मराठी-हिंदी चित्रपटांचे अनेक पैलू आपण विचारात घेतो, जसे की कथा, संगीत, गाणी, कलावंत, उभारलेले सेट्स. या सर्वांमध्ये एक पैलू असतो हाणामारी असलेल्या चित्रपटातल्या व्हिलन्सचा अड्डा...
जुन्या जमान्यातले गावठी अड्डे...
दोन किंवा तीन टेकड्यांमध्ये खडकाळ भाग असतो, किंवा एखादी भली मोठी गुहा असते. त्यात मेन व्हिलनला बसायला चांगलासा गुळगुळीत दगड असतो आणि व्हिलनच्या माणसांनी बाकी दगड वाटून घेतलेले असतात. वस्तीपासून बरंच लांब एखाद्या जंगलात किंवा डोंगराळ प्रदेशात ही डाकू मंडळी आपले बस्तान बसवतात. अड्ड्याच्या मधोमध एकतर पाणी तरी असतं किंवा लाकडं रचून barbequeसारखं काहीतरी बनवलेलं असतं...
हे अड्डे निसर्गाच्या सानिध्यात असल्याने इथे कृत्रीम प्रकाशाची गरजच नसते. मुख्य डाकू जर शिकलेला असेल किंवा परिस्थितीला कंटाळून डाकू झाला असेल, तर अशा गुहांमध्ये कुठे ना कुठेतरी लुकलुकणारे बल्ब दिसतात. पण एरवी प्रकाशाचं म्हणाल, तर जागोजागी लावलेल्या मशालींवरच अशा अड्ड्यांची भिस्त असते. अशा ठिकाणी आपल्याला दोन दगडी खांब दिसतात, जिथे दोरखंडासह एखाद्या व्यक्तीला बांधलं जातं. "मि. नटवरलाल", "धडाकेबाज", "शोले", "चायना गेट", अशा डाकूछाप चित्रपटांत आपल्याला हे अड्डे पहायला मिळतात...
जुन्या जमान्यातले शहरी अड्डे...
एखादा जुनाट कारखाना किंवा रंग उडालेली दुमजली इमारत असते. त्याला लागूनच एक मैदान असतं. त्या मैदानात किंवा बिल्डिंगीत भरपूर ड्रम एकावर एक रचून ठेवलेले असतात. त्या ड्रमात काय असतं कोण जाणे, पण फाईट खाणारा त्या ड्रमांवर आदळतो आणि ड्रम धडाधड कोसळतात. मध्येच दोऱ्या लटकवलेल्या असतात. त्यांचं दुसरं टोक दिसत नाही, पण टार्झनसारखा एका ठिकाणाहून दुसरीकडे जायला त्यांचा उपयोग होतो. कुठे ना कुठे पाण्याचा एक भला मोठा माठ ठेवलेला असतो जो फायटिंग सुरू असताना फुटून जातो...
अशा अड्ड्यांवर लाईट्स फार कमी असतात. एखाद-दुसरा बल्ब, दोनेक ट्यूबा आणि कटकट आवाज करणारा पंखा. एक गोष्ट नक्की, अशा अड्ड्यांमध्ये साखळ्यांची कमतरता नसते. जितकी ओलीस माणसं असतील तितक्या साखळ्या मौजूद असतात. धरमेंद्रचा "आँखे", "अंदाज अपना अपना", "दे दणादण", "सीता और गीता", या आणि अशा अनेक चित्रपटांमध्ये हा अड्डा आपल्याला पहायला मिळतो...
आधुनिक अड्डे...
असे अड्डे सहसा एखाद्या चोर रस्त्याच्या शेवटीच असतात. एखाद्या तळघरात, एखाद्या आलिशान बिल्डिंगीत असलेल्या छुप्या दारापलिकडे, समुद्रातल्या एखाद्या बेटावर असे हे अड्डे बसवलेले असतात. इथे कुठलाही दरवाजा हाताने उघडला जात नाही, तर सेंसरने किंवा पासवर्डने किंवा शिट्टीच्या आवाजासारख्या एखाद्या ध्वनीने अशी दारं उघडली जातात. अशा अड्ड्यांवर सर्व गोष्टी बटणांच्या मदतीने केल्या जातात. इथे प्रकाशाची अजिबात कमतरता नसते, उलट झगामगा मला बघा अशी प्रकाश योजना असते...
वेगवेगळ्या प्रकारचे दिवे इथे लावलेले दिसतात. कधी बटणांच्या सहाय्याने तर कधी टाळ्या वाजवून हे दिवे चालू-बंद केले जातात. या अड्ड्यांमध्ये एक अशी जागा असते जिथे हिरो किंवा बाकी पॉझिटिव्ह (भूमिकेत पॉझिटिव्ह हां...) लोकांची दिशाभूल केली जाते किंवा कोड्यात टाकून त्यांच्या सभोवताली अडथळे निर्माण केले जातात. या आधुनिक अड्ड्यांचा एक नियम असतो बरं का. तो असा, की शेवटच्या फायटिंगच्या वेळी हे अड्डे हमखास नेस्तोनाबूत व्हायला लागतात. कधी व्हिलन स्वत:च पेरलेले बॉम्ब सुरू करतो तर कधी हिरो किंवा हिरोईन दिलेरी दाखवत बॉम्ब हल्ला करतात. "मि. इंडिया", लक्ष्याचा "अफलातून", "शान", "परवरीश" अशा काही चित्रपटांमध्ये हे आधुनिक अड्डे आपल्याला पहायला मिळतात...
मोकळे ढाकळे अड्डे...
गुंडांच्या अड्ड्यांमधला हा सर्वात भारी प्रकार आहे. कधी निसर्गाच्या सानिध्यात तर कधी भल्या मोठ्या बंगल्यात असे हे अड्डे भरवले जातात. इथे ट्यूब्सचा किंवा बल्बचा कृत्रीम प्रकाश तर असतोच, पण नैसर्गिक प्रकाशही चांगल्याच प्रमाणात असतो. असे अड्डे सहसा शहरांपासून लांब असतात. आजूबाजूला जंगल तरी असतं किंवा समुद्र तरी असतो. जर जंगल किंवा समुद्र नसेल तर एखादा मोठाला बंगला असतो ज्यात हे व्हिलन लोक ठाण मांडून बसतात...
अशा मोकळ्या-ढाकळ्या अड्ड्यांची एक खासियत असते बरं का... इथे शेवटची फायटिंग रात्री न होता दिवसा किंवा मावळतीपर्यंत दाखवली जाते. मशीन गन्स तर बहुतांश फाईट सीन्समध्ये असतातच, पण अशा मोकळ्या अड्ड्यांवर बॉम्स आणि हँडग्रेनेडचा जास्त वापर दिसतो. गुलशन राय काकांच्या, "मोहरा", "त्रिदेव", "विश्वात्मा", अशा बऱ्याच चित्रपटांत हे अड्डे दिसतात. शिवाय "थरथराट", "नरसिंहा" अशा चित्रपटांमध्येही हे मोकळे मोकळे अड्डे सापडतात...
असे हे विविध अड्डे, गब्बरसिंह, शाकाल, मोगँबो, टकलू हैवान, बादशाह, अशा भारदस्त मंडळींनी त्यांच्या स्पर्शाने पावन केले. उगाच आपण त्यांना नावं ठेवतो. किती कष्ट घेतले असतील या मंडळींनी... पोलीस आणि पब्लिक यांच्या नजरा चुकवून जागा पाहणे, तिथे आपला अड्डा बसवणे, शिवाय त्या अड्ड्याचा मेंटेनंस आलाच की... असे चित्रपट पुन्हा बनलेच, तर माझी हीच इच्छा राहील, की व्हिलन संपू देत, पण तो अड्डा मात्र शाबूत रहावा. अहो नव्या व्हिलनला तेवढाच कमी त्रास... नाही का...
@ अनिकेत परशुराम आपटे.







No comments:
Post a Comment