Friday, 2 October 2020

अंधारी आणि हिंसक दुनिया...


इंस्पेक्टर खांडिलकर (आदित्य श्रीवास्तव) यांच्या संयमी शब्दांनी, सत्या (जे. डी. चक्रवर्थी) या माणसाचा, एक सामान्य तापट डोक्याचा माणूस ते एक थंड डोक्याचा कुविख्यात गुंड, हा प्रवास ज्या कथेच्या आधारे मांडला, ती कथा होती १९९८ साली प्रदर्शित झालेल्या रामगोपाल वर्मा दिग्दर्शित, "सत्या" या चित्रपटाची...

मुंबई अंडरवर्ल्ड... एक अशी दुनिया जिथे हिंसाचार, खून, मारामाऱ्या, तस्करी, बेकायदेशीर कामं, यांचा ससेमिरा सुरूच असतो. याच गोष्टींमुळे मुंबई अंडरवर्ल्ड आणि मुंबई पोलीस यांच्यात उंदरा-मांजराचा खेळ सतत सुरू होतो. मुंबई अंडरवर्ल्डच्या आतल्या गोटातले बारकावे, त्यांचे राजकीय संबंध, गुंडांमधील गटबाजी आणि या सर्वांना जेरीस आणण्यासाठी मुंबई पोलीसांनी केलेले शर्थीचे प्रयत्न, हा सगळा प्रवास दाखवण्याचा लेखक अनुराग कश्यप आणि सौरभ शुक्ला यांनी छान प्रयत्न केला आहे...

चित्रपटातली जी धिम्या चालीची गाणी आहेत, ती जरी नसती तरी चाललं असतं. अर्थात, गल्ज़ार साहेबांनी लिहिलेल्या शब्दात कमालीची ताकद आहे यात वादच नाही, तरी बहुतेक गाणी कथेला थोडी मागे खेचतात. पण, "कल्लू मामा..." आणि "सपने में मिलती है..." ही उडत्या चालीवरची गाणी तर अफलातून आहेत. या दोन्ही गाण्यात, अनुक्रमे सौरभ शुक्ला आणि मनोज बाजपाई भन्नाट नाचले आहेत. चक्रवर्थीसोबतच सौरभ शुक्ला, गोविंद नामदेव, परेश रावल, आदित्य श्रीवास्तव, मकरंद देशपांडे अशा अनेक कलाकारांनी त्यांच्या वाट्याला आलेल्या भूमिकांना योग्य न्याय दिला आहे. पण सर्वात लक्षात राहतात  उर्मीला मातोंडकर यांनी साकारलेली विद्या आणि मनोज बाजपाई यांचा भीकू म्हात्रे...

चित्रपटभर भिंधास्त वावरणाऱ्या दिलखुलास भीकू म्हात्रेची भूमिका इतकी रंगली याला कारण म्हणजे त्या व्यक्तिरेखेचं लेखन आणि मनोज बाजपाईची जबरदस्त अदाकारी. याशिवाय 'ग्लॅमरस नायिका' या आपल्या ओळखीला बगल देत, चित्रपटात साध्या साड्या नेसणाऱ्या, हळुवार बोलणाऱ्या, नगण्य किंवा एकदमच कमी मेकपचा वापर करूनही छान दिसणाऱ्या विद्याची भूमिकाही उर्मीला मातोंडकर यांनी उत्तम वठवली आहे...

एकंदरीत, जितकं अंधारलेलं तितकंच हिंसेेेेेच्या आहारी गेलेलं गुन्हेगारी जग आणि त्यातूनही दिसणारा प्रेम व भावनांचा हलकासा कवडसा रामगोपाल वर्मा यांनी "सत्या" या चित्रपटात सुरेख दाखवला...

@ अनिकेत परशुराम आपटे.

No comments:

Post a Comment