“डिस्को डान्सर” हे शब्द कानी पडताच आपल्याला आठवतात गौरांग चक्रवर्ती अर्थात आपल्या सर्वांच्या परिचयाचे मिथुनदा म्हणजेच प्रसिद्ध अभिनेते मिथुन चक्रवर्ती...
कोलकात्यात जन्मलेल्या मिथुनदांनी त्यांच्या प्रदीर्घ कारकिर्दीची सुरुवात, १९७६ साली प्रदर्शित झालेल्या “मृगाया” या चित्रपटाने केली. लक्षात घेण्याची गोष्ट म्हणजे याच चित्रपटासाठी मिथुनदांना त्यांचा पहिला राष्ट्रीय पुरस्कारही मिळाला होता. पुढे, “दो अनजाने” व “फूल खिले हैं गुलशन गुलशन” या चित्रपटात छोट्या भूमिका साकारताना, १९७८ साली प्रदर्शित झालेला “मेरा रक्षक” हा चित्रपट त्यांचा पहिला यशस्वी चित्रपट ठरला. तिथून मिथुनदांना मिळाली “Action Hero” ही नवी ओळख आणि “सुरक्षा”, “जागीर”, “वतन के रखवाले”, “कमांडो”, “बॉक्सर”, “ग़ुलामी” अशा हाणामारी चित्रपटांची लांबच लांब रांग लागली. काही चित्रपट अयशस्वी ठरले तर काही यशस्वी झाले, पण मिथुनदांवर चित्रीत झालेल्या साहस व हाणामारीच्या दृश्यांची विशेष चर्चा राहिली...
एकीकडे मिथुनदांचे हाणामारीवाले चित्रपट चर्चेत असताना, त्या आणि इतर काही चित्रपटांमधली त्यांची नृत्यही प्रशंसा मिळवून गेली. १९८२ साली प्रदर्शित झालेल्या “डिस्को डान्सर” या चित्रपटाने मिथुनदांना “डान्सर नट” ही नवी ओळख मिळाली. त्यांच्या, “Pelvic Dance Style” या विशिष्ट नृत्यप्रकाराने अक्षरश: धुमाकूळ घातला होता. ८०चं दशक मिथुनदांचा सुवर्णकाळ होता असं म्हणायला हरकत नाही. जवळ जवळ शंभरहून अधिक चित्रपटात झळकून मिथुनदांनी प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं. एकीकडे नृत्य तर दुसरीकडे हाणामारी अशा दुहेरी रस्त्यावरून मार्गक्रमण करताना, “शौकीन”, “पसंद अपनी अपनी”, “बात बन जाये” अशा काही वेगळ्या विषयांवरच्या चित्रपटात काम करत मिथुनदांनी प्रशंसा मिळवली. ९०च्या दशकात मिथुनदांनी काही काळ चित्रपटांपासून लांब राहत ऊटी येथे ‘मोनार्क हॉटेल’ बसवलं...
त्या ठिकाणी होणाऱ्या चित्रपटांच्या चित्रिकरणादरम्यान मिथुनदांनी चित्रपटकर्त्यांना आपल्याच हॉटेलमध्ये राहण्याची व्यवस्था करून दिली. याचमुळे मिथुनदांसाठी अनेक चित्रपटांचे दरवाजे उघडले आणि लो बजेट व बी ग्रेड हाणामारीच्या चित्रपटांचा जणू पाऊसच पडला. अशा चित्रपटात रमले असताना २००५ साली प्रदर्शित झालेल्या “ऐलान” या थरारपटाने मिथुनदा पुन्हा मुख्य प्रवाहात आले. तो चित्रपट फारसा चालला नाही, पण मिथुनदांची अदाकारी आणि संवादफेक स्तुती मिळवून गेली. मिथुनदांच्या या सेकंड इनिंगमध्ये, “गुरू”, “दिल दिया है”, “लकी”, “गोलमाल ३”, “हाऊसफुल २”, “लक” अशा अनेक चित्रपटांमध्ये सहायक व्यक्तिरेखेत ते झळकले...
अदाकारीखेरीज मिथुनदा प्रसिद्ध होते चित्रपटांमधील त्यांच्या विविध नावांमुळे. "सुरक्षा"मधला 'गनमास्टर जी ९' असो किंवा "डिस्को डांसर"मधला 'जिमी' असो, "अग्निपथ"मधला 'कृष्णन अय्यर एम.ए.' असो किंवा "बॉक्सर"मधला 'शंकर' असो, मिथुनदांना मिळालेली चित्रपटातली नावं त्यांच्या चित्रपटांइतकीच लोकप्रिय होती...
आज १६ जून. मिथुनदांचा आज वाढदिवस. या डांसिंग गनमास्टरला वाढदिवसाच्या मनापासून शुभेच्छा...
कोई शक...
@ अनिकेत परशुराम आपटे.



No comments:
Post a Comment