Friday, 23 July 2021

व्हिलनचा अड्डा...

मराठी-हिंदी चित्रपटांचे अनेक पैलू आपण विचारात घेतो, जसे की कथा, संगीत, गाणी, कलावंत, उभारलेले सेट्स. या सर्वांमध्ये एक पैलू असतो हाणामारी असलेल्या चित्रपटातल्या व्हिलन्सचा अड्डा...

जुन्या जमान्यातले गावठी अड्डे...

दोन किंवा तीन टेकड्यांमध्ये खडकाळ भाग असतो, किंवा एखादी भली मोठी गुहा असते. त्यात मेन व्हिलनला बसायला चांगलासा गुळगुळीत दगड असतो आणि व्हिलनच्या माणसांनी बाकी दगड वाटून घेतलेले असतात. वस्तीपासून बरंच लांब एखाद्या जंगलात किंवा डोंगराळ प्रदेशात ही डाकू मंडळी आपले बस्तान बसवतात. अड्ड्याच्या मधोमध एकतर पाणी तरी असतं किंवा लाकडं रचून barbequeसारखं काहीतरी बनवलेलं असतं...

हे अड्डे निसर्गाच्या सानिध्यात असल्याने इथे कृत्रीम प्रकाशाची गरजच नसते. मुख्य डाकू जर शिकलेला असेल किंवा परिस्थितीला कंटाळून डाकू झाला असेल, तर अशा गुहांमध्ये कुठे ना कुठेतरी लुकलुकणारे बल्ब दिसतात. पण एरवी प्रकाशाचं म्हणाल, तर जागोजागी लावलेल्या मशालींवरच अशा अड्ड्यांची भिस्त असते. अशा ठिकाणी आपल्याला दोन दगडी खांब दिसतात, जिथे दोरखंडासह एखाद्या व्यक्तीला बांधलं जातं. "मि. नटवरलाल", "धडाकेबाज", "शोले", "चायना गेट", अशा डाकूछाप चित्रपटांत आपल्याला हे अड्डे पहायला मिळतात...

जुन्या जमान्यातले शहरी अड्डे...

एखादा जुनाट कारखाना किंवा रंग उडालेली दुमजली इमारत असते. त्याला लागूनच एक मैदान असतं. त्या मैदानात किंवा बिल्डिंगीत भरपूर ड्रम एकावर एक रचून ठेवलेले असतात. त्या ड्रमात काय असतं कोण जाणे, पण फाईट खाणारा त्या ड्रमांवर आदळतो आणि ड्रम धडाधड कोसळतात. मध्येच दोऱ्या लटकवलेल्या असतात. त्यांचं दुसरं टोक दिसत नाही, पण टार्झनसारखा एका ठिकाणाहून दुसरीकडे जायला त्यांचा उपयोग होतो. कुठे ना कुठे पाण्याचा एक भला मोठा माठ ठेवलेला असतो जो फायटिंग सुरू असताना फुटून जातो...

अशा अड्ड्यांवर लाईट्स फार कमी असतात. एखाद-दुसरा बल्ब, दोनेक ट्यूबा आणि कटकट आवाज करणारा पंखा. एक गोष्ट नक्की, अशा अड्ड्यांमध्ये साखळ्यांची कमतरता नसते. जितकी ओलीस माणसं असतील तितक्या साखळ्या मौजूद असतात. धरमेंद्रचा "आँखे", "अंदाज अपना अपना", "दे दणादण", "सीता और गीता", या आणि अशा अनेक चित्रपटांमध्ये हा अड्डा आपल्याला पहायला मिळतो...

आधुनिक अड्डे...

असे अड्डे सहसा एखाद्या चोर रस्त्याच्या शेवटीच असतात. एखाद्या तळघरात, एखाद्या आलिशान बिल्डिंगीत असलेल्या छुप्या दारापलिकडे, समुद्रातल्या एखाद्या बेटावर असे हे अड्डे बसवलेले असतात. इथे कुठलाही दरवाजा हाताने उघडला जात नाही, तर सेंसरने किंवा पासवर्डने किंवा शिट्टीच्या आवाजासारख्या एखाद्या ध्वनीने अशी दारं उघडली जातात. अशा अड्ड्यांवर सर्व गोष्टी बटणांच्या मदतीने केल्या जातात. इथे प्रकाशाची अजिबात कमतरता नसते, उलट झगामगा मला बघा अशी प्रकाश योजना असते...

वेगवेगळ्या प्रकारचे दिवे इथे लावलेले दिसतात. कधी बटणांच्या सहाय्याने तर कधी टाळ्या वाजवून हे दिवे चालू-बंद केले जातात. या अड्ड्यांमध्ये एक अशी जागा असते जिथे हिरो किंवा बाकी पॉझिटिव्ह (भूमिकेत पॉझिटिव्ह हां...) लोकांची दिशाभूल केली जाते किंवा कोड्यात टाकून त्यांच्या सभोवताली अडथळे निर्माण केले जातात. या आधुनिक अड्ड्यांचा एक नियम असतो बरं का. तो असा, की शेवटच्या फायटिंगच्या वेळी हे अड्डे हमखास नेस्तोनाबूत व्हायला लागतात. कधी व्हिलन स्वत:च पेरलेले बॉम्ब सुरू करतो तर कधी हिरो किंवा हिरोईन दिलेरी दाखवत बॉम्ब हल्ला करतात. "मि. इंडिया", लक्ष्याचा "अफलातून", "शान", "परवरीश" अशा काही चित्रपटांमध्ये हे आधुनिक अड्डे आपल्याला पहायला मिळतात...

मोकळे ढाकळे अड्डे...

गुंडांच्या अड्ड्यांमधला हा सर्वात भारी प्रकार आहे. कधी निसर्गाच्या सानिध्यात तर कधी भल्या मोठ्या बंगल्यात असे हे अड्डे भरवले जातात. इथे ट्यूब्सचा किंवा बल्बचा कृत्रीम प्रकाश तर असतोच, पण नैसर्गिक प्रकाशही चांगल्याच प्रमाणात असतो. असे अड्डे सहसा शहरांपासून लांब असतात. आजूबाजूला जंगल तरी असतं किंवा समुद्र तरी असतो. जर जंगल किंवा समुद्र नसेल तर एखादा मोठाला बंगला असतो ज्यात हे व्हिलन लोक ठाण मांडून बसतात...

अशा मोकळ्या-ढाकळ्या अड्ड्यांची एक खासियत असते बरं का... इथे शेवटची फायटिंग रात्री न होता दिवसा किंवा मावळतीपर्यंत दाखवली जाते. मशीन गन्स तर बहुतांश फाईट सीन्समध्ये असतातच, पण अशा मोकळ्या अड्ड्यांवर बॉम्स आणि हँडग्रेनेडचा जास्त वापर दिसतो. गुलशन राय काकांच्या, "मोहरा", "त्रिदेव", "विश्वात्मा", अशा बऱ्याच चित्रपटांत हे अड्डे दिसतात. शिवाय "थरथराट", "नरसिंहा" अशा चित्रपटांमध्येही हे मोकळे मोकळे अड्डे सापडतात...

असे हे विविध अड्डे, गब्बरसिंह, शाकाल, मोगँबो, टकलू हैवान, बादशाह, अशा भारदस्त मंडळींनी त्यांच्या स्पर्शाने पावन केले. उगाच आपण त्यांना नावं ठेवतो. किती कष्ट घेतले असतील या मंडळींनी... पोलीस आणि पब्लिक यांच्या नजरा चुकवून जागा पाहणे, तिथे आपला अड्डा बसवणे, शिवाय त्या अड्ड्याचा मेंटेनंस आलाच की... असे चित्रपट पुन्हा बनलेच, तर माझी हीच इच्छा राहील, की व्हिलन संपू देत, पण तो अड्डा मात्र शाबूत रहावा. अहो नव्या व्हिलनला तेवढाच कमी त्रास... नाही का...

@ अनिकेत परशुराम आपटे.

Tuesday, 20 July 2021

शोले (कविता)...

मंडळी, "शोले" हा चित्रपट सर्वांनाच माहित आहे. अनेकांनी तो बऱ्याच वेळा पाहिला आहे. हाच "शोले" वेगळ्या रूपात सादर करतो आहे. गोड मानून घ्या...


शोले (कविता)...

गब्बर सिंहचा कहर बरसला, रामगढ़ सारे भेदरले...
याच गब्बरला नमवण्यासाठी, ठाकूर बलदेवसिंह रणांगणात उतरले...

झुंज देता गब्बरशी, ठाकूरने कुटूंबासह हातही गमावले...
त्याचवेळी ठाकूरसाहेबांना, जय-वीरू हे भुरटे चोर आठवले...

जय-वीरू हे जिवलग मित्र, सर्वांच्या हातावर तुरी देत निसटले...
सूरमा भोपालीच्या मदतीने, अंग्रेज के ज़मानेवाल्या जेलरकडे प्रगटले...

मजेशीर क्लृप्त्या करून दोघांनी, जेलरच्या तोंडचे पाणी पळवले...
खोटं पिस्तुल दाखवून पळ काढत, सूरमा भोपालीचे घर त्यांनी गाठले...

बक्षीसाच्या रकमेतला हिस्सा घेऊन, जय-वीरूने सूरमा भोपालीचे घर सोडले...
पण पोलिसांच्या गराड्यात मात्र, तिथेच दोघंही अडकले...

अशा या जय आणि वीरूला, ठाकूरने बरोब्बर शोधले...
गब्बरला जिवंत पकडण्यासाठी, त्यांनी दोघांनाही रामगढ़ला बोलावले...

रामगढ़मध्ये दोघांनीही, राधा व बसंतीमध्ये सौंदर्य पाहिले...
वीरूला आवडली बडबडी बसंती, शांत राधावर जयने मन वाहिले...

सुरू झालं आता धुमशान, गब्बरसोबत चकमकींचे पीक पिकले...
जय-वीरू जिंकत होते कधी तर, कधी गब्बरने त्यांना हरवले...

अखेर रंगला महासंग्राम, गब्बर सिंहशी अंतिम युद्ध झाले...
वीरू-बसंती वाचले मात्र, जयने प्राणांचे बलिदान दिले...

हलते चित्र हे अमाप सुंदर, मोठ्या पडद्यावर रंगले...
पंचमदांच्या मधुर स्वरांनी, सर्वच पार गुंगले...

नाणेफेकीचे सारे कौल, नेहमी जयनेच जिंकले...
तो कसे काय हे जमवत असे, हे गुपित कथेच्या शेवटीच कळले...

व्यक्तिरेखा चित्रातल्या सर्वच्या सर्व, कोणी कधीच न विसरले...
जबरदस्त अशा संवादांनी, तेव्हाच अमृत प्राशन केले...

सलीम-जावेद यांच्या कथेवर, जे अप्रतीम चित्र रेखाटले...
तो चित्रपट म्हणजे, सिप्पींच्या रमेशचा, "शोले..."

@ अनिकेत परशुराम आपटे.

Wednesday, 14 July 2021

स्मृतिभ्रंशाचा भूलभुलैय्या...

काही जण एका ठिकाणी अडकले आहेत. सर्वांना स्मृतीभ्रंश झाला आहे. अशातच, अडकलेल्यांपैकी काही जण अपहरणकर्ते आहेत तर काहींचं अपहरण झालंय, असं समजलं तर... हाच प्लॉट आहे सुपर्ण वर्मा दिग्दर्शित, "ऍसिड फॅक्टरी" या चित्रपटाचा...

रोमियो, ओमी, सुलतान, जे.डी., मॅक्स आणि सार्थक हे सहा जण एका ऍसिड फॅक्टरीत अडकलेले असतात. गॅस लीक झाल्यामुळे सर्वांना तात्पुरता स्मृतिभ्रंश झालेला असतो. तेवढ्यात, कैझर (इर्फान खान) नावाच्या कुख्यात डॉनचा फोन येतो. त्या फोनवरून समजतं, की त्या सहा जणांपैकी एक मरणार आहे. इतरांसह स्वत:लाही न ओळखणारे ते सहा जण या फोनमुळे गोंधळतात आणि एकमेकांवर संशय घेऊ लागतात...

दुसरीकडे कैझरला पकडण्यासाठी जंग जंग पछाडणाऱ्या पोलिसांना चकवून कैझर निसटतो आणि फॅक्टरीकडे निघतो. तिथे फॅक्टरीत त्या सहा जणांमधला तिढा अधिकच वाढतो जेव्हा समजतं, की या सहा जणांपैकी दोघांचं अपहरण झालं आहे आणि बाकी चौघं कैझरच्या हाताखाली असलेले अपहरणकर्ते आहेत. एकमेकांच्या मदतीने या फॅक्टरीतून बाहेर पडण्याच्या निर्णयावर ते सहा जण पोहोचतात आणि एकेक करून सर्वांची स्मृती परत येते. सर्वांना एकमेकांची ओळख पटते आणि त्याच वेळी कैझर तिथे येतो. चांगले विरुद्ध वाईट असं धुमशान रंगतं आणि खलं व्यक्तींना शासन होतं...

फरदीन खान, डॅनी डेंग्झाँग्पा, मनोज बाजपाई, डीनो मोरिया, आफताब शिवदासानी आणि दिया मिर्झा या सर्वांनीच त्यांच्या त्यांच्या व्यक्तिरेखा छान वठवल्या आहेत. इरफान खान यांनी थंड डोक्याचा पण घातक असा कैझर भन्नाट रंगवला आहे. त्यांची संवादफेक व देहबोली चांगलाच भाव खाऊन जाते. पण standout performances ज्यांना म्हणता येईल असे दोनच कलावंत आहेत. ते म्हणजे मनोज बाजपाई आणि डॅनी...

प्रसंगी गंभीर दृष्यांना थोडं हलकं करण्याचं काम मनोज बाजपाई यांनी सुरेख जमवलं आहे. पण व्यक्तिरेखेतली नाविन्यता दिसली ती डॅनी यांनी साकारलेल्या भूमिकेमुळे. आजवर इतक्या चित्रपटांमधून मुख्य खलं भूमिका साकारणारे डॅनी, या चित्रपटात मात्र मुख्य खलनायकाच्या हस्तकाच्या भूमिकेत वेगळे पण छान वाटले. दिया मिर्झा, आफताब शिवदासानी आणि फरदीन खान यांच्या वाट्याला मात्र बऱ्यापैकी गंभीर स्वरूपाच्या व्यक्तिरेखा आल्या आहेत...

अशा action चित्रपटांचे दोन मुख्य आधारस्तंभ असतात, पार्श्वसंगीत आणि camera angles. चित्रपटाचे हे दोन्हीही आधारस्तंभ अतिशय भक्कम आहेत. कॅमेऱ्याने टिपलेले long shots, close shots, drone shots, त्या त्या वेळी येणाऱ्या साहसदृष्यांना चांगलेच परिणामकारक बनवतात. पार्श्वसंगीत जास्त तीव्र नाही, पण सर्व दृष्यांना बऱ्यापैकी पूरक आहे. चित्रपटातली एक गोष्ट मात्र थोडीशी खटणारी आहे. ती गोष्ट म्हणजे फरदीन खान आणि गुलशन ग्रोव्हर यांची एकत्रित दृश्य...

संपूर्ण चित्रपटात फरदीन खान व गुलशन ग्रोव्हर यांच्यात तीन दृश्य चित्रित झाली आहेत. त्यातल्या पहिल्या दोन दृश्यांमुळे कथेतल्या रहस्याचा काही भाग आधीच उघड होतो. त्या उलट, हीच दृश्य थोड्या वेगळ्या पद्धतीने चित्रित झाली असती तर गूढ अधिक फुलवता आलं असतं. संपूर्ण चित्रपटात इतर कलावंतांची येणारी दृश्य, खऱ्या रहस्याची उकल करण्यात मोलाचा हातभार लावतात. चित्रपटाचा शेवट तर छानच जमला आहे. चित्रपटाची सुरुवात स्मृतिभ्रंशाने होते आणि शेवटही तसाच होतो. अगदी शेवटच्या क्षणी, गाडी जाताना इरफान खानचा तो लुक संजय गुप्ता style, twist in the tailचा भन्नाट नमूना सादर करतो...

एकंदरीत, जर sleek and stylized action thriller पाहण्याची आवड असेल, तर २००९ सालचा, "ऍसिड फॅक्टरी" त्याच पठडीतला आहे...

@ अनिकेत परशुराम आपटे.

Sunday, 11 July 2021

सकारात्मकतेचा श्रीगणेशा...

एक मार्ग बंद झाला, की देव दुसरा मार्ग उघड करून देतो. त्या मार्गावर जर आपण हिमतीने चाललो, तर यश हमखासच मिळतं ही मोलाची शिकवण दिली आहे, विविध कोरेगावकर दिग्दर्शित, "पुन:श्च हरिओम" या चित्रपटाने...

ही कथा आहे रवी (विठ्ठल काळे), दीपाली (स्पृहा जोशी), रवीचे बाबा (संजय कुलकर्णी), रवीची आई (नीता शेंडे) आणि रवीची मुलगी (कश्वी सावंत) या पारकर कुटुंबाची. छोटी छोटी स्वप्न उराशी बाळगणाऱ्या पारकर कुटुंबावर अचानकपणे संकटं कोसळतात. आधी कोविडमुळे झालेलं लॉकडाऊन, मग वादळामुळे झालेलं नुकसान आणि दुकानाच्या भाड्यासाठी होणारा धमकीवजा तगादा, यांमुळे पारकर कुटुंबाची मानसिक व आर्थिक स्थिती खालावते आणि पराभवाची छटा सर्वांच्या चेहऱ्यावर दिसू लागते...

याच दरम्यान दीपाली व तिच्या मुलीला या संकटांमधून बाहेर पडण्याचा एक मार्ग सापडतो. घरच्यांकडून, प्रामुख्याने रवीकडून विरोध होईल हे माहित असल्याने दीपाली गुपचूपपणे तो मार्ग स्वीकारते. काही दिवसांनी रवी व इतर कुटुंबियांना दीपालीचं हे गुपित समजतं. समज-गैरसमजाच्या फेऱ्यातून बाहेर पडत पारकर कुटुंबीय एकत्र येऊन आलेल्या संकटांना हरवण्याच्या मार्गावर चालण्याचा श्रीगणेशा करतात...

कथानकाची मांडणी छान आहे. सर्व कलावंतांची अदाकारी तर उत्तम झालीच आहे. पण पार्श्व संगीतानेही चित्रपटात मोलाचा वाटा उचलला आहे. रवीची हतबलता आणि दीपालीची लढवैय्येवृत्ती एकाच वेळी दाखवताना पार्श्वसंगीताने कमाल केली आहे. मुलीने काढलेला आपला व्हिडियो पाहताना, "याचा असाही उपयोग होऊ शकतो..." ही गोंधळलेली पण आनंदी भावना चेहऱ्यावर दाखवणारी दीपाली आणि आपण काहीच करत नाही म्हणून निराश झालेला व त्याच नैराश्याचा उद्रेक बायकोवर काढणारा रवी... चित्रपटातले हे दोन सीन विशेष लक्षात राहतात...

एकंदरीत, एका सामान्य कुटुंबाची असामान्य कथा दाखवणारा मिताली जोशी लिखित, "पुन:श्च हरिओम" हा चित्रपट, सकारात्मक विचार मांडणारा आहे हे नक्की...

@ अनिकेत परशुराम आपटे.

Friday, 9 July 2021

संघर्ष कथा...

दाक्षिणात्य चित्रपट म्हटले, की डोळ्यांसमोर येतात अशक्यप्राय हाणामारीची दृष्य आणि उडत्या चालींवरच्या गाण्यांमधली दिलखेचक नृत्य. काही दाक्षिणात्य चित्रपट मात्र याला अपवाद ठरले. अशाच वेगळ्या धाटणीच्या चित्रपटांमधला एक म्हणजेच, १९९२ साली प्रदर्शित झालेला, मणिरत्नम दिग्दर्शित "रोजा..."

एकीकडे श्रीनगरमध्ये कर्नल रायप्पा (नासीर) आपल्या जवानांसह वसीम ख़ान (शिवा रिंदानी) या कुख्यात आतंकवाद्याला जेरबंद करतो, तर दुसरीकडे दक्षिण भारतातल्या एका छोट्या गावात लहानाची मोठी झालेली रोजा (मधू), आपल्या मोठ्या बहिणीच्या (वैष्णवी) लग्नाची स्वप्न पाहत असते. रोजाच्या मोठ्या बहिणीचं लग्न, रॉ या संस्थेत काम करणाऱ्या ऋषी कुमार (अरवींद स्वामी) सोबत होणार असतं. ऐनवेळी ऋषी रोजाच्या मोठ्या बहिणीला नकार देऊन रोजाशी लग्न करण्याचा प्रस्ताव ठेवतो. रोजाला हे मान्य नसूनही आई-वडिलांसाठी ती तयार होते...

मोठ्या बहिणावर अन्याय झाला या भावनेने दु:खी झालेली रोजा, ऋषीसोबत मद्रासला येते. रोजा ऋषीशी तुटकपणे वागू लागते. त्याचा रागराग करू लागते. आपल्या मोठ्या बहिणीचं आधीच एका मुलावर प्रेम होतं आणि तिनेच ऋषीला नकार द्यायला सांगितलं असतं हे सत्य कळल्यावर मात्र रोजा ऋषीची माफी मागते. एका नव्या नात्याला सुरुवात होते आणि ऋषी व रोजामधलं प्रेम बहरत जातं. चित्रपटाचा हा पूर्वार्ध शांत, रोमँटिक, गोडीगुलाबीचा असा आहे. उत्तरार्ध सुरू होण्याच्या काही क्षण आधी, कामानिमित्त काश्मीर खोऱ्यात आलेल्या ऋषीचं अपहरणनाट्य घडतं आणि तिथूनच कथेला अनपेक्षित कलाटणी मिळते...

चित्रपट उत्तरार्धात प्रवेश करतो आणि एक रंजक व वेगवान कथाभागाला सुरुवात होते. दहशतवादाच्या पार्श्वभूमीवर बेतलेला हा उत्तरार्ध खरंतर संघर्षकथा म्हणता येईल. वसीम ख़ान सुटू नये म्हणून सेनेने केलेला संघर्ष, आतंकवाद्यांचं मतपरिवर्तन व्हावं म्हणून ऋषीने केलेला संघर्ष असे संघर्षांचे वेगवेगळे पैलू यात दिसतात. अखेर आतंकवाद्यांच्या म्होरक्याचं मन बदलतं आणि तो ऋषीला सोडून देतो, वसीम ख़ानला सेना घेऊन जाते आणि रोजा व ऋषीचं गोड मिलन होतं...

चित्रपटातली रोजाची मध्यवर्ती व्यक्तिरेखा अभिनेत्री मधू यांनी उत्तम वठवली आहे. लग्नापूर्वीची खट्याळ, अवखळ रोजा आणि लग्नानंतरची गंभीर रोजा, हा बदल तर दाखवून दिलाच आहे. पण नवऱ्याबद्दलचा राग, त्याच्याबद्दलचं प्रेम, शारिरीकदृष्ट्या कमकूवत असल्याने आणि भाषा न आल्याने आपलं म्हणणं मांडू न शकल्यामुळे निर्माण झालेली हतबलता आणि अखेर नवरा परतल्याने झालेला परमानंद, अशा वेगवेगळ्या छटा दाखवत मधू यांनी भूमिकेला पुरेपूर न्याय दिला...

मधूसोबतच अभिनेते पंकज कपूर यांनी त्यांच्या वाट्याला आलेली लियाक़त ही व्यक्तिरेखा सुरेख साकारली आहे. थंड डोक्याने कट रचणारा लियाक़त, ऋषीच्या बोलण्याने मनात वेगळे विचार येऊन थोडा मवाळपणाकडे झुकलेला लियाक़त, भावाच्या मृत्यूने उध्वस्त झालेला लियाक़त, या छटा सादर करताना पंकज कपूर यांची अदाकारी लाजवाब होती...

चित्रपटाचा तिसरा आणि महत्वाचा भाग म्हणजे चित्रपटाला लाभलेलं अप्रतीम संगीत. संगीत दिग्दर्शक म्हणून पदार्पण करणाऱ्या ए.आर.रहमान यांनी चित्रपटाच्या कथेच्या दोन्हीही भागांना साजेसं संगीत दिलेलं आहे. रहमान यांनी संगीतबद्ध केलेल्या, "यह हसीन वादियाँ यह खुला आसमान...", "दिल है छोटासा...", "रोजा जानेमन...", "भारत हमको जान से प्यारा है..." अशा एकापेक्षा एक अप्रतीम गाण्यांनी चित्रपटाच्या कथेवर सुवर्णकळस चढवला...

एकंदरीत, दहशतवादाच्या पार्श्वभूमीवर बेतलेली ही अप्रतीम संघर्षकथा दाखवणारा, मणिरत्नम लिखीत, राष्ट्रीय पुरस्कार विजेता "रोजा" हा चित्रपट, एक नितांत सुंदर व अभिजात कलाकृती आहे यात वादच नाही...

@ अनिकेत परशुराम आपटे.