दादर स्टेशनला विलासने वडा-पाव खाल्ला...
यावर हिंदी-मराठी नाट्य-चित्रसृष्टीतल्या दिग्गजांचे सीन्स झाले, तर कसे होतील...
मनमोहन देसाई...
दादर स्टेशनच्या समोरच्या चौकात एक आंधळी म्हातारी वडा-पाव विकत असते. एका बाजूने इन्स्पेक्टर विराट, दुसऱ्या बाजूने डॉन लारा आणि तिसऱ्या बाजूने डॉक्टर सलीम तिथे येतात आणि वडा-पाव खाऊ लागतात. ती आंधळी म्हातारी सारखं, "विलास, माझा मुलगा विलास..." असं म्हणत असते. तिघांनाही वाटतं, की बहुतेक तिचा मुलगा हरवला. ते तिला विचारतात तर ती सांगते की विलास लहान असताना एकदा क्रिकेट खेळत असतो. त्याने मारलेला बॉल म्हातारीच्या डोक्यात बसतो आणि ती आंधळी होते. हे पाहून घाबरून विलास पळून जातो. तेवढ्यात इन्स्पेक्टर विराटला डॉन लाराला अटक करण्याची ऑर्डर मिळते. विराट आणि लारामध्ये हाणामारी होते. डॉक्टर सलीम ती थांबवण्याचा प्रयत्न करतो. तिघांच्याही हातातले वडा-पाव हवेत उसळतात. त्यातली चटणी म्हातारीच्या डोळ्यात जाते आणि तिला दिसू लागतं. ती भांडण थांबवते आणि म्हणते, "माझा एक मुलगा हरवला. पण आज मला तीन मुलं मिळाली. विराट, लारा आणि सलीमच्या रूपात माझा विलासच परत आला आहे. हे ऐकून तिघंही एकमेकांना मिठी मारतात...
राज कपूर...
दादर स्टेशनबाहेर पाण्याचा पाईप फुटल्याने तिथे धबधबा तयार झालेला असतो. त्या धबधब्याशेजारी एक वडा-पाववालीचा ठेला असतो. वडा-पाववाली एका बाजूने सुंदर आणि एका बाजूने कुरूप असते. विलास तिच्या सुंदर बाजूने तिच्या समोर येत राहतो आणि वडा-पाव खात राहतो. विलासला ती वडा-पाववाली आवडते आणि तो तिला लग्नाचं विचारतो. तेवढ्यात लाईट जातात. त्या अंधारात, ठेल्याच्या खाली विलास आणि ती मुलगी......... पूर्ण रात्र निघून जाते. सकाळी विलास उठतो तर ती मुलगी बाजूला नसते. तो समोर पाहतो तर ती मुलगी पाईप फुटून तयार झालेल्या धबधब्यात अंघोळ करत असते. विलास तिचा कुरूप चेहेरा पाहतो. ती मुलगी परतल्यावर विलास तिला नाकारतो आणि स्टेशनकडे निघतो. मुलगी रडू लागते. विलास का मन त्याला झगझोडतं. विलास परत येतो आणि त्या मुलीला तिच्या कुरूप बाजूने मिठी मारत तिच्या हातून वडा-पाव खातो...
इंद्र कुमार...
विलास दादर स्टेशनच्या ब्रिजवर उभा असतो. त्याला रस्त्यावर वडा-पावची गाडी आणि त्यामागे एक मुलगी दिसते. मुलीकडे पाहत विलास जिना उतरू लागतो. तो घसरतो आणि प्रत्येक पायरीवर बसण्याच्या जागी आपटत खाली येतो. ती मुलगी धावत येऊन विलासला आधार देते. त्याला वडा-पावच्या गाडीवर घेऊन जाते. मग मलमपट्टी करून विलासला वडा-पाव देते. हे पाहून वडा-पाववाला भडकतो. विलासच्या हातून वडा-पाव काढून घेतो आणि त्याला ढकलतो. विलासचं डोकं त्याच गाडीवर आपटतं. मुलगी रडू लागते. रडता रडता ती विलासच्या डोक्याला पट्टी बांधते. मग रागाने वडा-पाववाल्याकडे पाहत नुसत्या मिरच्या आणि तिखट चटणी खाऊ लागते. वडा-पाववाल्याला पाझर फुटतो आणि तो विलासला वडा-पाव देतो. विलास एका हातात वडा-पाव धरतो. दुसऱ्या हाताने मुलीचे डोळे पुसतो आणि तिला प्यायला पाणी देतो...
रोहित शेट्टी...
विलास दादर स्टेशनबाहेर उभा असतो. वडा-पावची गाडी बघून तिथे जातो. वडा-पाव संपले असं वडा-पाववाला सांगतो. विलास जायला निघतो. तेवढ्यात पुलावरून दोन बाईक्स येताना दिसतात. एका बाईकवर सिम्बा असतो ज्याने हातात पाव घेतलेला असतो. एका बाईकवर सिंघम असतो ज्याच्या हातात वडा असतो. दोघंही विलासभोवती पुढल्या चकावर बाईक गोल-गोल फिरवतात. इतक्यात हवेतून एक हेलिकॉप्टर येतं ज्याच्याबाहेर सूर्यवंशी लटकलेला असतो. त्याच्या हातात चटणीचा बाऊल असतो. हेलिकॉप्टर पण हवेतून विलासभोवती घिरट्या घालू लागतं. सिम्बा पावाला विलासकडे फेकतो. सिंघम वड्याला त्याच्याकडे भिरकावतो. त्याच वेळी वरून सूर्यवंशी चटणीचं बाऊल उलटं करतो. वडा आणि पाव एकमेकांना भेटतात आणि चटणीच्या फोर्सने खाली जात विलासच्या हातात विसावतात...
यश चोपडा...
दादर स्टेशनबाहेर एका वडा-पावच्या ठेल्याच्या एका बाजूला हातात पाव घेऊन विलास आकाशाकडे पाहत असतो. ठेल्याच्या दुसऱ्या बाजूला एक मुलगी हातात वडा घेऊन आकाशकडे पाहत असते. विलासच्या मनात खयाल येतो की कभी कभी मेरे पाव में वडा आता है... त्या मुलीचं दिल पण कहतं की दुनिया में हर वडे के लिए एक पाव बनाया गया है... मेरे वडे के लिए भी पाव होगा... दोघं एकमेकांकडे पाहतात आणि ड्रीम सीन सुरू होतो. बर्फ अच्छादित डोंगराच्या मधोमध अनेक रंगांच्या फुलांनी भरलेलं एक मोठं मैदान आहे. विलास आणि ती मुलगी पांढऱ्या शुभ्र कपड्यात मैदानाच्या विरुद्ध बाजूना उभे आहेत. विलास हात उंचावतो आणि हातातला पाव समोर येतो. ती मुलगी हसते आणि तिच्या हातातला वडा पाहते. मग ती मुलगी त्या फुलांमधून विलासकडे धावते आणि त्याच्या पावात वडा ठेवते. ड्रीम सीन संपतो. विलास आणि ती मुलगी एकत्र उठतात. एकमेकांना पाहतात. जवळ येतात आणि वडा-पाव एकमेकांना बिलगतात...
प्रियदर्शन...
विलास दादर स्टेशनबाहेर येतो. समोर एक वडा-पावाचा ठेला असतो. त्यावर लिहिलं असतं, "अनुराधा वडा-पाव सेंटर, यक का डबल मिलेगा..." ठेल्यावर वडा-पाव विकणारा लीला, बाजूला उभा चोर राजू, भाडं वसूल करायला आलेला ठेल्याचा मालक खडक सिंह आणि लीलाचा मदतनीस छोटा पंडित, इतकीच माणसं असतात. विलास पैसे देतो. छोटा पंडित प्लेटमध्ये दोन वडा-पाव ठेवतो आणि त्याला चटणी लावणार इतक्यात राजू त्यातला एक वडा-पाव उचलून पळ काढतो. राजूने वडा-पाव चोरला म्हणून राहिलेला वडा-पाव घेऊन विलास राजूच्या मागे धावतो. चटणी लावायची राहिली म्हणून चटणीचा डबा घेऊन छोटा पंडित विलासच्या मागे धावतो. चटणीचा डबा परत आणायला लीला छोटा पंडितच्या मागे धावतो. भाडं घ्यायला खडक सिंह लीलाच्या मागे धावतो. राजूचा पाय एका झाडाखाली असलेल्या एका त्रिशुळात अडखळतो. राजू पडतो. झाडावर पाटी असते "भैरव कवच". त्रिशूळ हवेत उडून राजूच्या हातून वडा-पाव आपल्या टोकावर अडकवतो. मग त्रिशूळ जमिनीवर उभा राहतो. जांभळं वावटळ वर येतं आणि त्यातून एक भूत बाहेर येऊन त्रिशूळ धरतं. ते भूत म्हणतं, "आमी मोंजूलिका..." आणि वडा-पाव त्रिशुळावरून निघून विलासच्या हाती सामावतो...
साऊथचा ऍक्शन चित्रपट...
विलास दादर स्टेशनबाहेर येतो. रस्त्याच्या दुसऱ्या बाजूला वडा-पाववाला असतो. रस्त्यावर गाड्या भरधाव चालत असतात. विलास वडा-पाववाल्याकडे पाहून ओरडतो. वडा-पाववाला वर बघतो. तो एका हाताने वड्याला आणि दुसऱ्या हाताने पावाला विलासकडे भिरकावतो. विलास धावत्या गाडयांवर उड्या मारत हवेत झेप घेतो. डोळे किलकिले करून तो पाहतो तर पावाला चटणी नसते. विलास वडा-पाववाल्याला खूण करतो. वडा-पाववाला लगेच चटणीचं बाऊल हवेत उडवतो. हवेतच चटणी बाऊलपासून वेगळी होते. बाऊल तसंच खाली येत वडा-पाववाल्याच्या ठेल्यावर विसावतं. पाव उघडतो. हवेतली चटणी बरोब्बर पावाला जाऊन लागते. पाव खाली येत असताना वडा त्यात शिरतो. हवेतच विलास तोंड उघडतो. चटणी भरलेला वडा-पाव विलासच्या तोंडात अडकतो. विलास तसाच खाली येऊन दोन पायांवर उभा राहतो. त्याच्या पायाखालच्या जमिनीतून धुळीचं छोटं वावटळ उठतं. विलासच्या खिशातून पैसे बाहेर येत वावटळात शिरतात. वावटळ वडा-पाववाल्याकडे जाऊन शांत होतं. पैसे त्याच्या गल्ल्यात पडतात. इकडे विलास एक मोठा घास घेतो आणि निघून जातो...
महेश कोठारे...
विलासला दादर स्टेशन समोर वडा-पावचा ठेला दिसतो. ठेल्याचं नाव असतं "गिधाड वडा-पाववाले..." टकलू हैवान आणि झगड्या रामोशी ठेला चालवत असतात. सकाळपासून तिथे कोणीच फिरकलेलं नसतं. विलासला पाहून दोघं त्याच्याकडे येतात आणि त्याला उचलून ठेल्यावर आणतात. ठेल्यावर कवट्या महाकाळ आणि तात्या विंचूचे हार घातलेले फोटो असतात. ठेल्याच्या टपावर एक बाहुला बसवलेला असतो आणि त्यावर पाटी असते इनामदार भुसनळे. हे सारं पाहून विलास घाबरतो आणि जायला उठतो. पण टकलू आणि झगड्या त्याला अडवतात. बाजूलाच असलेल्या झाडाआडून लक्ष्या हे सगळं पाहत असतो. त्याचा थरथरट होतो. झाडाखाली बसून लक्ष्या थरथरू लागतो. त्यामुळे झाड हलू लागतं. एक बाटली वरून खाली पडते. लक्ष्या बाटली उचलतो आणि पाणी असेल म्हणून ती उघडतो. आतून धूर निघतो आणि पाठोपाठ इन्स्पेक्टर महेश कोलांटी उडी घेत बाहेर येतो. टकलू आणि झगड्याशी दे दणादण करून त्यांना हवेत उडवतो आणि पुन्हा बाटलीत जाऊन बसतो. लक्ष्या बाटली घेऊन जातो तर विलास तिथे असलेल्या वडा-पावांवर ताव मारून निघून जातो. नष्ट झालेल्या ठेल्यावर आता तो बाहुला पडलेला असतो. तो उभा राहत म्हणतो, "वडा-पाव... व्हळकॅम्बोचा वडा-पाव खाल्ला... आई ययी ययी ययी ययी ययी... सूड लक्ष्या सूड..."
केदार शिंदे...
संध्याकाळच्या ५.५५च्या ट्रेनने विलास दादर स्टेशनला उतरतो. त्याला भूक लागते. समोर एक दुकान असतं. त्यावर पाटी असते मदन सुखात्मे वडा-पाव सेंटर. दुकानावर खूप गर्दी असते आणि सगळे वडा-पावासाठी हात सरसावून उभे असतात. विलास एका माणसाला कारण विचारतो तेव्हा समजतं, की दामोदर पंत नावाचा माणूस हे दुकान चालवतो आणि मदन सुखात्मे यांनी यासाठी भांडवल दिलं. पंतांना वेळेचं भान फार म्हणून बरोब्बर ६ वाजता वडा-पाव विकायला सुरुवात होते. पण वडा-पाव अचानक गायब होतात आणि हातात कागद येतात. विलास तिथे जात असताना वाटेत एक देऊळ लागतं. देवीला नमस्कार करत विलास म्हणतो, "देवी, मला या रहस्याचा उलगडा होऊ दे..." एक प्रकाश येतो आणि आकाशवाणी होते, "होईल हां उलगडा..." विलास दुकानावर जातो. पंतांना पैसे देऊन वडा-पाव घेतो. वडा-पाव गायब होऊन विलासच्या हाती कागद येतो. देवीच्या शक्तीमुळे विलासला स्लो मोशनमध्ये एक आदिवासी येऊन वडा-पाव घेऊन जाताना दिसतो आणि एक वाडाही दिसतो. विलास कागद वाचतो तर त्यातही वाड्याच्या खुणा असतात. विलास वाड्यात पोहोचतो. तिथे गलगले, राजा, हरी, पुढारी, अण्णा, अशी अनेक भुतं असतात. श्रीरंग नावाचं भूत त्यांचा नेता असतं. श्रीरंग सांगतो आम्हाला पंतांनी केलेला वडा-पाव खूप आवडतो. घुम्या नावाच्या माणसाकरावी विलास एकदम शंभर वडा-पावांची ऑर्डर पंतांपर्यंत पोहोचवतो. शंभर वडा-पाव आल्यावर ते आदिवासी भूत विलासचा वडा-पाव त्याला परत देतं. विलास वडा-पाव खाणार इतक्यात वडा-पावमधून आवाज येतो, "आता हा मला खाणार. पहिल्यांदा कोणी माणूस खाणार मला... वाह..." "म्हणजे आता मला पदार्थांचे आवाज येऊ लागले... " असं म्हणत विलास आश्चर्याने वर बघतो. देवी आकाशात हसत असते...
@ अनिकेत परशुराम आपटे.

No comments:
Post a Comment