"चांदणं चाहूल होती...... झुले ऊंच माझा झोका..." जान्हवी प्रभू अरोरा यांच्या सुरेल स्वरातलं, "ऊंच माझा झोका" या मालिकेचं हे शीर्षक गीत ऐकलं की एकच चेहेरा समोर येतो. तो चेहेरा आहे प्रसिद्ध अभिनेत्री स्पृहा जोशी यांचा...
झी मराठीवर प्रसारित झालेल्या, "दे धमाल" या मालिकेतून आणि २००४ साली प्रदर्शित झालेल्या, "माय-बाप" या चित्रपटामधून एक बालकलावंत म्हणून स्पृहा जोशी यांनी पदार्पण केलं. त्यानंतर आपलं शिक्षण पूर्ण करण्यासाठी अभिनय क्षेत्रापासून काही काळ त्या दुरावल्या खऱ्या पण, रुह्या कॉलेजमध्ये असताना, "गमभन", "एक और मय्यत", "एक अशी व्यक्ती", "अनन्या" अशा महाविद्यालयीन नाटकांमधून काम करताना त्यांचा अभिनय बहरत गेला...
२००८-०९ दरम्यान प्रसारित झालेल्या, "अग्निहोत्र" या मालिकेत, 'ऍड. उमा बंड' ही व्यक्तिरेखा साकारत स्पृहा जोशी यांनी दणक्यात पुनरागमन केलं. पुढे, "एका लग्नाची दुसरी गोष्ट", "एका लग्नाची तिसरी गोष्ट", "प्रेम हे" आणि अलिकडच्या, "रंगबाज़ फिरसे" या मालिकांमधून झळकत त्या प्रेक्षकांच्या पसंतीस उतरल्या. या सर्व मालिकांच्या पलिकडे, स्पृहा जोशी यांच्यासाठी मैलाचा खडक ठरली, ती "ऊंच माझा झोका" या मालिकेत त्यांनी साकारलेली 'रमाबाई रानडे' ही मध्यवर्ती भूमिका. त्या व्यक्तिरेखेने स्पृहा जोशींना जणू पंखच मिळाले आणि त्यांच्या प्रसिद्धीचा झोका अधिकच ऊंच गेला...
मालिकांसोबतच, "मोरया", "लॉस्ट अँड फाऊंड", "विकी वेलिंगकर", "होम स्वीट होम", "अ पेईंग गोस्ट" अशा काही चित्रपटांमधून विविध भूमिका साकारत त्या रुपेरी पडद्यावरही झळकल्या. रुपेरी पडद्यासोबतच, "लहानपण देगा देवा", "नांदी", "डोंट वरी बी हॅपी", "नेटक" अशा नाटकांमधल्या आपल्या भूमिकांनी स्पृहा जोशी यांनी नाट्यवेड्या रसिकप्रेक्षकांनाही आपलंसं केलं. "सूर नवा ध्यास नवा" या कार्यक्रमाद्वारे स्पृहा जोशी छोट्या पडद्यावर एका वेगळ्याच भूमिकेत दिसल्या. ती भूमिका होती सूत्रसंचालकाची...
एक उत्तम अभिनेत्री म्हणून प्रसिद्धी मिळवत असताना, एक लेखिका, कवयित्री आणि गीतकार म्हणून स्पृहा जोशी यांनी आपला एक वेगळा चाहतावर्ग निर्माण केला. आज स्पृहा जोशी यांचा वाढदिवस. 'उमा ते रमा' या प्रवासातून आणि त्यानंतरही मिळालेली प्रसिद्धी, शिवाय 'लोपामुद्रा'द्वारे मिळालेली लोकप्रियता, इतकं सगळं असतानाही जमिनीवर असणाऱ्या स्पृहा जोशींना वाढदिवसाच्या मनापासून शुभेच्छा...
@ अनिकेत परशुराम आपटे.



No comments:
Post a Comment