Thursday, 3 August 2023

खलनायक नहीं नायक है तू...

"जी हां... मैं हूँ खलनायक...", विनोद राठोड यांच्या बुलंद आवाजातला हा संवाद ऐकला, की एकच चित्रपट आठवतो. तो चित्रपट म्हणजे, १९९३ साली प्रदर्शित झालेला "खलनायक..."

बल्लू ऊर्फ बलराम (संजय दत्त) या कुख्यात गुन्हेगाराभोवती चित्रपटाचं कथानक फिरतं. आपल्या मुलाच्या, बल्लूच्या परतीवर आशा ठेऊन असलेली आरती (राखी गुल्ज़ार), बल्लूच्या मदतीने घातपाती कृत्याचा कट रचणारा रोशी महंता (प्रमोद मुधू), बल्लूकडून माहिती काढून रोशी आणि त्याच्या समूहाचा नायनाट करण्याचा निर्धार केलेला इंस्पेक्टर राम सिन्हा (जॅकी श्रॉफ) आणि रामवरचा कलंक पुसण्यासाठी बल्लूला पकडून देण्याच्या इराद्याने त्याच्या गोटात सामिल झालेली गंगा (माधुरी दिक्षीत-नेने). या सर्व उपकथानकांतून प्रवास करत चित्रपट पुढे जातो...

चित्रपटात नकारात्मक व्यक्तिरेखा तितकीशी महत्वाची नाही. सुभाष घई यांच्या इतर चित्रपटांच्या तुलनेत या चित्रपटातली रोशी महंता ही खल व्यक्तिरेखा तितकी भारदस्त वाटत नाही. प्रमोद मुधु यांनी थोड्याफार दुय्यम असलेल्या व्यक्तिरेखेला चांगला न्याय दिला आहे. हाणामारीप्रधान चित्रपट जरी असला, तरी अवास्तव हिंसा दाखवली गेली नाही. या चित्रपटाचं पार्श्वसंगीतही तितकंच तोलामोलाचं आहे. चित्रपटातल्या वेगवेगळ्या दृष्यांना एकत्र जोडण्याच्या कामात चित्रपटाचं पार्श्वसंगीतही मदत करतं...

चित्रपटाला लक्ष्मीकांत-प्यारेलाल यांचं उत्कृष्ट संगीत लाभलं आहे. चित्रपटातली बहुतांश गाणी ही नृत्यप्रधान आहेत आणि इथे सरोज ख़ान यांनी नृत्यदिग्दर्शनात कमाल केली आहे. "चोली के पीछे क्या है...", "पालखी में हो के सवाँर चली रे...", "आ जा सजन आ जा...", "नायक नहीं खलनायक हूँ मैं..." या गाण्यांना सरोज ख़ान यांनी त्यांच्या नृत्यदिग्दर्शनाने वेगळीच उभारी दिली. यावर, आपल्या दिलखेचक नृत्याने आणि अदाकारीने माधुरी दिक्षीत-नेने यांनी या गाण्यांवर कळस चढवला. माधुरीने गाण्यादर्म्यान दिलेल्या हास्यमुद्रा आणि नृत्यमुद्रा यांनी त्या गाण्यांना चार चाँद लावले...

राखी गुल्ज़ार यांच्या वाट्याला त्यांच्याच 'इंतजार करनेवाली माँ' या पठडीतली भूमिका आल्याने तसं काही वेगळं वाटलं नाही. कथा, पटकथा, संगीत आणि पात्रनिवड याखेरीज, चित्रपटाची अजून एक भक्कम बाजू होती. ती बाजू म्हणजे, चित्रपटात बल्लू ऊर्फ बलराम प्रसादची मध्यवर्ती भूमिका सादर करणारे अभिनेते संजय दत्त. बल्लूची वेशभूषा, केशभूषा, देहबोली, बल्लू जेव्हा त्याच्या चेहेऱ्याचा लुक बदलतो, बल्लूची चलाखी, एकदम सुरूवातीला असलेलं त्याचं विकृत हसणं आणि तेच हसणं जेव्हा एकदम शेवटी येतं, कोरडा-पाषण हृदयी बल्लू स्वत:मध्ये बदल घडवतो, बल्लूची भावनिक छटा, या सर्व गोष्टी अभिनेते संजय दत्त यांनी अप्रतीम सादर केल्या आहेत. संजूबाबाने पूर्ण चित्रपट खाऊन टाकला आहे असं म्हटलं तरी हरकत नसावी...

रोशी महंता त्याच्या कटात यशस्वी होतो का... राम सिन्हा त्याच्या इराद्यात सफल होतो का... रामवरचा कलंक पुसण्यात गंगाला यश मिळतं का... आरती तिच्या मुलाला परत मिळवते का... बल्लू खरंच खलनायक आहे, की त्याच्यात एक नायकही लपलेला आहे... या सर्व प्रश्नांची उत्तरं मिळवण्यासाठी आणि संजय दत्तच्या अप्रतीम अदाकारीसाठी सुभीष घई दिग्दर्शित, "खलनायक" हा चित्रपट पाहण्यासारखा आहे...

@ अनिकेत परशुराम आपटे.

No comments:

Post a Comment