"मी बाबूराव गणपत राव आपटे... म्येरेको बिलकुल रिक्स नई ल्येनेका है..." आपल्या विशिष्ठ संवादफेकीने, "हेराफेरी" या चित्रपटातला हा संवाद अजरामर करणारे कलावंत म्हणजेच आपल्या सर्वांच्या परिचयाचे, अभिनेते परेश रावल...
१९८५ साली प्रदर्शित झालेल्या "अर्जून" या चित्रपटाद्वारे रुपेरी पडद्यावर पहिलं पाऊल ठेवणाऱ्या परेशजींनी "नाम", "कब्ज़ा", "फतेह", "बाज़ी", "राम लखन", "किंग अंकल" अशा अनेक चित्रपटातून भूमिका केल्या. त्यांच्या जवळ जवळ सर्वच भूमिका या नकारात्मक स्वरुपाच्या होत्या. गंभीर भूमिकेत परेशजी क्वचितच दिसले. "सर", "सरदार", "वह छोकरी", "गोलमाल - फन अनलिमिटेड" या चित्रपटातल्या परेशजींच्या गंभीर स्वरूपाच्या भूमिका विशेष लक्षात राहिल्या...
पेरशजींच्या अदाकारीचा एक वेगळा पैलू पहायला मिळाला तो १९९० साली प्रदर्शित झालेल्या "अंदाज़ अपना अपना" या चित्रपटातल्या दुहेरी भूमिकेमुळे. दोन्हीही व्यक्तिरेखा साकारताना परेशजींनी वापरलेली संवादफेक आणि विनोदाचं अप्रतीम टायमिंग यांमुळे आमिर ख़ान सलमान ख़ानसारखे कलावंत समोर असूनही परेशजींच्या अदाकारीला दाद मिळाली. परेशजींच्या याच संवाद फेकीचा आणि विनोदाच्या अप्रतीम टायमिंगचा फायदा इतर अनेक चित्रपटांना मिळाला...
'विनोदी खलनायक' ही संकल्पना बहुदा परेशजींच्या अदाकारीमुळे प्रकाशझोतात आली. "ख़ुबसूरत", "बड़े मियाँ छोटे मियाँ", "दौड़, "रावण राज" अशा चित्रपटात परेशजींनी विनोदी खलनायक छान साकारले. मग आला २००० साली प्रदर्शित झालेला "हेरा-फेरी". परेशजींच्या बाबूराव गणपतराव आपटे या व्यक्तिरेखेने अक्षश: धुमाकूळ घातला. बाबूराव आपटेच्या बोलण्याचा लेहेजा, चालण्याची पद्धत, त्याचा तो चष्मा प्रेक्षकांना प्रचंड आवडले. पुढे परेशजींच्या विनोदी भूमिकांनी सजलेल्या "फिर हेरा फेरी", "आवारा पागल दिवाना", "हंगामा", "हलचल", "भूलभुलैय्या", "आँखें", "मालामाल वीकली" अशा अनेक चित्रपटांची रांग लागली...
परेशजींकडून होणारी विनोदनिर्मिती आचरटपणाची किंवा ओढून-ताणून केलेली कधीच नव्हती. निव्वळ टायमिंग आणि संवादफेक यांची चोख सांगड घालत परेशजींनी त्या त्या भूमिका निभावल्या. परेश रावल म्हणजे विनोदी भूमिका असंच समीकरण तयार झालं होतं. याच समीकरणाला बगल देणाऱ्या काही गंभीर स्वरूपाच्या व्यक्तिरेखाही परेशजींनी, "बाग़बान", "आक्रोश", "ऐतराज़", "महारथी", "संजू" "तूफान" अशा चित्रपटांमध्ये साकारल्या. अर्थात, "तूफान" मधल्या त्यांच्या भूमिकेला प्रेक्षकांनी दादही दिली, पण तरीही, विनोदी भूमिका साकारणारे कलावंत म्हणूनच परेशजी जास्त लक्षात राहिले...
चित्रपटसृष्टीसोबतच, राजकारणातही परेशजींनी हात आजमावला. भा.ज.प. संसद सदस्य म्हणून परेशजींनी अहमदाबादहून निवडणूक लढवून ती जिंकलीही होती. पण निखळ मनोरंजन करणेच बरे हे लक्षात घेऊन, त्या मार्गाला जास्त न जाता परेशजी चित्रपटांत अधिक रमले. जितक्या तन्मयतेने परेशजी चित्रपटातील त्यांच्या भूमिका निभवायचे; प्रसिद्ध अभिनेत्री स्वरूप संपत यांच्याशी विवाहबद्ध झाल्यावर, सांसारिक जबाबदाऱ्याही परेशजींनी तितक्याच प्रामाणिकपणे पार पाडल्या...
आज ३० में. प्रसिद्ध अभिनेते, पद्मश्री परेश रावल यांचा आज वाढदिवस. या हरहुन्नरी चतुरस्त्र बाबूराव गणपतराव आपटेला वाढदिवसाच्या कोटी कोटी शुभेच्छा...
ये द्येवा गणपती बाप्पा...
उठा ले रे बाबा उठा ले...
म्येरे को नई उठानेका रे...
परेशजी के दुश्मनों को उठा ले...
@ अनिकेत परशुराम आपटे.

.jpeg)
.jpeg)
.jpeg)
No comments:
Post a Comment