बरसों पहले कैद केलेला एक आत्मा, म्हणजे भूत अचानक बाहेर येतं. मग एकामागून एक अनहोनी घटनाएँ होऊ लागतात आणि सरते शेवटी भूत नष्ट होतं, म्हणजे आत्म्याला मुक्ती मिळते. याच कथानकावर बेतलेला चित्रपट म्हणजे अनीस बज़्मी दिग्दर्शित "भूल भुलैयाँ २..."
कॅमेरा एँगल्स आणि प्रकाश योजना नेहमीसारख्याच आहेत. म्हणजे हवेलीचं पालटलेलं रूप, धक्कातंत्राचा वापर, कमी-जास्त होणारा प्रकाश, एखाद्या सायाचं दिसणं आणि गायब होणं, हे सगळं पाहताना भिती वाटावी असं काहीच होत नाही. उलट त्यामध्ये किंवा त्यानंतर येणारा विनोदी संवाद किंवा दृष्य, मुख्य दृष्याची मजाच घालवून टाकतात. पटकथा बऱ्याच ठिकाणी मार खाते. नुकतीच तोंड ओळख झालेल्या रुहानसोबत (कार्तिक आर्यन) रीतचं (कियारा अडवाणी) बस सोडून भलतीकडेच जाणं, लपण्यासाठी ओस पडलेल्या हवेलीत येणं, मंजूलिकासोबतची घटना रीतसमोरच घडली असूनही तिचं मंजूलिकावर विश्वास न ठेवणं, भरल्या घरात रीतचं इतके दिवस लपून बसणं आणि कोणालाही त्याचा सुगावा न लागणं, अचानकपणे रीतच्या वहिनीला (तब्बू) रीतचं सत्य समजणं, या सर्व घटनांची मांडणी वेगळ्या पद्धतीने करता आली असती...
चित्रपटातल्या सर्व गाण्यांपैकी विशेष लक्षात राहतील अशी दोनच गाणी आहेत. एक म्हणजे "हरे राम हरे राम हरे कृष्णा हरे राम..." आणि दुसरं म्हणजे "आमी जे तोमार..." चाल बदलून अरजीत सिंहच्या स्वरात मेल व्हर्जनमध्ये चित्रित झालेलं "आमी जे तोमार..." सुद्धा ऐकायला आणि पहायला छान वाटलं. चित्रपटाचं संगीत मस्त जमलं आहे. प्रत्येक गाण्यातल्या बीट्स आणि ऱ्हिदम आपल्याला ठेका धरायला लावतात. कार्तिक आर्यन, कियारा अडवाणी आणि तब्बू यांनी त्यांच्या त्यांच्या वाट्याला आलेली नृत्य छान सादर केली आहेत, विशेषत: कार्तिक आर्यन. त्यांचं नृत्यकौशल्य तर अप्रतीम आहेच, पण त्यांनी अदाकारीही भन्नाट केली आहे. तब्बू, मिलिंद गुणाजी, संजय मिश्रासारखी मंडळी समोर असतानाही कार्तिक आर्यनने छाप सोडली आहे...
राजेश शर्माने सतत घाबरणारा पण प्रेमळ काका छान साकारला आहे. मुख्य म्हणजे त्यांनी ती व्यक्तिरेखा, परेश रावल यांची झाक न दाखवता साकारली आहे. तब्बूने त्यांना मिळालेली भूमिका छान वठवली आहे. प्रेमळ वहिनी साकारताना, कहानी में ट्विस्ट आणणारी अदाकारीही त्यांनी सुरेख दर्शवली आहे. मिलिंद गुणाजी यांच्या व्यक्तिरेखेत मनोज जोशी यांची झलक दिसते, ज्यांनी "भूल भुलैया"मध्ये कठोर बापाची भूमिका सादर केली होती. अश्विनी कळसेकर यांना एकसूरी भूमिका मिळाल्यासारखं वाटतं. "लक्ष्मी" चित्रपटातली त्यांची व्यक्तिरेखा याही चित्रपटात थोड्या ग्रे शेड देऊन पुन्हा प्रस्तुत केल्यासारखी जाणवते...
चित्रपटाची सुरुवात जबरदस्त होती. त्या मानाने उर्वरीत कथा थोडी रटाळ वाटली. मंजूलिकाचं अस्तित्व दर्शवणाऱ्या, "आमी जे तोमार..." या गाण्याचे बोल जितक्या प्रभावीपणे "भूल भुलैया"मध्ये वापरले गेले होते, तितका चांगला वापर या चित्रपटात जाणवला नाही. या चित्रपटात कावळ्यांचा वापर केला गेला ज्याचा इतका परिणाम नाही जाणवला. "राज़" चित्रपटात नायिकेला जसं विशिष्ठ आवाज ऐकवून त्या अशुभ ठिकाणी बोलावलं जातं, तसं काहीसं "भूल भुलैया २"मध्ये "आमी जे तोमार..." या गाण्याचे बोल वापरून, रीतबाबत करताना दाखवता आलं असतं. पण तसं न करता, मंजूलिकाच्या मुख्य कथानकापेक्षा, रुहान-रीतच्या केमिस्ट्रीवर आणि रुहानच्या बुवाबाजीवर जास्त भर दिलेला दिसतो.
डरावनी हवेली, तंत्र-मंत्राने बंद केलेला दरवाजा, विनोदी छोटा पंडित, मंजूलिका की आत्मा, "आमी जे तोमार...", "हरे राम हरे राम हरे कृष्णा हरे राम..." हे सर्वच पुन्हा एकदा मौजूद असल्यामुळे हा चित्रपट, अक्षय कुमार आणि विद्या बालन यांच्या "भूल भुलैया" या चित्रपटाचा पुढचा भाग आहे असं म्हटलं जात होतं. पण ते तसं नाही. चित्रपटाची मांडणी, कथानकातली वळणं पूर्ण वेगळी आहेत. चित्रपटातली सर्वात चांगली गोष्ट म्हणजे चित्रपटाच्या एकदम शेवटी येणारा ट्विस्ट. त्या ट्विस्टमुळे काही संवाद, काही दृष्य तशी का होती, हे लक्षात येतं. मुख्य म्हणजे मंजूलिकाला वेगळ्या पद्धतीने दाखवण्याचा प्रयत्न चांगला होता...
एकंदरीत, कथानकामुळे स्वत:च संभ्रमात अडकलेला चित्रपट म्हणजे आकाश कौशिक लिखीत, "भूल भुलैया २". पहावा, तर कार्तिक आर्यनसाठीच...
@ अनिकेत परशुराम आपटे.

No comments:
Post a Comment