'रामसेतू' किंवा 'ऍडम्स ब्रिज' खरंच मानवनिर्मित आहे की निसर्गाची किमया आहे, यावर आजही वाद-विवाद सुरू आहेत. याच वादांवर आधारलेला चित्रपट म्हणजे, अभिषेक शर्मा दिग्दर्शित "राम सेतू..."
डॉ. आर्यन कुलश्रेष्ठ एक पुरातत्वशास्त्रज्ञ म्हणजेच archeologist तर असतोच, शिवाय नास्तिकही असतो. त्याचा अशा कोणत्याही गोष्टीवर विश्वास नसतो, जी सिद्ध करता येत नाही. अशातच, रामसेतूचं संशोधन करून हा सेतू मानवनिर्मित नाही, हे पुराव्यानिशी सिद्ध करण्याच्या कामगिरीवर आर्यनला पाठवलं जातं. अनेक रहस्यांनी भरलेल्या या प्रवासात आर्यनला पुढे नेणारे मदतनीसही भेटतात आणि अडथळा आणणारे शत्रूही समोर येतात. भारतातून सुरू झालेला रामसेतूच्या अस्तित्वाचा डॉ. आर्यनचा हा प्रवास अखेर श्रीलंकेत समाप्त होतो...
चित्रपटाची भव्यता लक्षात घेता, सेट्सवर सुरेख काम झालं आहे. विशेषता सेतू आणि पाण्याखालचं वातावरण दाखवताना व्यवस्थित काळजी घेतलेली दिसते. पाण्याची खोली जशी वाढत जाते तशी तिथे आढळणाऱ्या जलरांचरांची, पाणवनस्पतींची विविधताही बदलत जाते. ही बाब लक्षात ठेऊनच सेट्स आणि लोकेशन्स दाखवले गेले हे विशेष. चित्रपटात वेगळी अशी गाणी नाहीत. शिव तांडव स्तोत्राच्या काही ओळी किंवा हनुमान चालीसामधल्या काही ओळी वेगळ्या चालींवर ऐकायला मिळतात. अर्थात कथेचा प्रवाहच असा आहे, की गाण्यांना त्यात वावच नाही. चित्रपटात जबरदस्तीने आयटम साँग घुसवण्याचा प्रयत्न झाला नाही, ही मला आवडलेली सर्वात चांगली गोष्ट...
चित्रपटाचं पार्श्वसंगीत दमदार आहे. वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळं पार्श्वसंगीत वापरल्याने, ते ते दृष्य अधिक उठाव घेतं. शिवाय हनुमान चालीसा आणि शिव तांडव स्तोत्रातल्या काही ओळी, चालू दृष्यात पार्शवसंगितासारख्या वापरल्याने दृष्याची भव्यता अधोरेखित होते. कलावंतांचं म्हणावं, तर हिरोला हिरोईन असावी आणि ट्विस्ट इन द टेल यावा यासाठी नुसरत भरुचा यांनी साकारलेलं गायत्रीचं पात्र टाकलं गेलं असावं असं मला वाटतं. जॅक्विलीन फर्नँडीस यांनी साकारलेलं डॉ. सँड्रा या पात्राला चित्रपटात इतकी लांबी का दिली गेली, हे समजत नाही. सत्यदेव यांनी साकारलेलं ए.पी. हे पात्र मात्र चित्रपटातलं सर्प्राईझ पॅकेज ठरतं...
चित्रपटातल्या दोन मुख्य व्यक्तिरेखांचं काम सुंदर झालं आहे. एक म्हणजे डॉ. आर्यन कुलश्रेष्ठ. आपल्या विषयाला, ध्येयाला धरून जिद्दीने काम करणाऱ्या डॉ. आर्यनची भूमिका अक्षय कुमारने छान साकारली आहे. डॉ. आर्यनच्या तोडीस तोड असलेली दुसरी व्यक्तिरेखा म्हणजे इंद्रकांत. इंद्रकांत समोर येताच, तो किती पाषाणहृदयी असू शकेल आणि आपली अभिलाषा पूर्ण करण्यासाठी तो कुठल्याही थराला जाऊ शकेल याची पुरेपूर कल्पना येते. अभिनेते नासर यांनी ही भूमिका सुरेख वठवली आहे. "बाहुबली" आणि "रावडी राठोड" या दोन्हीही चित्रपटांतल्या त्यांच्या नकारात्मक भूमिकांपेक्षा वेगळी असलेली इंद्रकांत ही व्यक्तिरेखा अधिक प्रभावशाली आहे...
इतकं असूनही चित्रपटातल्या काही गोष्टी लेखकाला नीट समजावता आल्या नाहीत. डॉ. आर्यन जेव्हा श्री रामाचं अस्तित्वच नाकारतो तेव्हा वातावरण शांत कसं राहतं..., आर्यन कट्टर नास्तिक असूनही रामसेतू पाहून त्याच्या तोंडून "ओ माय गॉड..." हे उद्गार कसे निघतात..., ट्विस्ट आणण्यासाठी गायत्रीला आर्यनसमोर आणलं जातं, पण आर्यनचे शत्रू गायत्रीपर्यंत पोहोचतातच कसे... शोधकार्य पूर्ण करायला आर्यनकडे दोन पूर्ण दिवस आणि तिसरा अर्धा दिवस असतो. पण आर्यनच्या प्रवासात येणाऱ्या टप्प्यांची अंतरं अधिक असतात. हे गणित कसं काय जुळलं..., प्रवास संपवून आर्यन पुराव्यांसह भारतात येतो. पण इतक्या लवकर कसा येतो... हे प्रश्न अधांतरितच ठेवले गेले...
एकंदरीत, डॉ. आर्यनला त्याच्या प्रवासादर्म्यान काय गवसतं... त्याचा शोध पूर्ण होतो का... नास्तिक असलेला डॉ. आर्यन बदलतो की तसाच राहतो... या सर्व प्रश्नांची उत्तरं चित्रपट पाहूनच मिळतील. "नॅशनल ट्रेजर", "जंगल क्रूज", "इंडियाना जोन्स" अशा शोधकथांच्या धाटणीचा अभिषेक शर्मा लिखीत, "रामसेतू" हा चित्रपट, मोठ्या पडद्यावर एकदा तरी पहावा असाच आहे...
@ अनिकेत परशुराम आपटे.
No comments:
Post a Comment