Wednesday, 31 December 2025

मेरा "नाम" विश्वनाथ...

 


"देख.. यह हिंदू का खून... यह मुसलमान का... अब बता, इसमें से हिंदू का खून कौनसा है और मुसलमान का कौनसा...", "विधात्या, तू इतका कठोर का झालास रे...", "कैसे बताऊ मैं तुम्हें मेरे लिए तुम कौन हो...", "कंट्रोल उदय कंट्रोल..." या संवादांना ज्यांनी एक वेगळी ऊंची दिली, ते आहेत विश्वनाथ पाटेकर. अर्थात प्रख्यात अभिनेते नाना पाटेकर...

Contemprary hero म्हणून नाना कधीच पडद्यावर दिसले नाहीत. "अंकुश" मधला रविंद्र केळकर असो किंवा "हम दोनों" मधला विशाल सैगल असो. "तिरंगा" मधला शिवाजीराव वागळे असो किंवा "पक पक पकाक" मधला 'भुत्या' असो. नाना नेहमी गंभीर स्वरूपाच्या भूमिकेत जास्त दिसले. नानांची संवादफेक आणि त्यांची अदाकारी यांमुळे त्यांनी अभिनय केलेले "क्रांतिवीर", "प्रहार", "यशवंत", "कोहराम", "वजूद", "अब तक छप्पन" हे चित्रपट प्रेक्षकांच्या पसंतीस पडले...

नानांच्या अभिनय स्वभावाला नं साजेशा, "हुतुतु", "आपलं मानूस", "गुलाम-ए-मुस्तफा", "तरकीब", "वध", "राजनीती", "अंधा युद्ध" अशा काही चित्रपटांमधल्या त्यांच्या वेगळ्या भूमिकाही प्रेक्षकांना रुचल्या. चित्रपट चालले असतील नसतील, पण नानांनी स्वतःचा ठसा मात्र उमटवला. नानांची loud dialog delivery आणि intense acting, त्यांना विनोदी भूमिका कितपत साकारू देतील ही शंका होती. पण "राजू बन जेन्टलमॅन", "वेलकम", "हाऊस फुल ५" या चित्रपटांमधल्या त्यांच्या विनोदी भूमिकांनी या शंकांचं निरसन केलं...

नानांच्या अभिनय कारकिर्दीतले दोन वेगळे पैलू म्हणजे वेडसर झाक असलेल्या भूमिका आणि नकारात्मक भूमिका. "प्रतिघात", "युगपुरुष", "अंगार", "माफीचा साक्षीदार", "अग्निसाक्षी", अशा काही चित्रपटांमधून या वेगळ्या धाटणीच्या भूमिका नानांनी साकारल्या. पण वेडसर झाक असलेल्या त्यांच्या भूमिकांपेक्षा त्यांच्या नकारात्मक भूमिका प्रेक्षकांना जास्त भावल्या. "खामोशी द म्यूझिकल", "नटसम्राट", "डॉ. प्रकाश बाबा आमटे" या चित्रपटातल्या वेगळ्या भूमिका नानांनी उत्तम वठवल्याच. पण प्रेक्षकांनीही त्यांना चांगला प्रतिसाद दिला...

एक अभिनेता, नट, दिग्दर्शक म्हणून मराठी-हिंदी चित्रपटसृष्टीत नानांचं एक वेगळं स्थान आहेच. पण एक माणूस म्हणून ते कसे आहेत याचं उत्तम उदाहरण म्हणजे त्यांनी समाजासाठी केलेली कार्य. 'साधी राहणी आणि उच्चं विचारसरणी' याच तत्वावर नाना वागले आणि आजही वागतात. चित्रपटात त्यांची वेषभूषा किंवा रंगभूषा काहीही असो, पण एरवी मात्र नाना अत्यंत साधं राहणंच पसंत करतात. 'अनुभूती' या संस्थेतर्फे नानांनी बिहारमधल्या अनेक पूरबाधित गावांना मोलाची मदत केली. शिवाय महाराष्ट्रातील अनेक गावांमधल्या शेतकऱ्यांना त्यांनी वेळप्रसंगी पैशानेही मदतीचा हात दिला. अभिनेते मकरंद अनासपुरे यांच्यासह २०१५ साली नानांनी "Naam Foundation" ही संस्था स्थापन केली. या संस्थेतर्फे शेतकऱ्यांकरिता निधी उभारण्याचं महत्वाचं कार्य त्यांनी केलं...

आपण जे 'Down to earth' म्हणतो. नाना अगदी तसेच आहेत. आज लाखो रुपये कमावणारे नाना, कोणे एकेकाळी अशोक मामांनी केलेले छोटेसे उपकारही विसरले नाहीत. अशोक मामा म्हणजे अभिनेते अशोक सराफ यांनी नानांना केलेली पैशांची मदत असो, किंवा अशोक मामांचे पाय चेपून दिल्यानंतर अशोक मामांनी त्यांना दिलेले पाच रुपये असो. यांबद्दल आजही नाना सर्वांना सांगतात. नानांचे चित्रपट, त्यांची कार्य, अशोक मामांसोबत असलेली त्यांची मैत्री, याशिवाय नाना अजून एका गोष्टीसाठी ओळखले जातात. ती गोष्ट म्हणजे भारतीय थलसेनेला त्यांनी दिलेली सेवा. १९८८ साली नानांनी "Territory Army"मध्ये कॅप्टन म्हणून प्रवेश केला. १९९९ साली कारगिल युद्धादरम्यान 'Maratha Light Infantry'मधून मेजर या हुद्द्यावर असताना नानांनी भारतमातेची सेवा केली...

आज एक जानेवारी. आज नानांचा ७५वा वाढदिवस. उत्तम व्यक्तिमत्वाच्या, चतुरस्त्र अभिनेते आणि दिग्दर्शक विश्वनाथ पाटेकर, अर्थात पद्मश्री नाना पाटेकर यांना ७५व्या वाढदिवसानिमित्त कोटी कोटी शुभेच्छा.

@ अनिकेत परशुराम आपटे.

Saturday, 1 November 2025

सॉरीचा मामला...

 


तो इडली खात होता. 'अ'चा त्याला धक्का लागला. इडली खाली पडली. त्याने 'अ'ला सॉरी म्हणायला सांगितलं. 'अ' आरेरावी करू लागला. त्याने 'अ'ला मार मार मारलं. 'अ' म्हणाला तो 'ब'साठी काम करतो. तो 'अ'ला 'ब'कडे घेऊन गेला. 'अ'ची सारी हकीगत 'ब'ला सांगून त्याने 'ब'ला सॉरी म्हणायला सांगितलं. 'ब' मगरूरी करू लागला. त्याने 'ब'ला चोप चोप चोपला. 'ब' म्हणाला 'क'चा त्याला पाठिंबा आहे. 'अ' आणि 'ब'ला घेऊन तो 'क'कडे गेला. 'अ' आणि 'ब'ची हकीगत 'क'ला सांगून त्याने 'क'ला सॉरी म्हणायला सांगितलं...

'क' दादागिरी करू लागला. त्याने 'क'ला बुकल बुकल बुकलला. 'क' म्हणाला त्याच्यावर 'ड'चा हात आहे. 'अ', 'ब' आणि 'क'ला घेऊन तो 'ड'कडे गेला. 'ड'ला सारी हकीगत सांगून त्याने 'ड'ला सॉरी म्हणायला सांगितलं. 'ड' शांत होता. 'ड' त्याला सॉरी म्हणाला. तो खुश झाला. पण लगेच त्याला आठवलं की या प्रवासात त्याला 'अ', 'ब', 'क' आणि 'ड' ज्या ठिकाणी होते, तिथे काही बेकायदेशीर गोष्टी होत्या. मग काय, तो 'ड'च्या मागे आणि 'ड' त्याच्या मागे, असा अफलातून पाठलाग सुरू झाला. शेवटी त्याने 'अ', 'ब', 'क' आणि 'ड', सर्वांनाच हाणलं. सोबत त्यांच्या बाकी माणसांनाही मारलं आणि स्वतः हवेतून उडून गेला...

ही कथा आहे गोपीचंद मालिनेनी दिग्दर्शित "जाट" या चित्रपटाची. कथा तशी साधारणच आहे. सुतावरून स्वर्ग कसा गाठता येतो याचा प्रत्यय या चित्रपटामुळे येतो. इथे सूत म्हणजे ती इडली आणि स्वर्ग म्हणजे दुश्मनांचा तो अड्डा जो आपला नायक नेस्तोनाबूत करतो. सन्नी देओलचा ओरडा-आरडीचा आणि हाणामारीचा तो पुराना अवतार या चित्रपटात पुन्हा पहायला मिळतो. एखाद-दुसरी गाणी चित्रपटात आहेत. पण तीसुद्धा नसती तर काही फारसा फरक पडला नसता. चित्रपटाचं पार्श्वसंगीत मात्र दमदार आहे. त्यामुळेच चित्रपटातली जान थोडी बाकी राहते...

सन्नीपाजी जर नायक असेल, तर तितक्याच ताकदीचा व्हिलन समोर असायला हवा हे खरं. रणदिप हुडाने तो व्हिलन छान साकारला आहे. दोघांमध्ये क्लुप्त्या आणि हाणामारी यात बराबर की टक्कर दिसते. चित्रपटातली हाणामारीची दृश्य तर बेफाट आहेत. पण क्लायमॅक्सच्या हाणामारीच्या वेळी मात्र थोडी कमतरता जाणवते. इतर दृश्यांमध्ये पाच ते सहा किंवा जास्तीत जास्त दहा जण स्क्रिनवर दिसतात. पण शेवटच्या दृश्यात आपला नायक चक्क रावणाच्या लंकेमध्ये घुसतो ना. तेव्हा तिथे कमीत कमी तीसेक जणं तरी असतील. पण त्या वेळेला आपला नायक शांतपणे हेलिकॉप्टरमधून एकेक शस्त्र बाहेर काढतो. ते संपेपर्यंत वापरत पुढे पुढे जातो. गोळ्या संपल्यावर पुन्हा चालत चालत हेलिकॉप्टरपर्यंत जातो. दुसरं शस्त्र घेतो आणि पुन्हा गोळीबार किंवा बॉम्बबार सुरू करतो. हे थोडं खटकलं...

बाकी सन्नी देओलची तुफान फटकेबाजी, फटाकेबाजी, नायकासोबत असलेल्या ल्याडीजची हाणामारी, व्हिलन मंडळींची पळापळ, हे सगळं पाहताना मजा आली. एकंदरीत, एक प्लेट इडलीवरून सुरू झालेला हा सॉरीचा मामला, परत परत बघण्यासारखा नसला तरी वन टाईम वॉच नक्कीच आहे. सन्नीपाजीच्या ऍक्शन इमेजचे फॅन असणाऱ्यांनी नक्कीच पहावा, गोपीचंद मालिनेनी लिखित, "जाट..."

@ अनिकेत परशुराम आपटे.

Thursday, 2 October 2025

सामान्याचा असामान्य लढा...

आपल्या आयुष्यात अचानक आलेल्या वादळाचा हिमतीने आणि हुशारीने सामना करणाऱ्या एका सामान्य माणसाची कथा म्हणजे, सुबोध खानोलकर दिग्दर्शित, "दशावतार..."

नाटकात आणि वेगवेगळ्या कार्यक्रमात दशावतार आणि इतर वेगवेगळी रूपं वठवणाऱ्या बाबुलीची (दिलीप प्रभावळकर) प्रकृती वयापरत्वे खालावत जाते. तेव्हा बाबुलीचा मुलगा माधव (सिद्धार्थ मेनन) त्याच्याकडून ही कामं बंद करण्याचं वचन घेतो. महाशिवरात्रीला बाबुलीच्या शेवटच्या सादरीकरणादरम्यान बाबुलीवर मानसिक आघात होतो. बाबुली रौद्र रूप धारण करतो आणि, दशावतारातले काही अवतार घेऊन, त्याच्या आयुष्यात वादळ आणणाऱ्या लोकांवर बरसतो...

कोकणातला निसर्ग, कौलारू घरं, नद्या, माणसं, त्यांचा पेहेराव, सगळं कसं ठेवणीतलं. इतकंच नव्हे, तर कोकणातली ती गावरान भाषाही छान जमून गेली आहे. चित्रपटात केला गेलेला ड्रोन कॅमेऱ्याच्या वापर आणि वेळोवेळी येणारं पार्श्वसंगीत यांमुळे चित्रपटाला एका प्रकारची भव्यता येते. चित्रपटात पाच गाणी आहेत. त्यातही, "मानूनी घे रंगपूजा..." हे गाणं बऱ्यापैकी छान झालं आहे. चित्रपटात विजय केंकरे, महेश मांजरेकर, भरत जाधव, रवी काळे, सुनील तावडे, प्रियदर्शिनी इंदलकर, आरती वाडगबाळकर, अभिनय बेर्डे, अशा मातब्बर कळावंतांची मंदियाळी आहे. पण चित्रपटाचा सर्वात मोठा USP आहे दिलीप प्रभावळकर. त्यांनी वठवलेली बाबुलीची व्यक्तिरेखा अप्रतिम रंगली आहे. त्यांची देहबोली, त्यांचे हावभाव, वेगवेगळ्या प्रसंगात त्यांनी दाखवलेलं अप्रतिम टायमिंग, यांमुळे त्यांनी संपूर्ण चित्रपट व्यापला आहे...

तांत्रज्ञान, अदाकारी आणि संवाद या तीनही पातळींवर जरी चित्रपट नक्कीच उजवा असला, तरी चित्रपटातल्या काही गोष्टी थोड्या खटकल्यासारख्या जाणवल्या. पहिली गोष्ट म्हणजे बाबुली व माधव आणि त्यांच्या वयातलं अंतर. वडील आणि मुलगा यांच्यात जेवढं नातं असतं, त्या मानाने या दोघातल्या वयात जरा जास्त अंतर वाटतं. दुसरी गोष्ट म्हणजे, 'सिस्टीमविरोधात एका सामान्य माणसाने दिलेला लढा...' या मुद्द्यावर संपूर्ण चित्रपट नसला तरी उत्तरार्ध मात्र पूर्ण अवलंबून आहे. अर्थात चित्रपटाच्या पूर्वार्धात या गोष्टीची थोडी कुणकूण लागते खरी. चित्रपटातली तिसरी खटकणारी गोष्ट म्हणजे चित्रपटाचा शेवट. चित्रपटाच्या शेवटी बाबुलीचं श्रीरामाचं रूप आणि रावणरूपी त्या वादळाचा अंत, हे दृश्य दाखवलं असतं, तर एक उत्कट असा शेवट पहायला मिळाला असता...

कथा एका परीने शोकांतिका आहे, कारण एक पूर्ण कुटुंब सिस्टीमच्या पाशात होरपळलं गेलं. पण दुसऱ्या बाजूने विचार केला, तर एका सकारात्मक शेवटावर चित्रपट थांबतो, जिथे सारं गाव जागं होतं आणि बाबुलीचा लढा पुढे चालवतं. चित्रपटात दोन मुद्दे अधोरेखित केले गेले आहेत. आपण जर जनावरांशी, वृक्षांशी, किड्यांशी नीट वागलो, तर तेसुद्धा आपल्यासोबत खेळी-मेळीनेच वागतात. त्यांच्यावर केलेला छोटासा उपकारही ते कधीच विसरत नाहीत. दुसरा महत्वाचा मुद्दा म्हणजे हा निसर्ग, हे वातावरण, आपल्या परंपरा, हे सगळं टिकवणं आपल्याच हातात असतं. प्रगती झालीच पाहिजे. पण त्यासाठी आपला निसर्ग, आपली माणसं, ही किंमत नाही...

दिलीप प्रभावळकरांच्या अप्रतिम अभिनयासाठी आणि कोकणातल्या निसर्ग दर्शनासाठी आवर्जून पहावा असा चित्रपट आहे, सुबोध खानोलकर लिखित, "दशावतार..."

@ अनिकेत परशुराम आपटे.

Friday, 12 September 2025

खलनायक गोपाल...

"ऐ छामिया..." कुठल्याही हिंदी चित्रपटात हा संवाद ऐकला, की जाणकार प्रेक्षक हमखास म्हणतात, "या चित्रपटातला व्हिलन, नक्कीच रणजीत असणार...

पंजाबस्थित अमृतसरमध्ये गोपाल बेदी यांचा जन्म झाला. हो. गोपाल बेदी. म्हणजेच चित्रपट अभिनेते रणजीत. १९७० साली प्रदर्शित झालेल्या, "सावन भादो" या चित्रपटात एका छोट्या भूमिकेद्वारे त्यांनी हिंदी चित्रपटसृष्टीत पदार्पण केलं. त्यावेळी अभिनेते सुनील दत्त यांनी त्यांचा अभिनय पाहून त्यांना आपल्या आगामी, "रेश्मा और शेरा" या चित्रपटात संधी दिली. असं म्हणतात, की त्यांनी गोपाल बेदी हे नाव बदलून रणजीत नाव धारण करावं हे सुनील दत्त यांनीच सुचवलं...

दोन्ही चित्रपटात छोट्या भूमिका करणाऱ्या रणजीत यांना प्रसिद्धी मिळाली ती, "शर्मिली" या चित्रपटात त्यांनी साकारलेल्या नकारात्मक भूमिकेमुळे. त्यानंतर, "प्रेम प्रतिज्ञा", "रामपूर का लक्ष्मण", "हाथ की सफाई", "अमर अकबर अंथोनी", "गद्दार", "विश्वनाथ", "नमक हलाल", "सुहाग", अशा जवळ जवळ २०० चित्रपटांमधून रणजीत यांनी अनेक दमदार नकारात्मक व्यक्तिरेखा साकारल्या. एक प्रभावशाली खलनायक म्हणून लोकप्रियता मिळवताना रणजीत यांनी, "खजाना", "खोटे सिक्के", "३६ घंटे" अशा काही चित्रपटांमध्ये सकारात्मक छटा असलेल्या भूमिकाही निभावल्या...

१९९० आणि त्यापुढच्या काळात रणजीत यांनी सहायक खल व्यक्तिरेखा आणि चरित्र भूमिकांना जास्त पसंती दिली. "दुलारा", "सैनिक", "जय विक्रांता", "करण-अर्जुन", "आ गले लग जा" अशा अनेक चित्रपटातल्या खल आणि सहायक भूमिका रणजीत यांनी निभावल्या. सहायक आणि खल भूमिका निभावताना रणजीत यांच्या वाट्याला काही विनोदी भूमिकासुद्धा आल्या. "बंटी और बबली", "हाऊसफुल चित्रपट-मालिका", "सन ऑफ सरदार" अशा काही चित्रपटांमध्ये रणजीत यांनी साकारलेल्या विनोदी भूमिकांवर, त्यांनी कोणे एकेकाळी निभावलेल्या नकारात्मक भूमिकांची छाप दिसून आली...

१९९०च्या दशकात अभिनेते रणजीत एका वेगळ्या भूमिकेत प्रेक्षकांसमोर आले. ती भूमिका होती दिग्दर्शकाची. विनोद खन्ना अभिनीत "कारनामा" आणि राहुल रॉय अभिनीत "गजब तमाशा" या दोन चित्रपटांचं दिग्दर्शन रणजीत यांनी केलं. चित्रपटांनी तिकीट खिडकीवर मार खाल्ला, पण रणजीत यांच्या दिग्दर्शनाची मात्र स्तुती झाली. अभिनेते आणि दिग्दर्शक म्हणून मोठ्या पडद्यावर लौकिक मिळवणाऱ्या रणजीत यांनी, "जुनून", "गुल सनोबर", "घर एक सपना" अशा अनेकानेक मालिकांमधून विविध भूमिका साकारत छोटा पडदाही गाजवला...

आज १३ सप्टेंबर. आज गोपाल बेदी उर्फ प्रसिद्ध अभिनेते रणजीत यांचा वाढदिवस. हिंदी व पंजाबी चित्रपट आणि मालिकांमधल्या या जबरदस्त खलनायकाला वाढदिवसाच्या भरभरून शुभेच्छा...

"Once and for all... कभी कभी..."

@ अनिकेत परशुराम आपटे.

Sunday, 10 August 2025

वैचारिक द्वंद्व...

 


"ॐ नमो भगवते वासुदेवाय नमः.."

पाच वर्षाचा, श्री विष्णूचा परम भक्त प्रल्हाद आणि श्री ब्रह्मदेवांच्या वरदानाने उन्मत्त झालेला हिरण्यकश्यपु यांच्यातल्या वैचारिक द्वंद्वावर प्रकाश टाकणारा चित्रपट म्हणजे अश्विन कुमार दिग्दर्शित, "महावतार नरसिंह..."

पुराणातली ही कथा तर सर्वांनाच माहीत आहे. पण कथेचं सादरीकरण खूप छान आहे. चित्रपटातली गाणी थोडी धिम्या गतीची आहेत. पण कथेतल्या दोन वेगळ्या प्रवृत्ती दाखवायला त्यांचा यथायोग्य वापर होतो. अनेक दृश्यांमध्ये येणारे विविध श्लोक कथेला पूरक ठरतात...

चित्रपटातील दृश्यांबद्दल बोलायचं झालं, तर तंत्रज्ञानाचा सुरेख वापर दिसतो. लढाई आणि द्वंद्वाची दृश्य खूप वेगवान घेतली आहेत. त्यामुळे कोण कोणाला मारत आहे हे काही दृश्यांमध्ये समजेनासं होतं. चित्रपटातली दोन दृश्य अतिशय उत्तम रंगली आहेत. त्यातलं पाहिलं दृश्य म्हणजे भक्त प्रल्हाद आणि श्री विष्णू यांच्या भेटीचं दृश्य. भक्त प्रल्हादाच्या करुणामय हाकेला साद देऊन त्याच्यासमोर श्री विष्णू प्रकट होतात. ते दृश्य पाहताना डोळ्यात पाणी आल्याशिवाय राहत नाही...

चित्रपटातलं दुसरं महत्वाचं दृश्य म्हणजे उन्मत्त झालेल्या हिरण्यकश्यपुचा अंत करण्यासाठी खांबातून प्रकट झालेले महावतार नरसिंह. चित्रपटाच्या शेवटच्या पंचवीस मिनिटात हे दृश्य येतं. तांत्रिक दृष्ट्या अतिशय सुंदर असलेलं हे दृश्य चित्रपटाचा high point आहे असं मला वाटतं. फक्त लाईट्सचा भपकारा इतका आहे की काही क्षणी डोळे आपोआप बंद होतात. पण तेवढा भाग सोडल्यास, चित्रपटातलं हे अंतिम दृश्य अतिशय उत्कंठावर्धक झालेलं आहे...

चित्रपटातल्या सर्व व्यक्तिरेखांमध्ये हिरण्यकश्यपु आणि श्री विष्णू या व्यक्तिरेखा अतिशय सुंदर झाल्या आहेत. त्यातही श्री नारायणाचं भव्य आणि दिव्य रूप खरंच अप्रतिम आहे. एक व्यक्तिरेखा मला थोडी खटकली. ती व्यक्तिरेखा म्हणजे श्री वरुणदेव. "Pirates of Caribbean" नावाची एक चित्रपट मालिका आहे. त्यात 'Devy Jones' नामक एक व्यक्तिरेखा आहे. त्या व्यक्तिरेखेचं शारीरिक स्वरूप आणि श्री वरुणदेव यांचं या चित्रपटातलं शारीरिक स्वरूप यांच्यात बरंच साम्य आढळतं. इतर दैवी व्यक्तिरेखा पाहताना प्रसन्न वाटतं. पण वरुणदेव समोर येताच, कधी ते दृश्य संपतं असं होतं...

चित्रपटातले संवाद उत्कृष्ट आहेत. भाषेचं व्यवस्थित भान ठेऊन ते संवाद लिहिले गेलेत. चित्रपटातले नेत्रदीपक देखावे चित्रपटाची भव्यता अतिशय सुंदर पद्धतीने दाखवतात. "आदिपुरुष" आणि "ब्रह्मास्त्र" च्या जमान्यात, कुठल्याही मोठ्या कलावंताचा आवाज voice over साठी न वापरणारा, आपली संस्कृती जपणारा आणि आपल्या पुराणावर भाष्य करणारा जयपूर्ण दास लिहीत, "महावतार नरसिंह" हा चित्रपट, आपण तर पहायला हवाच, पण आत्ताच्या पिढीलाही दाखवायला हवा...

"ॐ नमो नारायणाय..."

@ अनिकेत परशुराम आपटे.

Monday, 23 June 2025

जारण...

जारण, चेटुक, करणी, ब्लॅक मॅजिक या विषयांवर अनेक चित्रपट बनले आहेत. पण जारण हा विषय, एका वेगळ्या प्रकारे दाखवण्याचा प्रयत्न करणारा चित्रपट म्हणजे, हृषीकेश गुप्ते दिग्दर्शित, "जारण..."

ही कथा आहे राधाची (अमृता सुभाष). राधा लहान असताना, गंगुटी (अनिता दाते-केळकर) नावाची एक जखीण तिच्यावर जारण म्हणजे चेटुक करते. काळाच्या ओघात गाव लांब राहून राधा शहरात येते. तिचं लग्न होतं. आता तिचं एक छान विश्व असतं. म्हणजे राधा, तिचा नवरा शेखर (विक्रम गायकवाड) आणि त्यांचं मूल. राधाच्या या विश्वाला गालबोट लागतं, त्यांच्या गाडीला झालेल्या अपघातामुळे. त्या अपघातानंतर राधाचं आयुष्यच बदलतं. तिला भास व्हायला लागतात. वेगवेगळ्या गोष्टी दिसू लागतात. हे सगळं गंगुटीने केलेल्या जरणामुळेच होतंय असं वाटत राहतं. राधा या अवस्थेतून बाहेर येईल की नाही... गंगुटीचं काय झालं... ती आत्ता कुठे असेल... या प्रश्नांवर चित्रपट संपतो...

चित्रपटात दाखवलेलं गावाकडचं जुनाट घर एकदम छान आहे. माजघर, ओसरी, वृंदावन, माळा, झोपळा सगळं एकदम ठेवणीतलं. गंगुटी जिथे तंत्र-मंत्र करते, ती जागा कल्पकतेने सजवलेली आहे. राधाचं शहरातलं घरही छान निवडलं आहे. थ्रीलर चित्रपटात पार्श्वसंगीत आणि प्रकाश योजना, या दोन्ही गोष्टी जास्त महत्वाच्या असतात. या चित्रपटातही वाड्यात दाखवलेला प्रकाश, शहरातल्या घरात दाखवलेला प्रकाश कथेनुरूप आहे आणि व्यवस्थित परिणाम साधतो. पार्श्वसंगीत म्हणायचं तर काही वेगळ्या प्रकारचे आवाज वापरलेत. असे कुठलेही आवाज नाहीत जे जोरात येतात. जिथे जिथे सांगिताची गरज आहे, तिथे खालच्या पट्टीत ते ते संगीत सुरू होऊन मग वरची पट्टी गाठतं...

चित्रपटातल्या कलावंतांनी आपापल्या भूमिका छान वठवल्या आहेत. पण सर्वात उजव्या ठरल्यात त्या अनिता दाते-केळकर आणि अमृता सुभाष यांनी साकारलेल्या व्यक्तीरेखा. अनिताने त्यांचे डोळे, हसणं, तीक्ष्ण नजरेने बघणं, आवाज आणि हाव-भाव, यांचा यथायोग्य वापर करून गंगुटीचं व्यक्तिमत्व छान उभारलं आहे. एकाच वेळी किळसही वाटावी आणि दराराही निर्माण व्हावा अशी ती व्यक्तीरेखा रंगली आहे. चित्रपटाचं मुख्य पात्र, म्हणजे राधा रंगावताना अमृताने सुद्धा त्यांचं अभिनय कौशल्य पणाला लावलेलं दिसतं. राधाच्या मनातला भावनिक गोंधळ, लहानपणीच मनात बसलेली भीती, आस-पासच्या आणि राधाच्या घरच्या लोकांवरचा राग, हे सगळं अमृताने छान जमवून आणलं आहे...

चित्रपटात धक्कातंत्र आणि कॅमेरा अँगल्स यांचा वापर एकदम योग्य तर्हेने केलेला दिसतो. चित्रपटाची लांबी दोनेक तासांची असेल, पण मध्यंतरापर्यन्तचं कथानक जरा रटाळ वाटतं. ऐन मध्यंतरापूर्वी घडलेल्या एका सीनमुळे कथा एकदम वेगळी दिशा पकडते. खरंतर तिथूनच कथा वेग घेते असं म्हणायला हरकत नाही. चित्रपटात एक सीन तीन वेळा येतो. तीनही वेळेला त्या सीनचा शेवट कथानकाची दिशा बदलतो. चित्रपटाची सुरुवात ज्या कथाभागाने होते, चित्रपट पाहताना आपल्याला वाटतं, शेवटही त्याच कथाभागावर किंवा त्याच्या परिणामावर होईल. पण संभ्रमात टाकणारा वेगळाच शेवट दाखवण्याचा प्रयत्न चांगला आहे...

एकंदरीत, मल्टी-स्टारर, हाणामारी, कौटुंबिक समस्या, प्रेम प्रकरणं यांमध्ये अडकलेल्या चित्रपटांपासून थोडा वेगळा ठरणारा हृषीकेश गुप्ते लिखित, "जारण" हा चित्रपट पहायला हवा हे नक्की...

@ अनिकेत परशुराम आपटे.

Friday, 13 June 2025

वडा-पाव अख्यान (भाग दोन)...

 


दादर स्टेशनला विलासने वडा-पाव खाल्ला...

यावर हिंदी-मराठी नाट्य-चित्रसृष्टीतल्या दिग्गजांचे सीन्स झाले, तर कसे होतील...

मनमोहन देसाई...

दादर स्टेशनच्या समोरच्या चौकात एक आंधळी म्हातारी वडा-पाव विकत असते. एका बाजूने इन्स्पेक्टर विराट, दुसऱ्या बाजूने डॉन लारा आणि तिसऱ्या बाजूने डॉक्टर सलीम तिथे येतात आणि वडा-पाव खाऊ लागतात. ती आंधळी म्हातारी सारखं, "विलास, माझा मुलगा विलास..." असं म्हणत असते. तिघांनाही वाटतं, की बहुतेक तिचा मुलगा हरवला. ते तिला विचारतात तर ती सांगते की विलास लहान असताना एकदा क्रिकेट खेळत असतो. त्याने मारलेला बॉल म्हातारीच्या डोक्यात बसतो आणि ती आंधळी होते. हे पाहून घाबरून विलास पळून जातो. तेवढ्यात इन्स्पेक्टर विराटला डॉन लाराला अटक करण्याची ऑर्डर मिळते. विराट आणि लारामध्ये हाणामारी होते. डॉक्टर सलीम ती थांबवण्याचा प्रयत्न करतो. तिघांच्याही हातातले वडा-पाव हवेत उसळतात. त्यातली चटणी म्हातारीच्या डोळ्यात जाते आणि तिला दिसू लागतं. ती भांडण थांबवते आणि म्हणते, "माझा एक मुलगा हरवला. पण आज मला तीन मुलं मिळाली. विराट, लारा आणि सलीमच्या रूपात माझा विलासच परत आला आहे. हे ऐकून तिघंही एकमेकांना मिठी मारतात...

राज कपूर...

दादर स्टेशनबाहेर पाण्याचा पाईप फुटल्याने तिथे धबधबा तयार झालेला असतो. त्या धबधब्याशेजारी एक वडा-पाववालीचा ठेला असतो. वडा-पाववाली एका बाजूने सुंदर आणि एका बाजूने कुरूप असते. विलास तिच्या सुंदर बाजूने तिच्या समोर येत राहतो आणि वडा-पाव खात राहतो. विलासला ती वडा-पाववाली आवडते आणि तो तिला लग्नाचं विचारतो. तेवढ्यात लाईट जातात. त्या अंधारात, ठेल्याच्या खाली विलास आणि ती मुलगी......... पूर्ण रात्र निघून जाते. सकाळी विलास उठतो तर ती मुलगी बाजूला नसते. तो समोर पाहतो तर ती मुलगी पाईप फुटून तयार झालेल्या धबधब्यात अंघोळ करत असते. विलास तिचा कुरूप चेहेरा पाहतो. ती मुलगी परतल्यावर विलास तिला नाकारतो आणि स्टेशनकडे निघतो. मुलगी रडू लागते. विलास का मन त्याला झगझोडतं. विलास परत येतो आणि त्या मुलीला तिच्या कुरूप बाजूने मिठी मारत तिच्या हातून वडा-पाव खातो...

इंद्र कुमार...

विलास दादर स्टेशनच्या ब्रिजवर उभा असतो. त्याला रस्त्यावर वडा-पावची गाडी आणि त्यामागे एक मुलगी दिसते. मुलीकडे पाहत विलास जिना उतरू लागतो. तो घसरतो आणि प्रत्येक पायरीवर बसण्याच्या जागी आपटत खाली येतो. ती मुलगी धावत येऊन विलासला आधार देते. त्याला वडा-पावच्या गाडीवर घेऊन जाते. मग मलमपट्टी करून विलासला वडा-पाव देते. हे पाहून वडा-पाववाला भडकतो. विलासच्या हातून वडा-पाव काढून घेतो आणि त्याला ढकलतो. विलासचं डोकं त्याच गाडीवर आपटतं. मुलगी रडू लागते. रडता रडता ती विलासच्या डोक्याला पट्टी बांधते. मग रागाने वडा-पाववाल्याकडे पाहत नुसत्या मिरच्या आणि तिखट चटणी खाऊ लागते. वडा-पाववाल्याला पाझर फुटतो आणि तो विलासला वडा-पाव देतो. विलास एका हातात वडा-पाव धरतो. दुसऱ्या हाताने मुलीचे डोळे पुसतो आणि तिला प्यायला पाणी देतो...

रोहित शेट्टी...

विलास दादर स्टेशनबाहेर उभा असतो. वडा-पावची गाडी बघून तिथे जातो. वडा-पाव संपले असं वडा-पाववाला सांगतो. विलास जायला निघतो. तेवढ्यात पुलावरून दोन बाईक्स येताना दिसतात. एका बाईकवर सिम्बा असतो ज्याने हातात पाव घेतलेला असतो. एका बाईकवर सिंघम असतो ज्याच्या हातात वडा असतो. दोघंही विलासभोवती पुढल्या चकावर बाईक गोल-गोल फिरवतात. इतक्यात हवेतून एक हेलिकॉप्टर येतं ज्याच्याबाहेर सूर्यवंशी लटकलेला असतो. त्याच्या हातात चटणीचा बाऊल असतो. हेलिकॉप्टर पण हवेतून विलासभोवती घिरट्या घालू लागतं. सिम्बा पावाला विलासकडे फेकतो. सिंघम वड्याला त्याच्याकडे भिरकावतो. त्याच वेळी वरून सूर्यवंशी चटणीचं बाऊल उलटं करतो. वडा आणि पाव एकमेकांना भेटतात आणि चटणीच्या फोर्सने खाली जात विलासच्या हातात विसावतात...

यश चोपडा...

दादर स्टेशनबाहेर एका वडा-पावच्या ठेल्याच्या एका बाजूला हातात पाव घेऊन विलास आकाशाकडे पाहत असतो. ठेल्याच्या दुसऱ्या बाजूला एक मुलगी हातात वडा घेऊन आकाशकडे पाहत असते. विलासच्या मनात खयाल येतो की कभी कभी मेरे पाव में वडा आता है... त्या मुलीचं दिल पण कहतं की दुनिया में हर वडे के लिए एक पाव बनाया गया है... मेरे वडे के लिए भी पाव होगा... दोघं एकमेकांकडे पाहतात आणि ड्रीम सीन सुरू होतो. बर्फ अच्छादित डोंगराच्या मधोमध अनेक रंगांच्या फुलांनी भरलेलं एक मोठं मैदान आहे. विलास आणि ती मुलगी पांढऱ्या शुभ्र कपड्यात मैदानाच्या विरुद्ध बाजूना उभे आहेत. विलास हात उंचावतो आणि हातातला पाव समोर येतो. ती मुलगी हसते आणि तिच्या हातातला वडा पाहते. मग ती मुलगी त्या फुलांमधून विलासकडे धावते आणि त्याच्या पावात वडा ठेवते. ड्रीम सीन संपतो. विलास आणि ती मुलगी एकत्र उठतात. एकमेकांना पाहतात. जवळ येतात आणि वडा-पाव एकमेकांना बिलगतात...

प्रियदर्शन...

विलास दादर स्टेशनबाहेर येतो. समोर एक वडा-पावाचा ठेला असतो. त्यावर लिहिलं असतं, "अनुराधा वडा-पाव सेंटर, यक का डबल मिलेगा..." ठेल्यावर वडा-पाव विकणारा लीला, बाजूला उभा चोर राजू, भाडं वसूल करायला आलेला ठेल्याचा मालक खडक सिंह आणि लीलाचा मदतनीस छोटा पंडित, इतकीच माणसं असतात. विलास पैसे देतो. छोटा पंडित प्लेटमध्ये दोन वडा-पाव ठेवतो आणि त्याला चटणी लावणार इतक्यात राजू त्यातला एक वडा-पाव उचलून पळ काढतो. राजूने वडा-पाव चोरला म्हणून राहिलेला वडा-पाव घेऊन विलास राजूच्या मागे धावतो. चटणी लावायची राहिली म्हणून चटणीचा डबा घेऊन छोटा पंडित विलासच्या मागे धावतो. चटणीचा डबा परत आणायला लीला छोटा पंडितच्या मागे धावतो. भाडं घ्यायला खडक सिंह लीलाच्या मागे धावतो. राजूचा पाय एका झाडाखाली असलेल्या एका त्रिशुळात अडखळतो. राजू पडतो. झाडावर पाटी असते "भैरव कवच". त्रिशूळ हवेत उडून राजूच्या हातून वडा-पाव आपल्या टोकावर अडकवतो. मग त्रिशूळ जमिनीवर उभा राहतो. जांभळं वावटळ वर येतं आणि त्यातून एक भूत बाहेर येऊन त्रिशूळ धरतं. ते भूत म्हणतं, "आमी मोंजूलिका..." आणि वडा-पाव त्रिशुळावरून निघून विलासच्या हाती सामावतो...

साऊथचा ऍक्शन चित्रपट... 

विलास दादर स्टेशनबाहेर येतो. रस्त्याच्या दुसऱ्या बाजूला वडा-पाववाला असतो. रस्त्यावर गाड्या भरधाव चालत असतात. विलास वडा-पाववाल्याकडे पाहून ओरडतो. वडा-पाववाला वर बघतो. तो एका हाताने वड्याला आणि दुसऱ्या हाताने पावाला विलासकडे भिरकावतो. विलास धावत्या गाडयांवर उड्या मारत हवेत झेप घेतो. डोळे किलकिले करून तो पाहतो तर पावाला चटणी नसते. विलास वडा-पाववाल्याला खूण करतो. वडा-पाववाला लगेच चटणीचं बाऊल हवेत उडवतो. हवेतच चटणी बाऊलपासून वेगळी होते. बाऊल तसंच खाली येत वडा-पाववाल्याच्या ठेल्यावर विसावतं. पाव उघडतो. हवेतली चटणी बरोब्बर पावाला जाऊन लागते. पाव खाली येत असताना वडा त्यात शिरतो. हवेतच विलास तोंड उघडतो. चटणी भरलेला वडा-पाव विलासच्या तोंडात अडकतो. विलास तसाच खाली येऊन दोन पायांवर उभा राहतो. त्याच्या पायाखालच्या जमिनीतून धुळीचं छोटं वावटळ उठतं. विलासच्या खिशातून पैसे बाहेर येत वावटळात शिरतात. वावटळ वडा-पाववाल्याकडे जाऊन शांत होतं. पैसे त्याच्या गल्ल्यात पडतात. इकडे विलास एक मोठा घास घेतो आणि निघून जातो...

महेश कोठारे...

विलासला दादर स्टेशन समोर वडा-पावचा ठेला दिसतो. ठेल्याचं नाव असतं "गिधाड वडा-पाववाले..." टकलू हैवान आणि झगड्या रामोशी ठेला चालवत असतात. सकाळपासून तिथे कोणीच फिरकलेलं नसतं. विलासला पाहून दोघं त्याच्याकडे येतात आणि त्याला उचलून ठेल्यावर आणतात. ठेल्यावर कवट्या महाकाळ आणि तात्या विंचूचे हार घातलेले फोटो असतात. ठेल्याच्या टपावर एक बाहुला बसवलेला असतो आणि त्यावर पाटी असते इनामदार भुसनळे. हे सारं पाहून विलास घाबरतो आणि जायला उठतो. पण टकलू आणि झगड्या त्याला अडवतात. बाजूलाच असलेल्या झाडाआडून लक्ष्या हे सगळं पाहत असतो. त्याचा थरथरट होतो. झाडाखाली बसून लक्ष्या थरथरू लागतो. त्यामुळे झाड हलू लागतं. एक बाटली वरून खाली पडते. लक्ष्या बाटली उचलतो आणि पाणी असेल म्हणून ती उघडतो. आतून धूर निघतो आणि पाठोपाठ इन्स्पेक्टर महेश कोलांटी उडी घेत बाहेर येतो. टकलू आणि झगड्याशी दे दणादण करून त्यांना हवेत उडवतो आणि पुन्हा बाटलीत जाऊन बसतो. लक्ष्या बाटली घेऊन जातो तर विलास तिथे असलेल्या वडा-पावांवर ताव मारून निघून जातो. नष्ट झालेल्या ठेल्यावर आता तो बाहुला पडलेला असतो. तो उभा राहत म्हणतो, "वडा-पाव... व्हळकॅम्बोचा वडा-पाव खाल्ला... आई ययी ययी ययी ययी ययी... सूड लक्ष्या सूड..."

केदार शिंदे...

संध्याकाळच्या ५.५५च्या ट्रेनने विलास दादर स्टेशनला उतरतो. त्याला भूक लागते. समोर एक दुकान असतं. त्यावर पाटी असते मदन सुखात्मे वडा-पाव सेंटर. दुकानावर खूप गर्दी असते आणि सगळे वडा-पावासाठी हात सरसावून उभे असतात. विलास एका माणसाला कारण विचारतो तेव्हा समजतं, की दामोदर पंत नावाचा माणूस हे दुकान चालवतो आणि मदन सुखात्मे यांनी यासाठी भांडवल दिलं. पंतांना वेळेचं भान फार म्हणून बरोब्बर ६ वाजता वडा-पाव विकायला सुरुवात होते. पण वडा-पाव अचानक गायब होतात आणि हातात कागद येतात. विलास तिथे जात असताना वाटेत एक देऊळ लागतं. देवीला नमस्कार करत विलास म्हणतो, "देवी, मला या रहस्याचा उलगडा होऊ दे..." एक प्रकाश येतो आणि आकाशवाणी होते, "होईल हां उलगडा..." विलास दुकानावर जातो. पंतांना पैसे देऊन वडा-पाव घेतो. वडा-पाव गायब होऊन विलासच्या हाती कागद येतो. देवीच्या शक्तीमुळे विलासला स्लो मोशनमध्ये एक आदिवासी येऊन वडा-पाव घेऊन जाताना दिसतो आणि एक वाडाही दिसतो. विलास कागद वाचतो तर त्यातही वाड्याच्या खुणा असतात. विलास वाड्यात पोहोचतो. तिथे गलगले, राजा, हरी, पुढारी, अण्णा, अशी अनेक भुतं असतात. श्रीरंग नावाचं भूत त्यांचा नेता असतं.  श्रीरंग सांगतो आम्हाला पंतांनी केलेला वडा-पाव खूप आवडतो. घुम्या नावाच्या माणसाकरावी विलास एकदम शंभर वडा-पावांची ऑर्डर पंतांपर्यंत पोहोचवतो. शंभर वडा-पाव आल्यावर ते आदिवासी भूत विलासचा वडा-पाव त्याला परत देतं. विलास वडा-पाव खाणार इतक्यात वडा-पावमधून आवाज येतो, "आता हा मला खाणार. पहिल्यांदा कोणी माणूस खाणार मला... वाह..." "म्हणजे आता मला पदार्थांचे आवाज येऊ लागले... " असं म्हणत विलास आश्चर्याने वर बघतो. देवी आकाशात हसत असते...

@ अनिकेत परशुराम आपटे.

Tuesday, 1 April 2025

सिंघम देवगण...

"आता माझी सटकली..." सिंघम चित्रपट-मालिकेतील हा प्रसिद्ध संवाद कुठेही ऐकला, तरी आठवतात विशाल वीरू देवगण अर्थात प्रसिद्ध अभिनेते अजय देवगण...

प्रसिद्ध action director वीरू देवगण यांचे सुपुत्र अजय देवगण यांनी मिठीभाई कॉलेजमधून त्यांचं शिक्षण पूर्ण केल्यानंतर कुकु कोहली दिग्दर्शित "फूल और कांटे" या चित्रपटाद्वारे अजयने दमदार पदार्पण केलं. दोन मोटरसायकलींवर उभा राहून होणाऱ्या त्याच्या एन्ट्रीला प्रचंड टाळ्या पडल्या होत्या. याच चित्रपटासाठी अजयला सर्वोत्कृष्ट पदार्पणाचा पुरस्कार मिळाला. "फूल और कांटे" तर हिट झालाच. पण पाठोपाठ आलेला "जिगर" सुद्धा यशस्वी झाल्याने अजय रातोरात स्टार झाले...

"जिगर" नंतर "शक्तिमान", "एक ही रस्ता", "धनवान", "दिव्यशक्ति", "संग्राम", "प्लॅटफॉर्म", "कानून" असे एका मागून एक चित्रपट फ्लॉप होत गेले आणि अजयच्या स्टारडमला थोडा धक्का लागला. पण १९९४ मध्ये आलेले "दिलवाले" आणि "सुहाग" यशस्वी झाले आणि पुन्हा अजयची लोकप्रियता वाढू लागली. "हलचल", "जंग", "हकीकत", "गुंडाराज" या चित्रपटांमुळे अजय action hero म्हणून नावाजले गेले. त्यांच्या अदाकारीला खरा वाव देणारा "नाजायज" यशस्वी झाला आणि अजयला सर्वोत्कृष्ट कलाकार हे 'Filmfare' चं नामांकन मिळालं. Action hero म्हणून नाव मिळवताना काही वेगळ्या धाटणीच्या चित्रपटांनी अजयची अभिनय क्षमताही प्रेक्षकांपर्यंत पोहोचवली...

"जख्म", "ईश्क", "हम दिल दे चुके सनम", "मैं ऐसा ही हूँ", "कंपनी", "दृश्यम", "युवा", "गंगाजल", "द लेजेन्ड ऑफ भगतसिंह", "रैड", "ओंकारा" अशा, वेगळ्या विषयांवरच्या अनेक चित्रपटात काम करून अजयने प्रेक्षकांसोबत समीक्षकांचीही स्तुती मिळवली. वेगळ्या भूमिका करताना अजयने, "हम किसीसे कम नहीं", "ईश्क", "ऑल द बेस्ट", "गोलमाल चित्रपट-मालिका", "मस्ती", "टोटल धमाल" या चित्रपटांमधून विनोदी भूमिक ही साकारल्या. इतर विनोदी कलावंत किंवा विनोदी भूमिका अप्रतिम वठवणारे इतर कलावंत असतानाही अजयने त्यांची छाप सोडली. विनोदी आणि गंभीर भूमिका तर अजयने निभावल्याच. पण "खाकी", "दिवानगी", "काल" सारख्या चित्रपटांमधून त्यांनी साकारलेल्या नकारात्मक व्यक्तीरेखासुद्धा प्रेक्षकांनी पसंत केल्या. अर्थात त्यांच्या romantic भूमिका इतक्या प्रभावशाली ठरल्या नाहीत...

अजयच्या चित्रपट तालिकेतले दोन मैलाचे खडक ठरले "तान्हाजी" आणि "सिंघम - चित्रपट मालिका". अजयने साकारलेली 'सुभेदार तान्हाजी मालुसरे' ही ऐतिहासिक व्यक्तीरेखा प्रेक्षकांच्या पसंतीस तर उतरलीच. पण समीक्षकांनी सुद्धा अजयच्या अदाकरीची स्तुती केली. अजयची सर्वात जास्त लोकप्रिय ठरलेली व्यक्तीरेखा म्हणजे बाजीराव सिंघम. या व्यक्तीरेखेला प्रेक्षकांनी अक्षरशः डोक्यावर घेतलं. आजतागायत सिंघमचे संवाद, सिंघमची लकब बऱ्याच ठिकाणी वापरली जाते. याच 'सिंघम' ला समोर ठेवत अजयने OTT platform वर आलेली "रुद्र" ही मालिकाही केली होती. मालिका यशस्वी झाली खरी पण  ''रुद्रवीर'ला 'सिंघम'ची ऊंची गाठता आली नाही...

आज २ एप्रिल. अभिनेते अजय देवगण यांचा आज वाढदिवस. प्रेक्षकांच्या मनाच्या "प्लॅटफॉर्म"वर "परवाना" म्हणून वसलेल्या या "सिंघम"ला वाढदिवसाच्या कोटी कोटी शुभेच्छा...

@ अनिकेत परशुराम आपटे.