Thursday, 24 June 2021

हिरव्या डोळ्यांची लोलो...

"व्हॉट इज मोबाईल नंबर...", "प्यार दिलों का मेला है...", "सरकाई लो खटिया जाड़ा लागे...", " सेक्सी सेक्सी सेक्सी मुझे लोग बोले..." अशा अनेक उडत्या चालींच्या गाण्यांवर दिलखेचक नृत्य करणारी अभिनेत्री म्हणजे 'लोलो...' अर्थात आपल्या सर्वांच्याच परिचयाच्या प्रसिद्ध अभिनेत्री करीष्मा कपूर...

चित्रपटसृष्टीतील प्रतिष्ठीत कपूर घराण्याचा वारसा लाभलेल्या लोलोने आजपर्यंत कपूर घराण्यातल्या कुठल्याही सदस्यासोबत चित्रपटात काम केलं नाही. अर्थात, लोलोची धाकटी बहीण करीना कपूर-ख़ान यांच्या नवऱ्यासोबत म्हणजेच अभिनेते सैफ अली ख़ानसोबत जेव्हा लोलोने चित्रपट केले तेव्हा सैफ अली ख़ान यांचा कपूर घराण्याशी संबंध जोडला गेला नव्हता. कॉलेज सोडून चित्रपटांत यायचं असं लोलोने ठरवलं आणि १९९१ साली प्रदर्शित झालेल्या "प्रेम क़ैदी" या चित्रपटाद्वारे नायिका म्हणून त्यांनी रुपेरी पडद्यावर पदार्पण केलं...

"प्रेम क़ैदी"सोबत, "जागृति", "निश्चय", "सपने साजन के" असे एकापाठोपाठ लोलोचे पाच-सहा चित्रपट अयशस्वी झाले. पण अजय देवगणसोबतचा "जिगर" आणि व्यंकतेशसोबतचा "अनारी" हिट झाले आणि लोलो पुन्हा प्रगतीपथावर आल्या. "शक्तिमान", "धनवान", "दुलारा", "प्रेम शक्ति"सारखे चित्रपट अयशस्वी होत असताना डेविड धवन-गोविंदा-सलमान ख़ान या त्रिकुटाने लोलोचा हात धरला आणि "कूली नं. १", "जुड़वा", "साजन चले ससुराल", "दुल्हन हम ले जाएँगे" अशा हिट विनोदी चित्रपटांची रांग लागली...


"लोलो फक्त गोविंदा आणि डेविड धवन याच्या विनोदी चित्रपटांमधून काम करतानाच यशस्वी होते...", "नायकाप्रधान चित्रपटात नाच-गाणी करणारी नायिका किंवा डांसिंग डॉल म्हणूनच ती चालते...", अशा बतावण्या होत असताना, "राजा हिंदुस्तानी", "जीत", "बिवी नं.१", "जानवर", "रिश्ते" अशा चित्रपटांमधून आपल्या अदाकारीची किमया दाखवत लोलोने प्रेक्षकांची पसंती मिळवली. "दिल तो पागल है", "फ़िज़ा", "ज़ुबेदा" आणि "शक्ति" या चित्रपटांतल्या लोलोच्या अदाकारीने तर त्यांना फिल्म फेयरसोबत राष्ट्रीय पुरस्कारही मिळवून दिला...

चित्रपटांसोबतच लोलोच्या वैयक्तिक आयुष्यातही बरेच चढ-उतार होते. मुलींनी चित्रपटसृष्टी काम करू नये या विचांरांचे असल्याने लोलोचे वडील अभिनेते रणधीर कपूर व त्यांची आई अभिनेत्री बबीता यांच्या नात्यात काहीसा दुरावा निर्माण झाला होता. पण कालांतराने तो मिटला. याशिवाय, अजय देवगण व अभिषेक बच्चन या अभिनेत्यांसोबत लोलोचं नाव जोडलं गेलं. काही काळापुरतं या नात्यांची चर्चा झाली खरी, पण २००३मध्ये या चर्चेला पूर्णविराम मिळाला जेव्हा संजय कपूर या उद्योगपतीशी लोलोचं लग्न झालं...

लग्नानंतर काही वर्षांसाठी चित्रपटसृष्टीतून दूर गेलेल्या लोलोने "डेंजरस इश्क़" या चित्रपटाद्वारे पुनरागमन केलं. चित्रपटाने सणकून मार खाल्ला पण लेलोच्या अभिनयाची चर्चा मात्र झाली. आज २५ जून. हिरव्यागार डोळ्याच्या, गोऱ्यागोमट्या लोलोचा अर्थात करीष्मा कपूरचा आज वाढदिवस. लोलोला वाढदिवसाच्या मनापासून शुभेच्छा...


"तुमसा कोई प्यारा कोई मासूम नहीं है...
क्या चीज़ हो तुम ख़ुद तुम्हें मालूम नहीं है..."

@ अनिकेत परशुराम आपटे.

Tuesday, 15 June 2021

डांसिंग गनमास्टर...

“डिस्को डान्सर” हे शब्द कानी पडताच आपल्याला आठवतात गौरांग चक्रवर्ती अर्थात आपल्या सर्वांच्या परिचयाचे मिथुनदा म्हणजेच प्रसिद्ध अभिनेते मिथुन चक्रवर्ती...

कोलकात्यात जन्मलेल्या मिथुनदांनी त्यांच्या प्रदीर्घ कारकिर्दीची सुरुवात, १९७६ साली प्रदर्शित झालेल्या “मृगाया” या चित्रपटाने केली. लक्षात घेण्याची गोष्ट म्हणजे याच चित्रपटासाठी मिथुनदांना त्यांचा पहिला राष्ट्रीय पुरस्कारही मिळाला होता. पुढे, “दो अनजाने” व “फूल खिले हैं गुलशन गुलशन” या चित्रपटात छोट्या भूमिका साकारताना, १९७८ साली प्रदर्शित झालेला “मेरा रक्षक” हा चित्रपट त्यांचा पहिला यशस्वी चित्रपट ठरला. तिथून मिथुनदांना मिळाली “Action Hero” ही नवी ओळख आणि “सुरक्षा”, “जागीर”, “वतन के रखवाले”, “कमांडो”, “बॉक्सर”, “ग़ुलामी” अशा हाणामारी चित्रपटांची लांबच लांब रांग लागली. काही चित्रपट अयशस्वी ठरले तर काही यशस्वी झाले, पण मिथुनदांवर चित्रीत झालेल्या साहस व हाणामारीच्या दृश्यांची विशेष चर्चा राहिली...

एकीकडे मिथुनदांचे हाणामारीवाले चित्रपट चर्चेत असताना, त्या आणि इतर काही चित्रपटांमधली त्यांची नृत्यही प्रशंसा मिळवून गेली. १९८२ साली प्रदर्शित झालेल्या “डिस्को डान्सर” या चित्रपटाने मिथुनदांना “डान्सर नट” ही नवी ओळख मिळाली. त्यांच्या, “Pelvic Dance Style” या विशिष्ट नृत्यप्रकाराने अक्षरश: धुमाकूळ घातला होता. ८०चं दशक मिथुनदांचा सुवर्णकाळ होता असं म्हणायला हरकत नाही. जवळ जवळ शंभरहून अधिक चित्रपटात झळकून मिथुनदांनी प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं. एकीकडे नृत्य तर दुसरीकडे हाणामारी अशा दुहेरी रस्त्यावरून मार्गक्रमण करताना, “शौकीन”, “पसंद अपनी अपनी”, “बात बन जाये” अशा काही वेगळ्या विषयांवरच्या चित्रपटात काम करत मिथुनदांनी प्रशंसा मिळवली. ९०च्या दशकात मिथुनदांनी काही काळ चित्रपटांपासून लांब राहत ऊटी येथे ‘मोनार्क हॉटेल’ बसवलं...

त्या ठिकाणी होणाऱ्या चित्रपटांच्या चित्रिकरणादरम्यान मिथुनदांनी चित्रपटकर्त्यांना आपल्याच हॉटेलमध्ये राहण्याची व्यवस्था करून दिली. याचमुळे मिथुनदांसाठी अनेक चित्रपटांचे दरवाजे उघडले आणि लो बजेट व बी ग्रेड हाणामारीच्या चित्रपटांचा जणू पाऊसच पडला. अशा चित्रपटात रमले असताना २००५ साली प्रदर्शित झालेल्या “ऐलान” या थरारपटाने मिथुनदा पुन्हा मुख्य प्रवाहात आले. तो चित्रपट फारसा चालला नाही, पण मिथुनदांची अदाकारी आणि संवादफेक स्तुती मिळवून गेली. मिथुनदांच्या या सेकंड इनिंगमध्ये, “गुरू”, “दिल दिया है”, “लकी”, “गोलमाल ३”, “हाऊसफुल २”, “लक” अशा अनेक चित्रपटांमध्ये सहायक व्यक्तिरेखेत ते झळकले...

अदाकारीखेरीज मिथुनदा प्रसिद्ध होते चित्रपटांमधील त्यांच्या विविध नावांमुळे. "सुरक्षा"मधला 'गनमास्टर जी ९' असो किंवा "डिस्को डांसर"मधला 'जिमी' असो, "अग्निपथ"मधला 'कृष्णन अय्यर एम.ए.' असो किंवा "बॉक्सर"मधला 'शंकर' असो, मिथुनदांना मिळालेली चित्रपटातली नावं त्यांच्या चित्रपटांइतकीच लोकप्रिय होती...

आज १६ जून. मिथुनदांचा आज वाढदिवस. या डांसिंग गनमास्टरला वाढदिवसाच्या मनापासून शुभेच्छा...

कोई शक...

@ अनिकेत परशुराम आपटे.

Tuesday, 8 June 2021

ग्लॅमरस गोरिया...

"चुराके दिल मेरा गोरिया चली...", "किताबें बहुत सी पढ़ी होंगी तुमने...", "शट अप एँड बाऊंस...", "तू मेरे टाईप का नहीं..." ही उडत्या चालींवरची गाणी ऐकली किंवा पाहिली की एकच चेहेरा आठवतो. तो चेहेरा म्हणजे अश्विनी शेट्टी, अर्थात नामांकित अभिनेत्री शिल्पा शेट्टी-कुंद्रा...

१९९३ साली प्रदर्शित झालेल्या "बाज़ीगर" या चित्रपटाद्वारे रुपेरी पडद्यावर यशस्वी पदार्पण करणाऱ्या शिल्पा शेट्टी यांच्या अभिनयाची सुरुवात झाली ती १९९२ साली निर्मिती अवस्थेत असलेल्या, "गाता रहे मेरा दिल" या चित्रपटाद्वारे. तो चित्रपट प्रदर्शित होऊ शकला नाही आणि वर्षभराने "बाज़ीगर"ने बाजी मारून शिल्पा शेट्टीसाठी यशाची दालनं उघडली...

"आग", "मैं खिलाड़ी तू अनारी", "औज़ार", "गँब्लर", "हथकड़ी", "इंसाफ", "जंग" अशा मसाला चित्रपटांमधून ग्लॅमरस भूमिका साकारताना शिल्पा शेट्टी यांची 'ग्लॅम गर्ल' अशी ओळख बनली होती. शिल्पा शेट्टी या नायिका असलेले काही चित्रपट यशस्वी झाले तर काही आपटले. पण शिल्पा शेट्टी यांच्या ग्लॅमरस अवतारांची तारीफ मात्र होत राहिली...

एकीकडे ग्लॅमरस भूमिका साकारताना, अभिनयक्षमतेला वाव मिळेल अशा वेगळ्या भूमिकाही शिल्पा शेट्टी यांनी सहज साकारल्या. "आओ प्यार करें", "धड़कन", "रिश्ते", "गर्व", "दस", "लाईफ इन अ मेट्रो" अशा चित्रपटांत शिल्पा शेट्टी यांच्या अभिनयाची विशेष स्तूती झाली. "फिर मिलेंगे" या चित्रपटातली एका एच.आय.व्ही. पीडित महिलेची कहाणी दाखवणारी तमन्ना ही व्यक्तीरेखा शिल्पा शेट्टी यांच्या अभिनय कालखंडातली सर्वोत्तम भूमिका होती असं माझं तरी मत आहे...

रुपेरी पडद्यावर झळकताना, "झलक दिखला जा" या नृत्यविषयक कार्यक्रमात परिक्षक म्हणून आणि "सेलिब्रिटी बिग ब्रदर ५" या परदेशी कार्यक्रमात स्पर्धक म्हणून झळकत शिल्पा शेट्टी यांनी छोटा पडदाही गाजवला. "सेलिब्रिटी बिग ब्रदर ५" या कार्यक्रमात वर्णाबाबत अत्यंत लाजिरवाणी वागणूक व बोलणी शिल्पा शेट्टी यांना मिळाली होती. छोट्या पडद्यावरच्या या वादग्रस्त कार्यक्रमात अखेर शिल्पा शेट्टीच विजेत्या ठरल्या होत्या...

एक कलावंत म्हणून शिल्पा शेट्टी जितक्या प्रसिद्ध होत्या, तितकीच लोकप्रियता त्यांनी केलेल्या समाजकार्यातही त्यांना मिळाली. एड्स विषयी माहितीपूर्ण कार्यक्रमांत आणि 'पेटा' या संस्थेच्या जनावरांच्या शोषणाविरोधी कार्यक्रमांत शिल्पा शेट्टी यांनी मोलाचा हातभार लावला. या शिवाय, स्वास्थ्यविषयक अनेक जाहिरातींमधूनही शिल्पा शेट्टी यांनी कामं केली आहेत...

आठ जून रोजी या ग्लॅमरस गोरियाचा जन्मदिवस असतो. उशीरा का होईना, पण त्यांना वाढदिवसाच्या मनापासून शुभेच्छा...

@ अनिकेत परशुराम आपटे.

Monday, 7 June 2021

सागर जैसी आँखोंवाली बॉबी...

‘हम तुम एक कमरे में बंद हो... और चाबी खो जाए...’ “बॉबी” चित्रपटातलं हे गाणं ऐकलं की आपल्याला आठवते प्रसिद्ध अभिनेत्री डिंपल कपाडिया. वयाच्या १६व्या वर्षीच आपल्या अभिनयाच्या जोरावर प्रकाशझोतात आलेल्या अभिनेत्री डिंपल कपाडिया यांचा “बॉबी” हा पहिला चित्रपट होता...

लहान वयात मिळालेल्या सुवर्ण संधीचे डिंपल कपाडिया यांना त्या वेळी सोने करता आलं नाही. याचं कारण असं, की “बॉबी” प्रदर्शित होण्याच्या आधी डिंपल कपाडिया यांनी ‘सूपर स्टार’ राजेश खन्ना यांच्याशी विवाह केला आणि सांसारिक जबाबदाऱ्या पार पाडण्यासाठी चित्रपटसृष्टीतून सन्यास घेतला...

“बॉबी” चित्रपटानंतर तब्बल १२ वर्षांनी डिंपल कपाडिया यांनी “सागर” या चित्रपटाद्वारे रुपेरी पडद्यावर पुनरागमन केलं. चित्रपटाच्या यशाबरोबरच एक उत्तम अभिनेत्री आणि नायिका म्हणून डिंपल कपाडिया प्रेक्षकांच्या मनात विराजमान झाल्या. पुढे, “अर्जून”, “जाँबाज”, “इंसानियात के दुश्मन”, “राम लखन”, “बँटवारा”, “लेकिन”, “आग का गोला”, “नरसिंह” अशा अनेक वेगवेगळ्या विषयांच्या चित्रपटांमधून नायिका म्हणून त्या प्रेक्षकांसमोर येत राहिल्या...

"सेक्स सिंबॉल" किंवा "सौंदर्यवती" या ओळखींना बाजूला सारत, नायिकाप्रधान चित्रपटांतल्या संवेदनशील भूमिकांमध्ये डिंपल कपाडिया जास्त दिसल्या. "प्रहार", "क्रांतिवीर", "काश", "दृष्टि", "गर्दीश", "औरत औरत औरत", अशा चित्रपटांमधून गंभीर स्वरूपाच्या भूमिका निभावताना त्या दिसल्या. "रुदाली" या चित्रपटातली त्यांची अदाकारी तर आपण विसरत नाहीच, पण चित्रपटाच्या शेवटी त्यांनी दिलेला रडण्याचा शॉट आजही अंगावर काटा उभा करतो...

नायिका, सहनायिका किंवा संवेदनशील अभिनेत्री म्हणून आपण सर्वच डिंपल कपाडिया यांना ओळखतो. पण एक खलनायिका म्हणूनही त्यांनी आपला चाहतावर्ग तयार केला तो १९८८ साली प्रदर्शित झालेल्या, "बीस साल बाद" या भयपटाद्वारे. चित्रपट फारसा चालला नाही, पण डिंपल कपाडिया यांनी साकारलेली प्रियकराला परत मिळवणाऱ्या एका अतृप्त आत्म्याची भूमिका विशेष लक्षात राहिली...

विविध प्रकारच्या चित्रपटांमधून यशस्वी होत असताना डिंपल कपाडिया यांनी आपला मोर्चा सहायक आणि चरित्र भूमिकांकडे वळवला. "दिल अशना है”, “दिल चाहता है”, “बनारस”, “हम कौन है”, “दाबंग”, “पतियाला हाऊस”, "वेलकम २" या चित्रपटांमधून चरित्र आणि सहायक भूमिका करताना डिंपल कपाडिया यांनी स्वत:चे वेगळे असे स्थान मिळवले...

आज ८ जून. हिंदी चित्रपटसृष्टीतल्या, सागर जैसी आँखोंवाल्या बॉबीचा म्हणजेच डिंपल कपाडिया यांचा आज वाढदिवस. आजच्या दिवसाच्या त्यांना मनापासून शुभेच्छा...

@ अनिकेत परशुकाम आपटे.

Thursday, 3 June 2021

बहुरंगी मामा...

 

'मी मिस्टर धनंजय माने, आणि हा माझा बायको पार्वती...’, ‘काळा पहाड म्हणतात मला, काळा पहाड...’, ‘छें, कित्तें रें, मी प्रोफेसर धोंड...’, ‘व्ह्हा विह्ही वूह्हू...’ हे अजरामर संवाद कानी पडले एक आठवण होते अशोक मामांची म्हणजेच दिग्गज अभिनेते अशोक सराफ यांची...

१९६९ साली प्रदर्शित झालेल्या “जानकी” या चित्रपटाद्वारे त्यांनी रुपेरी पडद्यावर पदार्पण केले. पुढे २५०हून अधिक चित्रपटांमधून झळकत अशोक मामा यांनी रुपेरी पडदा गाजवला. त्यांनी बहुतकरून विनोदी चित्रपटांमध्ये जास्त भूमिका निभावल्या. “गुपचूप गुपचूप”, “एक डाव भुताचा”, “भुताचा भाऊ”, “धूम धडाका”, “अशी ही बनवाबनवी”, “गोंधळात गोंधळ”, “एकापेक्षा एक”, “ठकास महाठक”, “बिनकामाचा नवरा” अशा अनेक विनोदी चित्रपटांमधून नायक म्हणून प्रेक्षकांसमोर येत अशोक मामा अत्यंत लोकप्रिय झाले...

विनोदी अभिनेते म्हणून प्रसिद्ध असेलेले अशोक मामा संवेदनशील आणि गंभीर स्वरूपाच्या भूमिकांमध्येही तितकेच लोकप्रिय झाले. “भस्म” या चित्रपटातली अशोक मामांची वेगळ्या धाटणीची व्यक्तिरेखा आजही प्रेक्षकांच्या स्मरणात आहे. त्याचसोबत, “वाट पाहते पुनवेची”, “अनपेक्षित” , “वजीर” अशा काही चित्रपटांमधूनही अशोक मामा नकारात्मक भूमिकेतही दिसले. “चौकट राजा”, “मधुचंद्राची रात्र”, “आपली माणसं”, “हेच माझं माहेर”, “कुंकू”, “एक उनाड दिवस” अशा चित्रपटांमधून अशोक मामा यांच्या गंभीर आणि सक्षम अभिनयाची प्रेक्षकांना ओळख पटली...

मराठी चित्रपटांमध्ये अत्यंत लोकप्रिय असलेले अशोक सराफ मराठी नाटकांमध्येही तितकेच अग्रेसर होते. “हमिदाबाईची कोठी”, “अनधिकृत”, “मनोमिलन”, “सारखं छातीत दुखतंय”, “संगीत संशयकल्लोळ”, “लगीनघाई” ही अशोक मामा अभिनीत नाटकं आजही रसिकांच्या मनात घर करून आहेत. मराठी चित्रपट आणि नाटकांमध्ये अशोक मामांची कारकीर्द बहरत असताना हिंदी मालिका आणि चित्रपटांमध्येही हात आजमावला...

“करण-अर्जून”, “कोयला”, “घर घर की कहानी”, “सिंघम”, “प्यार किया तो डरना क्या”, जोरू का गुलाम”, “गुप्त”, “येस बॉस” अशा अनेक हिंदी चित्रपटांमध्ये अशोक मामांच्या छोट्या-छोट्या भूमिका प्रचंड गाजल्या. शिवाय "डोंट वरी हो जाएगा", "चुटकी बजाके" या हिंदी मालिकांमधून झळकत अशोक मामांनी प्रशंसा मिळवली. “हम पांच” या गाजलेल्या हिंदी मालेकेतल्या अशोक मामांच्या 'आनंद माथूर' या व्यक्तिरेखेने अफाट यश मिळवलं आणि अशोक मामा मराठीसोबत हिंदी चित्रपट आणि मालिकाक्षेत्रातही अतिशय यशस्वी व लोकप्रिय झाले...

मिळालेले चित्रपट, नृत्यशैली आणि संवादफेक यांसाठी अशोक मामा जितके प्रसिद्ध होते, तितकेच ते जाणले गेले चित्रपटांतल्या त्यांच्या जोड्यांमुळे. मराठी चित्रपटसृष्टीतली सर्वात यशस्वी जोडी म्हणजे अशोक-लक्ष्या. "धमाल जोडी", "धमाल बाबल्या गणप्याची", "एक गाडी बाकी अनाडी", "बाळाचे बाप ब्रह्मचारी", "अफ्लातून", "तू सुखकर्ता" असे लोकप्रिय चित्रपट देत ही जोडी मराठी चित्रपटसृष्टीत अजरामर झाली. मराठी चित्रपटांतली अजून एक बहुचर्चित जोडी म्हणजे सचिन-अशोक. "भुताचा भाऊ", "आमच्यासारखे आम्हीच", "गम्मत जम्मत" अशा चित्रपटांमुळे ही जोडी प्रेक्षकांच्या मनात घर करून गेली...

"नाकावरच्या रागाला औषध काय..." आणि "अश्विनी ये ना..." या गाण्यांनीसुद्धा अशोक मामांसोबत एक वेगळी जोडी जमवली. ती जोडी होती अशोकमामा आणि योगायोगाची. "नाकावरच्या रागाला..." हे गाणं स्वत: अशोक मामांनी गायलं होतं तर "अश्विनी ये ना..." या गाण्यासाठी दिग्गज गायक किशोर कुमार यांनी आपला आवाज दिला होता. यात योगायोगाचा भाग असा, की ही दोन्हीही गाणी अशोक मामांवर चित्रीत झाली होती आणि दोन्हीही गाण्यांच्या गायकांचं मराठीतलं ते पहिलंच गाणं होतं...

आज ४ जून. अशोक सराफ नावाच्या या चतुरस्त्र अभिनेत्याचा आज जन्मदिवस. मराठी-हिंदी नाट्य-चित्रसृष्टीच्या या बहुरंगी मामांना वाढदिवसाच्या मनापासून शुभेच्छा...

@ अनिकेत परशुराम आपटे.