Wednesday, 19 October 2022

मेलडी कुमार...

 #HBD_Kumar_Sanu...

"बरसात के मौसम में...", "दिल की तनहाई को आवाज बना लेते हैं...", "साँसों की ज़रूरत है जैसे...", "सुन सुन सुन बरसात की धुन सुन...", "नाराज़ सवेरा है...", ही आणि अशी अनेक गाणी ज्यांच्या स्वरांनी सजली, ते आहेत केदारनाथ भट्टाचार्य म्हणजेच, सुप्रसिद्ध गायक कुमार सानू...


'बॉलीवूडचा मेलडी किंग' हे बिरुद मिरवणाऱ्या कुमार सानू यांना गायनाचं बाळकडू त्यांच्याच घरात मिळालं होतं. त्यांचे वडील, पशुपतिनाथ भट्टाचार्य एक प्रसिद्ध गीतकार व गायक होते. आपल्या वडिलांकडून मिळालेला सुरेल वारसा घेऊन कुमार सानू पुढे गेले. १९८६ साली कुमार सानू यांनी "तीन कन्या" या बांगलादेशी चित्रपटासाठी पहिलं गाणं गायलं. हिंदी चित्रपटांच्या त्यांच्या प्रवासाची सुरुवात मात्र १९८८ साली प्रदर्शित झालेल्या "हीरो हिरालाल" या चित्रपटातल्या "जश्न है मुहब्बत का..." या गीताने झाली...

सानू भट्टाचार्य या नावाने गायन करणाऱ्या कुमार सानू यांची भेट कल्याणजी-आनंदजी या संगीतकार द्वयींमधल्या कल्याणजींशी झाली. त्यांच्याच सल्ल्यानुसार, सानू भट्टाचार्य यांनी त्यांचे आदर्श आणि सुप्रसिद्ध गायक-नट किशोर कुमार यांना डोळ्यांसमोर ठेऊन, कुमार सानू असं असं नाव धारण केलं. कल्याणजींनीच "जादुगर" या त्यांच्या आगामी चित्रपटात कुमार सानू यांना गायची संधीही दिली...

चित्रपटात एखाद-दुसरं गाणं म्हणणाऱ्या कुमार सानू यांचा सुवर्णकाळ सुरू झाला तो १९९० पासून. "आशिक़ी" या चित्रपटातल्या, "साँसों की ज़ुरूरत है जैसे..." या गाण्याने कुमार सानू यांना रातोरात प्रसिद्धी मिळाली. एक गाणं सोडता बाकी सर्व मेल व्हॉईसची गाणी कुमार सानू यांच्या वाट्याला आलेला, "आशिक़ी" हा पहिला चित्रपट ठरला. इतकंच नव्हे, तर याच चित्रपटातील, "अब तेरे बिन जी लेंगे हम..." या गाण्यासाठी कुमार सानू यांना सर्वोत्कृष्ठ गायनाचा त्यांचा पहिला फिल्म फेयरचा पुरस्कार मिळाला. पुढे १९९१ ते १९९४ अशी सलग चार वर्ष कुमार सानू यांना सर्वोत्कृष्ठ पार्श्वगायनासाठी फिल्म फेयरचे पुरस्कार मिळाले आणि कुमार सानू प्रसिद्धी च्या शिखरावर विराजमान झाले...


कुमार सानू यांनी अनेक संगीतकारांसाठी पार्श्वगायन केलं. पण त्यातही अन्नू मलिक आणि नदीम-श्रवण ही नावं नेहमीच आघाडीवर राहिली. १९९० नंतर नदीम-श्रवण यांनी संगीतबद्ध केलेल्या चित्रपटांमध्ये बहुतांश चित्रपट कुमार सानू यांच्या वाट्याला आले. संगीतकारांसारखंच त्या काळातल्या गायिका आणि गायकांसोबतही कुमार सानू यांच्या जोड्या रसिकांच्या पसंतीस उतरल्या. अल्का याग्नीक, कविता कृष्णमूर्थी, सोनू निगम आणि उदित नारायण यांच्यासोबत कुमार सानू यांनी गायलेली द्वंद्व गीतं जास्त लोकप्रिय झाली...

गायनासोबतच, २००६ प्रदर्शित झालेल्या "उथ्थान" या चित्रपटाच्या निमित्ताने कुमार सानू यांनी संगीतकार आणि निर्माता या भूमिकाही बजावल्या. "वार परिवार", "सारेगमप (हिंदी)", "सूपर सिंगर" या छोट्या पडद्यावरील काही कार्यक्रमात जज म्हणूनही कुमार सानू यांनी हजेरी लावली. चित्रपट क्षेत्राखेरीज कुमार सानू यांनी नवी दिल्ली येथे गरीब मुलांसाठी 'कुमार सानू विद्या निकेतन' या नावाने शाळा सुरू केली जिथे मुलांना गणवेष आणि पुस्तके विनामूल्य दिली जातात. २००९ मध्ये कुमार सानू यांच्या योगदानाची दखल घेत त्यांना 'पद्मश्री' पुरस्काराने सन्मानित केलं...

आज २० ऑक्टोबर. केदारनाथ भट्टाचार्य ऊर्फ कुमार सानू यांचा जन्म दिवस. बॉलीवूडच्या या मेलडी किंगला माझा सांगीतिक सलाम...


"तेरे गानों के...
दिवाने तो हैं हम... सानू..."

@ अनिकेत परशुराम आपटे.

No comments:

Post a Comment