एक स्टाईलीश व्हिलन, एक देशभक्त हिरो, एक खतरनाक मिशन, शेवटी हिरोची जीत आणि व्हिलनचा मृत्यू. अशा ढंगाचं कथानक असलेले अनेक चित्रपट बनले. त्यातलेच २०१९ साली प्रदर्शित झालेला "वॉर" आणि २०२३चा "पठान", हे यश राज फिल्म्सच्या बॅनरमध्ये बनलेले दोन बिग बजेट चित्रपट...
दोन्हीही चित्रपट, एकाच धाटणीचे आणि साधारणत: एकच कथानक असले, तरीही समानतेसोबतच दोघांत काहीतरी वेगळेपणासुद्धा आहे. अर्थात कलावंत वेगळे आहेतच, पण तरीही काही बाबतीत दोन्हीही चित्रपट वेगळे आहेत...
साम्य...
"वॉर" आणि "पठान" या दोन्हीही चित्रपटात कर्नल लूथरा (आशुतोष राणा) हे व्यक्तिमत्व आहे. 'ब्रह्म' आणि "रक्तबीज'सारखे शब्द वापरून दोन्हीही चित्रपटातल्या मिशन्सना भव्य बनवण्याचा प्रयत्न दिसला आहे. दोन्हीही चित्रपटात व्हिलनला एकदम स्टाईलीश दाखवलं गेलं आहे. तिथेच, हिरोला एकदम रफ लुक दिला गेला आहे. अर्थात, "वॉर" चित्रपटातल्या हिरोचा लुक, "पठान" चित्रपटातल्या हिरोच्या लुकपेक्षा नक्कीच उजवा आहे. दोन्हीही चित्रपटात सहायक व्हिलनला आधी मोठं दाखवलं जातं. मुख्य व्हिलनचा खरा प्लॅन काय आहे ते अगदी शेवटच्या टप्प्यात समजतं...
जुन्या कुठल्यातरी गाण्याचे शब्द घेऊन नव्या संगितानिशी एक डान्स नंबर दोन्हीही चित्रपटात येतो, जिथे सुट्टीवर असलेला हिरो आणि अपनी अदाओं से घायाळ करणारी हिरोईन एकमेकांना भेटतात. दोन्हीही चित्रपटात उत्कंठावर्धक action sequencesसह थरारक chase sequencesसुद्धा आहेत. एका ओसाड घरवजा जागेत हिरो आणि व्हिलनचं द्वंद्व दाखवलं आहे, ज्यात व्हिलन आधी हिरोला धोपटतो आणि नंतर हिरो व्हिलनला ऊंचावरून खाली फेकून मारून टाकतो...
वेगळेपण...
"वॉर" आणि "पठान" या दोन्हीही चित्रपटात जसं थोडंफार साम्य आहे, तसाच थोडा वेगळेपणा देखील आहे. "वॉर" चित्रपटातल्या दोन्ही नायकांना एका गाण्यात नृत्याची संधी मिळाली आहे. पण "पठान"मध्ये तसा प्रकार दिसत नाही. "पठान"मध्ये मुख्य व्हिलन कोण, ते चित्रपटाच्या सुरुवातीपासूनच माहित असतं. पण "वॉर"मध्ये मुख्य व्हिलनच्या बाबतीत एक जबरदस्त ट्विस्ट समोर येतो. चित्रपटात संवादफेक आणि आवाजाचा ढंग या दोन गोष्टीसुद्धा वेगळा प्रभाव पाडू शकतात. या बाबतीत "पठान" हा "वॉर"पेक्षा उजवा ठरला आहे...
चित्रिकरणाबाबत बोलायचं, तर "पठान" नक्कीच "वॉर"पेक्षा वरचढ आहे. अर्थात दोन्हीही चित्रपटात साधारण चार वर्षांचं अंतर असल्याने तंत्रज्ञान तेवढं प्रगत झालं, जे "पठान"मध्ये जाणवतं. संगीतात मात्र "वॉर"ने "पठान"वर मात केली आहे. "वॉर"मधली गाणी बऱ्यापैकी श्रवणीय झाली आहेत तर "पठान"मधल्या गाण्यांमध्ये loud musicचा जास्त पगडा दिसतो. दोन्हीही चित्रपट एकसारखे असले, तरीही दोन्हीही चित्रपट आपापलं वेगळेपण जपून आहेत. तरीही दोन्हीही चित्रपटात काही अतर्क्य गोष्टी आहेत, ज्या योग्य जागी योग्य वेळी येतात...
Illogically At Place...
"वॉर"मध्ये दोन आणि "पठान"मध्ये दोन, अशी एकून चार चित्तथरारक पाठलाग दृष्य आपल्याला पहायला मिळतात. व्हिलनचं आपण समजू शकतो, की त्या जागेवरून पलायन करायला त्याने एखादं वाहन तयार ठेवलं असणार. पण त्याच वेळी, त्याच ठिकाणी, त्याच पद्धतीचं दुसरं वाहन तिथे असणं जरा अतर्क्य वाटतं. तेच वाहन घेऊन मग हिरो व्हिलनचा पाठलाग करतो. दुसरी गोष्ट म्हणजे ज्याच्या मागे सगळे हात धुऊन लागलेत, तो हिरो सर्रास केरळमधल्या एका लग्नात किंवा पॅरीसमधल्या एका रस्त्यावर फिरत असतो. हे ही थोडं वेगळं वाटतं...
एकंदरीत, Yash Raj Spy Universeचे "वॉर" आणि "पठान" हे भव्यदिव्य तर आहेतच, पण वेगवान आणि स्टाइलीशसुद्धा आहेत. सहसा जे thrilling action आणि chase sequences आपण हॉलिवूडच्या चित्रपटात पाहतो, ते आता बॉलिवूडच्या चित्रपटातही पहायला मिळत आहेत. "वॉर"मधून कबीर मिळाला, "पठान"मधून स्वत: पठान मिळाला. टायगर तर आधीपासून होताच. आता ती वेळ दूर नाही, जेव्हा Yash Raj Spy Universeचा एखादा चित्रपट भन्नाट मोठं मिशन घेऊन येईल, ज्यात टायगर, कबीर आणि पठान हे तिघं एकत्र पडद्यावर दिसतील...
@ अनिकेत परशुराम आपटे.
.jpeg)

.jpeg)
.jpeg)
No comments:
Post a Comment