आपण जेव्हा एखाद्या चित्रपटाच्या sequelचा विचार करतो तेव्हा त्यात मुख्यत्वे काय असतं... तर कथानक, पात्रांची नावं आणि कलावंत हे, मागच्या चित्रपटापासून पुढे सुरू होतात. "बाहुबली", "टाईमपास", "वास्तव", "दगडी चाळ" हे काही चित्रपट आहेत ज्यांचे सीक्वेल आले आणि बऱ्यापैकी गाजलेही. पण काही वर्षापूर्वी असे दोन चित्रपट होऊन गेले, जे म्हणायला सीक्वेल नव्हते. पण काही बाबतीत दोघांमध्ये साम्य होतं...
प्रिन्स नावाच्या एका ज्वेल थीफने धुमाकूळ घातलेला असतो. एका बाजूला पोलीस कमिशनर त्या प्रिन्सला पकडण्याचा निर्धार करतो तर दुसरीकडे खरा ज्वेल थीफ हा कमिशनरचा मुलगा विनयच आहे अशी हवा निर्माण होते आणि विनय त्यात नकळत अडकतो. या सापळ्यातून विनय कसा सुटतो आणि खरा ज्वेल थीफ कसा पकडला जातो ते शेवटी स्पष्ट होतं...
रिटर्न ऑफ ज्वेल थीफ (१९९६)...
एकेकाळी हिऱ्यांना पैलू पाडण्यात तरबेज असणारा विनय आता हिऱ्यांचा एक मोठा व्यापारी असतो. त्याचं स्वप्न असतं 'कोहिनूर' भारतात आणून त्याचं प्रदर्शन भरवायचं. अथक प्रयासांनी 'कोहिनूर' भारतात येतो आणि अनेक ज्वेल थीफ 'कोहिनूर' चोरण्याचे कट रचतात. या सर्व चोरात एकेकाळचा आघाडीचा ज्वेल थीफ प्रिन्सही सामिल असतो. 'कोहिनूर'ची चोरी होते आणि त्या चोरीचा आळ येतो प्रिन्सचा मुलगा आणि आत्ताचा कमिशनर सूर्यदेवसिंह याच्यावर. 'कोहिनूर' परत मिळवून खऱ्या ज्वेल थीफला पकडण्याचा निर्धार सूर्या करतो. अखेर 'कोहिनूर'ही सापडतो आणि खरा ज्वेल थीफही जगासमोर येतो...
साम्य...
दोन्हीही चित्रपट वेगळ्या धाटणीचे होते. "ज्वेल थिफ" एक suspense thriller होता, तर "रिटर्न ऑफ ज्वेल थिफ" suspensच्या कोंदणात बसवलेला एक मसालापट होता. तरीही, दोन्ही चित्रपटांतल्या काही दृष्यांमध्ये बऱ्यापैकी साम्य होतं. दोन्हीही चित्रपटात एक अपहरण नाट्य दाखवलं गेलं. या दृष्याचा कथेशी काय संबंध असेल असा विचार करत असताना, ते दृष्य खरंतर चित्रपटाच्या मुख्य गाभ्याशी निगडीत होतं हे अगदी शेवटी शेवटी समजतं. दोन्हीही चित्रपटात मुख्य नायकाला आपल्या कह्यात घेण्यासाठी shock therapyचा वापर केला गेला ज्यानंतर नायक काही काळासाठी खलनायकाच्या भूमिकेत शिरतो...
दोन्हीही चित्रपटातल्या सहनायिकांची भूमिका कथेशी जुळणारी नव्हती. "ज्वेल थिफ"मधली तनुजा आणि "रिटर्न ऑफ ज्वेल थिफ"मध्ये दिसलेली मधू, या दोन्हीही सहनायिका थोड्या patchworkसारख्या वाटल्या. अर्थात, दोन्हीही चित्रपटातील गूढ अजून गडद करण्यासाठी या सहनायिकांचा वापर केला गेला, पण त्यांना न घेताही कथा मांडता आली असती. दोन्हीही चित्रपटात 'दुहेरी भूमिका' (double role) या गोष्टीचा वापर केला गेला, पैकी एक चांगली आणि एक वाईट अशी मांडणी होती...
वेगळेपणा...
जिथे चित्रपटाच्या संगीतात "ज्वेल थिफ" हा "रिटर्न ऑफ ज्वेल थिफ"पेक्षा अग्रेसर आहे. एस.डी.बर्मन यांच्या मधाळ संगीतापुढे जतिन-ललित यांचं उडत्या चालींवरचं संगीत थोडं कमकुवत वाटतं. पण तिथेच, पार्श्वसंगीतात "रिटर्न ऑफ ज्वेल थिफ"ने "ज्वेल थिफ"ला मागे टाकलं आहे. अदाकारीमध्ये जिथे "ज्वेल थिफ" सरस ठरतो, तिथे हाणामारी आणि साहसदृष्यांमध्ये "रिटर्न ऑफ ज्वेल थिफ" पुढे जातो...
Suspense जिवंत राखण्याच्या बाबतीत मात्र "ज्वेल थिफ" सरस ठरला आहे. खरा ज्वेल थिफ कोण हे स्वत: ज्वेल थिफ समोर आल्याशिवाय समजत नाही. या बाबतीत "रिटर्न ऑफ ज्वेल थिफ" थोडा मार खातो. चित्रपटात जशी नायक-नायिकांची फौज आहे, तशी खलनायकांचाही जत्था आहे. या सगळ्यातून पुढे जाताना खरा ज्वेल थिफ कोण असू शकेल हे चाणाक्ष प्रेक्षक समजून जातात खरे पण त्यातही एक ट्विस्ट आल्यामुळे चित्रपटात रंगत निर्माण होते...
एकंदरीत, वेगळ्या धाटणीचे हे दोन्हीही चित्रपट sequel पठडीत बसत नसले तरी काही कलावंत, कलावंतांची नावं आणि काही दृष्यांमुळे "रिटर्न ऑफ ज्वेल थिफ" हा आधीच्या "ज्वेल थिफ"चा पुढचा भाग वाटावा इतपत साधर्म्य दोन्हीही चित्रपटात आढळून येतं...
@ अनिकेत परशुराम आपटे.
.jpeg)
.jpeg)
No comments:
Post a Comment