Monday, 7 June 2021

सागर जैसी आँखोंवाली बॉबी...

‘हम तुम एक कमरे में बंद हो... और चाबी खो जाए...’ “बॉबी” चित्रपटातलं हे गाणं ऐकलं की आपल्याला आठवते प्रसिद्ध अभिनेत्री डिंपल कपाडिया. वयाच्या १६व्या वर्षीच आपल्या अभिनयाच्या जोरावर प्रकाशझोतात आलेल्या अभिनेत्री डिंपल कपाडिया यांचा “बॉबी” हा पहिला चित्रपट होता...

लहान वयात मिळालेल्या सुवर्ण संधीचे डिंपल कपाडिया यांना त्या वेळी सोने करता आलं नाही. याचं कारण असं, की “बॉबी” प्रदर्शित होण्याच्या आधी डिंपल कपाडिया यांनी ‘सूपर स्टार’ राजेश खन्ना यांच्याशी विवाह केला आणि सांसारिक जबाबदाऱ्या पार पाडण्यासाठी चित्रपटसृष्टीतून सन्यास घेतला...

“बॉबी” चित्रपटानंतर तब्बल १२ वर्षांनी डिंपल कपाडिया यांनी “सागर” या चित्रपटाद्वारे रुपेरी पडद्यावर पुनरागमन केलं. चित्रपटाच्या यशाबरोबरच एक उत्तम अभिनेत्री आणि नायिका म्हणून डिंपल कपाडिया प्रेक्षकांच्या मनात विराजमान झाल्या. पुढे, “अर्जून”, “जाँबाज”, “इंसानियात के दुश्मन”, “राम लखन”, “बँटवारा”, “लेकिन”, “आग का गोला”, “नरसिंह” अशा अनेक वेगवेगळ्या विषयांच्या चित्रपटांमधून नायिका म्हणून त्या प्रेक्षकांसमोर येत राहिल्या...

"सेक्स सिंबॉल" किंवा "सौंदर्यवती" या ओळखींना बाजूला सारत, नायिकाप्रधान चित्रपटांतल्या संवेदनशील भूमिकांमध्ये डिंपल कपाडिया जास्त दिसल्या. "प्रहार", "क्रांतिवीर", "काश", "दृष्टि", "गर्दीश", "औरत औरत औरत", अशा चित्रपटांमधून गंभीर स्वरूपाच्या भूमिका निभावताना त्या दिसल्या. "रुदाली" या चित्रपटातली त्यांची अदाकारी तर आपण विसरत नाहीच, पण चित्रपटाच्या शेवटी त्यांनी दिलेला रडण्याचा शॉट आजही अंगावर काटा उभा करतो...

नायिका, सहनायिका किंवा संवेदनशील अभिनेत्री म्हणून आपण सर्वच डिंपल कपाडिया यांना ओळखतो. पण एक खलनायिका म्हणूनही त्यांनी आपला चाहतावर्ग तयार केला तो १९८८ साली प्रदर्शित झालेल्या, "बीस साल बाद" या भयपटाद्वारे. चित्रपट फारसा चालला नाही, पण डिंपल कपाडिया यांनी साकारलेली प्रियकराला परत मिळवणाऱ्या एका अतृप्त आत्म्याची भूमिका विशेष लक्षात राहिली...

विविध प्रकारच्या चित्रपटांमधून यशस्वी होत असताना डिंपल कपाडिया यांनी आपला मोर्चा सहायक आणि चरित्र भूमिकांकडे वळवला. "दिल अशना है”, “दिल चाहता है”, “बनारस”, “हम कौन है”, “दाबंग”, “पतियाला हाऊस”, "वेलकम २" या चित्रपटांमधून चरित्र आणि सहायक भूमिका करताना डिंपल कपाडिया यांनी स्वत:चे वेगळे असे स्थान मिळवले...

आज ८ जून. हिंदी चित्रपटसृष्टीतल्या, सागर जैसी आँखोंवाल्या बॉबीचा म्हणजेच डिंपल कपाडिया यांचा आज वाढदिवस. आजच्या दिवसाच्या त्यांना मनापासून शुभेच्छा...

@ अनिकेत परशुकाम आपटे.

1 comment: