Wednesday, 19 January 2022

ऐतिहासिक पण रंजक प्रवास...

सर्वजण चांगलं-वाईट लिहित असताना किंवा बोलत असताना बहती गंगा में मी पण हात धुवावा असं वाटलं. तर "८३..."

१९८३ मधला जून महिना हा भारतीय क्रिकेटसाठी अभूतपूर्व आणि सकारात्मक बदल घडवणारा महिना होता. Under dog किंवा कच्चा लिंबू समजल्या जाणाऱ्या भारतीय संघाने त्या वेळच्या बलाढ्य वेस्ट इंडीज संघाला, आपल्या पहिल्या व स्पर्धेतल्या शेवटच्या, अशा दोन सामन्यात धूळ चारत विश्वचषक जिंकला आणि इतिहास घडवला. भारतीय संघाचा, संघ निवड ते अंतिम सामना, हा प्रवास, कबीर खानने "८३" या चित्रपटाद्वारे पडद्यापर्यंत पोहोचवला आहे...

चित्रपटात गाणी आहेत. पण ती सर्व गाणी प्रासंगिक आहेत. कथानक भरकटलं आहे किंवा वेग कमी झाला आहे असं कुठेही वाटत नाही. गाण्यांसोबतच चित्रपटात वापरलेले वेगवेगळे आवाज सुंदर जमले आहेत. विशेषत: पिचवर बॉल आधळून बाऊंस होताना, बॅट्समन बॉल्ड होताना, बॅटला बॉल लागून शॉट बसताना जो ध्वनी निर्माण होत होता तो अप्रतीम होता. कथानकासारखंच चित्रपटातलं पार्श्वसंगीतही दमदार आहे. भारतीय संघाचं आगमन होताना, सगळ्या झेंड्यांमध्ये एकच तिरंगा फडकत असलेला दिसताना वापरलेलं पार्श्वसंगीत तर छान आहेच, पण वेस्ट इंडीजचे खेळाडू, खास करून विव्ह रिचर्ड्सला पडद्यावर दाखवताना वापरलेलं पार्श्वसंगीत तर लाजवाब आहे...

चित्रपट पाहताना, त्या वेळच्या बऱ्याच छोट्या छोट्या गोष्टींचा सखोल अभ्यास झाल्याचं जाणवतं. सुनील गावस्कर, विव्ह रिचर्ड्स, श्रीकांत यांच्या बॅटिंगची पद्धत, त्यांच्या उभं राहण्याची व चालण्याची पद्धत, दिलीप वेंगसरकरला माल्कम मार्शलचा चेंडू लागल्यावर त्याचं बॅट सोडून खाली बसणं, यशपाल शर्माचा बदाम शॉट, कीर्ती आज़ादने इयान बोथमचा त्रिफळा उडवला ते दृष्य, इंग्लंडविरुद्धचा उपांत्य सामना संपण्याआधीचा गदारोळ, अंपायचं स्टम्प पकडून उभं राहणं, संदीप पाटीलचं फिल्डींग पाहून हसणं, कपिल देवने घेतलेला तो कॅच, फायनल जिंकल्यावर परत जाताना मोहिंदर अमरनाथ स्टम्प उचलण्याचा प्रयत्न करतो पण हाती काहीच लागत नाही ते दृष्य, ही सर्व दृष्य त्या त्या मॅचच्या खऱ्या दृष्यांसोबत येतात, तेव्हा ते बारकावे अधिक प्रभाव पाडतात...

एखादा बॉलर स्लो मोशनमध्ये बॉल टाकतो आणि तो बॉल पिचवर पडून थोडासा धुरळा उडतो. हे सांकेतिक दृष्य जेव्हा जेव्हा येतं तेव्हा तेव्हा त्यापुढे एखादा नाट्यमय प्रसंग घडतो. चित्रपटातल्या सामन्यांमध्ये येणाऱ्या उत्कंठावर्धक दृष्यांसाठी या स्लो मोशनचा आणि पिचवर पडणाऱ्या बॉलचा सुरेख वापर केला गेला आहे. यासोबतच फायनलमधल्या शेवटच्या विकेटला थोडं लांबवल्यामुळे या दृष्याचा चांगला परिणाम झाला आहे. खऱ्या सामन्यात अंपायरने एका झटक्यात निर्णय दिला होता आणि सामना संपला होता. पण चित्रपटात हेच दृष्य लांबवल्यामुळे त्या नंतर मिळणाऱ्या विजयाचा आनंद द्विगुणीत होतो...

चित्रपटातल्या काही बाबी मात्र मला तितक्याशा रुचल्या नाहीत. बाकी कास्टिंग तर दणदणीत आहे, पण दिपिका पदुकोण रोमी देव वाटलीच नाही कधी. खरंतर माझीच बॅट व माझंच पिच या न्यायाने निर्माती म्हणून दिपिका पदुकोणने स्वत:ला सामिल करून घेतल्यासारखं वाटलं. दुसरी गोष्ट म्हणजे सामन्यांच्या काही दृष्यांमध्ये बॉलची दिशा, मारलेल्या शॉटची दिशा आणि बॅट्समनची नजर मेळ नाही खात. तिसरी मला न रुचलेली गोष्ट म्हणजे आदिनाथ कोठारेचा वापर. संघातल्या प्रत्येक खेळाडूला एखाद-दुसरं दृष्य दिलं गेलं आहे, पण दिलीप वेंगसरकर यांची व्यक्तिरेखा साकारणाऱ्या आदिनाथ कोठारेच्या वाट्याला मात्र बॉल लागण्याचा एकच सीन आलेला दिसतो...

संपूर्ण विश्वचषकादर्म्यान अतिशय खराब कामगिरी करणाऱ्या सुनील गावस्करचं नैराश्य, हॉटेलमधल्या सुनील गावस्कर आणि मानसिंह यांच्यातल्या एका दृष्याने व्यक्त झालेलं दिसतं. तिथेच, फॉर्ममध्ये असूनही दुखापतीमुळे पुढच्या सगळ्या सामन्यात खेळू न शकल्याची दिलीप वेंगसरकरची खंत, तो सल कुठेही दाखवले गेले नाहीत. दिलीप वेंगसरकर यांची हतबलता दाखवणारं एखादं दृष्य तरी असायला हवं होतं. मला न रुचलेली चौथी गोष्ट म्हणजे चित्रपटाचं नाव. चित्रपट मार्च महिन्याचा थोडा काळ आणि ज्यूनचा महिना असाच काळ दाखवतो. त्यामुळे कथानकाला शोभेल असं नाव दिलं असतं तर जास्त बरं झालं असतं. कारण १९८३ साली क्रिकेटसोबतच अजूनही चांगल्या-वाईट गोष्टी घडल्या होत्या...

कोणी फ्लॉप म्हणत असेल कोणी हिट म्हणत असेल. तरीही, रणवीर सिंहसह सर्वांच्या बेमालूम मेकपसाठी, रणवीर सिंह, जीवा व पंकज त्रिपाठी यांच्या अफलातून अदाकारीसाठी आणि भारत विरुद्ध झिम्बाब्वे या शूट न झालेल्या सामन्याचा, त्यातल्या कपिल देवच्या ऐतिहासिक विक्रमी खेळीचा आस्वाद घेण्यासाठी, कबीर खान लिखीत व दिग्दर्शित, भारतीय क्रिकेटच्या पहिल्या विश्वचषक विजयाचा प्रवास अतिशय रंजक पद्धतीने मांडणारा, "८३" हा चित्रपट थियेटरमध्येच पहावा हे नक्की...

@ अनिकेत परशुराम आपटे.

No comments:

Post a Comment