दाक्षिणात्य चित्रपट म्हटले, की डोळ्यांसमोर येतात अशक्यप्राय हाणामारीची दृष्य आणि उडत्या चालींवरच्या गाण्यांमधली दिलखेचक नृत्य. काही दाक्षिणात्य चित्रपट मात्र याला अपवाद ठरले. अशाच वेगळ्या धाटणीच्या चित्रपटांमधला एक म्हणजेच, १९९२ साली प्रदर्शित झालेला, मणिरत्नम दिग्दर्शित "रोजा..."
एकीकडे श्रीनगरमध्ये कर्नल रायप्पा (नासीर) आपल्या जवानांसह वसीम ख़ान (शिवा रिंदानी) या कुख्यात आतंकवाद्याला जेरबंद करतो, तर दुसरीकडे दक्षिण भारतातल्या एका छोट्या गावात लहानाची मोठी झालेली रोजा (मधू), आपल्या मोठ्या बहिणीच्या (वैष्णवी) लग्नाची स्वप्न पाहत असते. रोजाच्या मोठ्या बहिणीचं लग्न, रॉ या संस्थेत काम करणाऱ्या ऋषी कुमार (अरवींद स्वामी) सोबत होणार असतं. ऐनवेळी ऋषी रोजाच्या मोठ्या बहिणीला नकार देऊन रोजाशी लग्न करण्याचा प्रस्ताव ठेवतो. रोजाला हे मान्य नसूनही आई-वडिलांसाठी ती तयार होते...
मोठ्या बहिणावर अन्याय झाला या भावनेने दु:खी झालेली रोजा, ऋषीसोबत मद्रासला येते. रोजा ऋषीशी तुटकपणे वागू लागते. त्याचा रागराग करू लागते. आपल्या मोठ्या बहिणीचं आधीच एका मुलावर प्रेम होतं आणि तिनेच ऋषीला नकार द्यायला सांगितलं असतं हे सत्य कळल्यावर मात्र रोजा ऋषीची माफी मागते. एका नव्या नात्याला सुरुवात होते आणि ऋषी व रोजामधलं प्रेम बहरत जातं. चित्रपटाचा हा पूर्वार्ध शांत, रोमँटिक, गोडीगुलाबीचा असा आहे. उत्तरार्ध सुरू होण्याच्या काही क्षण आधी, कामानिमित्त काश्मीर खोऱ्यात आलेल्या ऋषीचं अपहरणनाट्य घडतं आणि तिथूनच कथेला अनपेक्षित कलाटणी मिळते...
चित्रपट उत्तरार्धात प्रवेश करतो आणि एक रंजक व वेगवान कथाभागाला सुरुवात होते. दहशतवादाच्या पार्श्वभूमीवर बेतलेला हा उत्तरार्ध खरंतर संघर्षकथा म्हणता येईल. वसीम ख़ान सुटू नये म्हणून सेनेने केलेला संघर्ष, आतंकवाद्यांचं मतपरिवर्तन व्हावं म्हणून ऋषीने केलेला संघर्ष असे संघर्षांचे वेगवेगळे पैलू यात दिसतात. अखेर आतंकवाद्यांच्या म्होरक्याचं मन बदलतं आणि तो ऋषीला सोडून देतो, वसीम ख़ानला सेना घेऊन जाते आणि रोजा व ऋषीचं गोड मिलन होतं...
चित्रपटातली रोजाची मध्यवर्ती व्यक्तिरेखा अभिनेत्री मधू यांनी उत्तम वठवली आहे. लग्नापूर्वीची खट्याळ, अवखळ रोजा आणि लग्नानंतरची गंभीर रोजा, हा बदल तर दाखवून दिलाच आहे. पण नवऱ्याबद्दलचा राग, त्याच्याबद्दलचं प्रेम, शारिरीकदृष्ट्या कमकूवत असल्याने आणि भाषा न आल्याने आपलं म्हणणं मांडू न शकल्यामुळे निर्माण झालेली हतबलता आणि अखेर नवरा परतल्याने झालेला परमानंद, अशा वेगवेगळ्या छटा दाखवत मधू यांनी भूमिकेला पुरेपूर न्याय दिला...
मधूसोबतच अभिनेते पंकज कपूर यांनी त्यांच्या वाट्याला आलेली लियाक़त ही व्यक्तिरेखा सुरेख साकारली आहे. थंड डोक्याने कट रचणारा लियाक़त, ऋषीच्या बोलण्याने मनात वेगळे विचार येऊन थोडा मवाळपणाकडे झुकलेला लियाक़त, भावाच्या मृत्यूने उध्वस्त झालेला लियाक़त, या छटा सादर करताना पंकज कपूर यांची अदाकारी लाजवाब होती...
चित्रपटाचा तिसरा आणि महत्वाचा भाग म्हणजे चित्रपटाला लाभलेलं अप्रतीम संगीत. संगीत दिग्दर्शक म्हणून पदार्पण करणाऱ्या ए.आर.रहमान यांनी चित्रपटाच्या कथेच्या दोन्हीही भागांना साजेसं संगीत दिलेलं आहे. रहमान यांनी संगीतबद्ध केलेल्या, "यह हसीन वादियाँ यह खुला आसमान...", "दिल है छोटासा...", "रोजा जानेमन...", "भारत हमको जान से प्यारा है..." अशा एकापेक्षा एक अप्रतीम गाण्यांनी चित्रपटाच्या कथेवर सुवर्णकळस चढवला...
एकंदरीत, दहशतवादाच्या पार्श्वभूमीवर बेतलेली ही अप्रतीम संघर्षकथा दाखवणारा, मणिरत्नम लिखीत, राष्ट्रीय पुरस्कार विजेता "रोजा" हा चित्रपट, एक नितांत सुंदर व अभिजात कलाकृती आहे यात वादच नाही...
@ अनिकेत परशुराम आपटे.

No comments:
Post a Comment