Friday, 9 October 2020

शो मस्ट गो ऑन...

लाईट्सचा झगमगाट, कॅमेऱ्यांचा लखलखाट, रॅम्प वॉक करणाऱ्या मॉडेल्स, रॅम्पच्या मागे पडद्याआड घडत असलेलं नाट्य आणि मॉडेल्सच्या आयुष्यांमधले चढ-उतार, मधुर भंडारकर यांनी हे सगळं दाखवण्याचा सुरेख प्रयत्न केला, २००८ साली प्रदर्शित झालेल्या "फॅशन" या चित्रपटामधून...


मेघना माथुर (प्रियंका चोप्रा) या मॉडेलची कहाणी, तिच्याच शब्दात मांडणारा हा चित्रपट मॉडेलिंग जगताचं एक वेगळं दर्शन घडवतो. मॉडेल्सची आपापसातली भांडणं, हेवेदावे किंवा वेगवेगळ्या फॅशन डिझाइनर्समध्ये असलेली स्पर्धा यावर जास्त भाष्य न करता, मेघना माथुर आणि शोनाली गुजराल (कंगना रणावत) या दोन मॉडेल्सच्या वैयक्तिक जीवनावर आणि झपाट्याने बदलत असलेल्या फॅशन जगताचा या दोघींवर होणाऱ्या परिणामांवर भर दिलेला दिसतो...

चित्रपटातली गाणी प्रासंगिक असली तरी ती गुणगुणत रहावी अशी वाटत नाही. त्यातल्या त्यात, "फॅशन का है यह जलवा..." प्रेक्षकांना बऱ्यापैकी आकर्षित करतं. अरबाज़ ख़ान, सुचित्रा पिल्लई, किट्टू गिड़वानी, समीर सोनी, मुग्धा गोडसे, हर्ष छाया, राज बब्बर, किरण जुनेजा, या सर्व कलाकारांनी त्यांच्या वाट्याला आलेल्या भूमिका उत्तम साकारल्या आहेत. पण या सर्व भूमिका झाकोळल्या गेल्या त्या प्रियंका चोप्रा आणि कंगना रणावत या दोघींच्याही, जीव ओतून आणि एकमेकींच्या तोडीस तोड केलेल्या अदाकारीने...

प्रियंका चोप्रा आणि कंगना रणावत या दोघींच्या भूमिका जवळ-जवळ सारख्याच आहेत, कंगना रणावत यांच्या भूमिकेपेक्षा प्रियंका चोप्रा यांची भूमिका जरा लांब आहे इतकंच. अभिनयाचा कस लावणाऱ्या या दोन्हीही भूमिकांना अनेक वेगवेगळ्या छटा आहेत. मॉडेलिंग जगतात यशाच्या परमोच्च स्थानावर विराजमान असताना आपल्या उद्धट व बेदरकार वागणुकीने सर्वांना हैराण करणारी शोनाली आणि शोमध्ये घडलेल्या wardrobe malfunctionच्या प्रसंगानंतर आपली अधोगती पाहत असताना घायाळ आणि चिडचिडी झाली शोनाली, अदाकारीमधला हा बदल कंगना रणावत यांनी छान दर्शवला आहे...

फॅशन जगतात जम बसवण्यासाठी संघर्ष करणारी, जराशी अबोल व निरागस मेघना माथुर ते फार कमी वेळेत यशाच्या शिखरावर पोहोचलेली बेलगाम आणि हेकेखोर मेघना माथुर, हा प्रवास आणि यातल्या मेघनाच्या विविध छटा प्रियंका चोप्रा यांनी उत्तम वठवल्या आहेत. प्रियंका चोप्रा यांची तीन दृष्य तर अतिशय सुरेख वठली आहेत. प्रसिद्धीच्या हवेत असताना जॅनेटला (मुग्धा गोडसे) तिच्या वैयक्तिक व वैवाहिक आयुष्यावरून टोमणा मारणारी, रेव्ह पार्टीनंतर मद्यधुंद अवस्थेत सर्वस्व हरवल्यावर मनाने उध्वस्त झालेली आणि ऐन वेळी मैत्रिणीच्या मृत्यूची बातमी समजल्यावरही प्रकाशझोत पडताच भावनांना दाबून रॅम्पवर चालणारी, या तीनही दृष्यात प्रियंका चोप्रा यांनी त्यांच्या अभिनयात कमालीची ऊंची गाठलेली दिसते...

चित्रपटातल्या अनेक घटकांपैकी, एक महत्वाचा घटक म्हणजे चित्रपटाचं पार्श्वसंगीत. सलीम-सुलेमान यांनी दिलेलं पार्श्वसंगीत चित्रपटात वेगळेच रंग भरतं. चित्रपटभर वेगवेगळ्या तऱ्हेने ऐकू येणारी एक विशेष धुन, काही दृष्यांची तीव्रता स्पष्ट करते. चित्रपटातला सर्वात मोलाचा क्षण म्हणजे चित्रपटाचं अंतिम दृष्य. Against all odds, मेघना आपला आत्मविश्वास परत मिळवते आणि रॅम्पवर चालताना, कितीही संकटं आली तरी, "Show must go on..." हा कानमंत्र देऊन जाते...

@ अनिकेत परशुराम आपटे.

No comments:

Post a Comment