एखादा गुन्हा घडल्यावर काळा कोट परिधान करून खटला चालवणारा एखादा वकीलच जेव्हा स्वत:च एखाद्या गुन्ह्यात अडकतो तेव्हा... हाच गाभा आहे २००९ साली प्रदर्शित झालेल्या दिपक तिजोरी दिग्दर्शित, "फॉक्स" या चित्रपटाचा...
अर्जून कपूर (अर्जून रामपाल) एक नामांकित वकील असतो. रग्गड पैसा घेऊन गुन्हेगारांना कायद्याच्या कचाट्यातून सहीसलामत बाहेर काढणे, यात त्याचा हातखंडा असतो. अशाच एका खटल्याच्या वेळी अर्जूनला आपल्या कृत्यांचा पश्चात्ताप होतो आणि विकीलीपासून सन्यास घेऊन, आपल्या प्रेयसीचा ऊर्वशी माथूरचा (सागरिका गाटगे) निरोप घेत तो गोव्याला निघून जातो...
गोव्याला अर्जून एका लेखकाला भेटतो ज्याला एक पुस्तक प्रकाशित करायचं असतं. त्या माणसाच्या मृत्यूनंतर त्याची इच्छा म्हणून सोफिया (उदिता गोस्वामी) नावाच्या एका प्रकाशकाकरवी अर्जून ते पुस्तक प्रकाशित करतो. पुस्तकाला त्या माणसाऐवजी आपलं नाव मिळालं हे अर्जूनला आवडत नाही पण पुस्तकाला मिळणारी प्रसिद्धी पाहून तो गप्प बसतो. पुस्तकाची एक प्रत गोव्याच्या ए.सी.पी. यशवंत देशमुख (सन्नी देवल) याच्या हाती लागते आणि कथेला वेगळीच कलाटणी मिळते...
पुस्तकाच्या आधारे, बंद झालेल्या पाच खुनाच्या अनुत्तरीत खटल्यांच्या फाइली यशवंत पुन्हा उघडतो आणि पुस्तकाच्या लेखकाला म्हणजेच अर्जूनला पाच खुनांच्या आरोपात अटक करतो. तिथून स्वत:ला वाचवण्यासाठी अर्जून जिवाचा आटापिटा करतो आणि यशवंत हर तर्हेने त्याची मदत करतो. अखेर खरा खुनी समोर येतो आणि अर्जून निर्दोष सुटतो...
मर्डर मिस्ट्री असूनही कथानक उत्कंठा वाढवते आहे, खुर्चीला खिळवून ठेवत आहे असं कुठेही वाटलं नाही. उलट काही बाबतीत कथानक थोडंसं कमकुवतच जाणवतं. प्रकाशन संस्थेची मालकीण एक तरूण मुलगी दाखवली गेली तेव्हा कथेत काही वळणं अपेक्षित होती. पण तसं काहीच दाखवलं गेलं नाही. नफ्यामागे धावणारा प्रकाशकच जर दाखवायचा होता तर कोणताही कलावंत चालून गेला असता. कथानक गंभीर होतं खरं पण तरीही सर्व मुख्य कलावंतांच्या चेहेऱ्यावर प्रत्येक वेळी एकच भाव दिसतो...
चित्रपटातलं एकमेव हाणामारीचं दृष्य आणि चित्रपटातली गाणी यथातथाच आहेत म्हणा पण चित्रपटातलं पाठलागाचं साहसदृष्य बऱ्यापैकी रंगलं आहे. चित्रपटातली एक चांगली गोष्ट म्हणजे अभिनेते सन्नी देवल यांना मिळालेली त्यांच्या आजवरच्या भूमिकांपेक्षा वेगळी आणि जरा हटके असलेली भूमिका. बाकी चित्रपटाला वेग नाही पण चित्रपटाची शेवटची दहा मिनिटं बऱ्यापैकी गती राखतात...
पाच खुनांच्या आरोपात अटक झालेल्या अर्जूनला सहजासहजी पाच दिवसांच्या जामिनावर सोडलं जातं आणि त्याची जबाबदारी एकट्या यशवंतवर सोपवली जाते. एका ए.सी.पी.च्या घराबाहेर कोणीच पहारेकरी नसतो आणि हातून वाळू निसटावी तसा अर्जून तिथून निसटून जातो. आरोपी पळाल्याचा गवगवाही होत नाही आणि यशवंतच्या चेहेऱ्यावर तसा लवलेशही दिसत नाही, कथानकाचे हे कच्चे दुवे कथेला अगदीच मागे खेचतात...
एकंदरीत, जराशी गोंधळलेली आणि सन्नी देवलच्या भूमिकेचा वेगळा टच दाखवणारी गूढकथा असलेला दिपक तिजोरी लिखित-दिग्दर्शित, "फॉक्स" हा चित्रपट वन टाईम वॉच याच पठडीत मोडणारा आहे...
@ अनिकेत परशुराम आपटे.
No comments:
Post a Comment