जारण, चेटुक, करणी, ब्लॅक मॅजिक या विषयांवर अनेक चित्रपट बनले आहेत. पण जारण हा विषय, एका वेगळ्या प्रकारे दाखवण्याचा प्रयत्न करणारा चित्रपट म्हणजे, हृषीकेश गुप्ते दिग्दर्शित, "जारण..."
ही कथा आहे राधाची (अमृता सुभाष). राधा लहान असताना, गंगुटी (अनिता दाते-केळकर) नावाची एक जखीण तिच्यावर जारण म्हणजे चेटुक करते. काळाच्या ओघात गाव लांब राहून राधा शहरात येते. तिचं लग्न होतं. आता तिचं एक छान विश्व असतं. म्हणजे राधा, तिचा नवरा शेखर (विक्रम गायकवाड) आणि त्यांचं मूल. राधाच्या या विश्वाला गालबोट लागतं, त्यांच्या गाडीला झालेल्या अपघातामुळे. त्या अपघातानंतर राधाचं आयुष्यच बदलतं. तिला भास व्हायला लागतात. वेगवेगळ्या गोष्टी दिसू लागतात. हे सगळं गंगुटीने केलेल्या जरणामुळेच होतंय असं वाटत राहतं. राधा या अवस्थेतून बाहेर येईल की नाही... गंगुटीचं काय झालं... ती आत्ता कुठे असेल... या प्रश्नांवर चित्रपट संपतो...
चित्रपटात दाखवलेलं गावाकडचं जुनाट घर एकदम छान आहे. माजघर, ओसरी, वृंदावन, माळा, झोपळा सगळं एकदम ठेवणीतलं. गंगुटी जिथे तंत्र-मंत्र करते, ती जागा कल्पकतेने सजवलेली आहे. राधाचं शहरातलं घरही छान निवडलं आहे. थ्रीलर चित्रपटात पार्श्वसंगीत आणि प्रकाश योजना, या दोन्ही गोष्टी जास्त महत्वाच्या असतात. या चित्रपटातही वाड्यात दाखवलेला प्रकाश, शहरातल्या घरात दाखवलेला प्रकाश कथेनुरूप आहे आणि व्यवस्थित परिणाम साधतो. पार्श्वसंगीत म्हणायचं तर काही वेगळ्या प्रकारचे आवाज वापरलेत. असे कुठलेही आवाज नाहीत जे जोरात येतात. जिथे जिथे सांगिताची गरज आहे, तिथे खालच्या पट्टीत ते ते संगीत सुरू होऊन मग वरची पट्टी गाठतं...
चित्रपटातल्या कलावंतांनी आपापल्या भूमिका छान वठवल्या आहेत. पण सर्वात उजव्या ठरल्यात त्या अनिता दाते-केळकर आणि अमृता सुभाष यांनी साकारलेल्या व्यक्तीरेखा. अनिताने त्यांचे डोळे, हसणं, तीक्ष्ण नजरेने बघणं, आवाज आणि हाव-भाव, यांचा यथायोग्य वापर करून गंगुटीचं व्यक्तिमत्व छान उभारलं आहे. एकाच वेळी किळसही वाटावी आणि दराराही निर्माण व्हावा अशी ती व्यक्तीरेखा रंगली आहे. चित्रपटाचं मुख्य पात्र, म्हणजे राधा रंगावताना अमृताने सुद्धा त्यांचं अभिनय कौशल्य पणाला लावलेलं दिसतं. राधाच्या मनातला भावनिक गोंधळ, लहानपणीच मनात बसलेली भीती, आस-पासच्या आणि राधाच्या घरच्या लोकांवरचा राग, हे सगळं अमृताने छान जमवून आणलं आहे...
चित्रपटात धक्कातंत्र आणि कॅमेरा अँगल्स यांचा वापर एकदम योग्य तर्हेने केलेला दिसतो. चित्रपटाची लांबी दोनेक तासांची असेल, पण मध्यंतरापर्यन्तचं कथानक जरा रटाळ वाटतं. ऐन मध्यंतरापूर्वी घडलेल्या एका सीनमुळे कथा एकदम वेगळी दिशा पकडते. खरंतर तिथूनच कथा वेग घेते असं म्हणायला हरकत नाही. चित्रपटात एक सीन तीन वेळा येतो. तीनही वेळेला त्या सीनचा शेवट कथानकाची दिशा बदलतो. चित्रपटाची सुरुवात ज्या कथाभागाने होते, चित्रपट पाहताना आपल्याला वाटतं, शेवटही त्याच कथाभागावर किंवा त्याच्या परिणामावर होईल. पण संभ्रमात टाकणारा वेगळाच शेवट दाखवण्याचा प्रयत्न चांगला आहे...
एकंदरीत, मल्टी-स्टारर, हाणामारी, कौटुंबिक समस्या, प्रेम प्रकरणं यांमध्ये अडकलेल्या चित्रपटांपासून थोडा वेगळा ठरणारा हृषीकेश गुप्ते लिखित, "जारण" हा चित्रपट पहायला हवा हे नक्की...
@ अनिकेत परशुराम आपटे.

No comments:
Post a Comment