Tuesday, 15 November 2022

जिद्दीचा प्रवास...

मनात जिद्द असेल, समोर ध्येय असेल तर आपण कुठलीही उंची गाठू शकतो... हाच संदेश देणारा चित्रपट आहे सूरज बरजातिया दिग्दर्शित "ऊँचाई..."

फारा दिवसांनी, नव्हे अनेक महिन्यांनी राजश्री प्रोडक्शन्स आणि सूरज बरजातिया ही नावं पुन्हा रुपेरी पडद्यावर दिसली. लौकिकाला साजेशी खेळी करत याही वेळी सूरज बरजातिया कौटुंबिक चित्रपट घेऊन आले. पण कथा मात्र वेगळ्या धाटणीची. आपल्या मित्राची शेवटची इच्छा पूर्ण करण्यासाठी तीन मित्र एव्हरेट बेस कँप ट्रेकला जाण्याचा निर्णय घेतात. स्वत:ची दु:ख, प्रतिकूल परिस्थिती, शारीरिक क्षमता या सगळ्यांवर मात करून हे तीन मित्र हा ट्रेक कसा पूर्ण करतात याची ही कथा...

सूरज बरजातियाच्या कुठल्याही चित्रपटाप्रमाणेच याही चित्रपटाचं संगीत छान जमलंय. "केटी को...", "वह लड़की पहाडी़...", "ज़िंदगी को हां कर दे...", "अरे ओ अंकल...", "देखो सवेरा पूछे जाना हे कहां...", सर्वच गाणी चांगली आहेत. पण मला सर्वात जास्त आवडलेलं गाणं म्हणजे "ज़िंदगी को हां कर दे..." या गाण्यात एक सकारात्मक विचार दिसून येतो. अमित त्रिवेदी यांनी कथेला साजेसं संगीत दिलं आहे. विशेष म्हणजे, उगाच गाणं आलं असं कुठेही वाटत नाही. या शिवाय, चित्रपटात किशोर कुमार यांनी गायलेल्या, "यह जीवन है... इस जीवन का... " या गाण्याच्या काही ओळी पुन्हा पुन्हा येत राहतात. वेगवेगळ्या प्रसंगी येणाऱ्या त्या ओळी वेगवेगळ्या भावना दर्शवतात...

कथानक म्हणजे खरंतर एक प्रवास आहे. सर्व व्यक्तिरेखांसोबत घडत जाणाऱ्या छोट्या उपकथानकांमधून हा प्रवास उलगडत जातो. एखाद-दुसरं उपकथानक सोडलं, तर बाकी उपकथानकांमुळे कथा मुख्य विषयापासून बऱ्याच ठिकाणी भरकत जाते. कथेचा मुख्य गाभा आहे चित्रपटातली शेवटची पन्नास मिनिटं. तो ट्रेक, तिथलं ते वातावरण, बदलत जाणारा प्रदेश, हेलिकॉप्टरने घेतलेले जबरदस्त लाँग शॉट्स, डोंगराळ प्रदेशात चढणीवर घ्याव्या लागणाऱ्या काळजीबद्दलची दृष्यांगणिक मिळत जाणारी माहिती, बर्फाच्छादित पर्वत शिखरं, हे सगळंच खूप मनोरम आहे. कलावंतांचा मेकपही प्रसंगानुरूप छान जमून गेला आहे...

सूरज बरजातियाच्या चित्रपटातली अजून एक विशेष गोष्ट म्हणजे चित्रपटातले कलावंत. या वेळी अमिताभ बच्चन, अनुपम खेर, बोमन इराणी, नीना गुप्ता, सारिका अशा मातब्बर आणि तगड्या कलावंतांची फौज आहे. अनुपमजी आणि बोमनजी, हे दोघंही त्या त्या व्यक्तिरेखांना न्याय देताना दिसत नाहीत असं माझं तरी मत आहे. बोमनजींची आत्ताची भूमिका, त्यांच्या "शिरीन-फरहाद की तो निकल पड़ी" या चित्रपटातल्या त्यांच्या भूमिकेशी मिळती-जुळती वाटली. अनुपमजी "द कश्मीर फाइल्स" मधल्या त्यांच्या भूमिकेतच अडकल्यासारखे वाटतात. अमितजींना जरा जास्त फुटेज मिळाल्यासारखं वाटतं. चित्रपटात एक नायक आहे असं नाही, पण अमितजींना मिळालेल्या सीन्समुळे सरते शेवटी तेच चित्रपटाचे नायक आहेत असं वाटतं...

चित्रपटातले तीन कलावंत विशेष भाव खाऊन जातात. सारिका, ज्या अनेक वर्षांनी पडद्यावर दिसल्या. परिणीती चोपड़ा, ज्यांनी कसलेल्या कलावंतांसोबत काम केलं आणि डॅनी डेंझाँग्पा, ज्यांची भूमिका एकदम छोटी होती. चित्रपटातल्या तीन मुख्य व्यक्तिरेखांना जरा मागे सारत, डॅनी, सारिका आणि परिणीती या तिघांनी त्यांच्या त्यांच्या भूमिका चोख वठवल्या आहेत. चित्रपटात बऱ्याच वर्षांनी अमिताभ-सारिका आणि अमिताभ-डॅनी या जोड्या दिसल्या. त्यांच्यामधली केमिस्ट्रीही छान जमली आली...

एकंदरीत, थोड्याशा धीम्या गतीने चालणारा हा कौटुंबिक चित्रपट म्हणजे, जिद्द आणि ध्येयाचा मैत्रीपूर्ण प्रवासच आहे असं म्हणायला हरकत नाही. डॅनी आणि परिणीतीसाठी अभिषेक दिक्षीत लिखीत "ऊँचाई" हा चित्रपट एकदा तरी पहावाच...

@ अनिकेत परशुराम आपटे.

No comments:

Post a Comment