Thursday, 19 January 2023

सकारात्मक दोस्त...

"गाड़ी बुला रही है..." या गाण्याच्या शब्दांच्या कोंदणात गुंफलेला चित्रपट म्हणजे दुलाल गुहा दिग्दर्शित, "दोस्त..."


ही कथा आहे मानवची (धर्मेंद्र). मानव एक साधा सरळ माणूस. त्याला चुकीची वागणूक अजिबात आवडत नाही. खरेपणाने जगण्यावर मानवची श्रद्धा असते. अशा या साध्या सरळ मानवला गोपी (शत्रुघ्न सिन्हा) नावाचा एक चोर भेटतो. मानवचा सरळ मार्ग चांगला की गोपीचा वाम मार्ग चांगला, या वादातच मानव आणि गोपीची दृढ मैत्री होते आणि वाट चुकलेल्या गोपीला सरळ मार्गावर आणण्याचा निर्णय मानव घेतो. मानव त्याच्या ध्येयात यशस्वी होतो की नाही, यावरच चित्रपटाचं कथानक बेतलेलं आहे...

लक्ष्मीकांत-प्यारेलाल यांचं संगीत आणि आनंद बक्शी यांचे शब्द असतानाही चित्रपटात मोजकीच गाणी आहे. कथेनुरूप पहायला गेलं, तर गाण्यांसाठी फारसा वाव दिसत नाही. चित्रपटात येणारी सगळीच गाणी चांगली आहेत, पण लक्षात रहावं असं एकच गाणं आहे. ते गाणं म्हणजे "गड़ी बुला रही है... सीटी बजा रही है..." या गाण्यात एकून पाच कडवी आहेत. चित्रपटाच्या अगदी सुरुवातीला या गाण्याची दोन कडवी येतात. चित्रपट जसा पुढे जातो, तशी गाण्याची राहिलेली तीन कडवी एका मागून एक येत राहतात. कुठे कुठे पार्श्व संगीत म्हणून गाण्याचे बोल किंवा संगीत वापरलं गेलं आहे...

चित्रपटात दोन नायक आहेत, मुख्य नायक धर्मेंद्र ज्यांनी मानव ही भूमिका केली आहे आणि सह-नायक शत्रुघ्न सिन्हा ज्यांनी गोपीचंद वर्मा ही व्यक्तिरेखा साकारली आहे. गोपीची व्यक्तिरेखा प्रत्येक वेळी परावलंबी वाटते. हा माणूस मदतीशिवाय काहीच तरू शकणार नाही असं सतत जाणवत राहतं. त्या उलट भूमिका आहे ती मानवची. नेहमी सरळ मार्गाने जाणारा मानव पूर्ण कथेत सकारात्मक विचार पसरवत राहतो. आजू-बाजूला नकारात्मक गोष्टी घडत असूनही मानव जिद्दीने त्यांच्याशी लढा देत राहतो...

धर्मेंद्र आणि शत्रुघ्न सिन्हा यांच्यासोबत हेमा मालिनी, कुमारी नाज़, कन्हैयालाल, अनवर हुसैन, रेहमान या कलावंतांनी तर हजेरी लावली आहेच, शिवाय असित सेन, जगदीश राज, सत्येन कप्पू याही कलाकारांची वर्णी लागली आहे. खास नाही म्हणता येणार, पण एका दृष्यापुरते पडद्यावर दिसलेले अमिताभ बच्चन हेही चित्रपटाचं एक आकर्षण आहे. मानव आपल्या मित्राला, आनंदला (अमिताभ बच्चन) भेटायला येतो, त्या एकाच दृष्यात अमिताभ बच्चन झळकलेत. त्यावेळी चित्रपटाच्या त्या फ्रेममध्ये धर्मेंद्र, अमिताभ बच्चन आणि शत्रुघ्न सिन्हा हे तिघंही पहिल्यांदाच आणि शेवटचे एकत्र होते...

चित्रपटाचं कथानक थोडं गंभीर स्वरूपाचं आहे. पण काही दृष्यांमध्ये शत्रुघ्न सिन्हा यांनी विनोदनिर्मिती करण्याचा चांगला प्रयत्न केला आहे. गंभीर दृष्यही त्यांनी तितक्याच ताकदीने वठवली आहेत. धर्मेंद्र त्यांचा नेहमीचा भडकूचंद नायक अधून मधून डोकं वर काढण्याचा प्रयत्न करतो, पण मानव ही व्यक्तिरेखा तशी सहनशील आणि जराशी संयमी असल्याने तो भडकूचंदपणा फार काळ टिकत नाही. हा समतोल धर्मेंद्र यांनी छान सांभाळला आहे...

एकंदरीत, सकारात्मक विचार आणि नकारात्मक विचार यांच्या द्वंद्वातून सकारात्मक विचारांचा कसा विजय होतो, हे दाखवणारा सचिन भौमिक लिखित, "दोस्त" हा चित्रपट एकदा तरी पहावाच...

@ अनिकेत परशुराम आपटे.

No comments:

Post a Comment