Friday, 28 January 2022

एकच शोधकथा दोन शेवट...

खून होतो, पोलीस तपास सुरू होतो. एकेक पुरावा समोर येतो. आरोप-प्रत्यारोप होतात. खुनाच्या रहस्याची उकल होते आणि खऱ्या खुन्याला शिक्षा होते. अनेक असे हिंदी चित्रपट होऊन गेले, ज्यात अशा पोलिसी शोधकथा होत्या. असेच दोन चित्रपट म्हणजे १९६९ आणि २०१७ साली प्रदर्शित झालेले, "इत्तेफ़ाक..."

इत्तेफ़ाक (१९६९)...

प्रसिद्ध चित्रकार दिलीप रॉयवर (राजेश खन्ना) त्याच्याच पत्नीच्या खुनाचा आळ येतो. या आघातामुळे दिलीप रॉयचं मानसिक संतुलन ढासळतं आणि त्याला वेड्यांच्या हॉस्पिटलमध्ये दाखल केलं जातं. दिलीप रॉय तिथून निसटतो आणि एका घरात आसरा घेतो. त्या घरात रेखा (नंदा) त्या वेळी एकटीच असते. तिथे काही विचित्र घडामोडी घडत जातात आणि त्या घरीच्या मालकाच्या म्हणजेच, जगमोहनच्या खुनाचाही आळ दिलीप रॉयवर येतो. अखेर इंस्पेक्टर कर्वेंच्या (इफ़्तिखार) चाणाक्ष तपास कार्यामुळे दोन्हीही खुनांना वाचा फुटते आणि दिलीप रॉय निर्दोष सुटतो...

इत्तेफ़ाक (२०१७)...

विक्रम सेठी (सिद्धार्थ मल्होत्रा) या प्रसिद्ध लेखकावर त्याच्या बायकोच्या खुनाचा आळ येतो. पोलिसांपासून पलायन करत विक्रम एका घरात शिरतो. काही क्षणात त्याच घरात राहणारी माया (सोनाक्षी सिन्हा) तिथून निसटते आणि पोलिसांना घेऊन परत येते, तेव्हा तिच्या नवऱ्याचा म्हणजेच, शेखरचा खून झालेला असतो आणि विक्रम तिथे सापडतो. विक्रम आणि माया दोघांच्याही वेगवेगळ्या जबान्या असतात. तसं असतानाही इंस्पेक्टर देव (अक्षय खन्ना) रहस्याची उकल करतो आणि दोन्हीही आरोपांमधून विक्रमची मुक्तता करतो...

एक आरोपी, एक मुलगी, एक इंस्पेक्टर आणि दोन खून, असं एक समान कथानक असलेल्या या दोन्हीही चित्रपटांत बरेच फरक होते ज्यामुळे दोन्हीही चित्रपट भिन्न ठरले...

१९६९च्या "इत्तेफ़ाक"मध्ये दिलीप रॉयला केंद्रस्थानी ठेऊन इतर व्यक्तिरेखांना त्याच्या सोबत गुंफून कथानक साकारलं गेलं होतं. दिलीप रॉयच्या नजरेतून चित्रपटाची कथा उलगडत गेली आणि कथेला पूर्ण करण्याच्या कामी इंस्पेक्टर कर्वे या व्यक्तिरेखेचा एक सहाय्यक म्हणून वापर केला गेला. कथानकाचा बराचसा भाग त्या बंगल्यात घडत असल्याने, प्रकाश योजना व ध्वनी यांचा वापर करून छान परिणाम साधला गेला, ज्यामुळे कथानकावर लक्ष केंद्रीत राहिलं...

२०१७ सालचा "इत्तेफ़ाक" मात्र इंस्पेक्टर देवला नायक बनवून त्याच्या दृष्टीकोनातून कथा मांडणारा चित्रपट वाटला. नायकाला विशिष्ठ स्टाईल दिली गेली होती, जिचा कथानकाशी म्हणण्यासारखा काही संबंध नव्हता. चित्रपटात अनेक लोकेशन्स वापरली गेल्यामुळे, तिथे घडणारं उपकथानक किंवा छोटे प्रसंग फारसे परिणामकारक झाले नाहीत. नायकासह सर्वच कलावंतांना बऱ्यापैकी glamorize केलं गेलं. त्यामुळे हाय प्रोफाईल मर्डर मिस्ट्री म्हणून चित्रपट पाहिला गेला...

२०१७ सालच्या "इत्तेफ़ाक"चा शेवट, नकारात्मकतेला समोर आणणारा शेवट होता. वास्तविक, 'इत्तेफ़ाक' या शब्दाचा वापर करून तशाच प्रकारचे प्रसंग घडवून चित्रपटाचा शेवट केला असता, तर नक्कीच तो योग्य ठरला असता. तिथेच, १९६९ सालच्या "इत्तेफ़ाक"चा शेवट अपेक्षित होता तसाच झाला. 'रेखा' या पात्राच्या बाजूने पाहिलं, तर तो एक दु:खांत होता. पण कथेच्या दृष्टीने, सकारात्मक विचार रुजवणारा तो एक सुखांतच होता...

१९६९ सालचा यश चोपड़ा दिग्दर्शित "इत्तेफ़ाक" आणि २०१७ साली प्रदर्शित झालेला अभय चोपड़ा दिग्दर्शित "इत्तेफ़ाक", हे एकाच धाटणीच्या कथानकावर बेतलेले दोन वेगळे चित्रपट होते. तांत्रिकदृष्ट्या, २०१७ सालचा "इत्तेफ़ाक" वरचढ असेलही, पण सर्व बाजूंनी विचार केला, तर यश चोपड़ा दिग्दर्शित "इत्तेफ़ाक" नक्कीच उजवा होता...

@ अनिकेत परशुराम आपटे.

Sunday, 23 January 2022

रटाळ व बेचव "कॉफी..."

"कॉफी की कहानी है ये... सुन ले तू ज़रा ज़रा...", रोहित राऊतच्या स्वरातलं हे गाणं आहे नितीन कांबळे दिग्दर्शित "कॉफी" या चित्रपटातलं...

तर कहानी कुछ यूँ है...

इंटिरियर डिझाइनर असलेल्या रेणुका राजवाडेला (स्पृहा जोशी) गोव्यात मोठं काम मिळतं. तिथे तिची भेट रोहित सरपोतदारशी (सिद्धार्थ चांदेकर) होते. सतत कामाचा, नवऱ्याचा म्हणजे रणजीत राजवाडेचा (कश्यप परुळेकर) विचार करणाऱ्या रेणुकामध्ये, स्वच्छंदी, कविता करणारी एक रावीही लपलेली असते. ही रावी पहिल्याच भेटीत रोहितकडे आकर्षित होते. काही काळासाठी रेणुकाला विसरून रावी रोहितसोबत जिवाचं गोवा करते...

मनसोक्त गोवा फिरल्यावर आणि रोहितसोबतची मैत्री प्रेमात बदलत असताना, बाजूला गेलेली रेणुका पुन्हा समोर येते. इथून सुरुवात होते रेणुका आणि रावीमधल्या एका प्रकारच्या द्वंद्वाची. रेणुकासाठी जितका रणजीत महत्वाचा असतो, तितकाच रावीसाठी रोहितही असतो. तिच्या या द्वंद्वामुळे तिच्यासोबत रणजीत आणि रोहितही भरडले जातात. अखेर रोहितच्या मागणीमुळे आणि रणजीतने दाखवलेल्या उच्च विचारांमुळे रेणुका आणि रावीमधलं द्वंद्व संपतं आणि एकीकडे ढीग तर दुसऱ्या बाजूला खड्डा अशा स्थितीत चित्रपट संपतो...

चित्रपटात दाखवलेली गोव्यातली लोकेशन्स अप्रतीम आहेत. चित्रपटात वापरलेले कॅमेरा एँगल्स, लाँग शॉट्स छान जमलेत. चित्रपटात अधून मधून डोकावणाऱ्या रावीच्या कविता ऐकत रहाव्याशा वाटतात. कलावंतांच्या अदाकारीबद्दल बोलावं तर ती एकसूरी वाटते. स्पृहा जोशी, "होम स्वीट होम" आणि "पुन:श्च हरिओम"चं बेयरिंग घेऊन वावरताना दिसते, सिद्धार्थ चांदेकर "झिम्मा"मधून अजून बाहेरच पडलेला दिसत नाही. आणि कश्यप परुळेकर, संपूर्ण चित्रपटात त्याच्या चेहेऱ्यावर एकच भाव दिसत राहतात...

भूतकाळ आणि वर्तमानकाळाची सांगड घालत पुढे जाणारं चित्रपटाचं कथानक थोडं तकलादू वाटतं. मध्यंतरापूर्वी एक ट्विस्ट येतो खरा, पण तो ट्विस्ट काही क्षणात फुस होऊन जातो. वास्तविक त्या ट्विस्टचा वापर करून कथानक फुलवता आलं असतं. पण तसं न केल्यामुळे आणि मध्यंतरापूर्वीचं हलकं-फुलकं कथानक गंभीर रूपात पुन्हा दाखवल्याने चित्रपट रटाळ होत जातो. नाही म्हणायला, टिपिकल पोझेसिव्ह नवरा असलेल्या रणजीतने चित्रपटाच्या अगदी शेवटी घेतलेला जगावेगळा निर्णय त्या व्यक्तिरेखेला वेगळीच ऊंची देतो...

एकंदरीत, मध्यंतरापूर्वी बऱ्यापैकी चविष्ट वाटणारी ही "कॉफी" जास्त वेळ ढवळल्यामुळे बेचव होत जाते हे मात्र नक्की...

@ अनिकेत परशुराम आपटे.

Wednesday, 19 January 2022

ऐतिहासिक पण रंजक प्रवास...

सर्वजण चांगलं-वाईट लिहित असताना किंवा बोलत असताना बहती गंगा में मी पण हात धुवावा असं वाटलं. तर "८३..."

१९८३ मधला जून महिना हा भारतीय क्रिकेटसाठी अभूतपूर्व आणि सकारात्मक बदल घडवणारा महिना होता. Under dog किंवा कच्चा लिंबू समजल्या जाणाऱ्या भारतीय संघाने त्या वेळच्या बलाढ्य वेस्ट इंडीज संघाला, आपल्या पहिल्या व स्पर्धेतल्या शेवटच्या, अशा दोन सामन्यात धूळ चारत विश्वचषक जिंकला आणि इतिहास घडवला. भारतीय संघाचा, संघ निवड ते अंतिम सामना, हा प्रवास, कबीर खानने "८३" या चित्रपटाद्वारे पडद्यापर्यंत पोहोचवला आहे...

चित्रपटात गाणी आहेत. पण ती सर्व गाणी प्रासंगिक आहेत. कथानक भरकटलं आहे किंवा वेग कमी झाला आहे असं कुठेही वाटत नाही. गाण्यांसोबतच चित्रपटात वापरलेले वेगवेगळे आवाज सुंदर जमले आहेत. विशेषत: पिचवर बॉल आधळून बाऊंस होताना, बॅट्समन बॉल्ड होताना, बॅटला बॉल लागून शॉट बसताना जो ध्वनी निर्माण होत होता तो अप्रतीम होता. कथानकासारखंच चित्रपटातलं पार्श्वसंगीतही दमदार आहे. भारतीय संघाचं आगमन होताना, सगळ्या झेंड्यांमध्ये एकच तिरंगा फडकत असलेला दिसताना वापरलेलं पार्श्वसंगीत तर छान आहेच, पण वेस्ट इंडीजचे खेळाडू, खास करून विव्ह रिचर्ड्सला पडद्यावर दाखवताना वापरलेलं पार्श्वसंगीत तर लाजवाब आहे...

चित्रपट पाहताना, त्या वेळच्या बऱ्याच छोट्या छोट्या गोष्टींचा सखोल अभ्यास झाल्याचं जाणवतं. सुनील गावस्कर, विव्ह रिचर्ड्स, श्रीकांत यांच्या बॅटिंगची पद्धत, त्यांच्या उभं राहण्याची व चालण्याची पद्धत, दिलीप वेंगसरकरला माल्कम मार्शलचा चेंडू लागल्यावर त्याचं बॅट सोडून खाली बसणं, यशपाल शर्माचा बदाम शॉट, कीर्ती आज़ादने इयान बोथमचा त्रिफळा उडवला ते दृष्य, इंग्लंडविरुद्धचा उपांत्य सामना संपण्याआधीचा गदारोळ, अंपायचं स्टम्प पकडून उभं राहणं, संदीप पाटीलचं फिल्डींग पाहून हसणं, कपिल देवने घेतलेला तो कॅच, फायनल जिंकल्यावर परत जाताना मोहिंदर अमरनाथ स्टम्प उचलण्याचा प्रयत्न करतो पण हाती काहीच लागत नाही ते दृष्य, ही सर्व दृष्य त्या त्या मॅचच्या खऱ्या दृष्यांसोबत येतात, तेव्हा ते बारकावे अधिक प्रभाव पाडतात...

एखादा बॉलर स्लो मोशनमध्ये बॉल टाकतो आणि तो बॉल पिचवर पडून थोडासा धुरळा उडतो. हे सांकेतिक दृष्य जेव्हा जेव्हा येतं तेव्हा तेव्हा त्यापुढे एखादा नाट्यमय प्रसंग घडतो. चित्रपटातल्या सामन्यांमध्ये येणाऱ्या उत्कंठावर्धक दृष्यांसाठी या स्लो मोशनचा आणि पिचवर पडणाऱ्या बॉलचा सुरेख वापर केला गेला आहे. यासोबतच फायनलमधल्या शेवटच्या विकेटला थोडं लांबवल्यामुळे या दृष्याचा चांगला परिणाम झाला आहे. खऱ्या सामन्यात अंपायरने एका झटक्यात निर्णय दिला होता आणि सामना संपला होता. पण चित्रपटात हेच दृष्य लांबवल्यामुळे त्या नंतर मिळणाऱ्या विजयाचा आनंद द्विगुणीत होतो...

चित्रपटातल्या काही बाबी मात्र मला तितक्याशा रुचल्या नाहीत. बाकी कास्टिंग तर दणदणीत आहे, पण दिपिका पदुकोण रोमी देव वाटलीच नाही कधी. खरंतर माझीच बॅट व माझंच पिच या न्यायाने निर्माती म्हणून दिपिका पदुकोणने स्वत:ला सामिल करून घेतल्यासारखं वाटलं. दुसरी गोष्ट म्हणजे सामन्यांच्या काही दृष्यांमध्ये बॉलची दिशा, मारलेल्या शॉटची दिशा आणि बॅट्समनची नजर मेळ नाही खात. तिसरी मला न रुचलेली गोष्ट म्हणजे आदिनाथ कोठारेचा वापर. संघातल्या प्रत्येक खेळाडूला एखाद-दुसरं दृष्य दिलं गेलं आहे, पण दिलीप वेंगसरकर यांची व्यक्तिरेखा साकारणाऱ्या आदिनाथ कोठारेच्या वाट्याला मात्र बॉल लागण्याचा एकच सीन आलेला दिसतो...

संपूर्ण विश्वचषकादर्म्यान अतिशय खराब कामगिरी करणाऱ्या सुनील गावस्करचं नैराश्य, हॉटेलमधल्या सुनील गावस्कर आणि मानसिंह यांच्यातल्या एका दृष्याने व्यक्त झालेलं दिसतं. तिथेच, फॉर्ममध्ये असूनही दुखापतीमुळे पुढच्या सगळ्या सामन्यात खेळू न शकल्याची दिलीप वेंगसरकरची खंत, तो सल कुठेही दाखवले गेले नाहीत. दिलीप वेंगसरकर यांची हतबलता दाखवणारं एखादं दृष्य तरी असायला हवं होतं. मला न रुचलेली चौथी गोष्ट म्हणजे चित्रपटाचं नाव. चित्रपट मार्च महिन्याचा थोडा काळ आणि ज्यूनचा महिना असाच काळ दाखवतो. त्यामुळे कथानकाला शोभेल असं नाव दिलं असतं तर जास्त बरं झालं असतं. कारण १९८३ साली क्रिकेटसोबतच अजूनही चांगल्या-वाईट गोष्टी घडल्या होत्या...

कोणी फ्लॉप म्हणत असेल कोणी हिट म्हणत असेल. तरीही, रणवीर सिंहसह सर्वांच्या बेमालूम मेकपसाठी, रणवीर सिंह, जीवा व पंकज त्रिपाठी यांच्या अफलातून अदाकारीसाठी आणि भारत विरुद्ध झिम्बाब्वे या शूट न झालेल्या सामन्याचा, त्यातल्या कपिल देवच्या ऐतिहासिक विक्रमी खेळीचा आस्वाद घेण्यासाठी, कबीर खान लिखीत व दिग्दर्शित, भारतीय क्रिकेटच्या पहिल्या विश्वचषक विजयाचा प्रवास अतिशय रंजक पद्धतीने मांडणारा, "८३" हा चित्रपट थियेटरमध्येच पहावा हे नक्की...

@ अनिकेत परशुराम आपटे.

Sunday, 9 January 2022

लव्हर बॉय क्रिश...

'डुग्गू' हे नाव ऐकल्यावर कोणाचा चेहेरा डोळ्यांसमोर येत असेल, तर तो आहे घाऱ्या डोळ्यांचा, ऊंचपुरा अभिनेता हृतिक रोशन...

त्याच्या अडखळत बोलण्यामुळे, लहानगा हृतिक बऱ्याच वेळा चेष्टेचा विषय बनायचा. अनेक वेळा त्याचे लोकांसमोर हसेही झाले. पण आपल्या जिद्दीने डुग्गूने या व्यंगावर मात तर केलीच, शिवाय एक मोठा अभिनेता म्हणूनही नावारूपाला आला...

१९८० साली प्रदर्शित झालेल्या "आशा" या चित्रपटातून अकस्मातच डुग्गू रुपेरी पडद्यावर दिसला. हृतिकचे अजोबा जे. ओमप्रकाश, "आशा" चित्रपटातल्या एका गाण्याचं चित्रिकरण करत असताना हृतिक तिथेच नाचत होता. कॅमेरा हृतिकवर येऊन स्थिरावला आणि शॉट कट न होता तसाच चालत राहिला. अशा पद्धतीने हृतिकचं रुपेरी पडद्यावर पहिलं पाऊल पडलं. पुढे "आस पास", "आपके दिवाने", "भगवान दादा" या चित्रपटांमधून एक बाल कलाकार म्हणून डुग्गू दिसला खरा, पण त्याचा खरा प्रवास अजून सुरू व्हायचा होता...

काही काळ चंदेरी दुनियेपासून लांब राहिलेला हृतिक पुन्हा परतला तो सहायक दिग्दर्शक म्हणून. हृतिकच्या वडिलांनी म्हणजे राकेश रोशनने दिग्दर्शित केलेल्या "खुदगर्ज", "किंग अंकल", "करन-अर्जून" आणि "कोयला" या चार चित्रपटांच्या सहायक दिग्दर्शनाची जबाबदारी हृतिकने सांभाळली. हृतिकने चित्रपटांत नायक म्हणून काम करावं असं सलमान खानने राकेश रोशनला सुचवलं होतं असं म्हणतात. ऊंची आणि चेहेऱ्यासोबतच हृतिकची शरीरयष्ठी सुदृढ होण्यासाठी सलमान खाननेच त्याला मार्गदर्शन केलं असंही ऐकण्यात आहे. "करन-अर्जून" प्रसारित झाल्याच्या पाच वर्षानंतर एक चांगलं कथानक घेऊन राकेश रोशन यांनी हृतिकला नायक म्हणून मोठ्या पडद्यावर आणलं...

२००० साली प्रदर्शित झालेल्या "कहो ना प्यार है" या चित्रपटामधून एक नायक म्हणून हृतिक समोर आला. त्याची दुहेरी भूमिका, देखणा चेहेरा, अप्रतीम अदाकारी, सुंदर नृत्य, कथानक, या सर्वांच्या एकत्रित ताकदीमुळे "कहो ना प्यार है"ने अफाट यश मिळवले आणि डुग्गू युवा पिढीच्या गळ्यातला ताईत बनला. काहीतरी वेगळं करण्याच्या इराद्याने केलेले "फिज़ा", "मिशन कश्मीर", "यादें" अयशस्वी ठरले आणि हृतिकची लोकप्रियता थोडी कमी झाली. पण "कभी ख़ुशी कभी ग़म" यशस्वी झाला आणि डुग्गू आघाडीच्या अभिनेत्यांच्या यादीत सामील झाला...

एकसूरी रोमँटिक भूमिका करत असताना हृतिकने दिलेले काही चित्रपट यशस्वी झाले, तर काही प्रेक्षकांच्या पसंतीतून उतरले. अशावेळी हृतिकने हाणामारी व गंभीर भूमिकांकडे मोर्चा वळवला. "बँग बँग", "अग्नीपथ", "धूम २", "जोधा-अक़बर", "गुज़ारीश", "क्रिश", "वॉर", "सूपर ३०" असे चित्रपट बऱ्यापैकी यश संपादन करताना हृतिक रोशन एक परिपक्व अभिनेता म्हणून यशस्वी होत गेला. सहायक दिग्दर्शक व अभिनेता म्हणून लोकप्रिय होत असताना हृतिकने पार्श्वगायनातही आपला गळा आजमावत, "काइट्स", "सूपर ३०" आणि "ज़िंदगी ना मिलेगी दोबारा" या चित्रपटांतून गाणीही गायली...

एक उत्तम अभिनेता, ऊंचपुरं व देखणं व्यक्तिमत्व, घारे डोळे व लहान मुलासारखं निरागस हास्य असलेल्या डुग्गूचा, अर्थात हृतिक रोशनचा आज वाढदिवस. लोकप्रियतेत वडिल राकेश रोशन यांच्याही दोन पावलं पुढे असलेल्या या लव्हरबॉय क्रिशला वाढदिवसाच्या मनापासून शुभेच्छा...

@ अनिकेत परशुराम आपटे.