'मज़लूमों का देवता...', किंवा 'चोरों के घर चोरी कर, गरीबों को इंसाफ दिलानेवाला...' अशा पठडीतले अनेक चित्रपट आहेत. पण दोन चित्रपट असे आहेत, जे सुरू झाले एका वेगळ्या उंचीवर, पण नायक-नायिकेमधल्या प्रेमाच्या गल्लीत घुसून थांबले. या चित्रपटांचं नाव एक होतंच, पण कहाणीही थोड्याफार फरकाने एकच होती. हे चित्रपट होते १९५५ आणि १९७८ साली प्रदर्शित झालेले, "आज़ाद..."
१९५५ साली आलेल्या "आज़ाद"मध्ये दिलीप कुमार व मीना कुमारी, नायक व नायिकेच्या भूमिकेत होते तर प्राण साहेबांनी मुख्य खलनायक रंगवला होता. १९७८ साली प्रदर्शित झालेल्या "आज़ाद"मध्ये याच भूमिका अनुक्रमे धर्मेंद्र, हेमा मालिनी आणि अजित यांच्या वाट्याला आल्या. प्रेम चोपड़ा यांनी १९७८च्या "आज़ाद"मध्ये जी सहखलनायकाची भूमिका केली होती, ती १९५५ सालच्या "आज़ाद" मधल्या मुराद यांच्या सहखलनायकी व्यक्तिरेखेपेक्षा जराशी वेगळी होती. शिवाय दोन्हीही चित्रपटांमध्ये खलनायक व सहखलनायक यांचं नातंही वेगळं होतं...
दोन्हीही चित्रपटांमध्ये मुख्य व्यक्तिरेखेला, म्हणजेच 'आज़ाद'ला समोर आणताना एक थ्रिलिंग दृश्य दाखवलं गेलं. पहिल्या वेळेस नायिकेला पळवून नेणाऱ्या माणसांना थोपवण्यासाठी कायदा हातात घेतलेली 'आज़ाद' व त्याची माणसं दिसली, तर दुसऱ्यावेळी तरूण मुलीचं एका म्हाताऱ्याशी होत असलेलं जबरदस्तीचं लग्न थांबवताना नक़ाबपोश 'आज़ाद' दिसला. या दृष्यांनंतर चित्रपटात काहीतरी वेगळं पहायला मिळेल असं वाटलं होतं, पण जशी कथा पुढे सरकते तसा अपेक्षाभंग होतो. कुमारने म्हातारा किंवा नवाबसाहब असे बदल करत 'आज़ाद'ला छान लपवलं होतं. अशोकने समोर आणलेला नक़ाबपोश 'आज़ाद' मात्र पाचंच मिनिटे टिकला आणि पुढच्या काही मिनिटातच त्याचा परदाफाशही झाला होता...
दोन्हीही चित्रपटांमधले अड्डे कमाल होते मात्र. डोंगरा डोंगरात असलेली गुहा, तिथे जाणारा रोप वे, तो रोप वे चालवण्यासाठी मानवचालित चक्की, गुहेच्या आसपास असणारे हिंस्त्र प्राणी, हे सगळं दाखवणारा १९५५च्या "आज़ाद" मधला कुमारचा अड्डा असो किंवा, जुनाट बंगल्यातल्या एका चोर दरवाजापलिकडे असलेला विचित्र आणि खतरनाक सापळ्यांनी सजलेला व गरम लाव्हा रसाच्या विहिरीचा १९७८च्या "आज़ाद"मधल्या अजितसिंहचा अड्डा असो, दोन्हीही अड्डे भन्नाट होते. अर्थात अजितसिंहचा खरा अड्डा म्हणजे तो जुनाट वाडाच होतं खरंतर, पण मुख्य फोकस त्या सापळ्यांच्या जागेवर होता. या दोन्हीही अड्ड्यांवर चित्रित झालेली दृश्य मात्र अतिशय उत्कंठावर्धक होती...
आता त्या मुद्द्याकडे येऊन जिथे हे दोन्ही चित्रपट आपापल्या नावापासून दुरावत गेले असं मला वाटलं. तो मुद्दा म्हणजे प्रेम. दोन्हीही चित्रपटात नायकानं नायिकेला पळवून नेत दूर नेल्याचं दाखवलं गेलं आहे. तिथे काही दिवस राहिल्यावर नायिकेला नायकामधला जोडीदार सापडतो आणि प्रेमाला पालवी फुटते. चित्रपटांतला हा कथाभाग बराच लांबल्याने आणि त्यात गाण्यांचा भरणा असल्याने चित्रपटातला पंच कमी होत जातो असं काही अंशी मला जाणवलं. कुठेतरी असं वाटलं की 'आज़ाद' आपल्या नायिकेभोवतीच घुटमळत राहतो आणि तिच्यावर व तिच्या वडिलांवर येणाऱ्या संकटांचाच सामना करत राहतो. १९५५ सालचा 'आज़ाद' तरी ठिक, की शेवटी शेवटी सर्व गुन्हेगारांना पकडून देऊन काही सामाजिक कार्य तरी करताना दिसतो. पण १९७८चा 'आज़ाद' बहुतेक अर्ध्या-पाऊण तासातच लुप्त होतो...
१९५५चा 'आज़ाद' हा आजाद पंछी या पठडीतला सामाजिक बांधिलकी जपणारा तरूण वाटतो, तर १९७८चा 'आज़ाद' हा कायदा हाती घेणारा स्वच्छंदी बंडखोर तरूण वाटतो. थोडक्यात, भारदस्त नाव असूनही त्या नावाला पुरेसा न्याय न देता फक्त नायिकेवरचं प्रेम आणि तिच्या वडिलांवरचं संकट दूर करणारा नायक, याच गल्लीत घुटमळत राहणारे एकाच नावाचे व आशयाचे दोन चित्रपट म्हणजे १९५५ व १९७८ साली प्रदर्शित झालेले, "आज़ाद..."
@ अनिकेत परशुराम आपटे.









No comments:
Post a Comment