Tuesday, 6 October 2020

रंगीत पण बेगडी दुनिया...

"कितने अजीब रिश्ते हैं यहाँ के... दो पल मिलते हैं साथ साथ चलते हैं..." लतादीदींच्या स्वरांनी सजलेलं आणि संदीप नाथ यांच्या शब्दांमधून चित्रपटाची कथा आणि व्यक्तिरेखांची व्यथा मांडणारं हे गाणं आहे २००५ साली प्रदर्शित झालेल्या मधुर भंडारकर दिग्दर्शित, "पेज ३" या चित्रपटातलं...


पत्रकार माधवी शर्मा (कोंकणा सेन शर्मा), हिच्या नजरेतून उलगडत जाणारा हा चित्रपट, एका रंगीबेरंगी, छानछोकी अशा एका खोट्या दुनियेचं दर्श घडवतो. एखादी गोष्ट प्रसार माध्यमांपर्यंत पोहोचली की ती वाऱ्यासारखी जनमानसात पसरवली जाते. काही ठिकाणी सत्याची उकल होते तर काही बाबतीत दडपशाहीचा वापर करून खऱ्या गोष्टीला भलतीच वळणं दिली जातात. मनोज त्यागी आणि नीना अरोरा या लेखक जोडीने वेगवेगळे धक्कादायक मुद्दे हाताळून चित्रपटात नेमकं हेच दाखवण्याचा प्रयत्न केला...

चित्रपटातली गाणी, गुणगुणत रहावी अशी नाहीत. पण त्यातल्या त्यात, "कितने अजीब रिश्ते हैं..." आणि "यहाँ ज़िंदगी..." ही गाणी लक्षात राहतात. कोंकणा सेन शर्मा यांच्या सोबत बोमन इराणी, अतुल कुलकर्णी, उपेंद्र लिमये, तारा शर्मा, संध्या मृदूल, अंजू महेंद्रू, मदन जैन, बिक्रम सलूजा, सुहासिनी मुळ्ये अशी, कलावंतांची बरीच लांब लचक फौज आहे. सर्वांनी त्यांच्या त्यांच्या वाट्याला आलेल्या व्यक्तिरेखा छान साकारल्या आहेत. पण त्यातल्या त्यात कोंकणा सेन शर्मा यांनी साकारलेली पत्रकार माधवी शर्मा आणि उपेंद्र लिमये यांनी वठवलेला इंस्पेक्टर अरुण भोसले जास्त लक्षात राहिले...

अर्थपूर्ण पत्रकारिता करण्याचा अट्टाहास, पण वरिष्ठांनी घातलेला दबाव यामुळे आतल्या आत कुढत राहणारी माधवी असो किंवा पोलीसाची खरी ताकद दाखवायला निघालेला, पण यंत्रणा आणि भ्रष्टाचार यांमुळे तसं न करू शकल्याने आतल्या आत घुसमटणारा भोसले असो, कोंकणा सेन शर्मा व उपेंद्र लिमये या दोघांनीही त्यांच्या अदाकारीने दोन्हीही व्यक्तिरेखा जिवंत केल्या...

मनोरंजनाच्या सहाय्याने एका विषयाला हात घालताना, समाजातील त्या त्या घटकांच्या भावना दुखावल्या जाणार नाहीत याची पुरेपूर काळजी लेखकांनी घेतलेली दिसते. थोडक्यात, कॅमेऱ्याच्या लखलखाटात दिखाऊपणा करणारी एक बेगडी दुनिया, मधुर भंडारकर यांनी "पेज ३" या चित्रपटाद्वारे खूप छान पद्धतीने समोर आणली...

@ अनिकेत परशुराम आपटे.

No comments:

Post a Comment