीमाच्या वडिलांच्या खुन्याचं नाव काढून घेण्यासाठी रोमियो ट्रेनमधून हिऱ्यांची चोरी करायला तयार होतो. हेलिकॉप्टरच्या सहाय्याने रोमियोला ट्रेनच्या बाहेर पर्यंत पोहोचवलं जातं. चालत्या ट्रेनचा एक डबा उघडून रोमियो आत जातो आणि हिरे चोरून पुन्हा हेलिकॉप्टरच्या सहाय्याने पळ कढतो...


ट्रेनवर गाणी, हाणामारी, मिलना-बिछड़ना, अशी अनेक दृष्य आहेत. पण चालू ट्रेनमध्ये घडलेल्या चोरीचं हे पहिलंच दृष्य असावं. काही तर्कविसंगत गोष्टी या दृष्यातही होत्या. अर्थात, बॉडी डबलचा वापर झाला आहेच. पण काही क्षणी स्वत:ला झोकून दिलेलं आहे. संजय दत्त किंवा सन्नी देओलकडून अशी दृष्य पाहणं साधी गोष्ट होती. अनिल कपूर अनपेक्षित होता. पण त्याने मात्र कमाल केली आहे...

चॉकलेट (सुनील शेट्टी आणि साथिदार)...

रॉयल बँक ऑफ इंग्लंडच्या ए.टी.एम. कॅश व्हॅनमधून पैसे चोरण्याचा कट रॉकर आणि त्याचे साथिदार म्हणजे चिप, देवा, सिम व पी.पी. रचतात. लेझर बीम्सने सुसज्ज केलेली कॅश व्हॅन एक बोगद्यात शिरताच रॉकर त्यात प्रवेश करतो आणि व्हॅन बोगद्याबाहेर पडण्याआधीच सगळा ऐवज घेऊन पसार होतो...


हे दृष्य प्राणसाहेबांच्या "डॉन"मधल्या दृष्याशी मिळतं-जुळतं आहे. फरक फक्त जबाबदारीचा होता. या चित्रपटात सुनील शेट्टीला मदत करणारे साथिदार होते. त्यामुळे त्या चोरीची जबाबदारी सर्वांवर समान राहणार होती. तंत्रज्ञान आणि हॅकिंग प्रणालीचा वापर करून उभारलेलं हे दृष्य, जबाबदारीच्या पैलूमुळे अधिक प्रभावशीली ठरतं...

धूम २ (हृतिक रोशन)...

नमिबियाच्या वाळवंटातून जाणाऱ्या एका ट्रेनमध्ये ठेवलेला राणी एलिझाबेथ २ चा मौल्यवान मुकूट चोरण्याचा कट मि. ए अर्थात आर्यन बनवतो. खुद्द राणीची वेशभूषा करून आर्यन तो मुकूट चोरतो आणि 'ए' हे चिन्ह तिथे ठेऊन गार्ड्सने भरलेलं सुरक्षाकवच भेदून पलायन करतो...


हे दृष्य कमाल लिहिलं गेलं आहे. Planning, preparation आणि execution. या तीनही गोष्टी एकहाती ठेवल्या गेल्या आहेत. त्यामुळे जबाबदारी आणि परिणाम दोन्हीही एकाच्याच डोक्यावर आहेत. इतका मौल्यवान मुकूट उघड्यावर का ठेवला गेला... आतून बाहेर पडण्याचा एकच मार्ग होका तर वेषांतर केलेला चोर बाहेर कुठून पडला... हे तर्क बाजूला ठेऊन ते दृष्य पाहिलं तर कमाल रंगलं आहे...

प्लेयर्स (अभिषेक बच्चन आणि साथिदार)...

रशियामधून रोमानियाला जाणाऱ्या एका ट्रेनमध्ये ठेवलेलं सोनं लुटण्याचा प्लॅन, चार्ली आणि रिया बनवतात. या कामात स्पायडर, बशीर, रॉनी आणि सनी यांना जोडण्याचं काम विक्टर दादा करतात. रशियन सुरक्षारक्षकाचा वेष घेऊन चार्ली सोनं ठेवलेल्या डब्ब्याच्या दाराचा पासवर्ड चोरतो. मग चालू ट्रेनमधून चार्ली, बशीर आणि रॉनी सगळं सोनं घेऊन पसार होतात...


"द इटॅलियन जॉब" या चित्रपटावर बेतलेल्या "प्लेयर्स" चित्रपटातलं हे दृष्य जबरदस्त होतं. अभिषक बच्चन जरी ही चोरी करणार असला, तरी त्याच्या प्रत्येक साथिदाराला नेमून दिलेली कामगिरी संपूर्ण कटाच्या दृष्टी महत्वाची होती. एकाही व्यक्तीचं काम अर्धवट राहिलं असतं तर पूर्ण चोरी फसली असती आणि एकहाती सगळे पकडले गेले असते. Illusion तंत्रज्ञानाचा वापर करून खुल्या माळरानावर एक आभास निर्माण केल्यामुळे दृष्य पाहताना अजून मजा येते...

अशा प्रकारच्या हलत्या चोऱ्यांचं दृष्य दाखवताना दोन गोष्टी महत्वाच्या असतात. एक म्हणजे पार्श्व संगीत आणि दुसरी गोष्ट आहे छायांकन अर्थात cinematography. दृष्य जितकं वेगवान असतं पार्श्वसंगीतही तितकंच दमदार असावं लागतं. वर दिलेल्या पाचही दृष्यात ऐकू येणारं पार्श्वसंगीत, त्या त्या चित्रपटात कुठे ना कुठेतरी पुन्हा पुन्हा ऐकू येत राहतं. शिवाय काही शब्दही, जसे की "चोर चोर..." किंवा "प्लेयर्स..." या पार्श्वसंगीतादर्म्यान येत राहतात...

चोरीचं कुठलंही दृष्य असू देत. एक असा point येतो, जेव्हा काही क्षणांपुरता pause घेतला जातो. त्या pauseमध्ये चोरीला जाणारी वस्तू आणि चोर यांच्यावर काही क्षणांसाठी कॅमेरा पॅन केला जातो. "डॉन", "रूप की रानी चोरों का राजा", "चॉकलेट", "प्लेयर्स" या सर्व चित्रपटात हा pause दिसला. पण "धूम २" मध्ये हा pause घेतला गेला नाही. अर्थात, ते दृष्य इतकं वेगवान होतं, की त्या pauseची कमतरता भासली नाही...

चोरीच्या दृष्यांतली सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे छायांकन अर्थात cinematography. एखाद्या ठिकाणातून केलेल्या चोरीचं दृष्य चित्रित करताना कॅमेरामॅनवर जास्त भार नसतो. एक कॅमेरा त्या वस्तूवर फोकस ठेऊन असतो तर दुसऱ्या कॅमेऱ्या चोर त्या वस्तूपर्यंत येताना दाखवलं जातं. एखाद्या ठिकाणावर हे चित्रिकरण सोप्पं असतं कारण कॅमेऱ्याला फक्त सेट करायचं असतं. हलत्या वाहनात चित्रिकरणाची खरी कसोटी असते. जागा कमी असल्याने कॅमेरा सेट करणं, योग्य वेळी योग्य चित्र टिपणं, चित्रिकरणासोबत कॅमेऱ्यालाही सांभाळणं, यात खरं कसब लागतं...

दृष्याचं लेखन, लोकेशन, छायांकन, पार्श्वसंगीत आणि दृष्यात दिसणाऱ्या कलावंतांची व बॉडी डबल्सची कामगिरी या सर्वांच्या आधारे, चित्रपटात दिसणारी हलत्या चोऱ्यांची ही दृष्य अधिकच वेगवान, थरारक आणि उत्कंठावर्धक होतात...

@ अनिकेत परशुराम आपटे.

Thursday, 25 May 2023

ट्रेनच्या दृष्याचा थरार...

हिंदी चित्रपटात अनेक साहस दृष्य, हाणामारीची दृष्य असतात. या दृष्यात कधी जनावरांचा तर कधी वाहनांचा वापर केला जातो. काही दृष्य येतात आणि जातात. पण काही दृष्य कायमची लक्षात राहतात. धावत्या ट्रेनचा वापर केलेले असेच thrilling action sequences माझ्या पाहण्यात आले...


शोले...

इंस्पेक्टर बलदेवसिंह, जय आणि वीरू या चोरांना घेऊन ट्रेनने जात असतात. त्या ट्रेनवर दरोडेखोर हल्ला करतात. इंस्पेक्टर बलदेवसिंह, जय आणि वीरू अचाट धैर्य दाखवत तो हल्ला परतवून लावतात...


जाल - द ट्रॅप...

नावेद रब्बानी नावाच्या अतिरेक्याला अजय ट्रेनने घेऊन जात असतो. नावेदला सोडवायला त्याचे साथीदार ट्रेनवर हल्ला करतात. अनीताच्या मदतीने सर्व अतिरेक्यांना कंठस्नान घालून अजय नावेदला पोलिसांच्या हवाली करतो...

दोन्हीही दृष्य जवळ-पास समान आहेत. जिथे "जाल"मध्ये ट्रेनवर हल्ला करणारी माणसं नावेदचीच होती हे दिसत असतं, तिथे "शोले"मध्ये ट्रेनवर हल्ला करणारे दरोडेखोर गब्बरची माणसं होती की नाही, हे स्पष्ट नाही होत. "शोले" मध्ये मालगाडीचा वापर केला गेला आहे, तर "जाल" मध्ये प्रवासीवाहक गाडी दिसते. मालवाहक ट्रेनमध्ये प्रवाशांचा आभाव असणार हे बरोबर, पण प्रवासीवाहक ट्रेनमध्ये गोळीबार सुरू झाला असतानाही प्रवासी छान खिडकीत बसलेत, काही तर चक्क झोपलेले दाखवलेत, प्रवाशांच्या चेहेऱ्यांवर घबराटीचे कसेल भाव नाहीत हे थोडं खटकतं...


दोन्हीही दृष्यात पार्श्वसंगीत दमदार आहे. "शोले" मधील दृष्यात पार्श्वसंगीत मध्ये मध्ये पेरलं जातं आणि बाकी आवाज हे गोळ्यांचे, घोड्यांच्या धावण्ये किंवा ट्रेनचे घेतले आहेत. "जाल - द ट्रॅप" मध्ये "ओम नम: शिवाय" या मंत्राचा पार्श्वसंगीत म्हणून केलेला वापर परिणामकारक आहे. बाकीचं पार्श्वसंगीत दृष्याला तितकंसं बांधून ठेऊ शकलं नाही...


"जाल - द ट्रॅप" मध्ये त्या दृष्यात दिसणाऱ्या पात्रांकडून काही संवाद ऐकू येत राहतात. कोण काय करेल, कुठे जाईल हे त्यातून स्पष्ट होतं जातं. "शोले" मध्ये दरोडेखोर विरुद्ध ठाकूर बलदेवसिंह, जय आणि वीरू ही लढाई सुरू झाल्यापासून ते संपेपर्यंत अगदी तुरळक संवाद आहेत. नेत्रपल्लवीच्या सहाय्याने तिघं एकमेकांना संदेश देत ती लढत जिंकतात. "जाल - द ट्रॅप" मध्ये जास्तीच्या संवादांमुळे ट्रेनचं ते दृष्य थोडं भरकटल्यासारखं वाटलं. तिथेच, एकदम कमी संवाद असल्यामुळे "शोले" मधलं ते ट्रेनचं दृष्य अधिक प्रभावशाली ठरलं...


"शोले" मध्ये दरोडेखोर शरणांगती पत्करून मागे हटतात आणि दृष्यातला थरार एका क्षणात संपतो. तिथेच, "जाल - द ट्रॅप" मध्ये दोन्हीही बाजूची पात्र एका ध्येयासाठी शेवटपर्यंत झुंज देत राहिल्यामुळे ते दृष्य त्याच ओघात संपतं. "शोले" मधल्या ट्रेनच्या दृष्याचा शेवट जिथे अकस्मात समोर येतो, तिथेच थराराच्या प्रवाहासोबत येणारा, "जाल - द ट्रॅप" मधील ट्रेनच्या दृष्याचा शेवट जास्त भावतो...


ही दोन्हीही दृष्य उत्कंठावर्धक आणि वेगवान आहेत. दोन्हीही दृष्यांचं दिग्दर्शन आणि छायांकन (cinematography) कमाल झालं आहे. तंत्रज्ञानाची बाजू लक्षात घेतली तर "जाल - द ट्रॅप" मधलं ट्रॅनचं ते अंतिम दृष्य नक्कीच वरचढ आहे. पण अदाकारी पाहिली तर "शोले" मध्ये सुरुवातीच्या काही मिनिटात येणाऱ्या ट्रेनच्या दृष्याने बाजी मारली आहे...

@ अनिकेत परशुराम आपटे.

Tuesday, 2 May 2023

देखणा सर्जा...

मराठी चित्रपटसृष्टीतल्या देखण्या आणि dashing नायकांची यादी काढली तर पहिल्या पाचातलं एक नाव असेल, अजिंक्य रमेश देव...


मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीमाधली प्रसिद्ध जोडी रमेश देव आणि सीमा देव हे त्यांचे आई-वडील असल्याने अजिंक्य देव यांना लहानपणापासूनच अभिनयाचा वारसा मिळाला होता. १९८५ साली प्रदर्शित झालेल्या "अर्धांगी" या चित्रपटातून एक नायक म्हणून अजिंक्य देव प्रथमच रुपेरी पडद्यावर झळकले...

आशा काळे, कुलदीप पवार अशा मातब्बर कलाकारांची फौज असतानाही अजिंक्य देव यांच्या अभिनयाला प्रेक्षकांनी लक्षात ठेवले. पुढे "वाहिनीची माया", "शाब्बास सुनबाई", "माझं घर माझा संसार", "कशासाठी प्रेमासाठी", "वाजवा रे वाजवा", "माहेरची साडी", "सरकारनामा", अशा अनेक मराठी चित्रपटांमधून नायक म्हणून भूमिका करताना अजिंक्य देव प्रसिद्ध झाले. अजिंक्य देव यांचं कॉमेडी टायमिंग इतकं छान होतं, की "अशी ही बनवाबनवी" या चित्रपटात, शंतनू ही व्यक्तिरेखा त्यांनी साकारायला हवी होती असं मला नेहमी वाटतं...


अजिंक्य देव जनमानसात जास्त लोकप्रिय झाले, ते १९८७ साली प्रदर्शित झालेल्या "सर्जा" या चित्रपटामुळे. "सर्जा", हा अजिंक्य देव यांचा पहिला ऐतिहासिक चित्रपट होता. त्यातला सर्जाचा गड चढून जाण्याच्या प्रसंगामुळे अजिंक्य देव 'dashing hero' म्हणून प्रेक्षकांत ओळखले गेले. त्यांच्या याच प्रतिमेचा वापर करून "बजरंगाची कमाल", "घायाळ", "जिवा-सखा", "वासुदेव बळवंत फडके" अशा चित्रपटात नायक म्हणून अजिंक्य देव यांना सादर केलं गेलं...

मराठीसोबतच हिंदी चित्रपटसृष्टीतही अजिंक्य देव यांनी आपला ठसा उमटवला. "संसार", "पांडव", "गैर" अशा काही चित्रपटांत नायक किंवा सहनायकाची भूमिका साकारणाऱ्या अजिंक्य देव यांनी, "इंद्रजीत", "फूल और अंगार", "तान्हाजी", "आन" अशा चित्रपटांमध्ये खल व्यक्तिरेखाही निभावल्या. २०१० साली प्रदर्शित झालेल्या "रिंगा रिंगा" या मराठी चित्रपटात अजिंक्य देव प्रथमच नकारात्मक भूमिकेत प्रेक्षकांसमोर आले. याशिवाय, १९९६ साली प्रदर्शित झालेल्या राम गोपाल वर्मा कृत "देय्यम्" या तेलगू चित्रपटातही अजिंक्य देव यांनी महत्वाची भूमिका निभावली होती...


आज ३ में. अजिंक्य देव यांचा साठावा वाढदिवस. चित्रपटसृष्टीच्या या देखण्या, डॅशिंग सर्जाला वाढदिवसाच्या मनापासून शुभेच्छा...

@ अनिकेत परशुराम आपटे.

Thursday, 27 April 2023

डिजिटल त्रिटक...

त्रिटक... त्रिटक म्हणजे, एकाच रंगमंचावर एकामागून एक येणाऱ्या तीन नाटकांचा समुह. आणि नाटकांना digitalize करून रंगमंचावर साकारण्याचा आगळा-वेगळा प्रकार म्हणजेच डिजिटल नाटक. नाट्यक्षेत्रातील हा वेगळा प्रकार अनुभवायचा, म्हणून तीन धमाल बालनाटकं पाहण्याचा योग आला. ती नाटकं होती, "नाटू नाटू", "जादूचा दिवा", "हिमगौरी आणि सात बुटके..."


नाटू नाटू...

नाटू नाटू नावाचा एक राजा, ज्याच्या डोक्याला त्याचाच मुकूट चिकटून बसतो. तो मुकूट काढण्यासाठी अनेक प्रयत्न केले जातात ज्यातून विनोद निर्मिती होते. खरंतर राजाच्या डोक्याला चिकटलेला मुकूट आणि तो वेगळा करण्यासाठीचे चाललेले प्रयत्न, यातच कथानक अजून फुलवता आलं असतं. पण या कथाभागाला तुकड्या-तुकड्याने दाखवत, प्रधान-विदुषक-पंडित आणि राणी यांचं कनेक्शन दाखवण्यात जास्त प्रसंग खर्ची पडले...

विदुषकाला दिलेली "राणीसाहेब..." ही ललकारी, "मोरूची मावशी" या नाटकातल्या "राणीसाहेब..." या ललकारीशी मिळती-जुळती होती. नाटकातले विनोदी पंचेस आणि त्यांचं टायमिंग छान जमलं होतं. विदुषकाला काही क्लृपत्या दिल्या असत्या, आणि त्याची एंट्री नाट्यरसिकांमधून झाली असती तर कदाचित त्या पात्राला अजून उठाव आला असता. नाटकाचा शेवट ठिक होता, पण ज्या गोष्टीमुळे ते नाट्य घडलं, त्यावरच शेवट व्हायला हवा होता. चिकटलेला मुकूट निघाल्यानंतर झालेल्या गोष्टीमुळे राजाला बसलेला धक्का, इथेच नाटक फ्रीज़ होऊन संपवलं असतं तर अधिक परिणामकारक वाटलं असतं...

जादूचा दिवा...

लाडोबा नावाचा एक मुलगा, ज्याला अभ्यासाचा कंटाळा येत असतो. मोठी माणसं आपल्याला उगाच रागावतात असंच त्याला वाटत राहतं. त्याला एक जादूचा दिवा सापडतो. त्या दिव्यातल्या जिन्नच्या मदतीने लाडोबा स्वत:ला राजा आणि सर्व मोठ्यांना आपले गुलाम बनवतो. अशातच एक भूत तिथे येतं. नाटकात दोन गोष्टी महत्वाच्या होत्या. एक होती, तो दिवा आणि जिन्नने केलेली जादू, दुसरी गोष्ट होती नाटकाच्या अगदी शेवटी शेवटी येणारं भूत. या दोन्हीही गोष्टी तितक्याशा खुलवता आल्या नाहीत. जिन्नची एकच जादू दाखवली गेली. ती म्हणजे लाडोबाचा राजा होणं. अजून काही जादू, जसं की जिन्नने मंत्र म्हटल्यावर प्रेक्षकांमधून येणारा एखादा बॉल दाखवला असता तर अजून मजा आली असती. तसंच भूत. नाटकात भुताला फक्त एकदाच दाखवलं गेलं आणि ते ही २-३ मिनिटं. त्या भुताची व्यक्तिरेखा अधोरेखित करून मग लाडोबाशी सामना दाखवला गेला असता तर छान रंगतदार शेवट झाला असता...

नाटकात लहानग्यांसाठी दोन छान संदेश आहेत. एक म्हणजे आपण आपल्या मोठ्यांचा आदर करावा. आपले मोठे जर रागवत असतील तर ते आपल्या भल्यासाठीच असतं हे लक्षात ठेवावं. दुसरा संदेश सांगतो, की अभ्यासच आपल्याला मोठं करतो तेव्हा त्याला डावलू नये. लहानांसोबतच मोठ्यांनाही एक मोलाची शिकवण हे नाटक देतं. ती शिकवण म्हणजे, लहानांना मारून-मुटकून गोष्टी घडत नाहीत. थोडा वेळ दिला, लहानांना समजून घेतलं तर गोष्टी आपोआप सुकर होतात...

हिमगौरी आणि सात बुटके...

चेटकीणीपासून वाचत जंगलात हरवलेली एक गोड सुंदर राजकन्या हिमगौरी, तिला भेटलेले सात बुटके, चेटकीणीचा आरसा, राजकुमार आणि सुखांत, हे कथानक सर्वांनाच माहित आहे. एखादं जुनं कथानक नव्याने समोर येत असताना सादरीकरण फार महत्वाचं असतं. या नाटकात वर्तमानकाळ आणि भूतकाळ यांची सांगड घालत कथा पुढे जात असल्याने त्यात नाविन्य जाणवतं...

नाट्यरसिकांना गुंतवून ठेवण्यात या नाटकाने चांगलीच बाजी मारली आहे. रसिकांमधून येणारी चेटकीण आणि टिवल्या-बावल्या करत रसिकांमधूनच धावत येणारे सात बुटके यांनी धमाल आणली. विशेषत: लहान मुलांना त्या बुटक्यांशी खेळणं, हात मिळवणं चांगलंच आवडत होतं. कथेनुरूप वापरल्या गेलेल्या कपड्यांच्या रंगसंगतीमुळे नाटक आधिक खुलत होतं. हिमगौरीचा पांढराशुभ्र पण साधा पोशाख विशेष लक्ष वेधत होता. छान सुरुवात आणि एक गोड सुखांत, यांमुळे जुन्या विषयावर नव्याने आलेलं हे नाटक छान रंगलं...

गाणी...

तीनही नाटकात, मराठी व हिंदी चित्रपटांमधली काही निवडक गाणी घेऊन त्यावर प्रसंग दाखवले गेले आणि नृत्य ही सादर झाली. काही गाण्यांची निवड चपखल होती. पण काही गाणी मात्र तिथे का होती हाच प्रश्न पडला. उदाहरणार्थ "जादूचा दिवा" नाटकात 'लल्लाटी भंडार...' हे गाणं घ्यायची खरंतर गरज नव्हती. पण ते तिथे आल्याने तेव्हा चाललेल्या प्रसंगाचं महत्व कमी झालं. गाण्यांची निवड जरी योग्य असली, तरी ती जरा अवास्तव वाटली. त्यामुळे मुख्य कथानकांत अडथळे येत होते किंवा व्यत्यय येत होता. अर्थात लहानग्यांना संगीत आणि नृत्य पसंत असतात. पण तासाभराच्या नाटकात एखादं गाणं चालून गेलं असतं. शिवाय कथानकांना अजून खुलवता आलं असतं...

तंत्रज्ञान...

तीनही नाटकांसाठी वेगळेपण ठरलं ते म्हणजे नाटकात वापरलेलं डिजिटल तंत्रज्ञान. "नाटू नाटू" मध्ये या तंत्रज्ञानाला तितकासा वाव नव्हता. जे एकमेव डिजिटल दृश्य दाखवलं गेलं, ते कथेशी समरस वाटत नव्हतं. "जादूचा दिवा" मध्ये जादूच्या दिव्यामुळे निर्माण होणारे चमत्कार आणि नाटकाच्या शेवटी येणारं भूत, या दोन्हीही गोष्टी तंत्रज्ञानाचा वापर करून अधिक परिणामकारक झाल्या असत्या. पण इथेही तंत्रज्ञानाचा म्हणावा तसा वापर झालेला दिसत नाही. पडद्यावर अवतरलेलं भूत गायब होतं आणि प्रेक्षकांमध्ये कुठेतरी प्रकटतं, असं काही दाखवलं असतं तर अधिक मजा आली असती. डिजिटल तंत्रज्ञानाचा पुरेपूर वापर दिसला, तो "हिमगौरी आणि सात बुटके या नाटकात. पडद्यावर प्रकटलेली उडणारी चेटकीण गायब होते आणि अचानक रसिकांमधून दिसते, हा कथाभाग बघण्यासारखा होता. अर्थात, चेटकीणीच्या आरशालाही digitalize केलं असतं तर ते बघायला छान वाटलं असतं. "हिमगौरी आणि सात बुटके" या नाटकाचं कथानक परिचित होतं, पण कथेला उभारी मिळाली, ती डिजिटल तंत्रज्ञानाच्या चोख वापरामुळे...

डिजिटल तंत्रज्ञानाच्या वापराचा मुख्य फायदा तीनही नाटकांच्या नेपथ्याला झाला. नेपथ्य म्हणजे नाटकात वापरलेले सेट्स. "नाटू नाटू" मधलं राजाचं शयनगृह, बाग आणि राजवाडा, "जादूचा दिवा" मधलं घर आणि जंगल, "हिमगौरी आणि सात बुटके" मधलं जंगल, राजवाडा, बुटक्यांचं घर, या सर्व सेट्समधले काही भाग डिजिटल पद्धतीने पडद्यावर हलत्या चित्रांच्या रूपात आल्याने तीनही नाटकांना 3D लुक प्राप्त झाला हे मात्र खरं. एकंदरीत, गंधार निर्मित, "नाटू नाटू", "जादूचा दिवा", "हिमगौरी आणि सात बुटके" हे डिजिटल त्रिटक म्हणजे लहानग्यांना मनोरंजनाची धमाल मेजवानीच आहे...

@ अनिकेत परशुराम आपटे.

Tuesday, 18 April 2023

मजेशीर खिचडी...

जी प्रेयसी, तीच खरी स्वयंपाकिण. जी स्वयंपाकिण, तीच खरी मैत्रिण. जो मित्र, तो खरा कारकून. जो डॉक्टर, तोच खरा उपवर. अशी धमाल दिसते १९८९ साली प्रदर्शित झालेल्या, "धरलं तर चावतंय" या चित्रपटात...


राजा (अशोक सराफ) आपल्या आई-वडिलांना वचन देतो, की त्याच्या बहिणीचं, नयनचं (अल्का कुबल) लग्न लावल्याशिवाय तो स्वत: लग्न करणार नाही. राजा नयनच्या लग्नाच्या खटपटीत असताना नयनचं राजाच्याच ऑफिसमध्ये काम करणाऱ्या मोहनवर (लक्ष्मीकांत बेर्डे) प्रेम असतं. इकडे राजाही अश्विनीच्या (रेखा राव) प्रेमात पडलेला असतो. अश्विनी सारखं लग्नासाठी विचारत असताना राजापुढे नयनच्या लग्नाचा पेच असतो. अशातच डॉ. प्रह्लाद टोणगे (दिलीप प्रभावळकर) या अमेरिकेत स्थाईक भारतीय डॉक्टरचं स्थळ नयनसाठी सांगून येतं...

डॉ. प्रह्लादच्या विनंतीला मान देऊन राजा त्याला घरी रहायला बोलावतो. तिथे राजाला भेटायला मुंबईला आलेली अश्विनी पावसामुळे मुंबईतच अडकते आणि राजाच्याच घरी राहण्याचा हट्ट धरते. प्रेयसीचा हट्ट म्हणून राजा अश्विनीला होकार देतो. नयनपुढे अश्विनीचं सत्य उघड होऊ नये म्हणून मोहनशी हातमिळवणी करून त्याला घरी बोलवून राजा एक प्लॅन बनवतो. दुसरीकडे नयनने मागवलेली एक स्वयंपाकिणही (प्रिया अरूण) घरी येते. त्या स्वयंपाकिणीचं नावही अश्विनीच असतं. एकेक करून त्या घरात सहा जण जमा होतात आणि समज-गैरसमजाचा गमतीशीर खेळ सुरू होतो...

चित्रपटाचं संगीत श्रवणीय आहे, पण लक्षात राहतील असे शब्द क्वचितच आहेत. त्यातल्या त्यात, "हळू बोल राजा तुझा वाजवीन बाजा..." हे गाणं छान रंगलं आहे. चित्रपटात असलेलं पार्श्वसंगीत कथेप्रमाणेच मजेशीर आहे. कथेच्या प्रवाहाला ते पार्श्वसंगीत चांगली साथ देतं. चित्रपटाची दुसरी जमेची बाजू म्हणजे कलावंत आणि अदाकारी. अशोक-लक्ष्या-दिलीप हे त्रिकूट पहिल्यांदाच एकत्र दिसलं. त्या तिघांची दृष्यांमधली देवाण-घेवाण अप्रतीम होती. अशोक-लक्ष्या ही अर्थातच धमाल जोडी आहे, पण दिलीप प्रभावळकरांची जोड मिळाल्यामुळे विनोदी दृष्यांना अजून बहर येतो...

दिलीप सरांची डॉ. प्रह्लाद टोणगे ही व्यक्तिरेखा छान रंगली आहे. त्या व्यक्तिरेखेत, "तो मी नव्हेच" या नाटकातल्या दिवाकर दातार आणि "हसवा फसवी" या नाटकातल्या प्रिन्स वाणटुंग पिंगपिंग या दोन व्यक्तिरेखांची झलक दिसून येते. अल्का कुबल यांना गंभीर भूमिकेत पाहण्याची सवय असल्याने विनोदी भूमिकेत पाहताना थोडं वेगळं वाटतं. पण ही भूमिकाही त्यांनी तितकीच छान साकारली आहे. प्रिया अरूण यांनी त्यांच्या वाट्याला आलेली भूमिका चोख वठवली आहे. एका बिन्धास्त मुलीचं व्यक्तिमत्व त्यांनी चांगलं सादर केलं आहे...

चित्रपटात दिलीप प्रभावळकर आणि प्रिया अरूण यांचं दुसरं एकत्रित दृष्य समोर येतं तेव्हा कथेत असलेल्या एका रहस्याची लगेच उकल होते. मुख्य पात्रांखेरीज, एका रिसेप्शनिस्टची व्यक्तिरेखा चित्रपटात आहे. चित्रपटात दोन वेळा अगदी मिनिटभरासाठी दिसलेल्या या व्यक्तिरेखेला दुहेरी व्यक्तिरेखेची जोड नसती दिली तरी चाललं असतं. उलट एकच व्यक्तिरेखा समोर ठेऊन त्यातच विनोदनिर्मिती अधिक खुलवता आली असती...

आपल्या आई-वडिलांना दिलेलं नयनच्या लग्नाचं वचन राजा पूर्ण करतो का... अश्विनी या नावामुळे झालेला गोंधळ निस्तरतो का... नयनचं लग्न मोहनशी होतं की डॉ. प्रह्लादशी... या प्रश्नांची उत्तरं जाऊन घेण्यासाठी आणि समज-गैरसमजातून निर्माण झालेल्या मजेशीर विनोदी खिचडीचा आस्वाद घेण्यासाठी श्रीनिवास भणंगे लिखीत व दिग्दर्शित, "धरलं तर चावतंय" हा चित्रपट पहाच...

@ अनिकेत परशुराम आपटे.