नसीरुद्दीन शाह, दीप्ती नवल, फ़ारुख़ शेख़ अभिनीत "कथा" हा चित्रपट सर्वांनाच माहित असेल. कुठलाही भपकारा न वापरता सहज सुंदर अदाकारी आणि चपखल कथानक या जोरावर "कथा" हा चित्रपट यशस्वी झाला. या चित्रपटातली तीन दृष्य अशी होती, जी चित्रपटात एकाहून अधिक वेळा आली आणि प्रत्येक वेळी त्या दृष्यांचा शेवट व परिणाम वेगळे होते. शिवाय ती दृष्य साकारणाऱ्या कलावंतांपैकी काहींच्या भूमिकाही वेगळ्या होत्या...
नवविवाहित दांपत्याचे दाराआडचे संवाद...
हे दुसरं दृष्य recreate होऊन चित्रपटाच्या अगदी शेवटी शेवटी येतं. इथे तो पुरूष बिऱ्हाडकरू दूध मागायला येतो तर राजाराम आणि संध्या खोलीत असतात. तिथे त्या विवाहित बिऱ्हाडकरूच्या चेहेऱ्यावर, "काही काळापूर्वी आपणही असेच होतो..." हे भाव असतात. शिवाय संवादातील वर्चस्व संध्याकडे असल्याचंही ऐकवलं गेलं आहे...
राजारामचं वाईचं दिवास्वप्न...
चित्रपटाच्या पहिल्या १५-२० मिनिटात येणारं हे दृष्य, राजाराम पाहत असलेलं दिवास्वप्न दाखवतं. यात वाईला राहत असलेल्या राजारामच्या आई-वडिलांना राजारामची तार मिळते. तारेत आनंददायी मजकूर असतो. शिवाय तीनशे रुपयांची मनीऑर्डरही सोबत असते. त्या पैशात नवं वासरू विकत घेण्याच्या गोष्टी करत असलेल्या आई-वडिलांना स्वप्नात पाहून राजारामच्या चेहेऱ्यावर समाधानी भाव असतात...
हेच दृष्य recreate होऊन चित्रपटाच्या उत्तरार्धात प्रत्यक्षात उतरतं. त्यावेळी खरोखरच राजारामची तार वाईला पोहोचते आणि त्यात राजारामने तीनशे रुपये मागवलेले असतात. राजारामची मागणी पूर्ण करण्यासाठी त्याच्या आई-वडिलांना त्यांच्याकडे असलेलं वासरू विकावं लागतं. मनीऑर्डर स्वीकारताना आपल्याच आई-वडिलांना त्रास दिल्याचे अपराधी भाव राजारामच्या चेहेऱ्यावर स्पष्ट दिसतात...
राजारामचं संध्याबद्दलचं दिवास्वप्न...
हे दृष्यदेखील चित्रपटात तीन वेळा येतं. पहिल्यांदा राजाराम दिवास्वप्न पाहत असतो तेव्हा तो स्वत:ला वेगळ्याच आत्मविश्वासपूर्ण रूपात बघतो. हा वेगळा राजाराम, समोशांची स्तूती करणाऱ्या संध्यालाच चहा बनवायला सांगतो. हे दिवास्वप्न अर्धवट राहतं आणि हे दृष्य लगेचंच खरं होतं. संध्या पुन्हा तशीच समोशांची स्तूती करते आणि चहाची मागणी करते. त्यावेळी राजाराम तडक उठतो आणि चहा करायला धावतो. दोन्ही दृष्यात आपली आवडती व्यक्ती आपल्या जवळ असल्याचा आनंद राजारामच्या चेहेऱ्यावर दिसतो...
ते दिवास्वप्न recreate होऊन खरोखरचं समोर येतं ते चित्रपटाच्या शेवटच्या २०-२५ मिनिटात. त्यावेळी समोशाच्या जागी चकली असते आणि राजारामची जागा बाशू घेतो. त्या दृष्यात राजाराम बघ्याची भूमिका निभावत असतो आणि काहीतरी गमावल्याचा भाव त्याच्या चेहेऱ्यावर दिसतो...
कथेत वेगवेगळ्या वेळी येणारी चित्रपटातली ही दृष्य, राजारामची सहनशीलता आणि काही ठिकाणी त्याचा कमी पडणारा आत्मविश्वास, यांचं दर्शन घडवतात. राजाराम पाहत असलेली दिवास्वप्न जेव्हा प्रत्यक्षात उतरतात तेव्हा ती त्याच्या मनावर आघात करणारी त्याच्या दृष्टीने नकारात्मक अशी दृष्य होऊन बसतात. पण दाराआडच्या संवादांचं recreated दृष्य, राजारामच्या सुखाची नांदी दर्शवतं आणि त्याच सकारात्मकतेत राजारामच्या या कथेचा शेवटही होतो आणि सुरुवातही होते...
@ अनिकेत परशुराम आपटे.
No comments:
Post a Comment