Saturday, 12 November 2022

गोंडस हसणारी अप्सरा...

"आय लव यू क...क...क...किरन..." "डर" चित्रपटातला शाहरुख़ ख़ानच्या कापऱ्या आवाजातला हा संवाद ऐकला की एकच व्यक्ती डोळ्यांसमोर येते. ती म्हणजे प्रसिद्ध अभिनेत्री जुही चावला...

मुंबईत आपलं शिक्षण पूर्ण करताना जुहीने १९८४ सालची 'मिस इंडिया' स्पर्धा जिंकली. त्यानंतर थोड्याच काळात जुहीला बी.आर.चोपड़ा यांच्या "महाभारत" या मालिकेत द्रौपदीच्या भूमिकेसाठी विचारणा झाली. पण ती संधी जुहीच्या हातून गेली. १९८६ साली प्रदर्शित झालेल्या "सलतनत" या मल्टी स्टारर चित्रपटातल्या छोट्या भूमिकेद्वारे जुही चावलाने रुपेरी पडद्यावर पहिलं पाऊल ठेवलं. तो चित्रपट यथातथाच चालला आणि इतर कलावंतांच्या भाऊगर्दीत जुहीचा अभिनय थोडा झाकोळला गेला. १९८८ साली प्रदर्शित झालेल्या "क़यामत से क़यामत तक" या चित्रपटात मुख्य नायिका म्हणून जुहीला संधी मिळाली. त्या भूमिकेसाठी जुहीला प्रशंसा तर मिळालीच, पण सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा फिल्म फेयरचा पुरस्कारही मिळाला...

अनेक दाक्षिणात्य चित्रपटांमधून झळकत जुहीने आपला जम बसवला. हिंदी चित्रपटातही "लव्ह लव्ह लव्ह", "स्वर्ग", अशा चित्रपटांमध्ये दुय्यम भूमिकांमध्ये दिसणाऱ्या जुहीला १९९० साली प्रदर्शित झालेल्या "प्रतिबंध" चित्रपटातल्या तिच्या भूमिकेने प्रसिद्धी मिळवून दिली. ते दशक जुही चावलासाठी सोन्याचा काळ ठरलं. "राजू बन गया जंटलमॅन", "हम हैं राही प्यार के", "डर", "नाजायज़", "येस बॉस" अशा अनेक हिट चित्रपटांमध्ये जुहीचा अभिनय खुलला. "हम हैं राही प्यार के" या चित्रपटातल्या 'वैजयंती'च्या व्यक्तिरेखेसाठी जुहीने घेतलेली मेहनत फळाला आली. प्रेक्षकांनी ती भूमिका उचलून धरलीच, पण त्या वर्षाचा फिल्म फेयरचा सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कारही जुहीला याच भूमिकेसाठी मिळाला...

जुहीचं विनोदाचं टायमिंगही छान होतं. जुहीचा बोलका चेहेरा, विनोदी हावभाव यांमुळे "बोल राधा बोल", "इश्क़", "लोफ़र", "मि. एँड मिसेस खिलाड़ी" अशा चित्रपटांमध्ये जुहीवर चित्रित झालेल्या विनोदी दृष्यांना अधिक बहार आली. विनोदासोबतच "आइना", "दरार", "लुटेरे", "अर्जून पंडित", "साजन का घर" अशा काही चित्रपटांमधून जुहीने गंभीर स्वरूपाच्या भूमिकाही साकारल्या. काही चित्रपट चालले तर काही अपयशी ठरले. पण जुहीच्या कामाचं कौतुक झालं. "वन टू का फोर", "गुलाब गँग", "तीन दिवारें", "ख़ामोश - ख़ौफ़ की रात" अशा चित्रपटांत जुहीच्या अभिनयाचे वेगळे पैलूही पहायला मिळाले. "गुलाब गँग" दोन गोष्टींसाठी लक्षात राहिला. याच चित्रपटात जुहीने पहिल्यांदाच माधुरी दिक्षीत-नेने यांच्यासोबत काम केलं. नकारात्मक छटा असलेल्या व्यक्तिरेखेतही जुही पहिल्यांदाच दिसली...

जुहीने रुपेरी पडद्यावर अनेक पुरूष कलावंतांसह जोड्या जमवल्या. त्यातही आमिर ख़ान, सन्नी देवल आणि शाह रुख़ ख़ान यांच्या समवेत जुहीची जोडी अधिक छान बहरली. शाह रुख़ ख़ानसोबत जुहीने पडद्यावरच नाही, तर पडद्याबाहेरही दोन वेगळ्या प्रकारच्या जोड्या जमवल्या. एक होती 'ड्रीम्ज अनलिमिटेड' ही निर्मिती संस्था. या संस्थेकडून निर्मितीक्षेत्रातही हात आजमावत जुहीने काही चित्रपटांची निर्मितीही केली. शाह रुख़ खान यांच्यासोबत जुहीची अजून एक जोडी म्हणजे 'कोलकाता नाईट रायडर्स' हा क्रिकेट संघ. 'आय.पी.एल.' या क्रिकेटच्या महास्पर्धेत जुहीने शाह रुख़ ख़ानसमवेत 'कोलकाता नाईट रायडर्स' या संघाचे मालकी हक्क मिळवून क्रिडाक्षेत्रातही नाव मिळवलं...

जुहीसोबतच्या सर्व जोड्यांमध्ये सर्वात यशस्वी जोडी म्हणजे उद्योगपती जय मेहताबरोबर तयार झालेली जुहीची आयुष्यभराची जोडी. कारकिर्दीच्या शिखरावर असताना १९९५साली उद्योगपती जय मेहताशी जुही चावलाचा विवाह झाला. आणि जुही नावाची ही अप्सरा, मेहतापरिवारात प्रविष्ट झाली. लग्नानंतर जुहीने चित्रपटक्षेत्र सोडलं नाही. काही काळ ब्रेक घेऊन जुही परतली आणि पुन्हा त्यांच्या मधाळ वाणीने व मृदू हास्याने रुपेरी पडदा चमकला...

आज १३ नोव्हेंबर. आज जुही चावलाचा वाढदिवस. बोलक्या चेहेऱ्याच्या या अप्सरेला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा...

Happy Birthday Ka...ka...ka...Kiran...

@ अनिकेत परशुराम आपटे.

No comments:

Post a Comment