Monday, 30 January 2023

फसलेल्या खुनांची अपघाती मालिका...

कुठल्याही रहस्यमय चित्रपटाची सुरुवात जितकी उत्कंठावर्धक असते, शेवटही तितकाच रंजक असावा लागतो. असाच एक चित्रपट म्हणजे परेश मोकाशी दिग्दर्शित, "वाळवी..."


चित्रपट सुरू होतो एका खुनाच्या योजनेने. A perfect pre-planned murder. त्या योजनेला सुरूंग तेव्हा लागतो, जेव्हा समजतं, की प्रत्यक्ष खुनाचा एक साक्षीदारही अस्तित्वात आहे. त्यानंतर स्वत:ला वाचवण्याचा एक प्रवास सुरू होतो. त्या प्रवासात, एक गुन्हा लपवायला अपघाताने का होईना, पण अजून गुन्हे घडत जातात. एका ठिकाणी, आपण कल्पनाही करू शकत नाही अशी गोष्ट घडते आणि गुन्ह्यांची मालिका आणि गुन्हेगारांचा प्रवास दोन्हीही तिथेच थांबतं...

चित्रपटात स्वप्नील जोशी, सुबोध भावे, शिवानी सुर्वे, अनीता दाते असे मोजकेच कलावंत आहेत. प्रत्येक कलाकाराने मिळालेल्या भूमिकेत जीव ओतला आहे. कथेचा विषय गंभीर स्वरूपाचा आहे खरा, पण महेश ढाकणे यांच्या खुसखुशीत संवादांनी, त्या गंभीर विषयालाही बऱ्यापैकी विनोदी बनवलं आहे. चित्रपटातील प्रत्येक सीन, "पुढे काय होणार..." हाच प्रश्न उपस्थित करत राहतो. चित्रपटात दोन वेळा आलेला साधा वेफर खाण्याचा सीनसुद्धा छान जमून गेला आहे...

चित्रपटात फार काही फापट-पसारा दिसत नाही. पात्रांची ओळख, गाणी-घेणी, मेलोड्रामा अशी लांबण न लावता थेट मुद्द्यावर चित्रपट सुरू होतो. कथेच्या अनुषंगाने पात्रांची आपोआपच ओळख पटते. कथाही बऱ्यापैकी वेग राखून आहे. काही प्रसंग आणि काही गोष्टी जेव्हा समोर येतात, तेव्हा कथानक वेगळं वळण घेईल असं वाटत राहतं. पण तसं न होता, आपला मार्ग न सोडता कथा पुढे सरकते यातच चित्रपट उजवा ठरतो...

चित्रपटातला सर्वात महत्वाचा टप्पा म्हणजे, एखाद्या विजेरीसारखा येणारा चित्रपटाचा शेवट. काही क्षण आपण विचार करत बसतो, की "अरे, असं कसं झालं..." पण पुन्हा सुरुवातीपासून चित्रपटाचं आकलन केल्यावर आपल्याला समजतं, की Twist in the tail घेऊन येणारा चित्रपटाचा हा शेवट, कथानकाच्या वेगाशी तर समरस आहेच, पण कथेत घडलेल्या प्रसंगासाठी अगदी योग्य आहे...

खरंच खून झाला का... जर झाला, तर तो कोणी केला... खून होताना कोणी पाहिलं का... जर पाहिलं, तर त्या साक्षीदाराचं पुढे काय झालं... चित्रपटाचं शीर्षक असं का आहे... या सर्व प्रश्नांची उकल करायची असेल, तर मधुगंधा कुलकर्णी आणि परेश मोकाशी लिखीत, "वाळवी" हा चित्रपट पहायलाच हवा...

@ अनिकेत परशुराम आपटे.

No comments:

Post a Comment