'मी मिस्टर धनंजय माने, आणि हा माझा बायको पार्वती...’, ‘काळा पहाड म्हणतात मला, काळा पहाड...’, ‘छें, कित्तें रें, मी प्रोफेसर धोंड...’, ‘व्ह्हा विह्ही वूह्हू...’ हे अजरामर संवाद कानी पडले एक आठवण होते अशोक मामांची म्हणजेच दिग्गज अभिनेते अशोक सराफ यांची...
१९६९ साली प्रदर्शित झालेल्या “जानकी” या चित्रपटाद्वारे त्यांनी रुपेरी पडद्यावर पदार्पण केले. पुढे २५०हून अधिक चित्रपटांमधून झळकत अशोक मामा यांनी रुपेरी पडदा गाजवला. त्यांनी बहुतकरून विनोदी चित्रपटांमध्ये जास्त भूमिका निभावल्या. “गुपचूप गुपचूप”, “एक डाव भुताचा”, “भुताचा भाऊ”, “धूम धडाका”, “अशी ही बनवाबनवी”, “गोंधळात गोंधळ”, “एकापेक्षा एक”, “ठकास महाठक”, “बिनकामाचा नवरा” अशा अनेक विनोदी चित्रपटांमधून नायक म्हणून प्रेक्षकांसमोर येत अशोक मामा अत्यंत लोकप्रिय झाले...
विनोदी अभिनेते म्हणून प्रसिद्ध असेलेले अशोक मामा संवेदनशील आणि गंभीर स्वरूपाच्या भूमिकांमध्येही तितकेच लोकप्रिय झाले. “भस्म” या चित्रपटातली अशोक मामांची वेगळ्या धाटणीची व्यक्तिरेखा आजही प्रेक्षकांच्या स्मरणात आहे. त्याचसोबत, “वाट पाहते पुनवेची”, “अनपेक्षित” , “वजीर” अशा काही चित्रपटांमधूनही अशोक मामा नकारात्मक भूमिकेतही दिसले. “चौकट राजा”, “मधुचंद्राची रात्र”, “आपली माणसं”, “हेच माझं माहेर”, “कुंकू”, “एक उनाड दिवस” अशा चित्रपटांमधून अशोक मामा यांच्या गंभीर आणि सक्षम अभिनयाची प्रेक्षकांना ओळख पटली...
मराठी चित्रपटांमध्ये अत्यंत लोकप्रिय असलेले अशोक सराफ मराठी नाटकांमध्येही तितकेच अग्रेसर होते. “हमिदाबाईची कोठी”, “अनधिकृत”, “मनोमिलन”, “सारखं छातीत दुखतंय”, “संगीत संशयकल्लोळ”, “लगीनघाई” ही अशोक मामा अभिनीत नाटकं आजही रसिकांच्या मनात घर करून आहेत. मराठी चित्रपट आणि नाटकांमध्ये अशोक मामांची कारकीर्द बहरत असताना हिंदी मालिका आणि चित्रपटांमध्येही हात आजमावला...
“करण-अर्जून”, “कोयला”, “घर घर की कहानी”, “सिंघम”, “प्यार किया तो डरना क्या”, जोरू का गुलाम”, “गुप्त”, “येस बॉस” अशा अनेक हिंदी चित्रपटांमध्ये अशोक मामांच्या छोट्या-छोट्या भूमिका प्रचंड गाजल्या. शिवाय "डोंट वरी हो जाएगा", "चुटकी बजाके" या हिंदी मालिकांमधून झळकत अशोक मामांनी प्रशंसा मिळवली. “हम पांच” या गाजलेल्या हिंदी मालेकेतल्या अशोक मामांच्या 'आनंद माथूर' या व्यक्तिरेखेने अफाट यश मिळवलं आणि अशोक मामा मराठीसोबत हिंदी चित्रपट आणि मालिकाक्षेत्रातही अतिशय यशस्वी व लोकप्रिय झाले...
मिळालेले चित्रपट, नृत्यशैली आणि संवादफेक यांसाठी अशोक मामा जितके प्रसिद्ध होते, तितकेच ते जाणले गेले चित्रपटांतल्या त्यांच्या जोड्यांमुळे. मराठी चित्रपटसृष्टीतली सर्वात यशस्वी जोडी म्हणजे अशोक-लक्ष्या. "धमाल जोडी", "धमाल बाबल्या गणप्याची", "एक गाडी बाकी अनाडी", "बाळाचे बाप ब्रह्मचारी", "अफ्लातून", "तू सुखकर्ता" असे लोकप्रिय चित्रपट देत ही जोडी मराठी चित्रपटसृष्टीत अजरामर झाली. मराठी चित्रपटांतली अजून एक बहुचर्चित जोडी म्हणजे सचिन-अशोक. "भुताचा भाऊ", "आमच्यासारखे आम्हीच", "गम्मत जम्मत" अशा चित्रपटांमुळे ही जोडी प्रेक्षकांच्या मनात घर करून गेली...
"नाकावरच्या रागाला औषध काय..." आणि "अश्विनी ये ना..." या गाण्यांनीसुद्धा अशोक मामांसोबत एक वेगळी जोडी जमवली. ती जोडी होती अशोकमामा आणि योगायोगाची. "नाकावरच्या रागाला..." हे गाणं स्वत: अशोक मामांनी गायलं होतं तर "अश्विनी ये ना..." या गाण्यासाठी दिग्गज गायक किशोर कुमार यांनी आपला आवाज दिला होता. यात योगायोगाचा भाग असा, की ही दोन्हीही गाणी अशोक मामांवर चित्रीत झाली होती आणि दोन्हीही गाण्यांच्या गायकांचं मराठीतलं ते पहिलंच गाणं होतं...
आज ४ जून. अशोक सराफ नावाच्या या चतुरस्त्र अभिनेत्याचा आज जन्मदिवस. मराठी-हिंदी नाट्य-चित्रसृष्टीच्या या बहुरंगी मामांना वाढदिवसाच्या मनापासून शुभेच्छा...
@ अनिकेत परशुराम आपटे.





No comments:
Post a Comment