मराठी चित्रपटसृष्टीत एक काळ असा होता जेव्हा डॅशिंग हिरो अजिंक्य देव किंवा रमेश भाटकर, विनोदवीर अशोक सराफ, लक्ष्मीकांत बेर्डे, सचिन पिळगावकर किंवा प्रशांत दामले, या मंडळींचे चित्रपट प्रेक्षकांच्या मनावर राज्य करत होते. अशा वेळी निर्माती स्मिता तळवलकर यांनी "चौकट राजा" हा संवेदनशील चित्रपट प्रेक्षकांसमोर आणत एक धाडसी पण यशस्वी पाऊल उचलंलं...
शरीराने वाढूनही बुद्धीने खुंटलेला मतिमंद नंदू (दिलीप प्रभावळकर) त्याच्या आईसोबत म्हणजे दुर्गामावशीसोबत (सुलभा देशपांडे) राहतो. नंदूची बालमैत्रिण मुन्नी, मीनल (स्मिता तळवलकर) म्हणून त्याच्या आयुष्यात येते. दोघांना एकमेकांची ओळख पटते आणि भेटी वाढू लागतात. मीनलच्या नवऱ्याला म्हणजे राजनला (दिलीप कुलकर्णी) हे मान्य नसतं. त्याच्या इच्छेखातर मीनल नंदूला मानसोपचार केंद्रात दाखल करते. या धक्क्याने दुर्गामावशी प्राण सोडते. मीनलसाठी केंद्रातून पळालेला नंदू घरी येतो तेव्हा त्याला आईची बातमी समजते. पोरका झालेला नंदू मीनलकडे आसऱ्यासाठी जातो पण राजन त्याला झिडकारून हाकलून देतात. अखेर राजनला त्याची चूक समजते आणि तो नंदूला दत्तक घेतो...
काळजाला चटका लावणाऱ्या या कथेच्या जोडीला होती स्मिता तळवलकर, दिलीप कुलकर्णी, सुलभा दशपांडे आणि अशोक सराफ यांची सहज सुंदर अदाकारी. पण कथेवर सुवर्णकळस चढवला तो दिलीप प्रभावळकरांच्या सशक्त आणि दमदार अभिनयाने...
१. आपल्या मुलीची बाहुली परत मिळवण्यासाठी मीनल नंदूला चपराक देते तेव्हाचा नंदू...
२. मुन्नी आणि नंदू बोलत असताना त्याच्या मनातल्या पुरुषी भावना उचंबळून तो मीनलला मीठी मारतो तेव्हाचा नंदू...
३. आई देवाघरी गेल्याचं समजल्यावर बिछान्यात पांघरूणाच्या आत रडत बसलेला नंदू...
एकही संवाद न वापरता निव्वळ डोळे आणि चेहेऱ्यावरचे भाव, यांचा वापर करून दिलीपभैय्यांनी ही दृष्य अप्रतीम वठवली...
स्मिताताईंनी उचललेलं हे शिवधनुष्य दिलीपभैय्यांनी त्यांच्या अभिनयसामर्थ्यावर लिलया पेलून धरलं. चित्रपट पाहताना, तो जरा मोठा झाला किंवा लवकर का नाही संपला, हे आपल्याला कुठेही जाणवत नाही. उलट दिलीप प्रभावळकरांच्या अदाकारीचा हा दिवा तेवतच रहावा हेच वाटतं. चित्रपटात मोजकी तीन गाणी आहेत पण ती सादर होत असताना, एखादं गाणं चित्रपटात का आहे... असा साधा विचारही मनात येत नाही. प्रत्येक गाणं काही ना काहीतरी सांगत कथेला पुढेच नेत राहतं...
एकंदरीत, संवेदनशील पण सशक्त कथा असलेल्या या वेगळ्या पण हव्याहव्याशा वाटणाऱ्या "चौकट राजा"ने पत्त्यातील चौकट राजाप्रमाणेच चित्रपटसृष्टीवर आपला वेगळा ठसा उमटवला...
@ अनिकेत परशुराम आपटे.




