Saturday, 11 June 2022

भयावह आभास...

जंगल... मनुष्य वस्तीपासून, गजबजाटापासून, सिमेंट-काँक्रीटच्या इमारतींपासून आणि प्रदुषणापासून दूर असलेली एक जागा. जंगल म्हणजे प्राणी-पक्षी, झाडं-झुडुपं, फळं-फुलं यांचं घर. पण या सर्वांसह एखादी अकल्पनीय गोष्ट जंगलात असेल तर... हाच गाभा आहे २००५ साली प्रदर्शित झालेल्या, सोहम शाह दिग्दर्शित "काल" या चित्रपटाचा...


तीन मुलं, देव (विवेक ओबेरॉय), विशाल (विशाल मल्होत्रा), साजिद (कुशल पंजाबी) आणि एक मुलगी इशीका (लारा दत्ता) ट्रिपला निघाले असताना, त्यांचा ड्रायव्हर त्यांना फार्म हाऊसच्या ऐवजी जंगलाच्या दिशेने घेऊन जातो. तिथे या चौघांची भेट, जंगलात होणाऱ्या रहस्यमय मृत्यूंचं संशोधन करायला आलेल्या क्रिश (जॉन एब्राहम) आणि रिया (ईशा देओल) या जोडप्याशी होते. सर्वजण जंगलातच एका गेस्ट हाऊसमध्ये राहतात. अतिवृष्टीमुळे जंगल बंद होत असल्याच्या वार्ता कानी पडतात आणि त्याच वेळी गेस्ट हाऊसचा मालक आणि साजिद गायब असल्याचं समजतं...

हॉटेल मालक आणि साजिदला शोधण्यासाठी आणि जंगलातून बाहेर पडण्यासाठी उरलेले सर्वजण एकत्र निघतात. या कामी, काली प्रताप सिंह (अजय देवगण) हा वनमित्र त्यांना मदत करायला तयार होतो. अचानक समोर आलेल्या कालीकडे क्रिश संशयाने पाहत राहतो पण कालीच्या मदतीशिवाय जंगलातून बाहेर पडण्याचा मार्ग सापडणार नाही हे लक्षात आल्यावर तोही तयार होतो. या मार्गात अनेक अकल्पनीय घटना घडत जातात आणि समुहातल्या काहींचा रहस्यमय मृत्यूही होतो. या मृत्यूंमागे खरंच एखादं जनावर आहे, की अजून काही, हे सत्य क्रिशला उलगडता येतं का... सर्वांना जंगलाबाहेर पोहोचवण्यात काली यशस्वी होतो का... या प्रश्नांची उत्तरं चित्रपटच देईल...

कथानक बऱ्यापैकी वेगवान आहे. प्रेमकथा, प्रेम त्रिकोण या नेहमीच्या कथांना बगल देत करण जोहर यांनी "काल" चित्रपटाच्या रूपाने वेगळ्या धाटणीच्या कथानकाला हात घातला आणि हा त्यांचा प्रयोग बऱ्यापैकी यशस्वीदेखील झाला. रक्तपात, स्फोट, खून, हा करण जोहर यांच्या चित्रपटांचा प्रांत नाही. पण "काल"मध्ये सर्वच होतं आणि त्याचं चित्रिकरणही सुरेख जमलं आहे. रोमँटिक कहाण्यांना रंगवणारे नेहमीचे कलावंत न घेता ऍक्शन चित्रपटात जास्त दिसणाऱ्या कलावंतांना "काल"मध्ये वाव मिळालेला दिसतो...

अभिनेते शाहरुख़ ख़ान, हे निर्माते आणि मलाईका अरोरा-ख़ान यांच्यासोबत पाहुणे कलावंत, अशा दुहेरी भूमिकेत समोर आल्याने चित्रपटाला एक ग्लॅमर प्राप्त झालं आहे. "काल"मुळे शाहरुख़ ख़ान आणि मलाईका अरोरा-ख़ान, "दिल से" नंतर बऱ्याच काळाने पुन्हा एकदा आयटम साँग करताना दिसले. तसंच, "करण-अर्जून"च्या वेळी जे शक्य झालं नाही, ते "काल"च्या निमित्ताने साध्य झालं. म्हणजेच, निर्माते आणि कलावंत म्हणून का होईना, पण शाहरुख़ ख़ान आणि अजय देवगण पहिल्यांदा एकत्र आले...

चित्रपटाचं बहुतांश चित्रिकरण हे ग्रे शेड आणि डिम लाईटचा वापर करून केलं गेलं ज्याचा प्रभाव जाणवला. चित्रपटात होणाऱ्या मृत्यूंचे संकेत देण्याची पद्धतही छान होती. म्हणजे ज्या व्यक्तीचा मृत्यू होणार आहे, त्या व्यक्तीला मृत व्यक्ती समोर असल्याचं दिसतं. अशी तीन दृष्य आहेत चित्रपटात. तीनही दृष्यांचं चित्रिकरण आणि पार्श्वसंगीत म्हणून वापरला गेलेला जनावराचा आवाज, यांमुळे ती ती दृष्य छान वठली आहेत. साजिदला शोधायला सर्वजण बाहेर पडतात, आणि दुतर्फा झाडी असलेल्या एका मोकळ्या रस्त्यावर सगळे तीन वाघांच्या तावडीत सापडतात... हा सीन अत्यंत उत्कंठावर्धक झाला आहे. माझ्यामते संपूर्ण चित्रपटाचा तो हायलाईट सीन असावा...

चित्रपटाच्या सर्वात दमदार बाजू म्हणजे चित्रपटाचं संगीत आणि चित्रपटातली साहसदृष्य. कथानकात गाणी बसवायला जास्त वाव नसल्यामुळे चित्रपटाच्या सुरुवातीला येणारं "काल धमाल..." आणि शेवटी येणारं "तौबा तौबा..." ही दोनच गाणी चित्रपटात आहेत. ऱ्हिदम, बीट्स आणि नृत्यशैली, यांमुळे ही गाणी प्रचंड यशस्वी तर झालीच. शिवाय चित्रपटाच्या यशातही या गाण्यांचा मोठा वाटा आहे. गाण्यांसोबतच चित्रपटातली सहासदृष्यही रोमहर्षक झाली आहेत. चित्रपटात हाणामारी नाही, पण झाडाची बाहेर आलेली फांदी, नदीवरचा तुटलेला पूल, कोलमडणारं झाड, यांचा वापर करून साहसदृष्य निर्माण केली गेली आहेत. स्लो मोशन कॅमेरा तंत्रामुळे ही दृष्य अधिक उठाव घेतात...

एकंदरीत, संवादफेकीत आणि अदाकारीत थोडे गोंधळ आहेत. पण तरीही, संगीत, पार्श्वसंगीत, चित्रिकरण आणि साहसदृष्य यांचा सुरेख वापर असलेला सोहम शाह लिखित, "काल" बघण्यासारखा आहे...

@ अनिकेत परशुराम आपटे.

No comments:

Post a Comment