"व्हॉट इज मोबाईल नंबर...", "प्यार दिलों का मेला है...", "सरकाई लो खटिया जाड़ा लागे...", " सेक्सी सेक्सी सेक्सी मुझे लोग बोले..." अशा अनेक उडत्या चालींच्या गाण्यांवर दिलखेचक नृत्य करणारी अभिनेत्री म्हणजे 'लोलो...' अर्थात आपल्या सर्वांच्याच परिचयाच्या प्रसिद्ध अभिनेत्री करीष्मा कपूर...
चित्रपटसृष्टीतील प्रतिष्ठीत कपूर घराण्याचा वारसा लाभलेल्या लोलोने आजपर्यंत कपूर घराण्यातल्या कुठल्याही सदस्यासोबत चित्रपटात काम केलं नाही. अर्थात, लोलोची धाकटी बहीण करीना कपूर-ख़ान यांच्या नवऱ्यासोबत म्हणजेच अभिनेते सैफ अली ख़ानसोबत जेव्हा लोलोने चित्रपट केले तेव्हा सैफ अली ख़ान यांचा कपूर घराण्याशी संबंध जोडला गेला नव्हता. कॉलेज सोडून चित्रपटांत यायचं असं लोलोने ठरवलं आणि १९९१ साली प्रदर्शित झालेल्या "प्रेम क़ैदी" या चित्रपटाद्वारे नायिका म्हणून त्यांनी रुपेरी पडद्यावर पदार्पण केलं...
"प्रेम क़ैदी"सोबत, "जागृति", "निश्चय", "सपने साजन के" असे एकापाठोपाठ लोलोचे पाच-सहा चित्रपट अयशस्वी झाले. पण अजय देवगणसोबतचा "जिगर" आणि व्यंकतेशसोबतचा "अनारी" हिट झाले आणि लोलो पुन्हा प्रगतीपथावर आल्या. "शक्तिमान", "धनवान", "दुलारा", "प्रेम शक्ति"सारखे चित्रपट अयशस्वी होत असताना डेविड धवन-गोविंदा-सलमान ख़ान या त्रिकुटाने लोलोचा हात धरला आणि "कूली नं. १", "जुड़वा", "साजन चले ससुराल", "दुल्हन हम ले जाएँगे" अशा हिट विनोदी चित्रपटांची रांग लागली...
"लोलो फक्त गोविंदा आणि डेविड धवन याच्या विनोदी चित्रपटांमधून काम करतानाच यशस्वी होते...", "नायकाप्रधान चित्रपटात नाच-गाणी करणारी नायिका किंवा डांसिंग डॉल म्हणूनच ती चालते...", अशा बतावण्या होत असताना, "राजा हिंदुस्तानी", "जीत", "बिवी नं.१", "जानवर", "रिश्ते" अशा चित्रपटांमधून आपल्या अदाकारीची किमया दाखवत लोलोने प्रेक्षकांची पसंती मिळवली. "दिल तो पागल है", "फ़िज़ा", "ज़ुबेदा" आणि "शक्ति" या चित्रपटांतल्या लोलोच्या अदाकारीने तर त्यांना फिल्म फेयरसोबत राष्ट्रीय पुरस्कारही मिळवून दिला...
चित्रपटांसोबतच लोलोच्या वैयक्तिक आयुष्यातही बरेच चढ-उतार होते. मुलींनी चित्रपटसृष्टी काम करू नये या विचांरांचे असल्याने लोलोचे वडील अभिनेते रणधीर कपूर व त्यांची आई अभिनेत्री बबीता यांच्या नात्यात काहीसा दुरावा निर्माण झाला होता. पण कालांतराने तो मिटला. याशिवाय, अजय देवगण व अभिषेक बच्चन या अभिनेत्यांसोबत लोलोचं नाव जोडलं गेलं. काही काळापुरतं या नात्यांची चर्चा झाली खरी, पण २००३मध्ये या चर्चेला पूर्णविराम मिळाला जेव्हा संजय कपूर या उद्योगपतीशी लोलोचं लग्न झालं...
लग्नानंतर काही वर्षांसाठी चित्रपटसृष्टीतून दूर गेलेल्या लोलोने "डेंजरस इश्क़" या चित्रपटाद्वारे पुनरागमन केलं. चित्रपटाने सणकून मार खाल्ला पण लेलोच्या अभिनयाची चर्चा मात्र झाली. आज २५ जून. हिरव्यागार डोळ्याच्या, गोऱ्यागोमट्या लोलोचा अर्थात करीष्मा कपूरचा आज वाढदिवस. लोलोला वाढदिवसाच्या मनापासून शुभेच्छा...
"तुमसा कोई प्यारा कोई मासूम नहीं है...
क्या चीज़ हो तुम ख़ुद तुम्हें मालूम नहीं है..."
@ अनिकेत परशुराम आपटे.



No comments:
Post a Comment